मनोविश्लेषण : सिग्मंड फ्रॉइड (१८५६-१९३९) यांनी मांडलेल्या मानवी मनाविषयीच्या सिद्धांतप्रणालीला आणि मानसोपचार  पद्धतीला मनोविश्लेषण ही संज्ञा वापरली जाते मनोविश्लेषण म्हणजे, फ्रॉइड यांच्या सिद्धांतचौकटीला धरून केलेले मनाचे अन्वयन आणि स्पष्टीकरण. मानशास्त्रीय विचाराचा आवाका वाढवण्याचे आणि सखोल करण्याचे काम फ्रॉइड यांनी केले. त्यामधून एक स्वतंत्र संप्रदायही अस्तित्वात आला. फ्रॉइडपासून आजतागायत या संप्रदायातही अनेक वळणे येऊन गेली.

मानवी मनोव्यवहाराच्या विश्लेषणाचा आरंभ जरी फार प्राचीन असला, तरी एकोणिसाव्या शतकातील वैज्ञानिक विचाराची प्रगती अभूतपुर्वच होती. मानसशास्त्रात ती दोन प्रकारे जाणवली : एक म्हणजे भौतिक विज्ञानाची वस्तुनिष्ठ आणि सार्वत्रिक पद्धती स्वीकारून व्हुंट यांनी सुरू केलेले प्रायोगिक मानसशास्त्र व दुसरा प्रकार म्हणजे मानवाच्या समग्र आकलनासाठी मूलतत्वांची व संकल्पनांची चौकट मांडणारे

मनोविश्लेषणवादी सिद्धांत. या सिद्धांताची व्यवस्थित मांडणी आणि सर्व मानवी वर्तनाला कवेमध्ये घेण्याची त्याची क्षमता या दोन वैशिष्यांमुळे फ्रॉइड हे विसाव्या शतकातील सर्वात महत्वाचे मानसशास्त्रज्ञ गणले जातात. त्यांच्या नंतरच्या प्रत्येक मानसशास्त्रज्ञाला त्यांची दखल घ्यावीच लागली. ही प्रणाली मानणारे, ह्या  प्रणालीस पुर्णपणे टाकाऊ समजणारे आणि या प्रणालीला आपापल्या परीने वळण लावणारे अशा तीन वर्गात फ्रॉइड यांच्या नंतरच्या मानसशास्त्रज्ञांची विभागणी करता येईल. साहित्य, कला, धर्म, पुराणकथा, संस्कृती, सर्वसामान्य वर्तन, विकृतवर्तन या सर्वच प्रश्रांवर फ्रॉइड यांनी काही मूलतत्वांच्या आधारे नवा प्रकाश टाकला.

मनोविश्लेषणवादी विचाराने धर्म, नीती, आध्यात्मिक उन्नतीचे मार्ग या क्षेत्रांसमोर एक नवा प्रश्र उभा केला. कारण मानवी मनोरचनेची बैठक ईश्वरनिरपेक्ष सहजप्रवृत्ती व चैतन्यशक्ती यांच्या आधारे मांडून मनोविश्लेषणवादाने सृष्टिनियमाचा शोध घेण्याची वैज्ञानिक पद्धती अंगीकारली. यातून मूल्यसंकल्पना त्रिकालाबाधित, की संस्कृतिसापेक्ष, हा प्रश्र घसाला लावायला मदत झाली आणि आध्यात्मिक उन्नती ही उन्नती आहे, एखाद्या विकृतीचे उदात्तीकरण आहे, हा अस्वस्थ करणारा प्रश्र उत्पन्न झाला. 

मनोविकृतिग्रस्त, गुन्हेगार, कलावंत अशा वेगळ्या माणसांच्या वेगळेपणाचा अन्यवही मनोविश्लेषणाच्या चोकटीत लावून दाखवतायेत असल्यामुळे, त्यामागे काही अनाकलनीय ईश्वरी वा दिव्य संकेत असतात, या समजुतीलाही तडा गेला.

या प्रकारे पापपुण्य, दैवी लेणे, त्रिकालाबाधित मूल्ये या सर्वच गोंष्टीबाबत मूलभूत प्रश्र नव्याने मांडणारा हा सिंद्धांत काहींना पाखंडी, मूर्तिभंजक वाटला, तर काहींना सत्यान्वेषी विचाराचा अग्रदूत मासला. मनोविश्लेषणवादाला कडवे समर्थक व कट्टर विरोधक मिळाले आहेत.

मानसशास्त्रज्ञांमध्येही समर्थक व विरोधकांच्या फळ्या उभ्या राहिल्या. मनोविश्लेषणवादी संकल्पनांनी मानसशास्त्राचे काम अंतिम टप्प्यावर आणले असे मानणारे समर्थक त्याच्या उपयोजनाच्या मागे लागले, तर विरोधक त्याची बैठकच नाकारून मापनाधिष्ठित सिद्धांताचे प्रतिपादन करू लागले आणि या सार्‍यातूनच या सिद्धांतप्रणालीच्या संबंधात प्रायोगिक अभ्यासही सुरू झाला.

विसाव्या शतकातील विचारमंथनात मनोविश्लेषणवादाचा स्पष्ट सूर मानसशास्त्र, सौंद्रर्यशास्त्र, साहित्य, कलासमीक्षा या सर्व प्रांतांत ऐकू येतो.

पार्श्वभूमी : वैद्यकीय ज्ञान आणि मानसशास्त्र या दोहोंतील संगमभूमी ही फ्रॉइड यांच्या कामाचे आरंभश्थान होय. त्यावेळी जाणिवेचे विश्लेषणात्मक मानसशास्त्र ⇨व्हिल्हेल्म व्हुंट (१८३२-१९२०) यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठीय स्तरावर विकास पावत होते, त्यावेळीच वैद्यकीय क्षेत्रात मज्जाविकृतीवरील चिकित्सेच्या निमित्ताने एक नवीन द्दष्टिकोन अस्तित्वात आला होता. पॅरिस येथे ⇨झां मार् त शार्को (१८२५-९३) संमोहनाचा अवलंब करून ओऔन्मादिक विकृतीवर चिकित्सा करीत होते. नॅन्सी शहरी बर्नहाईम हेही मनोमज्जाविकृतींवर संमोहनचिकित्सा करीत होते. मनोविकृतींना शारीरिक स्वरूपाचीचकारणे असतात हा केवळ शरीरवादी द्दष्टिकोन असमाधानकारक ठरू लागला होता. कारण, काही मनोविकृतींच्याबाबतीत कोणतेच शारीरिक कारण आढळून येत नव्हते. साहजिकच, कमजोर इच्छाशक्ती, मानसिक ताण-तणाव, सूचनवशता, अयोग्य सवयी इ. गोष्टी विचारात घेण्यात येऊ लागल्या होत्या. संमोहित अवस्थेत रूग्‍णास सूचना देऊन त्याची औन्मादिक लक्षणे दूर करता येतात, असे ⇨प्येअर झाने (१८५९-१९४७) यांनाही आढळले होते. या सर्व गोष्टीच्या ऊहापोहातून जाणिवेचे स्तर आणि मानसोद् भव शारीरव्याधी या दोन संकल्पना आकारू लागल्या होत्या.

मनोविकृतीवरील उपचाराच्या द्दष्टीने संमोहन ही पद्धती फ्रॉइड यांनी शार्को यांच्याकडे जाऊन अभ्यासली. ⇨ योझेक ब्रॉइअर (१८४२-१९२५) यांनी संमोहनावस्थेतील भावविरेचनाचे तंत्र वापरून उन्मादलक्षणे बरी करण्यात यश मिळविले फ्रॉइड आणि ब्रॉइअर यांनी या तंत्राचा अधिकाधिक वापर करून स्टडीज इन हिस्टेरिया हा ग्रंथ प्रसिद्ध केला (१८९३-९५).

परंतु संमोहनावरस्थेत ज्या स्मृती व भावना व्यक्ती सहज शब्दांकित करू शकते त्या जागेपणी कोठे असतात. त्या शब्दरूप का घेऊ शकत नाहीत, या संकल्पनात्मक प्रश्रांबरोबरच संमोहनचिकित्सेच्या काही मर्यादाही लक्षात येऊ लागल्या होत्या एक तर, काही रूग्ण संमोहित होत नसत. खाजगी रूग्णांच्या बाबतीत संमोहनचिकित्सा फारशी यशस्वी होत नाही, असे ही  फ्रॉइड यांना नॅन्सी येथे कळले होते (१८८९). तिसरी गोष्ट म्हणजे संमोहनचिकित्सा ही चिकित्सकव रूग्ण यांच्या व्यक्तिसापेक्ष अशा संबंधांवर अवलंबून असते. ब्रॉइअरप्रमाणेच फ्रॉइड यांच्या अनुभवास असेही आले, की संमोहनाद्वारे बर्‍या होऊ लागलेल्या रूग्ण स्त्रीच्या भावना व अभिवृत्ती चिकित्सकाकडे वळू लागतात व हे संक्रमण (ट्रान्सफरन्स) योग्य आणि व्यवस्थित रीत्या हाताळणे संमोहनपद्धतीमध्ये कठीण जाते.  संमोहनपद्धतीने झालेली सुधारणाही तात्पुरतीच ठरे, दुसरेच एखादे विकृतिलक्षण द्दग्गोचर होऊ लागे. म्हणून वरील उणिवा नसलेली व विकृती समूळ नाहीशी करू शकेल अशी पद्धती फ्रॉइड यांना आवश्यक वाटू लागली. तू जागा झाल्यानंतर तुला हे सर्व आठवू शकेल अशी सूचना संमोहित अवस्थेत देऊन ठेवली, तर रूग्णास ते सर्व आठवू लागते ही गोष्ट फ्रॉइड यांनी नॅन्सी येथे पाहिली होती. तेव्हा, जागृत अवस्थेत असतानासुद्धा रूग्णास शरीराने व मनाने शिथिल अवस्थेत ठेवले व मनात जे विचार येतील ते येऊ देत म्हणून सांगितले, तर या मुक्त साहचर्य पद्धतीने त्याला एरवी न आठवणार्‍या लहानपणापर्यतच्या प्रसंगापर्यंत पोहचणे शक्य होईल असे त्यांना वाटले.[संमोहनविद्या].


म्हणून ‘भावविरेचन’ याऐवजी ‘मनोविश्लेषण’ ही संज्ञा त्यांनी निवडून स्वत:ची अशी चिकित्सापद्धती आकाराला आणली आणि त्या पद्धतीच्या पायाभूत संकल्पना प्रस्तुत केल्या. या संकल्पना दोन प्रकारच्या आहेत: (१) मनुष्याच्या मानसिक रचनेचे स्वरूप सांगणार्‍या संकल्पना. यामध्ये अबोध मनाचा सिद्धांत,आदिम कामप्रेरणेची (लिबिडो) संकल्पना आणि व्यक्तिमत्वरचनेचा सिद्धांत यांचा समावेश होतो. (२) वर्तनांचे कार्यकारणभाव विशद करणार्‍या संकल्पना. यांमध्ये सहजप्रवृत्ती, प्रेरणांचे द्विध्रुवात्मक स्वरूप, सुखतत्व, व्यक्तिमत्वातील अहं ने निर्माण केलेल्या स्वरक्षक यंत्रणा इत्यादींचा समावेश होतो.

मनुष्याची मानसिक रचना :  वर्तनाच्या व मनोव्यापारांच्या उलगड्यासाठी मन ही संकल्पना शरीर यापेक्षा वेगळी कल्पून मनाचे धर्म, मनाचे व्यापार इ. कल्पनांच्या साहाय्याने अनुभवाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न फार प्राचीन काळापासून झालेला आहे. त्यात,मनाची संज्ञाशक्ती किंवा जाणीव, स्वप्न, भास, सुषुप्ती, ध्यान, समाधी यांसारख्या जाणिवेच्या अवस्था ‘आत्मा’ हे सूक्ष्मतम तत्व कल्पून समाविष्ट केल्या जात होत्या.

फ्रॉइड यांनी मन ही संकल्पना तीन स्तरांच्या रूपात मांडली मानवी मनाच्या कक्षा बोधावस्था, बोधपूर्व अवस्था आणि अबोधावस्था अशा तीन थरांत विस्तारलेल्या असतात, हा त्यांचा मुख्य सिद्धांत होय. ज्या मानसिक घटना आमि स्मृती यांची वर्तमानकाळात व्यक्तीला जाणीव असते, तो बोध स्तर होय. याखेरीज स्मृती व इच्छांचे एक भांडार असते. ते सर्वच्या सर्व प्रत्यक्ष जाणिवेत नसते, परंतु सहजपणे उपलब्ध होऊ शकते. हे बोधपूर्व मन. ⇨अबोध  मनात खोल गाडलेल्या स्मृती, इच्छा, प्रच्छन्न प्रेरणा दबून राहिलेल्या असतात. या मनाचा काही भाग आदिम स्वरूपाचा, पाशवी विचार आणि वासनांचा बनलेला व केवळ सुखाची इच्छा धरणारा असतो. तो कधीच बोध कक्षेत आलेला नसतो. उरलेल्या अबोध कक्षेत बोधजाणिवेतून हद्दपार केलेल्या धक्कादायक, क्लेशकारक व लज्जास्पद इच्छा, विचार, स्मृती इ. गोष्टींचा कल्लोळ चालू असतो. यामुळे अबोध मनाच्या ठिकाणीही प्रेरक शक्ती असते. अबोध मनाची कक्षा बोध मनाच्या मानाने खूपच विस्तृत असते. म्हणून फ्रॉइड यांनी बोध मनाला हिमनगाचा पाण्यावरील द्दश्य भाग अशी उपमा दिली.

बोध मन आणि बोधपुर्व मन यांच्या आशयात (कन्टेन्ट) आंतरिक सुसंगती असते, कालक्रम आणि बाह्या  वास्तव यांच्याशी मिळते घेण्याची क्षमता असते. अबोध मन मात्र कालक्रमनिरपेक्ष, विस्कळित, वालिश क्षमता असते. अप्रगत आणि आदिम असते. त्यातील आशयाला बोध मनात यायला प्रतिबंध होत असतो.

मनाच्या या प्रकारच्या रचनेमुळे, नियत्रंण झुगारू पाहणारे अबोध मन आणि बाह्या वास्तवातील नियमांच्या अंकित असणारे बोध मन व बोधपूर्व मन यांचे सतत द्वंद्व  चालू असते. अबोध मन अत्यंत आवेगमय प्रेरणांनी रसरसत असते. त्याला प्रतिंबध होत असला, तरी ते सतत धडका देत असते. भलतेच शब्द अमावितपणे तोंडून देणे, सोईस्कर विस्मरण, कल्पनाशक्तीच्या लीला, स्वप्ने, आंतरिक संघर्ष व अस्वस्थता, मज्जाविकृतीची लक्षणे या सर्व गोष्टी अबोध मनाच्या अस्तित्वाच्या खुणा आहेत. गंभीर चित्तविकृतींमध्ये तर अबोध मनाच्या सर्व भिंती कोसळून तेथील खदखदणारे रसायन थेट अभिव्यक्तीच्या टप्प्यावर प्रवेश मिळविते.

अबोध मनाच्या या वैशिष्यांच्या निर्मिती करणार्‍या ह्या शक्तीसाठी लिबिडो ही संज्ञा फ्रॉइड यांनी वापरली. लिबिडी वा कामप्रेरणा या शक्तीचे रूपच कामुक आहे, ही संकल्पना प्रस्तुत करून मानवी मनोरचनेचे इतर सर्व आराखडे फ्रॉइड यांनी कोलवून टाकले. मुळातील चैतन्यशक्ती ही सर्वव्यापी तर खरीच, पण तीच कामुक, लैंगिकही आहे असे म्हटल्याने सर्व कृती, वयाच्या सर्व अवस्थांतील वर्तनाचा तपशील, उन्नतीची सर्व धडपड हे सारे काही कामुकतेचे आविष्कार बनले. कामप्रेरणा ही संकल्पना फर्इड यांनी एकाच वेळी अत्यंत व्यापक केली आणि ती ठामपणे शारीर अशा रूपातही मांडली.त्यामुळे त्यांचा धिक्कार झाला. तरीपण सर्व शरीरव्यापारांतून, इच्छापूर्तींतूनउपभोगातून जे काही सुख मिळते ते कामकुच वा कामप्रेरणारूपच असते, ही मूळ कल्पना सोडून न देता व्यक्तीचा मानस-लैंगिक विकास कोणते टप्पे घेत घेत होतो, हेही फ्रॉइड यांनी विशद केले.

बालकांच्या लैंगिकतेचा विकासक्रम व तिच्याशी संबंधित असलेल्या बालकांच्यामानसिक जीवनातील घटनांचा क्रम फ्रॉइड यांनी वर्णन केला आहे, तो असा: पहिल्या वर्षी बालकाची लैंगिकता ओष्ठ व मुखकेंद्रित असते. दूध पिताना किंवा भूक नसतानादेखील बोट, बूच चोखून, वस्तू चावत राहून मूल ओष्ठस्पर्शसुख मिळवीत असते.ही त्याच्या लैंगिकतेची मुखकेंद्रित (ओरल) अवस्था होय. तिसर्‍या वर्षाच्या सुमारास मलविसर्जनाच्या क्रियेततसेच मल रोखून धरण्यात व तज्जन्य संवेदन अनुभवण्यात मुलाला आनंद वाटू लागतो. ही गुदकेंद्रित ( ॲनल) अवस्था होय. चौथ्या वर्षाच्या सुमारास मूल मूत्रोत्सर्गाच्या वेळचे सुख अनुभवू लागते तसेच हळूहळू स्वत: च्या जननेंद्रियाशी चाळा करू लागते. ही बालकाची लैंगिकतेची अननेंद्रिये वा लिंग केंद्रित (जेनिटल) अवस्था होय. स्वत:च्या शरीरात रममाण होण्याची बालकाची ही प्रवृत्ती स्वत:चे प्रतिबिंब पाहून स्वत:वरच प्रेम करू लागलेल्या नार्सिसस ची आठवण करून देते. म्हणून स्वत:च्याच शरीरापासून सुख मिळणार्‍या ह्या आत्मरतिपर लैंगिकतेस फ्रॉइड यांनी नार्सिसझम म्हटले आहे. [“आत्मरति].

तीन ते सहा वर्षे या वयात मुलामुलींच्या लैंगिकतेस वेगळी दिशा मिळते. मातापिता हे तिचे विषय बनतात. बालकाच्या मातापित्यांविषयीच्या प्रेमात लैगिक छटा येऊ लागते. संगोपनासाठी म्हणून मुलाला त्यांची असाणारी गरज, स्तनपानाच्या प्रसंगी मातेकडून आणि स्नानादी प्रसंगी मातापित्यांकडून मिळणारे स्पर्शसुख, मातापित्यांच्या वात्सल्याचा भाग म्हणून त्यांच्याकडून मिळणारे चुंबन, आलिंगनादींमुळे मिळणारे  उद्दीपन या सर्वांमुळे बालकाला मातापित्यांचे आकर्षण वाटू लागते. याच वयात स्वत:चे उघडे शरीर पाहण्याची प्रवृत्ती, परपीडनाचा आनंद अनुभवण्याची प्रवृत्ती (सॅडिझम), दुसर्‍याकडून दुखवून घेण्यात आनंद अनुभवण्याची प्रवृत्ती (मॅसोकिझम) या प्रवृत्तीही दिसून येऊ लागतात. परंतु मातापित्यांची दटावणी, शरीरातून बाहेर पडलेल्या मलमूत्राची वृणा व नैतिक संस्कार यांमुळे काही प्रवृत्तींचे निरोधन होत असते. [“परपीडन व स्वपीडन विकृति].

ईडिपस गडाचा उद् भव व निरास: तीन ते सहा या वयात मुलामुलींमध्ये मातापित्यांविषयी कोमल प्रीतीभावाबरबरच द्वेष अशी संमिश्र अभिवृत्तीही निर्माण होते. मुलाला मातेविषयी आकर्षण व पित्याविषयी द्वेष वाटू लागतो,तर मुलीला पित्याविषयी आकर्षण व मातेविषयी द्वेष वाटू लागतो, तर मुलीला पित्याविषयी आकर्षण व मातेविषयी द्वेष वाटू लागतो. भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित होण्याची अत: प्रेरित प्रवृत्ती, मातेला मुलगा, तर पित्याला मुलगी अधिक आवडते ही गोष्ट, आणि आईकडून हव्या असणार्‍या प्रेमात मुलाला स्व: चा पिता स्पर्धक व पित्याकडून प्रेमात मुलीला ही स्पर्धक वाटते. ह्या गोष्टींचा या प्रकाराशी संबंध असतो. [“ईडिपस गंड].


सहा ते बारा या वयोगटातला फ्रॉइड यांनी सुप्त कामुकतेचा काळ म्हटले आहे. या काळात आईवडीलांनी प्रेम व्यक्त केल्यास मुलांना ते आवडत नाही, पण मनातून दोघांबद्दलही त्यांना ओढ वाटत असते. त्यांच्या आत्मरतीसही ओहोटी लागते.

बारा ते वीस या वयात तीन अवस्था अंतर्भूत आहेत. वयात येण्याच्या शारीरिक घडामोडींमुळे बाल्यावस्थेतील मुखवर्ती, उत्सर्जनवर्ती आणि जननेंद्रियवर्ती कामुकतेचे चक्र एकबार पुन्हा या वयात दिसू लागते. अतिशय तीव्र शरीर संवेदना आणि तरल जाणीव हे या पहिल्या टप्प्याचे विशेष. दुसर्‍या टप्प्यात आत्यंतिक सुह्द भाव आणि समलिंगीयासक्ती यांचा समावेश होतो. या वयातील भिन्नलिंगी व्यक्तींची मैत्री समाजातही तितकीशी मान्य नसते आमि स्वत:च्याच कामप्रेरणेने गोंधळलेली ही मुले समलिंगी समूहाच्या सुरक्षिततेतच स्वत:ला गुरफटवून घेत असतात. यानंतरच्या टप्प्यांवर प्रथमत: अल्पजीवी, प्रायोगिक स्वरूपाची प्रेमप्रकरणे व नंतर अधिक गंभीर व अर्थपुर्ण प्रेमसंबंध उत्पन्न होऊ लागतात. लैंगिक जीवन व जबाबदारी यांचे योग्य आकलनही  तोवर झालेले असते.

अबोध मन आण मनोलैंगिक शक्तीचा विकास यांचा हा आराखडा एकीकडे सामान्य अनुभवाशी सुसंगत तर वाटतो, परंतु त्यातील तपशिलाच्या अनेक गोष्टी संस्कृतीने नेहमी अप्रस्त वा पापी ठरवलेल्या होत्या आणि फ्रॉइड तर कामुकतेला, लैगिकतेला अत्यंत ठामपणे केंद्रस्थानी बसवून मानसिक आरोग्य आणि विकृती या दोन्हींची खुली चर्चा करत होते. फ्रॉइड क्रांतिकारक वाटतात, त्याचे मुख्य कारण हेच आहे. त्यांची मूलग्राही वैज्ञानिक सर्वेकद्दष्टी कोणालाच आपले बुरखे टिकवू देत नव्हती. कारण ही तत्वे प्रत्येक व्यक्तीच्या मनोरचनेमध्ये  कशी अनुस्यृत असतात, हेही त्यांनी सांगितले.

फ्रॉइड यांनी माणसाचे ⇨व्यक्तिमत्व तीन भागांत विभागले आहे. या भागांना ⇨दम् किंवा सुप्तात्मा (इड), ⇨अहम् (एगो) आणि श्रेष्ठात्मा किंवा ⇨पराहम् (सुपर एगो) अशी नावे त्यांनी दिली. इदम् किंवा सुप्तात्मा हा अबोध मनाचे प्रतिनिधित्व करणारा भाग. सामान्यपणे माणसातील पशु असे त्याचे वर्णन करता येईल. त्याला तर्क, नियम यांचे वावडे असते. विस्कळित, विसंगत, वास्तवाचा संपर्क नसलेल्या अनेक इच्छा, वासना, विकार या भागात वास करीत असतात. श्रेष्ठात्मा किंवा पराहम् म्हणजे एरव्ही आपण सदसद् विवेकबुद्धी म्हणतो ती [” सदसद् बुद्धि]. याचा काही भाग अबोध मनाचा असतो. नीती, विधिनिपेध, आदर्श यांच्यामार्फत निर्णय व नियत्रंण ही कार्ये तो करतो. अहम् हा व्यक्तिमत्वाचा प्रशासक घटक. त्याचा बराच भाग सबोध आणि काही बोधपुर्व असतो. त्याचा इदम् आणि पराहम् शी संपर्क असतो. (१) शारीरिक पोषण व संरक्षण (२) इदम् चे वास्तवानुरूप नियंत्रण, (३) सामाजिक वास्तवाशी ⇨संघर्ष निर्माण करणार्‍या वासनांचे ⇨निरोधन, (४) इदम् आणि पराहम् यांचा मेळ घालणे इ. मुख्य कामे अहम् पार पाडत असतो.

मनाच्या या रचनेमध्ये गुंतागुंत निर्माण होते ती प्रेरणांच्या द्विध्रुवात्मकतेमुळे कारण, एकूण जैविक शक्ती जीवनाभिमुख प्रेरणांप्रमाणेच मरणाभिमुख प्रेरणांनाही जन्म देते. त्यामुळे एकाच वेळी प्रेम आणि द्वेप, एकाच ठिकाणी विधायक व विध्वंसक वृत्ती, जगणार्‍याची ओढ आणि मरणाचीही ओढ असा प्रकार उत्पन्न होतो. यातून कोणत्या प्रवृत्तींचे प्राबल्य निर्माण होईल त्यानुसार वर्तनास दिशा मिळते.

फ्रॉइड यांच्या या संकल्पनांमुळे माणसाच्या स्वत:विषयीच्या आकलनात भर पडली. आत्मवंचना करून स्वत:सुप्रतिष्ठित प्रतिमा जपत बसण्याचे त्याला कारण उरले नाही, त्याबरोबरच कामप्रेरणेच्या अंकित राहून तिचा धिक्कार करण्यापेक्षा तिचे स्वरूप समजावून घेण्याकडे लक्ष वळवणे शक्य झाले.

वर्तनामागील कार्यकारणभाव : मनुष्य जसा वागतो तसा तो का वागतो या प्रश्रनाचे उत्तर देताना फ्रॉइड यांनी सहजप्रेरणांचा स्वत:च्या चौकटीशी सुसंगत असा सिद्धांत मांडला. व्यक्तिमत्त्वाची रचना कार्यान्वित करणारी तत्वे म्हणजे सहजप्रेरणा. संवेदन, स्मरण, विचार या इतरप्रक्रियांना दिशा मिळते ती या प्रेरणांमुळे. वर्तनाचा रोख आणि विरामस्थान या दोन्हींचे नियंत्रण सहजप्रेरणा करतात. सहजप्रेरणांची ऊर्जा शारीरिक गरजांमधून निर्माण होते. शरीरातील कमतरता भरून निघाली, की सहजप्रेरणेचे ध्येय साध्य होते. या व्यवहारात इतर काही दुय्यम साध्ये उत्पन्न होतात. अंतिम साध्यांना फ्रॉइड यांनी आंतरिक साध्ये म्हटले, तर दुय्यम साध्यांना त्यांनी बाह्या साध्ये म्हटले. शरीरांतर्गत उणिवेमुळे ताण व ध्येयप्राप्तीमुळे विराम, असे हे चक्र चालते. ताण नाहीसा होण्याने मिळणारा आनंद तीव्रतर करण्यासाठी मनुष्य काही वेळा ताण वाढवण्याचा मार्गही आधी स्वीकारतो. आवर्तन, पुनरावर्तन आणि सुखसाधन हे सहजप्रेरणांचे  विशेष असतात.

सहजप्रेरणा व्यक्तिमत्वाच्या इदम् मधून उद् भवतात. इदम् हे ऊर्जेचे भांडार आहे, त्यातून सतत वेगवेगळ्या व्यवहारांना लागणाऱ्याऊर्जेचा पुरवठा होत असतो. त्याचा वापर अहंच्या निर्मितीसाठीही होतो.फ्रॉइड यांच्या सिद्धांतात सहजप्रेरणांचे दोन वर्ग सांगितलेले आहेत. एक वर्ग जीवनाभिमुख प्रेरणांचा आणि दुसरा मरणाभिमुख प्रेरणांचा. जीवनाभिमुख प्रेरणांमध्ये ‘अहम्’ मधून येणार्‍या प्रेरणा आणि ‘लिबिडो’ मघृन येणार्‍या प्रेरणा असे दोन वर्ग फ्रॉइड यांनी सांगितले: ‘अहं’ प्रेरणा जीवरक्षणात्मक, वास्तव तत्वाशी बांधलेल्या, तर लिबिडा-प्रेरणा जातिरक्षणात्मक, परंतु प्रेमविषयाशी बांधलेल्या, सुखतत्वाने भारलेल्या. मरणाभिमुखतेचे मुख्य रूप आक्रमण प्रवृत्ती. या प्रेरणाविषयक सिद्धांताचे खालील तत्त्कावरून समजून येईल.


जैविक कार्यशक्ती

∣ 

       

जीवनाभिमुख प्रेरणा

वा जीवन – प्रेरणा

(इरॉस)

मरणाभिमुख प्रेरणा वा

मृत्यु –प्रेरणा

(थॅनॅटॉस)

       
       

आक्रमक प्रवृत्ती यांची

(इतरांवर   आक्रमण,

हत्या, आत्महत्या इ.)

लिविडो

अहंप्रेरणा

लैंगिक प्रेरणा

भूक, तहान, स्वरक्षण, स्वप्रस्थापन इत्यादी.

समूहप्रस्थापन इत्यादी

या वर्गीकरमातून मानवी वतन समजावून घेण्याचा एक मार्ग तयार झाला. कवींनी व इतर कलावंतांनी रेखून दाखविलेल्या काही आकृतिबंधांचे विश्लेषण या सिंद्धांताने करता येऊ लागले.निर्मिती आणि विध्वसं, व्यक्ती आणि समाज, विवेक आणि अत्याचार, प्रेम आणि द्वेष यांच्या द्वंद्वांचे अनेक आविष्कार या सिद्धांताच्या आधारे आकलन होऊ लागले.

या प्रेरणांचे कार्य सांगताना लिविडोचे कार्य मीलनाने, अहम् चे कार्य समाजमान्यतेने आणि आक्रमकतेचे कार्य विघटन क्रियेने होते, असे मनोविश्लेषणवादाचे प्रतिपादन आहे. यांपैकी मौलनाची ओढ अगदी सहजपणे स्त्री –पुरूष संबंधांपुरती माहीत होती. परंतु तिचे एक टोक आत्मरती आणि दुसरे टोक विश्वात्मकता होय, हा फ्रॉइड यांचा प्रतिभाशाली सिद्धांत आहे. त्याचप्रमाणे समाजमान्यतेसाठी मनस्वी मार्गांना मुरड घालणेहेही सर्वांच्या परिचयाचे होते, परंतु त्याचेच एक टोक आत्मवंचना आणि दुसरे टोक स्वार्थत्याग असते हे मात्र काहीसे परिचित असले, तरी माणसालाआवडण्याजोगे नव्हते. मरणाभिमुख प्रेरणा ही कल्पना तर अगदीच नवी होती. त्याविषयीचे फ्रॉइड यांचे चिंतनही दीर्घकाळ चालू होते. याचा उल्लेख सिव्हिलायझेशन अँड इट्स डिस्कन्टेट्स या पुस्तकात आला आहे. मृत्यु प्रेरणेचे आक्रमक आविष्कार म्हणजे माणसाच्या सांस्कृतिक विकासाला खीळ घालणारी अंतर्गत शक्तीच आहे, हे विधान त्यांनी या चिंतनाच्या आधारे केले आणि प्रत्यक्ष वर्तनात जीवनाभिमुख आवुष्कारातही क्रौर्याच्या ज्या छटा दिसतात, त्यांचा अन्व्य लावणे शक्य झाले.

 या सिद्धांतामुळे मानवी प्रेरणांची बौद्धिक द्दष्टया अधिक समाधानकारक मांडणी झाली. मानवी वर्तनाच्या गुंतागुंतीच्या प्रत्ययाला त्या आधीचे सिद्धांत पुरे पडत नव्हते. वर्तनवादी विचार केवळ शारीर घटकांवर भिस्त ठेवून होता, तर मॅक्डूगलचा सिद्धांत ⇨सहजप्रेरणांच्या होती. त्यांच्या तुलनेत, मूलत: द्विध्रुवात्मक मांडणी करून यांची मिश्रणे ज्या यंत्राणांनी होतात त्या यंत्रणांचाही प्रंपच करून फ्रॉइड यांनी निश्चितच अधिक समाधानकारक मांडणी केली. या प्रेरणांचे अंत:संवंध उकलून दाखवण्याची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली.

हे अंत:संबंध सांगताना आत्मरती, अहंसंरक्षक यंत्रणा आणि मृत्युप्रेरणेचे विध्वंसनात्मक आविष्कार त्यांनी स्वत:च्याप्रतिभेने झालेल्या आकलनातून स्पष्ट केले, कधी एकेका रूग्णाच्या  जीवनेतिहासातून, तर कधी समूहांच्या इतिहासातून.

लिबिडो किंवा कामप्रेरणा ही प्रेमविषयाशी निबद्ध होण्याची स्वाभाविकच धडपड करते, परंतु अहम् आकाराला येण्यापुर्वी हा प्रेमविषय म्हणजे स्वत:च अशी स्थिती असते. हीप्राथमिककोटीची आत्मरती होय. तिच्यामुळेच शारीरक्रिया व त्यापासून मिळणारे सुख यांचा पाठपुरावा बालपणी चालू असतो. पुढे ही अवस्था ओलांडली जाते, तरी पण आत्मरती पूर्णत: लोप मात्र पावत नाही.

इतरांच्या प्रेमाबाबत ⇨ वैफल्यभावना जाणवली, की कामप्रेरणेचा काही अंश पुन्हा अहम् कडे वळतो. ही दुय्यम कोटीची आत्मरती होय. स्वत:च्या देखणेपणाचे कौतुक, स्वत:च्या अवगुणांकडे डोळेझाक आणि गुणांवर भर, इतरांच्या प्रेमासाठी व कौतुकासाठी आसुसलेपणा या गोष्टी दुय्यम आत्मरतीच्या द्योतक दुय्यम कोटीची आत्मरती ह्या संकल्पनेच्या साहाय्याने फ्रॉइड यांनी मानसिक आघातमूलक मज्जाविकृती, सीमारेषेवरील चित्तविकृती आणि खुद्द चित्तविकृती (विशेषत: छिन्नमानस विकृती) यांची उपपत्ती लावली आहे. [⟶ चित्तविकृति, छिन्नमानस, मज्जाविकृति].

रूग्णाच्या स्वपणांचा  लैंगिक आशय तसेच त्यांच्या कल्पित अशा लैंगिक आशययुक्त स्मृती वगैरे गोष्टी लक्षात घेऊन फ्रॉइड यांनी लैंगिक वा कामप्रेरणेवर – लिविडोवर –काही वर्षेपर्यंत खूपच भर दिला.

अहम् आणि लिविडो यांच्या एकत्रित कार्यातून जीवरक्षण व जातिरक्षण साध्य होते. अहम् चे लक्ष समाजमान्यतेवर व लिबिडोचे लक्ष सुखप्राप्तीवर हे सुख प्रथमत: आत्मरतीतून व नंतर नंतर परप्रीतीतून मिळविण्याची धडपड चालते. दुसरी व्यक्ती आणि अधिकाधिक व्यापक होत जाणारे समूह, हे लिबिडोचे प्रेमविषय बनत जातात आणि समूहजीवनाला प्रेरणांचा आधार मिळतो. अहम् च्या कार्यामुळे अनिर्वध सुखाची अशक्यता जाणली जाते व लिबिडोच्या सुखलोलुपतेस काबूत ठेवले जाते.

मृत्युप्रेरणा : प्रेमतत्वाच्या अंकित असलेल्या प्रेरणांच्याहून अगदी भिन्न स्वरूप व उद्दिष्ट असलेली अशी मृत्यूप्रेरणा अथवा विनाशनप्रेरणा फ्रॉइड यांनी मानली आहे. मृत्यु हेच जीवनाचे अंतिम टोक असते. विघटन वा मृत्यु (थॅनॅटॉस) हेही निसर्गांचे तत्व असते. अजीव द्रव्यातून अस्तित्वात आलेले सजीव द्रव्य पुन्हा पूर्वीच्या अजीव स्थितीप्रत  जाऊ पहात असते, असे फ्रॉइड यांनी प्रतिपादन केले व आक्रमक प्रेरणेस ह्या विनाशन प्रेरणेची प्कतिनिधी म्हणून गणले. पूर्वी लैगिंक प्रवृत्तींना जितके महत्व देण्यात आले होते, तितकेच महत्व त्यांनी नंतर आक्रमक प्रेरणेस दिले व तिचे दमन हेही मानसिक आरोग्यास बाधक गणले.

व्यक्तीची ही उपजत मृत्युप्रेरणा जन्मापासूनच परिशराशी चालणार्‍या झगड्याचे रूप घेत असते. तीही कामप्रेरणेमाणेच बाह्या विषयांकडे वळत असते. फ्रॉइड यांच्या मते मृत्युची मुलांना पडणारी स्वपने ही विनाशन प्रेरणेचेच आविष्कार असतात. दुसर्‍या व्यक्तीची संमती नसताना आपली कामतृप्ती करून घेणे, दुसर्‍याची चीजवस्तू हस्तगत करण्याचा मोह, दुसर्‍याला इजा करण्याचा मोह, सत्तेविरूद्ध बंड करण्याची इच्छा, प्रतिस्पर्ध्याविषयी मत्सर, जनसमूहांची स्थलांतरेझाल्यावेळचे निर्घुण अत्याचार, हुणांच्या आणि मोगलांच्या स्वार्‍या, जेरूसलेमची खिश्चनांनी केलेली लूट, महायुद्धातील अंगावर शहारे आणणारे प्रकार हे स्र्व आक्रमक प्रेरणेचेच पुरावे होत. त्यांचे आणखी प्रतिपादन असे आहे, की बाह्या विषयाकडे वळलेल्या आक्रमकतेबाबत वैफल्य आले, तर ती प्रेरणा(लिबिडोप्रमाणेच)( इंट्राजेक्ट) होते अशा वेळी अहंचाचपरंतपु कार्यत :वेगळा झालेला भाग असा जो पराहम् तो ती आक्रमकता स्वत:कडे घेतो व आतल्या आत अहंविरूद्ध वापरू लागतो. ⇨आत्महत्येची इच्छा, स्वत:ला क्लेश देण्याची किंवा शिक्षा घेण्याची इच्छा, आत्मनिंदेची प्रवृत्ती इ. प्रकार यातून उद् भवतात.


मृत्युप्रेरणा वा आक्रमकतेची उपजत प्रेरणा मानून फ्रॉइड यांनी त्यांच्या पुर्वीच्या प्रतिपादनात सुधारणा करून जी भर घातली, ती अशी: (१) जीवनानुकूल आणि जीवनविनाशक प्रेरणा नेहमी एक मेकींत कमीअधिक प्रमाणात मिसळलेल्या असतात. (२) माणसाच्या विधायक स्वरूपाच्या कृतीमध्येदेखील प्रेरणेची साथ असतेच असते.  (३) बालकांना पित्याविषयी वाटणार्‍या द्वेषात तसेच भावंडातविषयी वाटणार्‍या मत्सरात आक्रमक प्रेरणेचादेखील भाग असतो. (४) लैंगिक सुखाचा भाग म्हणून परपीडनाची प्रेरणा म्हणजे लैंगिक प्रेरणेचे ते केवळ विकृत रूप नसून तिचे मूळ आक्रमक प्रेरणेत असले पाहिजे. कारण जीवन सहायक अशा इरॉस मध्ये जीवनविनाशी प्रेरणा असणे असंभवनीय होय. प्रिय व्यक्तीकडून पीडन करून घेण्याच्या इच्छेमध्ये लैंगिक प्रेरणा आणि स्वत:ची अंतस्थ विनाशन प्रेरणा यांची युती  झालेली असते. (५) ज्या विध्वंसनात कोणतेही लैंगिक प्रयोजन नसते, त्यामध्ये  आक्रमक प्रेरणा आणि अहंप्रीती यांचे मिश्रण असते.

या प्रकारे परस्परविरोधी प्रेरक तत्वांची सुरूवातसहजप्रेरणांपासूनच होत असल्याने माणसाचे वागणे विवेकी आणि अविवेकी अशा दोन ध्रुवांमध्ये  का जोके खात असते, ते कळू लागते आणि अविवेकी वृत्तींवर पूर्ण मिळवल्याचा दावा किंवा तशी इच्छा हे प्रकार काहीसे अवाजवी व अवास्तव ठरतात. याची सूचनाही त्यातून मिळते. माणसाला स्वत:ला जाणवत  असो की नसो, त्याच्या अबोध मनातील प्रेरणांचा रेटा त्याच्या वागण्यात दिसणारच. त्यामुळे त्याच्या वर्तनात कोणतीही गोष्ट सहज, कारणरहीत, आपोआप, उगीच अशी नसते. त्यामागे निश्चित मानसिक व्यूहाच्या कार्याची चालना असते, असा मानसिक नियतत्ववाद फ्रॉइड यांनी आग्रहपूर्वक प्रतिपादन केला.

निसर्गातील कोणतीही घटना पुरेशा कारणावाचून घडत नसते, प्रत्येक घटना सर्वतोपरी कारणनियत असते, ही सर्व वैज्ञानिकांप्रमाणे फ्रॉइड यांचीही श्रद्धा असल्यामुळे मानवाच्या संबंधात त्यांनी असे प्रतिपादन केले, की माणसाच्या प्रत्येक कृतीस, प्रत्येक विचारास, प्रत्येक बावनेस मानसिक स्वरूपाचे कारण असलेच पाहिजे आणि ते मानसिक कारण प्रेरणा, इच्छा, हेतु या  स्वरूपाचे असले पाहिजे. माणसाच्या कोणत्यही कृतीबाबत ती  यहच्छया घडली किंवा स्वतंत्रपणे केली गेली, असे म्हणता येणार नाही. क्षुल्लक गोष्टींच्या बाबतींत आपण असे म्हणतो, की दुसरी गोष्ट करता आली असती पण अमुकच गोष्ट करावयाचे ठरविले. फ्रॉइड यांना हे मान्य नव्हते. त्यांच्या मते एखाद्या कृतीच्या मुळाशी जाणीवपूर्वक हेतू आढळत नसेल, तर कोणता तरी अबोध हेतू असणारच, तिला अबोध असे उद्दिष्ट असणारच आणि ते उद्दिष्ट पूर्णपणे साध्य झाले नाही, तर जाणीवपूर्वक करण्यात येत असणार्‍या कृतीमध्ये व्यत्यय येत असलाच पाहिजे व अनपेक्षित असा काही प्रकार घडत असणारच. बोलता लिहीताना होणार्‍या अभावित चुका काय, चुकून विसरणे काय, चुकून मोडतोड होणे काय, तसेच स्वप्ने पडणे काय ह्या सर्व प्रकारांना पुरेसे कारण असलेच पाहिजे आणि ते अबोध स्वरूपाच्या इच्छा व त्यांचे समाधान ह्या प्रकारांनी संबंधित असले पाहिजे.

प्रेरणांच्या या तिरंगी सामन्यात वर्तनातील गुंतागुंत वाढतच जाते. स्वत:चाच स्वत:शी वाद वाढत जातो. ओढाळ मनाचा आणि वास्तवाचा तोल सांभाळणे कठीण होऊ लागते. या धडधडीत महत्त्वाचे काम अहम् करतो. काही ठराविक यंत्रणा वापरून इदम् चे आबेग तो दडपून ठेवतो आणि स्वत:ची समाजमान्यतेनुसार बनवलेली प्रतिमा जपण्यासाठी धडपडतो. त्यात यश मिळते तोवर एक ताण सहन करत माणूस जगतो. पण अपयश आले की ते अनेक विकृतिलक्षणांत परिणत होते.

अहम् च्या आत्मसंरक्षक यंत्रणा : अहम् हा व्यक्तिमत्वाचा भाग जन्मानंतरविकास पावत असतो. पराहम् चे  आदेश पाळण्याची त्याची क्षमता सुरूवातीला कमी असते. आत्मरतीने लिबिडोच्या आवेगांमागे वर्तन जात असते. त्यामुळे काहीशा निर्बल अहम् ला सतत पराहम् चा धोका वाटत राहतो. पराहम् चे आदेश पाळण्यात कसूर झाली, तर शिक्षा म्हणजेच कोणते तरी दु:ख होणार. स्वत:कडे न्यूनता येणार. हे टाळण्साठी अहम् च्या यंत्रणा तयार करतो. त्यांची रूपे वर्तनात वेगवेगळ्या प्रकारे दिसतात.

दमन वा निरोधन : ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात परंतु समाजमान्य नसतात, त्यांच्या अतृप्तीचा त्रास त्या इच्छाच नाकारून टाकून कमी केला जातो. या दमनयंत्राने विशिष्ट स्मृती, विचार, संवेदना यांना अबोधात ढकलून त्यांच्यावर एक बांध घातला जातो. या अविवेकी यंत्रमेमुळे  ज्या गोष्टी समाजमान्य नाहीत त्यांचे आकलन वाटू शकत नाही, प्रगल्भतेला बाघ येतो आणि व्यक्तिमत्वात गाठी निर्माण होतात. ‘मला करावेसे वाटते परंतु चारचौघात बरे दिसत नाही म्हणून मी करत नाही’ या विचाराची जागा मला मुळी असले करावेसेच वाटत नाही या विचाराला  दिली जाते. याचे प्रमाण जेवढे वाढेल तेवढे व्यक्तिमत्व कमजोर राहते. याचा परिणाम असा होतो, की पराहम् च्या आदेशाचा अर्थही  कळत नाही आणि लिबिडोच्या आवेगाचा निरासही होत नाही. फक्त आतून सततची वाटणारी भीती मात्र उरते. एकूनच आविष्कार संकोचून जातात. पराहम् जेवढा बलिष्ठ तेवढे दमनयंत्रणेचे  प्रमाण अधिक.

दमन झालेला आवेगांचे रूप काही वेळा जसेच्या तसे राहते आणि संधी मिळताच वर उसळते, तर काही वेळा ते वेगळ्याच वस्तूवर किंवा व्यक्तीवर रोखले जाते. अहम् चा डोळा चुकवण्यासाठी असे वेषांतर करून आवेगांचा उफशम करून घेतला जात असतो.

प्रक्षेपण (प्रोजेक्शन) : पराहम् चा धोका ज्या आवेगांना असतो, ते आवेग दुसर्‍यावर आरोपित करण्याची यंत्रणा म्हणजे प्रक्षेपण. माझ्या आक्रमक इच्छांचा किंवा लैंगिक इच्छांचा मला त्रास होतो या वस्तुस्थितीची जागा इतरांच्या आक्रमक इच्छांचा किंवा लैंगिक इच्छांचा मला त्रास होतो, या प्रक्षेपणाणे घेतली जाते. यामुळे पापभावनेपासून बचाव होतो. स्वत:च्या बर्‍यावाईट वर्तनाची जबाबदारी या यंत्रणेने सतत स्वत:बाहेर टाकली जात असते यामुळे स्वत:चा बचाव या बाहेरच्या गोष्टींपासून करण्यासाठी म्हणून आक्रमकतेला वाट करून मिळते.

विरोधी प्रतिक्रियानिर्मिती (रिॲक्शन फॉर्मेशन): प्रेरणांचे द्विध्रुवात्मक स्वरूप लक्षात घेता जो ध्रुव समाजमान्य नसेल, तेथील आवेग दुसर्‍या ध्रुवावरचे असल्यासारखे मिरवू लागतात. यामुळे मुळातच एक खोटेपणा वर्तनात येतो. तो लपवण्यासाठी अधिक प्रदर्शन, जास्त भडकपणा, ठराविकपणा ही वैशिष्टये निर्माण होतात. अशा व्यक्तीचे वर्तन दिखाऊ आणि भडक होते. या यंत्रणेने इतर व्यक्ती किती फसतात हा प्रश्रच आहे, परंतु आत्मवंचना मात्र नक्कीच होते.

स्तंभन (फिक्सेशन): स्तंभनाचे मुख्य स्वरूप म्हणजे खिळून राहणे. व्यक्तिमत्व विकसित होत असताना ते एकेका अवस्थेतून पुढच्या अवस्थेपर्यंत जाते. परंतु असुरक्षितता, अपयश किंवा क्शिक्षा यांची धास्ती वाटून एखादी अवस्था पार करण्याऐवजी माणूस तेथेच खिळून राहतो. याच प्रक्रियेचा आणखी एक प्रकार भावसंबंधाबाबतही दिसून येतो. इतर व्यक्तींशी भावसंबंध प्रस्थापित करण्यामुळे आईवडीलांच्या प्रेमास मुकावे लागेल की काय, या आशंकेने नव्या व्यक्ती, नव्या कृती, नवे आयुष्य याबाबत नकारात्मक कृती निर्माण होते.


परागमन (रिग्रेशन): विकासाच्या कोणत्याही टप्प्यावर असताना त्या त्या अवस्थेत ज्या भलत्या इच्छा त्रास देऊ लागतात, त्यांच्यापासून रक्षण करण्यासाठी व्यक्ती माघार घेऊन विकासाची कोणीतीतरी आधीची अवस्था स्वीकारते. लहान मुलासारखे वागण्याच्या अनेक परी प्रौढांच्या वर्तनात दिसतात. मुले मोठी होताना पुन्हा पुन्हा आणखी लहान वयाच्या मुलाला शोभेसे वर्तन करतात. जादूने, चुटकीसरशी आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी कल्पना हीही परागमनाचीच द्योतक आहे. विवेकनिष्ठ विचार सोडून केवळ स्वेच्छाकेंद्री विचार करणे, हा परागमनाचा गाभा म्हणता येईल.

कृतक समर्तन (रॅशनलायझेशन): आपल्या सर्व वागण्याचे समर्थन (निदान स्वत:पुरते तरी) व्यक्ती देत असते. पण हे समर्थन थेटपणे स्वतच्या खर्‍याखुर्‍या कारणांचा आधार घेऊन न करता चांगल्या (म्हणजेच समाजमान्य) कारणांकडे बोट दाखवून करणे म्हणजे कृतक समर्थन. धडपड करूनही न मिळालेल्या गोष्टी, अपयश, उशीर, चुका या सर्वांचे समर्थन करताना न मिळालेल्या गोष्टींचे महत्व कमी लेखणे, अपयशाचे खापर प्रकृती, परिस्थिती इत्यादींवर फोडणे, उशीराबद्दल सबबी शोधणे, चुका या चुकाच नव्हेत किंवा असल्या तर माझ्या नव्हेत असे अनेक प्रकार कृतक समर्थनाची रूपे होत.

या य़ंत्रणाखेरीजप्रतिपूरण (कॉम्पेन्सेशन), उदात्तीकरण (सब्लीमेशन), अपसरण (विथ् ड्रॉअल), नकारवृत्ती (निगेटीव्हिझम) इ. यंत्रणांचेही तपशील फ्रॉइड यांनी सांगितले आहेत. परंतु त्या सर्वांचे मानसिक कार्य मुळात सारखेच आहे. सर्व यंत्रणा बाल-अहम् ला असुरक्षितता, अपयश, शिक्षा यांच्यापासून वाचवण्याच्या कामी उपयोगी पडतात.

विकृतिलक्षणांची निर्मिती : वर्तनातील कोणत्याही तपशील कारण रहित असू शकत नाही, असे फ्रॉइड यांनी वांरवार सांगितले आणि वेगवेगळ्या संदर्भात सूक्ष्म विवेचननाने वर्तनाचे कार्यकारणभाव उलगडून दाखवले.

वास्तवात आणि सुखाचा निरतंर निरंकुश उपभोग घेण्याची इच्छा यांची सांगड व्यक्तिमत्वात होते, ती अहम् मुळे. या अहम् ची शक्ती कमी पडली, की इदम् वर नियंत्रण राहू शकत नाही. एकीकडे इदम् आणि दुसरीकडे पराहम् यांच्या परस्परविरूद्ध प्रेरणा व आज्ञा अहम् वर दबाव टाकत असतात. अहम् चे बळ कमी पडल्यास वर्तन विसंगत, विस्थापित, अनाकलनीय वाटू लागते, समूहातील इतर व्यक्तिंपेक्षा वेगळे, काही वेळा त्यांच्या टीकेला कारण होणारे, काही वेळा समाज विघातक तर काही वेळा स्वत:लाही इजा पोहचवणारे होते. या वर्तनाचे बाह्या रुप इतरांना कसेही दिसले, तरी त्याचे मूळ अह्म वर असलेल्या परस्परविरूद्ध दबावांमद्ये म्हणजे त्या व्यक्तीच्या इच्छांमध्येच असते. हे विकृतिलक्षणांचे उगमस्थान लक्षात घेतले, की विस्मृती, भ्रम, शक्तिक्षीणता, निद्रानाश वा इतर ज्या असंख्य प्रकारे विकृती वर्तनात दिसत असतात, त्यांचा उलगडा करण्याचे फ्रॉइड यांचे तंत्रही कळू लागते.

वर्तनाच्या नियंत्रणासाठी काही अटी, काही निषेध आणि काही विधी प्रत्येक समूहात निर्माण जालेले असतात. अहम् त्यांच्या नमुन्यानुसार वागण्याची धडपड करत असतो. विकृतिलक्षणे म्हणजे काही अटी, निषेध झुगारून देणे आणि विधिविषयक आज्ञांचे बंधनही टाकून देणे. यामुळे व्यक्तीच्या इच्छांशी विकृतिलक्षणे दोन्ही बांजूनी जोडली जातात. विकृत वर्तनातही काही करण्याच्या गोष्टी आणि काही  नाकारण्याच्या गोष्टी असतात. त्या दोन्हीचे मूळ स्वत:च्या इच्छांमधेच आहे. जे नाकारले जाते, त्यातही इच्छा आणि जे स्वीकारले जाते, त्यातही इच्छाच.

फ्रॉइड यांनी याही पुढे जाऊन असे म्हटले, की एखादा निषेध निर्माण होतो याचा  अर्थच असा, की त्याकडे ओढा निर्माण झालेला असतो. एखाद्या गोष्टीचे भय वाटते, टाळाटाळ केली जाते याचा अर्थच असा, की ती केल्यास कुठल्या ना कुठल्या प्रकारे धोका उत्पन्न होतो. अइम् ला जे नियंत्रण व समतोल साध्य करणे निकडीचे वाटते त्याला या धोक्यांमुळे बाधा येत असते. ही बाधा अनुभवाला येते ती मात्र चिंतेच्या रूपात येते.

चिंता (अँग्झायटी): चिंता हा एक नकोसा, तापदायक अनुभव आहे. शरीरांतर्गत अवयवांमध्ये अस्वस्थता उत्पन्न करणारे आवेग निर्माण झाल्यामुळे ही शारीरिक व मानसिक अवस्था प्रत्ययास येते. या अवस्थेचे कारण वाह्या किंवा आंतरिक अशा दोन्ही प्रकारचे असू शकते, परंतु ते व्यक्तीला नेहमी कळतेच असे मात्र नाही. जीवाला दु:ख अथवा धोकादायक बाह्या कारणांची जी भीती वाटते, त्यातून येणार्‍या अनुभवाला वास्तव चिंता (रिॲलिटी अँग्झायटी) असे नाव दिले आहे. बाह्या धोक्यांपासून स्वचे रक्षण करण्याची क्षमता बालपणी नसते आणि अहम् ची शक्तीही पुरेशी वाढलेली नसते. या असहाय स्थितीत वाटणारे भय अतिशय तीव्र झाल्यास त्यातून कायमची धास्ती बसते. या धक्कादायक अनुभवांचे मूळ जन्मण्याच्या क्रियेतच असते, असे फ्रॉइड यांनी प्रतिपादन केले. गर्भावस्थेतील पूर्ण संरक्षण आणि नंतर एकदम सर्व इंद्रियांवर होणारा उद्दीपनाचामारा म्हणजे अहम् च्या अत्यंत असहाय अवस्थेचा आदिरूप साचाच असतो. या उद्दीपनाची व्यवस्था लावण्यास, अर्थ लावण्यास, त्यातून निवड करण्यास अह् म पूर्णपणे असमर्थ असतो. या प्रकारच्या अवस्थेचा प्रत्यय आणणार्‍या इतर प्रसंगांशीही ही चिंता निगडीत होते. ही  स्थिती म्हणजे एक सुचना असते. त्यानंतर स्वतचा जीव वाचवण्यासाठी हालचाल सुरू होते.

चिंतेचा दुसरा प्रकार म्हणजे मज्जाविकृत चिंता (नूरॉटिक अँग्झायटी). आपल्या हातून काही अपराध घडण्याची स्वत:चीच स्वत:ला वाटणारी भीती  या चिंतेत प्रमुख असते. स्वतवर घातलेल्या बंधनांची शक्ती केव्हातरी कमी अक्रमक किंवा निषिद्व कृत्ये हातून घडतील, या मूळ भीतीतून दोन प्रकार निर्माण होतात. एक म्हणजे अनामिक व अकारण चिंता सतत वाटू लागणे आणि दुसरा म्हणजे भयगंड (फोबिया). पहिल्या प्रकारात घबराट होणे, कंप सुटणे, घामफुटणे यांसारखी लक्षणे दिसतात आणि अरिष्टओढवणार याच प्रकारचे विचार व्यक्तीच्या मनोव्यापारांचा कबजा घेतात. ] मयगंडामध्ये कोण्यातरी एका वस्तूची, वैशिष्टयाची, प्रसगांची अतिरेकी आणि अवाजवी भीती वाटते. या भीतीचे कोणतेही कारण व्यक्ती देऊ शकत नाही, ती अविवेकी (इर् रॅशनल) आहे हेही काही वेळा शाब्दीक पातळीवर व्यक्तीला पटते, परंतु त्यापासून मुक्त होता येत नाही. या प्रकारच्या मज्जाविकृत चिंतेचे विकृत वर्तनाची लक्षणे निर्माण करण्यात मोठेच काम चालू असते.

चिंतेचा तिसरा प्रकार म्हणजे नैतिक चिंता (मॉरल अँग्झायटी). या चितेंमुळे पापभावना आणि शरम निर्माण होते. पराहम च्या आज्ञा नीट पाळल्या नाहीत. तेव्हा नैतिक अध:पतन आणि पराह् म् ची टोचणी यांच्यामुळे ही अवस्था निर्माण होते. नैतिक वर्तनाविषयीजेवढी आग्रही वृत्ती असेल, तेवढी ही चिंता अधिक. नैतिक द्दष्टयाशिथिल असणार्‍या व्यक्तींना या चिंतेचा त्रास कमी होतो. आग्रह जितका जास्त, तेवढे सहजप्रवृत्तींचे दमन व निरोधक जास्त, तेवढे सहजप्रवृत्तींचे दमन व निरोधन जास्त, म्हणजेच एका परीने अतृप्तीही जास्त. नैतिक आग्रहांमध्ये लैगिंकता सर्वात करडेपणाने नाकारली जात असते, त्यामुळे लैगिक अतृप्ती व अतृप्तीतून विकृती असे सत्र चालू राहते.

विकृतीलक्षणे या प्रकारे विरोधी प्रेरणा आणि अतृप्ती यांतून निर्माण होत असल्याने त्यांचा शोध व निरास साधण्यासाठी फ्रॉइड यांनी एक स्वतंत्र उपचारतंत्र केले.

मनोविश्लेषण चिकित्सा :  मनोविश्लेषण ही संज्ञा फ्रॉइडप्रणीत चिकित्सापद्धतीचा निर्देश करण्यासाठीही वापरली जाते. ही पद्धती ⇨उन्मादविकृतीचा अभ्यास करताना फ्रॉइड यांनी विकसित केली. या पद्धतीचा रोख रूग्णाला स्वत:च्या अबोध मनातील आशयाचा बोधमनात प्रवेश करून घेण्यावर आणि त्यावर स्वत:चे नियंत्रण प्रस्थापित करण्यावर असतो. ही चिकित्सा दीर्घकाळ चालते. त्यामध्ये रूग्ण व्यक्तीने स्वत: बोलत राहून उपचारकर्त्याने केवळ अन्वयनापुरती मदत करण्याचे काम पार पाडायचे असते.


चिकित्सेचे उद्दिष्ट व चिकित्सेची पद्धती यांची रूग्णास कल्पना यावी म्हणून त्याला प्रथम साधी उदाहरणे देऊन असे सागंण्यात येते, की त्यांच्या अबोध  स्वरूपात असलेल्या प्रेरक घटकांचा – इच्छांचा व भावनांचा – त्याच्या तक्रारवजा लक्षणांशी संबंध असण्याची शक्यता आहे, त्यांचा शोध त्याने स्वत:च  घ्यावयाचा आहे व स्वत:च्या व्यक्तिमत्वाला नवीन घाट द्यावयाचा आहे. विकृतीच्या अगदी मुळापर्यंत जाण्यास रूग्णास साहाय्य करणे व विकृती समूळ नाहीशी करणे हे चिकित्साचे उद्दिष्ट असते, त्यामुळे तो रूग्णाच्या वर्तमान तक्रारीकडे फारसे लक्ष देत नाही.

रूग्णास कोचावर आरामशीरपणे, शरीर व मान अगदी शिथिल ठेऊन पहुडण्यास सांगण्यात येते. चिकित्सक रूग्णाच्या उशाच्या बाजूस पाठीमागे बसतो. कोणत्याही प्रकारच्या अंकुशापासून मुक्त अशा प्रकारे मनात एका विचारासमवेत दुसरा, त्याच्या लगोलग तिसरा असे जेजे विचार, ज्या ज्या कल्पना व ⇨कल्पनाजाल (फँटसीज), ज्या ज्या स्मृती येतील त्या बोलून दाखवावयाच्यामग त्या कितीही क्षुल्लक, अप्रस्तुत, संकोचजनक वा खुळेपणाच्या वगैरे वाटोत असे रूग्णास सांगण्यात येते. अशा मुक्त साहचर्यात्मक पद्धतीने रूग्ण बोलत असताना चिकित्सक बहुतांशी श्रोत्याची ठेवतो. रूग्णास बोलते ठेवण्यापुरतेच तो स्वत: बोलतो. रूग्णाच्या तोंडून जे येते त्यावर तो नैतिक अभिप्रायवजा बिलकूल भाष्य करीत नाही. अशा तर्हेणने रूग्णास नि:संकोचपणे व आपले मन समजून घेतले जात आहे, अशा विश्वासाने बोलण्यास धीर दिला जातो. रूग्णाच्या मनात निरंकुशपणे जे जे येईल ते ते सर्व प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे त्याच्या समस्यांशी संबद्ध असणारच व त्याच्या आधारे रूग्णाच्या अंतरंगातील भावनात्मक विचारांच्या व स्मृतींच्या गुंत्यापर्यंत जाऊन पोहोचता 

येईल, अशी धारणा या पद्धतीच्या मुळाशी आहे. [⟶ साहचर्यवाद].  

या नवीन तंत्राचा अवलंब केल्यामुळे, रूग्णाच्या अंतरंगातील शक्ती एकमेकांवर कसा प्रभाव पाडीत असतात ते समजून येऊ लागते त्याची दमन वा निरोधन प्रक्रिया ध्यानात येऊ लागते दडपून टाकलेल्या भावनागर्भ स्मृती तसेच कल्पना निरनिराळी व एरवी अनाकलनीय अशी रुपे घेऊन वर येतात. निरोधनामुळे व्यक्तिमत्व विकृत बनून विकृतिलक्षणे कशी उद् भवतात, हेही लक्षात येऊ लागते. साहजिकच, निरोधनापायी आडमार्ग स्वीकीरलेल्या भावनांना त्या मार्गापासून सोडवणे व रूग्णाची विकृतिलक्षणे दूर करणे एवढेच चिकित्सेचे उद्दिष्ट रहात नाही. निरोधनामुळे विस्मृत झालेल्या ज्या गोष्टींचे अस्तित्व रूग्ण पूर्वी नाकारित असे त्या त्याच्या  जाणिवेत आणून देणे व रूग्ण त्यांवर विचार करून त्यांचा एकतर स्वीकार करील अथवा त्या बाजूस सारील असे करणे, हे चिकित्सचे उद्दिष्ट बनते. माझ्या पद्धतीचे हे नवीनपण लक्षात घेऊन तिला मनोविरेचन न म्हणता तिला मी मनोविश्लेषण (सायको ॲनॅलिसिस) म्हणू लागलो, असे फ्रॉइड यांनी स्वत:च म्हटले आहे.[⟶ मानसचिकित्सा].

संक्रमण (ट्रान्सफरन्स) : मनोविश्लेषणाच्या दरम्यान रूग्णाला बालपणातील व्यक्ती,  प्रसंग व घटना स्पष्टपणे आठवतातच असे नाही.परंतु त्यावेळच्या भावनात्मक अभिवृत्ती मात्र जागृत होऊ लागतात व मग त्यांचे संक्रमण होऊ लागते व खुद्द मनोविश्लेषक त्या अभिवृत्तींचा विषय बनतो. उदा., जर रूग्णाने लहानपणी  स्वत:च्या आईवडिलांविषयी प्रेमाबरोबरच विरोधभाव अशी संमिश्र अभिवृत्ती अनुभवली असेल, तर आता मनोविश्लेषक हा तीचे लक्ष्य बनतो. रूग्णाला त्याच्याविषयी कधीकधी खूप प्रेम वाटू लागते, त्याच्याप्रकृतीची रूग्ण आस्थेने विचारपूस करू लागतो, त्याच्याविषयी उत्साहाने बोलतो तर कधी कधी तो मनोविश्लेषकाप्रत अतिशय तिरस्कारवृत्ती आणि बंडखोरपणाची वृत्तीही दर्शवू लागतो. वस्तुत: रूग्णाला मनोविश्लेषकाविषयी असे वाटण्याजोगे काहीच घडलेले नसते. मनोविश्लेषकाविषयीचा रूग्णाचा हा अनुराग तसेच राग म्हणजे त्याच्या मातापित्याच्या संबंधात त्याने बालपणी अनुभवलेली अभिवृत्ती असते. तिचा संबंध त्याच्या लहानपणीच्या इच्छांशी, तज्जन्य कल्पनांशी असतो. तिचे त्यावेळी निरोधन झालेले असते, पण आता मनोव्श्लेषकाच्या सान्निध्यात, तिला वाट मिळण्यासारखे वातावरण मिळाल्याकारणाने तिचा रोख मनोविश्लेषकाकडे वळतो. फ्रॉइड यांच्या मते, असे हे अभिवृत्तीसंक्रमण घडून यावयालाच पाहिजे असते. रूग्णाचे भावविरेचन होत चालल्याचे, अर्थात मनोविश्लेषणसफल होत असल्याचे ते गमक असते. अशा संक्रमणापायी मनोविश्लेषणाची प्रगती काही काळापर्यंत खुंटते ही गोष्ट खरी, तथापि त्या संक्रमाणाचेदेखील विश्लेषण करण्याची संधी मनोविश्लेषकास लाभते, रूग्णाचे अबोध विचार, भावना व अभिवृत्ती त्याच्या  जाणिवेत आणून देण्यासाठी या संक्रममाचा उपयोग करून घेता येतो व हा मनोविश्लेषणपद्धतीचा फायदाच होय, असे फ्रॉइड यांनी म्हटले आहे.

संक्रमणाच्या बाबतीत मनोविश्लेषकाने तटस्थवृत्ती राखणे, रूग्णाच्या मानसजीवणात स्वत:स न गुंतवणे व अतिशय कौशल्याने संक्रमणाचा उपयोग मनोविश्लेषणासाठी करून घेणे आवश्यक असते. रूग्णाच्या त्यावेळच्या भावनांना स्वत:कडून कोणत्याही  प्रकारे प्रतिसाद दिला जाणार नाही, याविषयी मनोविश्लेषकाने दक्ष राहिले पाहिजे. अन्यथा, रूग्णाच्या भावजीवनात अदिकच गुंतागुंत  होऊन त्याची स्थिती अधिक बिघडण्याचा धोका असतो.

प्रतिरोध (रेझिस्टन्स): मनोविश्लेषण चालू असताना बहुधा पुढील गोष्टी घडू लागतात: रूग्णाच्या मनात कोणताच विचार, कोणत्याही आठवण, कोणतीही कल्पना येईणासे होते. जणू काय एकाद्या अतिशय दु:खदायक,किंवा भयंकर किंवा लाजिरवाण्या स्मृतीपाशी कल्पनेपाशी किंवा विचारापाशी तो येऊन ठेपतो. अथवा, प्रिय व्यक्तीचा तिरस्कार, कुटूंबातील एखाद्या व्यक्तीविषयीची वासनात्मक प्रीती ह्यांसारखी जी अभिवृत्ती स्वत:च्या ठिकाणी असल्याचे कबूल करावयास तो तयार नसतो. ती अभिवृत्ती जागृत होत असल्याचे त्याला जाणवू लागते आणि त्यामुळे तो बोलेनासा होतो. कधीकधी, अनेकविध युक्तांचा अवलंब करून तो मनोविश्लेषणात खीळ घालू पाहतो, ते टाळू पाहतो. रूग्ण, माझी सध्याची तक्रार तेवढी नाहीशी करा असा आग्रह धरतो. किंवा, तो स्वत:ची स्वप्ने तर स्वप्नेच सांगत राहतो. किंवा अवांतर गप्पागोष्टी करू लागतो किंवा मनोविश्लेषकाशी वाद अथवा मनोविश्लेषणपद्धतीसंबंधी चर्चा करू लागतो. कधी कधीतो ‘आता मला बरे वाटू लागले आहे, माझी तक्रार दूर झाली आहे.तेव्हा इत:पर येण्याची आवश्यकता राहिलेली नाही,’ असे म्हणतो. ह्या सर्व गोष्टी फ्रॉइड यांनी रूग्णाकडून प्रतिरोध असल्याच्या द्योतक म्हणून गणल्या आहेत. फ्रॉइड यांच्या मते, या प्रतिरोधाच्या मुळाशी अनेक गोष्टी असू शकतात. एक म्हाणजे रूग्णाने अंतर्मनात दडपून टाकलेल्या लैगिक वासनांचे, ऊर्मीचे, अभिवृत्तींचे निरोधन तसेच चालू ठेवण्याचा प्रयत्न होत असतो. दुसरे कारण म्हणजे जी विकृतिलक्षणे निर्माण झालेली असतात, ती रूग्णाला एक प्रकारचे बदली समाधानाचे मार्ग (सरॉगेट्स) म्हणून उपयोगी पडत असतात,ती लक्षणे जीवणातील समस्यांचा भुकाबला टाळण्यासाठी, स्वत:ची  कर्तव्ये टाळण्यासाठी तसेच इतरांचे लक्ष स्वतकडे वळवून घेऊन त्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी आतापर्यत त्याच्या उपयोगी पडलेली असतात व हे फायदे रूग्ण गमावू इच्छित नसतो. स्वत:चे अंतरंग जाणून घेऊन स्वत:च्या जीवनाची तर्‍हा बदलण्यासही तो घाबरत असतो. मनोविश्लेषकाशी जडलेले वलंबित्वाचे नातेही त्याला सुखद वाटू लागलेले असते. फ्रॉइड तसेच ] व्हिल्हेल्म श्टेकेल (१८६८-१९४०) यांनी म्हटले आहे, की स्वतची विकृती काही विशेष स्वरूपाची असून इतरांच्या विकृतींप्रमाणे लवकर बरी होणारी नाही, असे दर्शवण्याची इच्छा किंवा कधीकधी, मनोविश्लेषकालाअयशस्वी ठरवण्याची ईर्ष्या ही देखील  रूग्णाकडून होणार्‍या प्रतिरोधाची कारणे असू शकतात. मनोविश्लेषकाने रूग्णास त्याचा हा प्रतिरोध नाहीसा करण्यास साहाय्य करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे रूग्णाकडून प्रतिरोध होण्याची शक्यता आहे हे लक्षात ठेवून, त्याच्या विकृतीचे निदान त्याला समजून सांगण्याची घाई मनोविश्लेषकाकडून होणे इष्ट नसते.


मनोविश्लेषणाच्या दरम्यान घडणार्‍या  ह्या दोन गोष्टी –संक्रमक व प्रतिरोध – फ्रॉइड यांनी इतक्या महत्वाच्या गणल्या आहेत, की त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, अन्वेषणाची जी कोणती पद्धती ह्या दोन गोष्टी मानते व त्यांच्यापासून सुरूवात करते, तीच मनोविश्लेषण हे नाव स्वत:ला सार्थपणे लावून घेऊ शकते (कलेक्टेड पेपर्स), असे म्हणता येईल.

एकतर प्रतिरोधातून बाहेर आल्यानंतर रूग्णाच्या मनोविश्लेषणाची एक निर्णायक स्थिती येऊन टेपते, विश्लेषण यशस्वी होऊन रूग्णाला पुरेशी मर्मग्राही द्दष्टी प्राप्त होते आणि तो विश्लेषकाच्या मदतीशिवाय स्वत:च्या आयुष्यातील प्रश्र सोडवू शकतो. किंवा रूग्ण या प्रतिरोधाच्या अवस्थेतून बाहेर येतच नाही आणि ती चिकित्सा सोडून देतो.

स्वप्‍नमीमांसा : मुक्त किंवा निरंकुश साहचार्याने बोलत राहण्यासाठी रूग्णाच्या एखाद्या स्वप्‍नातून केलेली सुरूवात उपयुक्त ठरते, असे फ्रॉइड यांना दिसून आले. रूग्णाच्या स्वप्‍नांत लपलेला अर्थ स्पष्ट करून दाखवणे,हा या चिकित्सापद्धतीचा एक महत्त्वाचा भाग आहे.

स्वप्‍न म्हणजे वेषांतराचा एक प्रकार. स्वप्नांबाबत दोन महत्वाचे सिद्धांत फ्रॉइड यांनी मांडले एक म्हणजे स्वप्‍ने ही इच्छापूर्तीची साधने असतात आणि दुसरा म्हणजे स्वप्‍ने ही झोपेचे रक्षण करणारी आवश्यक अशी बाब असते. स्वप्‍नमीमांसा करून माणसाच्या अबोधापर्यंत सहज पोहोचता येते, कारण स्वप्‍नात प्रतीकात्मक अभिव्यक्ती साधलेली असते. एकदा या प्रतीकांची भाषा उलगडली, की वरकरणी कितीही निरर्थक वाटणारे स्वप्‍न हे कोल अर्थाने भरलेले आहे असे लक्षात येते.

स्वप्‍नांचा अर्थ लावताना व्यक्तीला स्वप्‍नात दिसलेली आणि नंतर जागेपणी आठवणारी द्दश्ये (मॅनिफेस्ट कन्टेन्ट) व त्यांचा लपलेला आशय (लेटन्ट कन्टेन्ट) असा भेद करावयास हवा. कारण ती द्दश्ये म्हणजे केवळ बाह्या पेहराव (डिसगाईज), छद्मी पेहराव असतात.म्हणून स्वप्नातील एकेक गोष्टीच्या संबंधात व्यक्तीच्या मनात येणार्‍या विचारांचा पाठपुरावा करूनच स्वप्नांचा खरा अर्थ, स्वप्नांचे इंगित कळू शकेल, असे फ्रॉइड यांनी म्हटले आहे.

माणसाच्या मनात दिवसा उत्पन्न झालेल्या इच्छा अथवा खोलवर दडलेल्या, लहानपणापासून तो  मोठेपणापर्यंतच्या अतृप्त राहिलेल्या इच्छा, तसेच माणसाने दडपून टाकलेल्या, निरोधित केलेल्या वासना व इच्छा स्वप्नरूपाने व्यक्त होत असतात. त्यांचे अंशत: समाधान माणूस स्वप्नसृष्टी निर्माण करून मिळवीत असतो. तथापि दडपून टाकलेल्या वासनांना माणसाच्या अहम् कडूनचा झोपेतही प्रतिकार चालूच असतो. तथापि त्या वासना – इच्छा तर दुर्दम्य असतात. त्यामुळे अहम् व त्या वासना यांच्यत जणू तडजोड होते. अहम् ला चालतील वा खपतील अशा प्रतीकात्मक प्रतिमांचा अवलंब स्वप्नात केला जातो व अशा रीतीने स्वप्‍नांची गुंफण केली जाते. तेव्हा स्वप्‍न ही एक तडजोड असते. माणसाच्या निद्रेचा भंग होऊ न देता स्वप्‍नाद्वारे त्याच्या इच्छा समाधान पावतात व स्वप्‍न हे निद्रेचेही रक्षण करते. माणसाला झोपेतून दचकून उठवणारी जी दु:स्वप्‍ने पडतात, ती देखील    इच्छातृप्तीच्या स्वरूपाचीच असतात, इच्छातृप्तीच्या दिशेने ती फारच पुढे गेलेली असतात इतकेच

स्वपनांची रचना वा गुफंण एखाद्या कतेप्रमाणे असते व त्या कथा निर्मितीत संक्षेप (कंडेन्सेशन ), विस्तारण (इलॅबोरेशन), नाटयीकरण, विस्थापन इ. प्रयुक्तयांचा अवलंब केला जात असतो, असे फ्रॉइड यांनी दाखविले आहे. खुद्द मनोविश्लेषकाचेदेखील मनोविश्लेषण झालेले असले पाहिजे, अशी फ्रॉइड यांची धारणा होती. त्यामुळे त्यांनी निरंकुश वा मुक्त साहचर्य पद्धतीने स्वत:च्या स्वपनांचेही विश्लेषण केले. अशा तर्‍हेने, रूग्णाच्या आणि स्वत:च्या स्वप्नांच्या विश्लेषणाच्या आधारे त्यांनी स्वप्नप्रतिमांचे प्रतिकात्मक अर्थ बसवले. उदा., बाटली, बरणी, खिसा, शेत म्हणजे योनी तर सरळ वस्तू, हातोडा, तोटी, झरा, टोपी, यंत्र म्हणजे लिंग तसेच ३ हा अंक म्हणजे वृषणासहित लिंग, प्रवास-मृत्यू, मिठाई – रतिसुख, तालबद्ध हालचाली-संभोग, राजाराणी-स्वत:चे पितामाता इत्यादी. फ्रॉइडनिष्ठ मनोविश्लेषणात स्वप्नांचा अर्थ त्यांनुसार लावला जात असतो. फ्रॉइड यांचा स्वप्नविषयक सिद्धांत त्यांनी इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स (१९००) या आपल्या प्रसिद्ध ग्रंथात प्रस्तुत केला आहे [⟶ स्वप्‍न].

माणसाच्या मनाचे स्वरूप आणि कार्यकारणभाव याविषयी फ्रॉइड यांनी सादर केलेला हा विचारव्यूह मनोविषश्लेषण म्हणून ओळखला जातो. कोणत्याही क्षेत्रात मनोविश्लेषणवादी विचार करताना अबोध मन, स्वप्‍नांतील इच्छापूर्ती, व्यक्तिमत्वरचना यांचे फ्रॉइडप्रणीत सिद्धांत ग्राह्या धरलेले असतात.

मनोविश्लेषणवादी चळवळ: फ्रॉइड यांनी स्वत:चे लिखाण प्रसिद्ध करायला आणि उपचारतंत्र विकसित करायला सुरूवात केली, त्यावेळी तात्काळ बहुसंख्य प्रतिक्रिया विरोधीच झाल्या परंतु हळूहळू काही डॉक्टर त्यांच्याभोवती चर्चेसाठी जमा होऊ लागले. त्यांपैकी काहीजणांना स्वत:च्य़ा मानसिक प्रश्रंबाबत मनोविश्लेषणाचा उपचार म्हणून उपयोग झाला होता. फ्रॉइड यांच्या कार्यालयात दर बुधवारी संध्याकाळी सर्वजण जमत. त्यावेळी त्यांना सायकॉलॉजिकल वेन्सडे सोसायटी असे साधे नाव पडले होते. १९०८ मध्ये व्हिएन्ना सायको ॲनालिटिकल सोसायटी या नावाने काम सुरू झाले. चर्चाचे वृत्तान्त होऊ लागले. वेगवेगळ्या क्षेत्रांतील माणसे या विचारांची दखल घेऊ लागले. यावेळी एकून ३२ सभासद होते. त्यांनी इतर देशांतील विचारवंतांशी संपर्क साधायला सुरूवात केली. या उपक्रमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर सायको ॲनालिटिकल असोसिएशन निर्माण झाली.

फ्रॉइड यांच्या विज्ञाननिष्ठ विचारपद्धतीला कोणतीच पोथी बनविण्याची आकांक्षा नव्हती. परंतु चळवळीचा पाया म्हणून काही संकल्पना मान्य केल्याशिवाय काम पुढे जाण्यासारखे नव्हते. त्यात एक मुख्य अडचण अशी होती, की  फ्रॉइड स्वत:च वैचारिक ऊहापोहात मग्न होते. त्यांच्याकडे आकर्षित झालेल्या व्यक्तीच्या धाडसाचा त्यांना अनादर करावयाचा नव्हता. परंतु अंतिम निर्णय देणारा लवाद म्हणून काम करण्याचे फ्रॉइड यांनी नाकारले. त्यामुळे ॲड् लर, युंग, ऑटो रांक आणि पुत्रवत जीव लावलेल्या फेरेंझी यांनी फ्रॉइडपासून स्वतंत्र होऊन काम करण्याचे पतकरले. फ्रॉइड यांना मनोविश्लेषणाचा पाया वैज्ञानिक पद्धतीचा हवा होता. अनेक भौतिक विज्ञांनाप्रमाणेच मूळ संकल्पनांची धूसरता, गृहीतांचे कामचलाऊ स्वरूप आणि संशोधनाला पुढे नेण्याची वैचारिक शक्यता एवढीच व्याख्या त्यांना अभिप्रेत होती. परंतु अबोध मानसिक प्रक्रिया, प्रतिकार आमि दमन हे सिद्धांत,कामप्रेरणेची केंद्रवर्ती भूमिका आणि ईडिपस गंड या गोष्टी मानल्या नाहीत, तर त्या विचाराला मनोविश्लेषण हे नाव द्यायला फ्रॉइड तयार नव्हते.

ॲड्लर, युंग रांक यांनी या चळवळीतून तुटून जाताना अतिशय अटीतटीचे वाद केले. त्यात ⇨ ॲल्फ्रेड ॲड्लरच्या पुढाकाराने अबोधापेक्षा बोध मनाच्या अभ्यासाकडे लक्ष वेधले गेले आणि बालवयातील कामुकतेचे केंद्रवर्ती स्थान त्यांनी अमान्य केले. त्याच्या जागी सामाजिक जीवनातील विद्यमान प्रश्रांचा मज्जाविकृतींशी असलेला संबंध शोधायला सुरूवात झाली. ⇨कार्ल युंग यांच्या मतप्रणालीत व्यक्तिगत अबोध मन राहिले, परंतु त्याची कामुक शक्ती मात्र त्यांनी मानली नाही. उलट सामूहिक अबोधाचा (कलेक्टिव्ह अन् कॉन्शस) एक अंश म्हणून त्याला एक गूढता प्राप्त झाली. ⇨ ऑटो रांक यांनी जन्म म्हणजे एक धक्का, या का अनुभवालाच पूर्ण प्राधान्य दिले आणि ईडिपस  गंडाचे महत्व दुय्यम लेखले. या सर्व वादांचे  वादळ सु. तीस वर्षे अधूनमधून उठत होते आणि मनोविश्लेषण चळवळीला तडाखे देत होते. परंतु  त्यातूनच एक प्रकारे फ्रॉइड यांच्या विचारांनी प्रचंड धक्का काहीसा हलका होत गेला आणि या विचारमंथनातून मनोविश्लेषणवादी द्दष्टीकोन वेगवेगळ्या  क्षेत्रांत पसरत गेला.

चळवळीच्या जागतिक प्रसाराच्या द्दष्टीने १९०९ हे साल महत्वाचे ठरले. फ्रॉइड स्वत: अमेरिकेत गेले आणि त्यांच्या विचारांना तेथे चांगलाच प्रतिसाद मिळाला. अमेरिकेत ए. ए. ब्रिल, कॅनडामध्ये अर्नेस्ट जोन्स, फ्रन्समध्ये मॉरिशाँ बोशॉ आणि ऑस्ट्रेलियातही सिडने येथील एक  धर्मगुरू असे लोक चळवळीत सामील झाले.


न्यूरेंबर्ग येथे १९१० साली दुसरी जागतिक परिषद झाली आणि या चळवळीची बाल्यावस्था संपली. त्यानंतरच्या चार वर्षात ॲड् लर श्टेकेल, युंग हे लोक चळवळीतून बाहेर पडले. मात्र १९१४ मध्येही फ्रॉइड यांनी या चळवळीच्या भवितव्याविषयी एक आशावादच व्यक्त केला होता. मनोविश्लेषणवादी विचार एक समर्थ आणि शक्तिशाली विचार आहे, यावर त्यांचा भरवसा होता.

अमेरिकेत जरी मनोविश्लेषणवादाला चांगला प्रतिसाद मिळाला,तरी फ्रॉइड त्या एकून प्रसाराच्या साशंक होते. एकतर त्यांचा विचार न समजताच मान्य करणारे काही लोक होते. त्यामुळे स्वत:ला सोयीच्या गोष्टी म्हणजे मनोविश्लेषण असा काहीसा प्रकार होत होता आणि दुसरीकडे त्यातील वैज्ञानिक प्रखरता मंदावून बरीच सरमिसळ चालू होती. शिवाय वैचारिक द्दष्ट्या अमेरिकेत वर्तनवादी विचारही विद्यापीठांमध्ये वाढत 

होता, स्थिरावत होता. त्यांच्या प्रायोगिक चिमट्यात मनोविश्लेषण बसत नव्हते.[⟶ वर्तनवाद]. पुढे या चळवळीत ⇨कारेन होर्नाय आमि एरिक एरिकसन ही दोन मातबर नावे आली. होर्नाय यांच्या सिद्धांतात सांसकृतिक घटकांना विशेष स्थान मिळाले. एका अर्थी फ्रॉइड आणि युंग या दोघांच्याही विचारांचे परिशीलन त्यात अंतर्भुत होते. बालवयातील अनुभवांबरोबरच नंतरच्या आयुष्यातील संघर्षांनाही मनोविश्लेषणात स्थान देण्याचा सिद्धांत होर्नाय यांनी मांडला. एरिक एरिक् सन यांनी व्यक्तिविकासाचे नवे विश्लेषण मांडले आणि व्यक्ती (मूल) आणि भौतिक, सामाजिक परिसर यांच्यातील परस्परसंबंधाचे सूक्ष्म पदर उलगडले. विकासाचेच नव्हे तर एकून आयुष्याचे चक्र आठ खंडांत त्यांनी विभागले, प्रेरणा व अध्ययन यांच्या आंतरक्रियांमधून घडणारे हे चित्र चळवळीच्या इतिहासात महत्त्वाचे आहे. मनोविश्लेषण म्हणजे विकृतींचे सार्वत्रिक प्रतिष्ठापन, हा प्रमुख आक्षेप बोथट करण्याच्या द्दष्टीने एरिक् सन यांचे कार्य विशेष महत्वाचे आहे.

मानसशास्त्र आणि मनोविश्लेषण : फ्रॉइड यांच्या विचारांचा  आवाका आणि झपाटा  विलक्षण होता. त्यांचे समकालीन मानसशास्त्र वर्तनवादी द्दष्टीकोन प्रस्थापित करण्यात गुंतलेले होते. त्यांना मापनाचे तंत्र विकसित करण्यात, त्याचे निकष ठरवम्यात रस होता. जर्मनीत व्हुंट, इंग्‍लंडमध्ये मॅक् डूगल, अमेरिकेत वॉटसन आणि त्यांच्या पाठोपाठ आलेल्या इतर परंपरा मनोविज्ञानाची इमारत इतर विज्ञानांच्या वैचारिक पायावर उभी करू पाहात होत्या. त्यामुळे अभ्यासपद्धतीविषयी बरीच चर्चा चालू होती. मनोमापनाची प्रायोगिक तंत्रे अवलंबण्यासाठी मानसशास्त्रीय प्रयोगशाळा काढल्या जात होत्या. मनोव्यापाराचे मूलघटक आणि मूलसंबंध यांची निश्चिती कोणत्या पातळीवर करावी, यांविषयी ऊहापोह चालू होता. या परिस्थितीत वेदन, संवेदन, अध्ययन इ. प्रक्रियांचे प्रायोगिक अन्वेषणाद्वारे आकलन वाढवण्याच्या द्दष्टीने प्रयत्न चालू होते. फ्रॉइड यांचा विचारव्यूह या  उद्योगामध्ये उपयुक्त तर नव्हताच, परंतु काही समस्या वाढवणाराच होता. यामधून फ्रॉइड यांच्यावर मानसशास्त्राच्या धुरिणांनी अतिशय प्रखर टीकास्त्र सोडले. या टीकेचा रोख प्रामुक्याने अबोध मनाच्या संकल्पनेवर, ईडिपस गंडाच्या सार्वत्रिकतेवर, कामप्रेरणेच्या माहात्म्यावर आणि विगमनात्मक विचारप्रणालींवर होता. म्हणजेच गृहीतांचा आशय व त्यात अभिप्रेत असणार्‍या निष्कर्षाच्या मांडणीची पद्धती या दोन्ही गोष्टीवर टीकाकारांनी जोड उठवली. परंतु एक संकल्पनाव्यूह म्हणून प्रयोगाच्या कवेत मनोविश्लेषणात्मक विधाने ताडून बघण्याचे प्रयत्नही मोठ्या प्रमाणात झाले.

मनोविश्लेषण- संबन्द्ध प्रयोगात्मक अभ्यास: फ्रॉइडप्रणीत मनोविश्लेषणाचे सामाजिक विज्ञांनामध्ये स्थान काय या प्रश्राचे उत्तर त्यातील सिद्धांतवजा कल्पना व तथ्ये (फॅक्ट्स) अनुभवनिष्ठ विज्ञानपद्धतींच्या कसोटीस उतरतात काय यावर अवलंबून राहील. काही मनोविश्लेषकांना विज्ञानांची अभ्यासपद्धती मनोविश्लेषणाच्या बाबतीत वापरू पहाणे हेच अप्रस्तुत वाटते. कारण विश्लेषक व रूग्ण यांच्यातील संबंध तसेच विश्लेषणकाळात जे घडून येत असते, त्यामध्ये मनोविश्लेषणाचे सारतत्व असते व पुन्हा जसाच्या तसा विश्लेषणासारखा प्रसंग अन्यत्र निर्माण करता येणारच नाही, असे त्यांना वाटते. ततापि काही मानसशास्त्रज्ञांनी, समाजशास्त्रज्ञांनी तसेच मानवशास्त्रज्ञांनी मात्र, मनोविश्लेषणातील किमान काही गोष्टींना निरिक्षणद्वारा आणि शक्य तेथे प्रयोगांद्वाराही पुष्टी मिळते काय, हे पहाण्याचे प्रयत्न केले आहेत. जे असुखद असते त्याचे निरोधन व परिणामी विस्मरण होते हे सत्य आहे काय, हे पहाण्यासाठी अपयशाचे प्रसंग निर्माण केल्यास व्यक्तीला त्यांचे विस्मरण होते काय व निरोधन दूर केले तर ते प्रसंग आठवू लागतात काय, हे पाहण्यासाठी झेलर यांनी जे प्रयोग केले आहेत, त्यांचा निष्कर्ष अस्तिपक्षी निघाला आहे. न आठवणार्‍या शब्दांमध्ये अस्वस्थ करणार्‍या भावभारित शब्दांची संख्या इतर शब्दांपेक्षा अधिक असते, असे क्लीम्स यांनी संमोहनाचा वापर करून केलेल्या प्रयोगांत आढळले आहे. त्या त्या प्रसंगी कराव्या लागणार्‍या गोष्टींचा ताण पित्तव्रण (अल्सर) निर्माण करण्यात कारणीभूत होतो असे सैनिकी प्रशिक्षण घेणार्‍यांच्या बाबतीत आढळून आले आहे. व अशा रीतीने मनोविश्लेषणास शरीरशास्त्रीय अभ्यासाची जोड  मिळत आहे. स्वप्ने व्यक्तीच्या मानसिक ताण कमी करीत असतात, ह्या कल्पनेसही प्रयोगाचा आधार मिळाला आहे. उदा., व्यक्तीला काही रात्री स्वप्‍ने पडूच दिली नाहीत. तर त्यानंतर तिला एरवीपेक्षा अधिक स्वप्‍ने पडतात असे आढळले आहे. स्वप्नातील प्रतीकात्मक प्रतिमांचे फ्रॉइड यांनी लावलेले अर्थ कितपत यथार्थ आहेत हे पहाण्यासाठी विविध वस्तुनामे देऊन स्त्रीलिंग व पुल्लिंग एवढाच भेद करावयाचा झाल्यास त्या त्या नामास कोणते लिंग द्याल, असे प्रयुक्तांना विचारण्यात आले आहे. विरोधी प्रेरणा अस्तित्वात असली की काय होते, हे पहाण्यासाठी क्लार्क यांनी केलेल्या प्रयोगांत असे आढळले आहे, की वर्गामध्ये बसलेल्या विद्यार्थ्याची कामप्रेरणा विवस्त्र माणसांची चित्रे दाखवून उद्दीपित केली, तर तिच्या साक्षात अभिव्यक्तीस अवरोध होत असल्याने प्रतीकात्मक अभिव्यक्ती होऊ लागते.

अभ्यासाची ही परंपरा मानसशास्त्रात चालूच राहिली आहे. फ्रॉइड स्वत: आपल्या सिद्धांतांना ‘त्या उपपत्ती आहेत, वस्तुस्थिती नव्हेत’ असेच मानत  असत. या प्रकारे प्रयोगात्मक अभ्यास चालू राहिला, तरी मुळात अबोधाच्या संकल्पनेवर वर्तनवादाने प्रचंड हल्ला चढवला. प्रत्यंतरनिष्ठ वास्तववादापेक्षा गूढतानिष्ठ अज्ञेयवादाकडे फ्रॉइड यांचे मार्ग जातात. फ्रिड आणि फ्रॉइडपंथीय म्हणजे एक मठपती आणि चेले यांचेच आधुनिक बुरख्यातले अवतार आहेत, शास्त्रकाट्याच्या कसोटीला न उतरणारे  दूरान्वित युक्तिवाद एक प्रकारची प्रत्यंतरनिरपेक्ष कोंडी उत्पन्न करतात व त्यामुळे मनोविश्लेषणवादी विधाने सिद्धही  करता येत नाहीत किंवा ती असिद्धही ठरवता येत नाहीत. ही आक्षेपकांची वैचारिक फळी होती.

उपचारतंत्राच्या क्षेत्रात मानवी मनाविषयीची एक वेगळी संकल्पना फ्रिड यांनी आणली. प्राचीन काळापासून  ॲरिस्टॉटलची मॅन इज अ रॅशनल ॲनिमल ही व्याख्या ग्राह्या धरून माणसातील अविवेक म्हणजे हीन गोष्ट मानली गेली. फ्रॉइड यांनी मनुष्य स्वभावत: अविवेकी आहे, हा वास्तव करण्यावर भर दिला आणि खोट्या लाजेच्या अथवा सिष्टाचाराच्या, प्रतिष्ठितपणाच्या दडपणातून कामप्रेरणेविषयीच्या तसेच अविवेकी वर्तनाविषयीच्या विचाराला बाहेर काढले. गेल्या पंचवीस-तीस वर्षात अल्बर्ट एलिस यांच्या विचारातून- उपचारातून विवेकी विचार-भावनपद्धती विकसित झाली आहे. त्यात अविवेकापेक्षा विवेकावर, अबोधापेक्षा बोध मनाच्या आशयावर, भूत कालापेक्षा वर्तमानावर व वस्तुस्थितीइतकेच त्याविषयीच्या समजुतीवर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे मनोविश्लेषणवादाची  लाट आपले आवर्तन पूर्ण करून विराम पावली आहे. तिचे योगदान मानवी विचारात आपला वाटा देऊन गेले आहे. त्यातून व्यक्त झालेले दर्शन मानसशास्त्राच्या, मानसोपचाराच्या पुढच्या वाटांना उपयुक्त ठरले आहे.


कलाव्यवहाराविषयी मनोविश्लेषणवादी सिद्धांत: मनोविश्लेषणाने  हाती लागणारे सत्य केवळ विकृत व्यक्तींपुरते मर्यादित नाही, ते सार्वत्रिक आहे, हे प्रस्थापित करण्यासाठी फ्रॉइड यांनी जी पावले उचलली, त्यात कलावंत, कलानिर्मिती आणि रसिकत्व या उच्च कोटिक म्हणून ओळखल्या जाणार्‍या वर्तनप्रातांतील पाउल महत्त्वाचे आहे. फ्रॉइड यांचे समकालीन विचारवंत बहुतांश अलौकिकतावादी होते,तर मानसशास्त्रातील वस्तुनिष्ठ प्रायोगिक परंपरा ‘स्व’ धर्म, कला, स्वप्‍न इत्यादींविषयी काही बोलण्यास असमर्थ होती. वैज्ञानिक पद्धतीची तत्वे व आराखडा उभा राहत होता आणि वेदन, संवेदन स्मरण, अध्ययन इत्यादींच्या मापनप्रणाली तयार होत्या. अशा वेळी स्वत:ला सापडलेल्या उपपत्तीवरून फ्रॉइड यांनी कलाव्यवहारातील रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला.

हा सिद्धांत थोडक्यात असा सांगता येईल : ‘पराहम्’ च्या नियत्रणाखाली  स्वत:च्या अबोध मनातील इच्छांचे उदात्तीकरण साधून कलावंत जी प्रतीकात्मक निर्मिती करतो, ती कलाकृती होय. कलाकृती निर्माण केल्याने स्वप्‍नातल्याप्रमाणेच इच्छापूर्तीचा आनंद मिळतो. कल्पनाशक्तीच्या इतर व्यवहारांप्रमाणेच कलानिर्मितीही अबोध मनातूनच प्रेरक शक्ती मिळवत असते. स्वप्‍नांच्या निर्मितीच्या वेळी ज्याप्रमाणे काही यत्रंणा वेषांतर साधण्यासाठी वापरल्या जातात, त्याचप्रमाणे कलानिर्मितीतही घडते. कलानिर्मितीच्या वेळी पराहम् आणि अहम् यांचे नियंत्रण अगदी स्पष्ट असते. परंतु काल्पनिक जग निर्माण करत असताना इदम् च्या आवेगांना वेषांतराबरोबरच सार्वत्रिकताही साध्य करावी लागते. सौंदर्यद्दष्टीमुळे कलावंत अबोध मनातील आशयाचा रासवटपणा काढून टाकून तो सौम्य बनवतो, व्यक्तिगत संवद्वतेवर आवरण चढवतो आणि हे सर्व केल्यामुळे रसिकालाही आस्वादक आनंदाची लालूच तो देऊ करतो.

या प्रक्रियांमुळे कलावस्तूचा ‘अर्थ’ स्वप्‍नाच्या अर्थाप्रमाणेच उलगडावा लागतो. अशा प्रकारचा उलगाडा करणारे अनेक अभ्यास आतापर्यत झाले आहेत. फ्रॉइड यांनी स्वत: लिओनार्दो दा व्हींची, जेन्सन, शेक्सपिअर, डॉस्टोव्हस्की यांच्या कलाकृतींचा विश्लेषणात्मक अभ्यास केला आणि त्यातून कलाकृतींचे अबोध मनातील उगम दाखवून देण्याचा प्रयत्न केला. या विश्लेषणात त्यांनी व्यक्तिमत्वरचनेचा वअबोध मनाचा सिद्धांत आणि अहम् च्या  यंत्रणा यांचा वापर केला होता. त्यातून कलावंत आणि मज्जाविकृत व्यक्ती यांच्यातील साम्य त्यांनी दाखविले. ‘कलावंत मज्जाविकृतीपासून बचावतात,’ परंतु त्यांची प्रेरणात्मक रचना मात्र सारखीच असते, असा त्यांचा अभिप्राय आहे.

रसिकाला कलाकृतीपासून आनंद कशामुळे मिळतो हे सांगताना अबोध मनातील अतृप्त इच्छांचा विरेचन, प्रक्षेपण आण सात्मीकरण  या यंत्रणांच्या द्वारे उपशम साधला जातो, असे त्यांनी सांगितले. यामुळे इच्छापुर्तिसाठी चाललेल्या धडपडीतून उत्पन्न होणारा ताण सैल होतो आणि आस्वादकाला आनंद मिळतो, असे कलानंदाचे विवरण त्यांनी केले आहे.

फ्रॉइडप्रणीत कलासिद्धांताची ही त्रोटक रूपरेषा आहे. कलेविषयी अगदी मूलग्राही सत्य पकडू शकलो नाही, असे फ्रॉइड यांनी नमूद करून ठेवले आहे. सौंदर्य, शैली, तंत्र इत्यादीविषयीही त्यातून जे काही साध्य होते ते कामप्रेरित आणि कामपूर्ती घडवणारे असते, यापलीकडे पारसे काही त्यांना म्हणावयाचे नव्हते. [⟶ सर्जन शीलता, सौंदर्यशास्त्र].

मनोविश्लेषण आणि धर्म : धर्म आणि धर्माचे मानसशास्त्र ह्या क्षेत्रात फ्रॉइड यांनी टाकलेली पावले सर्वात धाडसाची म्हणावी लागतील. टोटेम अँड टॅबू, ट फ्यूचर ऑफ अँन इल्यूजन आणि मोझेस अँड मोनोथिईजम ही तीन पुस्तके लिहून एका अवघड जागी विचारांची धडक देण्याचे काम त्यांनी केले.

फ्रॉइड स्वत: नास्तिक होते. त्यांच्या श्रद्धेचे रूपांतर धर्मविषयक फ्रश्रांविषयीच्या जिज्ञासेत झालेले होते. धार्मिक वर्तनातील तंतोतंत पुनरावृत्ती  (रिच्युअल) आणि काही चूक अथवा उणेपणा राहिल्यास निर्माण होणारी पाप वा अपराध भावना यांचे साम्य मज्जाविकृतवर्तनाच्या ‘अनिवार्य कृती’ या प्रकाराशी दिसून येते, अनिवार्य विचाराचा, ध्यासाचा अनुभव हाही या प्रकारच्या मज्जाविकृतीशी निगडीत असतो हे त्यांनी दाखवले. या या विवेचनाचे सार काढताना ‘अनिवार्य – विचार – कृतींनी पछाडलेली व्यक्ती स्वत:पुरते  एक धर्मसद्दश कर्मकांड बनवते असे वर्णन केल्यास धर्म म्हणजे जनसमृहांना जडलेली अनिवार्य- विचार- कृतीची मज्जाविकृती होय.’ असे फ्रॉइड यांनी म्हटले.

 हे विधान धक्कादायक तर होतेच, परंतु धार्मिक वर्तनाचा टोटेम अँड टॅयू या पुस्तकातील लेखात त्यांनी जो अन्वय लावला, त्यामुळे तर चळवळीतही उलतापालथ झाली. युंग यांनी ⇨विश्लेषणात्मक मानसशास्त्र या नव्या वाटेची सुरूवात केली होतीच, आता ते विभक्तही झाले. टोटेम अँड टॅयू या ग्रंथात वंश, कुळ, लैगिंक आचारातील विधिनिषेध या सामाजिक बंधाचा आणि वंधनांचा विचार केलेला आहे आणि जवळच्या अप्ताविषयी वाटणार्‍या लैगिंक आकर्षणाचा आणि पितृवधाच्या आक्रमक इच्छेचा संबंध सामाजिक व्यवहाराशी लावून दाखवलेला आहे. मज्जाविकृती व्यक्ती आणि आदिम मनोव्यापाराचे  घाट यांची साम्ये त्यांनी दाखविली आणि धर्माचा संबंध वासना आणि भय यांच्याशी असल्याचे प्रतिपादन केले.

धर्मकल्पनांचे प्रत्यक्ष व्यवहारात सतत बंधनात्मक रूप दिसते आणि नैसर्गिक कामप्रेरणेच्या आविष्कारापेक्षा तिच्या दमनातून निरोधनातून स्वत:चे उन्नयन करून घेण्याचा आदेश धर्मग्रंथ देतात. या पायावर माणूस एका मर्यादेपलीकडे जगू शकणार नाही असा इशारा फ्रॉइड यांनी दिला. निरोधनाचा अतिरेक शेवटी आत्मघातकी  मार्ग होय, हे त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितले.

मानवी इतिहास, संस्कृती आणि मनोरचनेचा मूळ पाया यांचा परस्परसंबंध एका तीव्र रूपात त्यांना दिसत होता. मोझेस अँड मोनोथिईझम या पुस्तकात त्यांनी ज्यू व्यक्तिमत्वाचा, इतिहासाचा आणि सामाजिक संबंधाचा शोध घेतला आहे. ज्यूंचा छळ, ज्यू लोकांचा धर्म आणि नैतिक बैठक, ज्यूंची चिवट एकता या सर्वांचा मनोविश्लेषणवादाच्या चौकटीतून अन्वय लावण्याचा हा प्रयत्न आहे. दुसर्‍या महायुद्धाचे वातावरण तापत असताना त्यांनी हे लेखन केले. त्या काळाच्या निकडीच्या प्रश्रावर बोट ठेवल्यानंतर स्वत:चे निदान त्यांनी सांगितले. या क्षेत्रात त्यांचा मुद्दा अत्यंत विवाद्य  ठरला. धर्मसंख्यांचा मोठाच विरोध त्यांना सहन करावा लागला. इतर समाजशास्त्रही त्यांच्या पद्धतीवर नाखूष होते, परंतु त्यांचे एखाद्या कवीसारखे हे सर्वानाच ढवळून टाकणारे होते. मनोविश्लेषण ही एका व्यक्तीने अभवलेली एक प्रचंड उलाढाल आहे. आपल्या आत्मचरित्रात फ्रॉइड  म्हणतात, माझ्या आयुष्यभराच्याप्रयत्नांचे सिंहावलोकन करताना मला असे दिसते, की मी अनेक प्रारंभ केले, अनेक सुचना प्रसृत केल्या, त्याचे भविष्यात काहीतरी फलित निघेलच पण हे फलित महान असेल की क्षुल्लक हे आज माझे मला सांगता येणार नाही.

पहा: फ्रॉइड, सिग्‍मंड.

संदर्भ: 1. Brill, A. A., Trans., Ed. The Basic Writings of Singmund Freud, New York. 1938.

           2. Brown, N. O. Life Against Death: The Psychoanalytlcal Meaning of History, Middletown, conn,, 1959.

           3. Erikson. E. H. Childhood and society, New York, 1964.

           4. Freud, Sigmund Trans., Ed. Strachey, James, Complete Introductery Lectures on Psychoanalysis, New York, 1966.

           5. Hendrick, Ires, Facts and Theories of Psychoonalysis, New York, 1958.

           6. Hoffman, F. J. Freudianism and the Literary Mind, Baton Rouge, 1957.

           7. Hornoy, Karen, New Ways in Psychoanalysis. Toronto, 1939.

           8. Jones, Ernest, The Life and Work of Sigmund Freud, 3 Vols., New York, 1953-57.

           9. Menninger, Karl. The Theory of Psychoanalytic Technique, New York, 1958.

          10. Wolman, B.B. Contemporary Theories and Systems in Psychogy, New York, 1960.

अकोलकर, व. वि. वनारसे, श्यामला