विश्वास : विश्वास हे विविध वस्तूंशी, व्यक्तींशी, अन्य प्राण्यांशी, विचारप्रणालींशी, मूल्यांशी, तत्त्वांशी किंवा अद्‌भूत, कल्पित मानल्या जाणाऱ्या विषयांशीही जडणारे भावनात्मक नाते आहे. ‘ईश्वराच्या अस्तित्वावर माझा विश्वास आहे’, ‘त्या माणसाच्या प्रामाणिकपणावर माझा विश्वास आहे’, ‘तुम्ही निश्चितपणे विजयी व्हाल, असा मला विश्वास वाटतो’, अशी वा अशा प्रकारची विधाने दैनंदिन जीवनात आपण अनेकदा ऐकतो. त्यांचा आशय लक्षात घेतला, तर ‘विश्वास’ ह्या शब्दाचा अर्थ ‘खात्री’, ‘श्रद्धा’ ह्या शब्दांच्या अर्थाजवळ येतो, असे दिसून येईल. विशेषत: ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाला ‘श्रद्धा’ हाच शब्द सामान्यत: वापरला जातो.

विश्वास निर्माण करणारे काही घटक व्यक्तिमनाच्या बाहेरचे, तर काही व्यक्तीमनातले असतात. व्यक्तिमनाच्या बाहेरचे जे घटक असतात, त्यांत निरनिराळ्या स्त्रोतांपासून मिळालेली माहिती हा घटक विशेष महत्त्वाचा होय. उदा., दूरदर्शन, नभोवाणी, वर्तमानपत्रे ह्यांसारख्या प्रसारमाध्यमांतून जे संदेश पुन्हा पुन्हा दिले जातात, ते त्यांच्या प्रभावी सूचनक्षमतेमुळे त्यांच्यावरील विश्वास उत्पन्न करतात. उदा., दूरदर्शनवरील विविध उत्पादनांच्या जाहिराती. त्या पाहून ती उत्पादने अत्यंत दर्जेदार आणि खात्रीलायक गुणवत्तेची असली पाहिजेत असा विश्वास कित्येकांच्या मनात निर्माण होऊ शकतो. तसेच वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेली वृत्तेही शंभर टक्के विश्वसनीय म्हणून अनेक लोक स्वीकारीत असतात.

प्रत्यक्ष अनुभवामुळेही विश्वास निर्माण होतो. एखाद्या व्यक्तीच्या प्रामाणिकपणावरील इतरांचा विश्वास हा त्या व्यक्तीच्या प्रामाणिकपणाचा नेहमीच अनुभव येत गेल्यामुळे निर्माण झालेला असतो. अशा व्यक्तींनी पुरविलेल्या माहितीवरही विश्वास टाकला जातो. तथापि कधी कधी वृत्त पुरविणारी व्यक्ती वा माध्यम खात्रीलायक नसतेही. परंतु त्या स्त्रोतापासून वा सूत्रापासून मिळालेली माहिती ज्यांच्या सोयीची असते, त्यांचा तिच्यावर त्वरित विश्वास बसतो. काही व्यक्तींची एक विशिष्ट प्रतिमा निरनिराळ्या प्रसारमाध्यमांतून निर्माण करण्यात आलेली असते. त्या व्यक्ती प्रत्यक्षात कशा आहेत, ह्याचा काहीच अनुभव नसताना तीच प्रतिमा विश्वासार्ह म्हणून स्वीकारण्याची सर्वसामान्य माणसांची वृत्ती असते. एखादी राजकीय विचारप्रणालीही प्रसारमाध्यमांद्वारे केल्या जाणाऱ्या परिणामकारक प्रचारातून लोकहिताची कशी आहे हे दाखवून तिच्यासंबंधी लोकांचा विश्वास निर्माण केला जातो.

अनेक लोक दीर्घकाळ जे करीत आले, ते इष्टच असले पाहिजे ह्या विश्वासामुळेच अनेक पारंपरिक चालीरीती कोणतीही चिकित्सा न करता स्वीकारल्या जातात. धर्मग्रंथांतील प्रत्येक वचनावरील विश्वास हा ह्याच पद्धतीने निर्माण झालेला असतो.

विश्वास निर्माण करणारे काही घटक व्यक्तिमनाच्या बाहेर जसे असतात, तसे काही व्यक्तिमनातही असतात. आपल्या परिसरातील घटकांना सर्व व्यक्ती सारख्याच पद्धतीने प्रतिक्रिया देत नाहीत. व्यक्तीचे वय, तिची मानसिक वाढ, तिचा अनुभव, तिच्या व्यक्तिमत्वातील परिपक्वता अशा अनेक घटकांवर त्या – त्या व्यक्तीची प्रतिक्रिया अवलंबून असते. त्यामुळे विविध व्यक्तींच्या विश्वासांचे जगही वेगवेगळे असते. उदा., आईवडील, शिक्षक ह्यांची मते लहान मुले चिकित्सा न करता खरी म्हणून विश्वासाने स्वीकारतात. त्याचप्रमाणे विचार करण्याची जबाबदारी टाळणारे काही प्रौढही इतर जे काही सांगतात, ते सर्व विश्वासार्ह मानून त्यांच्या मतांवर विश्वासाने अवलंबून राहतात. मानसिक रूग्णांच्या मनात वस्तुस्थितीशी विसंगत अशा प्रकारचे अनेक विश्वास निर्माण होतात. तथापि ह्या प्रकारच्या विश्वासाला संभ्रम ही संज्ञा योग्य ठरते. काही मनोविकृत स्वतःला राजा, सर्वसत्तावंत, परमेश्वर मानतात. तर काही मनोरूग्ण स्वतःला पापी, गुन्हेगार समजतात.

विश्वास ठेवणे आणि शास्त्रीय पुराव्यांनी सिद्ध झालेल्या वस्तुस्थितीचा स्वीकार करणे ह्यांत फरक करावा लागेल. उदा., ‘पृथ्वी गोल आहे, ह्यावर माझा विश्वास आहे’ असे म्हणणे चमत्कारिक ठरेल.

पाटकर, शोभा