स्मृतिलोप : ( ॲम्नेशिया ). अंशतः वा पूर्णतः स्मृती नाहीशी होणे, ही अवस्था स्मृतिलोप वा स्मृतिभ्रंश ह्या नावाने ओळखली जाते. ही अवस्था अनेकदा अत्यंत तीव्र स्वरूपाची असते आणि एखाद्या भावनिक वा शारीरिक अभिघातानंतर ( ट्रॉमा ) निर्माण होते. मानसिक आरोग्याच्या व्यवसायक्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, स्मृतिलोप ही एक वियोजनमूलक ( डिसोशिएटिव्ह) मानसिक विकृती असून अशा प्रकारच्या मानसिक विकृतींमध्ये खंडित स्मृती ( फ्यूग ) आणि बहुविध व्यक्तिमत्त्व ( मल्टिपल पर्सनॅलिटी ) ह्या स्मृतिलोपाच्या प्रकारांचाही समावेश होतो. स्मृतिलोपाच्या ह्या सर्व प्रकारांनी मानसोपचारतज्ज्ञांचे तसेच सर्वसाधारण माणसांचे लक्ष दीर्घकाळ वेधून घेतले आहे.

मनोजन्य स्मृतिलोप : जेव्हा काही भावनिक कारणांनी स्मृतिलोप होतो, तेव्हा त्याला मनोजन्य स्मृतिलोप (सायकोजेनिक ॲम्नेशिया) असे म्हणतात. मनोजन्य स्मृतिलोपाचे एक वैशिष्ट्य म्हणजे अशा विकृतीचा रुग्ण स्वतःची व्यक्तिगत माहिती विसरतो. उदा., स्वतःचे नाव, पत्ता, व्यवसाय, आपण कोण आहोत इत्यादी तथापि तो सर्वसाधारण स्वरूपाची माहिती विसरत नाही. उदा., स्वतःचे काही कौशल्य असल्यास त्याचे ज्ञान इत्यादी. स्मृतिलोप झालेल्या एखाद्या पियानोवादकाचे उदाहरण घ्यायचे झाले, तर असे म्हणता येईल, की आपण कोण आहोत, हे तो विसरेल पण त्याचे संगीताचे ज्ञान व पियानो वाजवण्याची क्षमता अबाधित राहील. व्यक्ती अनेक प्रकारच्या ताणांनी त्रस्त झाली—उदा., वैवाहिक वा आर्थिक समस्यांनी तसेच प्रिय व्यक्तीच्या निधनाच्या दुःखामुळे—तर तिचा मनोजन्य स्मृतिलोप होऊ शकतो. अशा स्मृति-लोपामुळे अप्रिय घटनेची स्मृतीही नाहीशी होते आणि तिच्यापासून दूर पळणेही शक्य होते. असह्य दुःखे आणि समस्या ह्यांपासून असे पलायन शक्य व्हावे म्हणून व्यक्तींना त्यांचे विस्मरण होते, असे अनेक मानसोपचारतज्ज्ञांचे मत आहे. मनोजन्य स्मृतिलोप काही थोड्या रुग्णांच्या उर्वरित आयुष्यात एक कायमची वस्तुस्थिती बनून राहतो तथापि बहुसंख्य रुग्णांचा स्मृतिलोप अचानक नाहीसाही होऊ शकतो. कधी काही दिवसांत, तर कधी काही वर्षांनी. हे कसे घडते, हे सांगता येत नाही.

खंडित स्मृती हा वियोजनमूलक स्मृतिलोपाचा आणखी एक प्रकार. असा स्मृतिलोप झालेली व्यक्ती आपल्या घरापासून वा काम करण्याच्या ठिकाणापासून काही तास, काही दिवस वा काही आठवडेसुद्धा दूर भटकत जाते. विल्यम जेम्स ह्या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने रेव्ह. ॲन्सेल बोर्न ह्या धर्मोपदेशकाची विलक्षण सत्यकथा सांगितली आहे. रेव्ह. बोर्न हा आपल्या घरापासून दोन महिने दूर होता आणि तो जेथे गेला, तेथे त्याने आपली नवीनच ओळख निर्माण केली होती. तो जेव्हा घरी परतला, तेव्हा त्या दोन महिन्यांत काय घडले, हे त्याला अजिबात आठवत नव्हते. अखेरीस संमोहनाच्या प्रभावाखाली त्या काळातील त्याची स्मृती परत आली. अशा प्रकारची विकृतिजनक भ्रमंती अनेक घटक एकत्र येऊन घडून येते. अधूनमधून ज्यांना विषण्णतेचे झटके येतात उद्ध्वस्त कुटुंबामध्ये ज्यांचे बालपण गेलेले आहे भोवतालची परिस्थिती ज्यांना असह्य होत असते, त्यांच्या बाबतीत हे घडते. खंडित स्मृती ही अवस्था तीव्र भावनिक संघर्षापासून दूर जाण्याची एक प्रतीकात्मक कृती आहे, असे मनोविश्लेषकांचे मत आहे. स्मृती खंडित झालेल्या व्यक्ती प्रसंगी शेकडो किमी. दूर जातात स्वतःची नवी ओळख निर्माण करून नवे आयुष्य जगू लागतात. त्या ज्या ठिकाणी नवे आयुष्य जगत असतात, त्या ठिकाणच्या लोकांना ह्या व्यक्तींमध्ये अपसामान्य असे काहीच आढळत नाही कारण त्या चारचौघांसारख्याच वागत असतात. खंडित स्मृतीच्या अवस्थेतून बाहेर पडल्यानंतर त्या अवस्थेत काय घडले हे अशा व्यक्तींना आठवत नाही.

खंडित स्मृतिलोप झालेल्या व्यक्ती आपल्या मूळ ठिकाणापासून दूर भटकत जातात, पण बहुविध व्यक्तिमत्त्वाची बाधा झालेल्या व्यक्ती आपले मूळ ठिकाण सोडत नाहीत मात्र त्यांच्यामध्ये एकाहून अधिक व्यक्तिमत्त्वे वास करीत असतात. एक, त्यांचे मूळ व्यक्तिमत्त्व (प्रायमरी पर्सनॅलिटी) शिवाय एक वा त्याहून अधिक व्यक्तिमत्त्वे त्यांच्या ठायी असतात. ही दुय्यम व्यक्तिमत्त्वे (सेकंडरी पर्सनॅलिटीज्) असतात. त्यांचे मूळ व्यक्तिमत्त्व बहुतेकांना ठाऊक असते. ते बहुधा सौम्य, शांत, आज्ञाधारक असते. ह्याच्या उलट, त्यांच्या दुय्यम व्यक्तिमत्त्वांची प्रवृत्ती आक्रमक, बेजबाबदार आणि सुखासक्त असण्याकडे असते.

एकाच व्यक्तीमध्ये एकाहून अधिक व्यक्तिमत्त्वे कशी नांदत असतात, हे अजून पूर्णतः स्पष्ट झालेले नाही परंतु अनेक मानसोपचारतज्ज्ञांचे असे मत आहे, की ह्यामागे त्यांच्या बालपणातल्या अनुभवांचा इतिहास असतो. तो तीव्र भावनिक, शारीरिक आणि लैंगिक छळाचा असतो. बेदम मार खाल्लेले एखादे पोर त्या दुःसह परिस्थितीला तोंड देण्यासाठी स्वतःची अशी समजूत करून घेते, की हा छळ ते स्वतः नव्हे, तर दुसरेच कोणी पोर सोसते आहे. ते त्या ‘ दुसऱ्या ’ मुलाला नावही देण्याचा संभव असतो. एकदा आपले यातनादायक अनुभव त्या दुसऱ्या मुलाचे आहेत असे मानण्याची सवय मनात मुरली, की यथावकाश त्या ‘ दुसऱ्या ’ मुलाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या मूळ व्यक्तिमत्त्वासह एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून नांदू लागते.

उन्माद ह्या मानसिक विकृतीतही स्मृतिलोप हे एक लक्षण आढळते. उन्मादातील स्मृतिलोपाचे दोन प्रकार दिसून येतातः पहिल्या प्रकारात भूतकाळातील विशिष्ट स्मृतींचा किंवा रुग्णाच्या जीवनातील विशिष्ट कालखंडातल्या स्मृतींचा लोप झाल्याचे आढळते. दुसऱ्या प्रकारात रुग्णाच्या चालू आयुष्यातील घटना त्याच्या मनावर नोंदल्या जात नाहीत आणि म्हणून त्या त्याला आठवतही नाहीत. हा प्रकार क्वचितच आढळतो. स्मृतिलोप हा शारीरिक कारणांनीही उद्भवतो पण मनोजन्य स्मृतिलोप आणि देहोद्भव स्मृतिलोप यांच्यात काही फरक आहे.मनोजन्य स्मृतिलोप हा काटेकोरपणे विशिष्ट स्मृतींनी स्मृतिसमूहाने सीमित झालेला असतो आणि ह्या स्मृतींना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष असे भावनिक महत्त्व असते. त्याचप्रमाणे रुग्णाच्या गरजा आणि त्याच्या मनातले संघर्ष ह्यांचा त्या स्मृतिलोपाशी संबंध असतो. उन्मादातील स्मृतिलोप बाळबोध शालेय ज्ञानापर्यंत कधी कधी गेलेला दिसतो. शब्दांची स्पेलिंगे आणि साधे अंकगणितही असा स्मृतिलोप झालेल्या रुग्णाला आठवत नाही. असा प्रकार देहोद्भव स्मृतिलोपाच्या संदर्भात कधीच घडत नाही. उन्मादजन्य स्मृतिलोपाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संमोहनासारख्या उपायांनी त्या स्मृतिलोपावर यशस्वी उपचार करता येतात.

देहोद्‍भव स्मृतिलोप : शारीरिक वा देहोद्भव कारणामुळे स्मरणशक्तीत दोष निर्माण होणे हे मेंदूच्या दुर्बलतेचे लक्षण असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. ही स्थिती तात्पुरतीही असू शकते. उदा., अतिरिक्त मद्यपानाचा कैफ चढल्यानंतर किंवा अपस्माराच्या झटक्यानंतर काही वेळ स्मृती दुर्बल होऊ शकते. डोक्याला जबर मार लागल्यानंतर किंवा मेंदूला जडलेल्या काही व्याधींमुळे स्मृतिलोपाची अवस्था दीर्घकाळही राहू शकते. नवे अनुभव साठवून ठेवण्याची स्मृतीची क्षमता जेव्हा र्‍हास पावते अगदी ताज्या घटनांची स्मृतीसुद्धा पूर्ण नष्ट होते, तेव्हा ह्या स्मृतिदोषाला नवस्मृतिक्षमतालोप ( अँटिरोग्रेड ॲम्नेशिया ) असे म्हणतात. स्मृतिलोपाला सुरुवात होण्यापूर्वी घडलेल्या घटनांची स्मृती जेव्हा नष्ट होते, तेव्हा ह्या स्मृतिदोषाला पश्चस्मृतिक्षमतालोप ( रेट्रोग्रेड ॲम्नेशिया ) असे म्हटले जाते.

देहोद्‍भव स्मृतिलोपाच्या अभिघातजन्य ( ट्रॉमॅटिक ॲम्नेशिया ) प्रकारात अभिघातानंतर शुद्धीवर आलेल्या माणसाच्या डोक्यावर कोणी गुद्दा मारला, तर तो प्रथम गोंधळून, चक्रावून जातो. आपण कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या परिस्थितीत आहोत, ह्याबाबतची त्याची जाणीव अंधूक होते. ही अवस्था साधारणपणे तासभर टिकते पण प्रसंगी ती काही दिवस वा आठवडेही टिकू शकते. ह्या स्थितीत असताना तो नव्या स्मृती साठवू शकत नाही. त्याचप्रमाणे भूतकालीन घटनाही त्याला आठवत नाहीत. विस्मृत झालेल्या या घटना भूतकाळातील अल्प वा दीर्घ कालखंडांतील असू शकतात. ही गेलेली स्मृती अनेकदा एका तार्किक क्रमाने परत येते, असे म्हटले जात असले, तरी तसे नेहमीच घडते असे नाही. स्मृती कोणत्याही क्रमाने येतात आणि योग्य त्या कालक्रमात हळूहळू परस्परांशी संबद्ध होतात.


डोक्याला सौम्य स्वरूपाची दुखापत झाल्यानंतर एक विशिष्ट प्रकारचा स्मृतिलोप झाल्याचे कधी कधी दिसून येते. ह्यात व्यक्तीची जाणीव नष्ट होत नाही आणि तिच्या सामान्य वर्तनातही काही बदल दिसून येत नाहीत. उदा., फुटबॉल खेळणाऱ्या खेळाडूच्या डोक्याला तो खेळत असता कधीकधी एक सौम्यसा झटका बसतो. त्याला किंचित भ्रमल्यासारखे वा गोंधळल्यासारखे होते पण तो खेळत राहतो आणि एखाद्या वेळी गोलही करतो. पण खेळातल्या त्याच्या साऱ्या हालचाली स्वयंचलित-पणे घडत राहतात. नंतर त्या विशिष्ट अवस्थेत काय घडले ह्याची स्मृती त्याला नसते. स्मृतिलोपाचा हा प्रकार अभिघातजन्य स्वयंचलन म्हणून ओळखला जातो.

मानसोपचारांत विजेचा धक्का देण्याचा ( इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थिअरी—ईसीटी ) हा एक उपचार आहे. विशेषतः अवसाद किंवा विषण्णता ( डिप्रेशन ) ह्या मनोविकारामध्ये हा उपचार केला जातो. तो केल्यावर रुग्णाला स्मृतिलोप झाल्याचा अनुभव येतो. त्याला भूतकालीन घटना तसेच नव्याने घडलेल्या घटनाही आठवत नाहीत. ही अवस्था काही दिवस वा आठवडे राहते आणि त्यानंतर नाहीशी होते.

स्मृतिलोपाचा एक प्रकार प्रथम चिरकारी मद्यासक्ती ( क्रॉनिक ॲल्को-हॉलिझम ) जडलेल्या लोकांत आढळून आला. मेंदूच्या अनेक विषाक्त ( टॉक्सिक ) आणि सांसर्गिक आजारांमध्ये तो आढळून येतो. बी जीवन-सत्त्वाची कमतरताही हा प्रकार निर्माण करते. मेंदूत होणारे अर्बुदही ह्या स्मृतिदोषाला कारणीभूत होऊ शकते. अशा स्मृतिलोपाची बाधा झालेले लोक नवी माहिती काही थोडे सेकंदच स्मृतीत साठवू शकतात आणि त्यांना एका अनुभवानंतर येणाऱ्या पुढच्या अनुभवात सातत्य राहत नसते. त्यामुळे ते ज्ञानसंपादन करू शकत नाहीत. मात्र अशा व्यक्ती विरळा असतात.

तीव्र मस्तिष्कशोथाच्या विकारात स्मृतिदोष निर्माण होऊ शकतात. असे स्मृतिदोष झालेल्या रुग्णाची जाणीव चांगली असते. तो संभाषण मात्र फारसे करीत नाही. मेंदूवर केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेनंतरही स्मृतिदोष निर्माण होऊ शकतात.

वृद्धावस्थेत काही प्रमाणात स्मृती दुबळी होते, हा जवळजवळ सार्वत्रिक अनुभव आहे. विशेषतः वृद्ध व्यक्ती नावे विसरतात आणि त्यांची ज्ञानार्जनाची शक्ती कमी होते. स्मरणशक्ती कमी होणे हे वृद्धत्वाचे पूर्वचिन्ह आहे. त्याचप्रमाणे मेंदूच्या रोहिण्या कठीण होत चालल्याचेही ते लक्षण आहे. परंतु मेंदूचा कोणताही रोग नसेल, तर अनेक वृद्धांच्या स्मृतीचे कार्य व्यवस्थित चालत असते.

मनोविभ्रम ( डिमेंशिया ) : मनोभ्रमामध्येही विस्मृती होते. तिचा वयाशी संबंध असतो. अशी विस्मृती वयाच्या सु. पासष्ट वर्षाआधी सुरू झाली, तर तिला जरापूर्व मनोभ्रम ( प्रीसीनाइल डिमेंशिया ) असे म्हणतात. त्यानंतर होणाऱ्या विस्मृतीला वार्धक्य मनोभ्रम ( सीनाइल डिमेंशिया ) असे म्हणतात. मनोविभ्रमामध्ये बोधनशक्तीचा ( कॉग्निशन ) प्रगामी र्‍हास ( प्रोग्रेसिव्ह डिटीरिओरेशन ) होत जातो आणि यथावकाश क्रियाशक्ती दुबळी होत जाते बौद्धिक शक्ती, स्मृती, भाववृत्ती, निर्णय-क्षमता, दिशाबोधक्षमता ( ओरिएंटेशन ) आणि दृक्-अवकाशासंबंधीची ( व्हिजनोस्पेशल ) कौशल्ये र्‍हास पावू लागतात. मनोविभ्रमाची कारणे वेगवेगळी असू शकतात. उदा., एखाद्या अपघातात मेंदूला झालेली इजा. परंतु अल्झायमर्स डिसीझ ह्या नावाने ओळखली जाणारी व्याधी हे मनोविभ्रमाचे कारण असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. ॲलॉइस अल्झायमर ह्या जर्मन तंत्रिका तज्ञाने ह्या व्याधीची पहिल्यांदा ओळख पटवली, म्हणून त्याच्या नावाने ही व्याधी ओळखली जाते.

अल्झायमर्स व्याधीचे कारण अज्ञात आहे. त्यामुळे त्यावर प्रति-बंधात्मक किंवा परिणामकारक अशी रोगनिवारक उपाययोजना उपलब्ध नाही. वृद्धत्व हे ह्या व्याधीचे स्वतःच कारण असते, असे नाही. परंतु अनेक परिवर्तकांपैकी ( व्हेअरिअबल्स ) ते एक असू शकते. उदा., पासष्ट ते पंचाहत्तर ह्या वयोगटातील वृद्धांपैकी १०% व्यक्ती ह्या व्याधीने ग्रस्त असतात, तर ऐंशी वा त्याहून अधिक वयाच्या वृद्धांपैकी ३५—४५% व्यक्तींना ही व्याधी झालेली दिसते.

अल्झायमर्स व्याधी हे मनोविभ्रमाचे मुख्य कारण होय. मनोविभ्रमाच्या अगदी आरंभापासून टप्प्याटप्प्याने वाढत जाणाऱ्या लक्षणांत नुकत्याच घडलेल्या घटनांची आठवण नाहीशी होणे, दिशाबोधनक्षमतेचा र्‍हास ( डिस्ओरिएंटेशन ), निर्णयक्षमता आणि व्यक्तिमत्त्व ह्यांत होणारे टोकाचे बदल, दीर्घजीवी स्मृती नाहीशी होणे, स्वतःच्या निकटच्या आप्तांचीही नावे विसरणे ह्यांचा समावेश होऊ शकतो. अल्झायमर्स ही मूलतः बोधनाशी निगडित असलेली व्याधी आहे पण ती व्यक्तीच्या सामाजिक वर्तनावर परिणाम घडवून आणते तिची कौटुंबिक नाती विस्कटून टाकते.

अल्झायमर्सचे कारण सांगणाऱ्या अनेक प्रणाली आहेत आणि प्रत्येक प्रणालीला काही प्रमाणात प्रयोगांचा आधार मिळालेला आहे. चेताकोशाचा ( न्यूरॉन ) र्‍हास, चेताप्रक्षेपकांमध्ये ( न्यूरोट्रान्समिटर्स ) होणारे बदल ह्या कारणांबरोबरच आनुवंशिक कारकही (जेनिटिक फॅक्टर्स) कारणीभूत म्हणून सांगितले जातात. ॲलॉइस अल्झायमरने कॉर्टिकल न्यूरॉन्सचा र्‍हास हे कारण एका अभ्युपगमाच्या स्वरूपात मांडले. सर्वसाधारणपणे असे दिसते की, अल्झायमर्स न झालेल्या समवयस्क व्यक्तींच्या तुलनेत ज्यांना तो झालेला आहे, अशा व्यक्तींच्या मेंदूच्या ऊतकांचा झालेला र्‍हास स्पष्टपणे दिसून येतो.

अल्झायमर्समध्ये आनुवंशिक कारकही आढळले आहेत. जरापूर्व  मनोभ्रम आणि वार्धक्य मनोभ्रम झालेल्या रुग्णांच्या समूहांमधील ५—१५% व्यक्तींमध्ये कौटुंबिक आनुवंशिकतेचा भाग दिसून आलेला आहे. मागील चार पिढ्यांपर्यंत त्यांचा माग काढता येतो, असे काही अभ्यासकांच्या निदर्शनाला आलेले आहे.

मूत्रपिंडाच्या विकारात अपोहन ( डायलिसिस ) करून घेणाऱ्या रुग्णांच्या निरीक्षणातून असे दिसून आले आहे, की काही थोड्या रुग्णांचा स्मृतिलोप होतो आणि त्याचा संबंध मेंदूमध्ये ॲल्युमिनिअमचा संचय होण्याशी असतो तथापि अल्झायमर्स आणि ॲल्युमिनिअमचा संचय ह्यांच्यातील असा संबंध वादग्रस्त ठरलेला आहे.

संदर्भ : 1. Jorm, Anthony F. A Guide to the Understanding of Alzheimers Disease and Related Disorders, 1987.

           2. Magill, Frank N. Rodriguez Jaclyn, Ed. International Encyclopaedia of Psychology,Vol.1. London, 1996.

           3. Mayes, Andrew R. Human Organic Memory Disorders, 1977.

           4. Takehiko, Yanagihara Peterson, Ronald C. Ed. Memory Disorders: Research and   Clinical Practise, 1991.

           5. Whitty, C. W. M. Zanguill, O. H. Ed. Amnesia, 1977.

 

कुलकर्णी, अ. र.