चेंचू: चेंचू ऊर्फ चेंचुवार ही आंध्र प्रदेशातील एक प्रमुख वन्य जमात. त्यांची वसती कर्नाटक व ओरिसा चेंचू जमातीचे दांपत्य

राज्यांतही काही प्रमाणात आढळते. १९६१च्या शिरगणतीप्रमाणे त्यांची  लोकसंख्या १८,८६६  होती. चेंचूंची वसती नल्लमलई डोंगराच्या दाट अरण्यात, कृष्णेच्या दक्षिणेस कुर्नूल, तसेच महबूबनगर व नलगोंड जिल्ह्यांतील अम्राबादच्या उंच पठारावर आहे. गुंतूर व नेल्लोर जिल्ह्यांतही थोड्या प्रमाणात चेंचू आढळतात. चेंचू हा मध्यम उंचीचा, सडसडीत व तपकिरी रंगाचा असतो. डोळे सामान्यतः  तपकिरीच असतात, काहींचे काळेही असतात. त्यांचे केस दाट, राठ, काळे व कुरळे असतात. बहुतेक पुरूष दाढीमिशा वाढवितात, पण त्या तुरळक असतात. चेंचू लोकांच्या अंगावर मळकट कपडे आढळले, तरी ते आपल्या केसांची मात्र काळजी घेतात. महिन्यातून एकदा तरी नहातात आणि स्त्री-पुरुष दोघेही केस विंचरतात. पुरुष केस न कापता ते विंचरून बुचडा घालतात. स्त्रिया मधोमध भांग पाडून मानेवर अंबाडा घालतात. मूल दोन वर्षांचे झाले की मग त्याचे जावळ काढतात. चेंचू स्त्रियांच्या कपाळावर व डोळ्यांच्या कडेला कानशिलावर गोंदलेले असते. चेंचू पुरुषाच्या कमरेला एक करगोटा बांधलेला असतो. तो सालीचे तंतू वळून तयार केलेला असतो. त्याला मोलतरू म्हणतात. एक चिंधी लंगोटी (गोश बत्ता) म्हणून लावलेली असते. थंडीवाऱ्यात एक सुती कापड तो पांघरतो व तेच कधी कधी मुंडासे म्हणून वापरतो. काही माणसानांच उपरणे (पै बत्ता) व मुंडासे (रुमाल बत्ता) अशी दोन वेगळी वस्त्रे असतात. 

चेंचू स्त्रियांनी आता आपल्या शेजारच्या शेतकरी स्त्रियांसारखाच पोशाख करायला सुरुवात केली आहे. त्या लुगडे व चोळी घालतात, मात्र लुगडे अपुरे असते. स्त्रिया जंगलातील गुंजा, कापेपाक नावाच्या तपकिरी बिया, पुल्ली पुसल नावाच्या पांढऱ्या बिया, कलाब नावाच्या फळाच्या हिरव्या बिया वगैरेंच्या माळा करून घालतात.

ॲल्युमिनियम व जस्ताची कडी, बांगड्या वगैरे दागिने त्या वापरतात. खणायची काठी हे चेंचूंचे प्रमुख निर्वाहाचे साधन. त्यांच्या खणायच्या काठीला कुर्रा-काम म्हणतात. ही सु. पाउण मी. लांब बांबूंची काठी असून तिला पुढे लोखंडी टोक बसविलेले असते. पूर्वी पारध हेच चेंचूंच्या निर्वाहाचे साधन होते पण आता पारधीवर नियंत्रण आल्याने कुर्रा-काम हेच महत्त्वाचे साधन ठरले आहे. स्त्री-पुरुष दोघेही या काठीचा उपयोग करतात. चेंचू लोक धनुष्यबाणही वापरतात. चेंचू तीन प्रकारचे बाण आपल्या धनुष्यासाठी वापरतात. विल्ल अंबु म्हणजे स्त्री-बाण, हा पानाच्या आकाराचा असतो. गुक म्हणजे पुरुष-बाण, हा साध्या भाल्याप्रमाणे असतो आणि तिसरा कोला नावाचा बाण चपट्या डोक्याचा असतो. हे बाण चेंचू लोक स्वत: तयार करतात. बाणांच्या काठीचे लोखंड लोहाराने केलेले असते. याशिवाय प्रत्येक चेंचूकडे कुऱ्हाड, सुरा व खुरपे असते.

मध गोळा करणे हा चेंचूंचा प्रमुख व्यवसाय आहे. मासेमारीत ते वाकबगार आहेत. चेंचूंच्या घरात भांडी मातीचीच  असतात. बांबूच्या विविध आकारांच्या परड्या व टोपल्या ते करतात. लाकडाच्या फळ्याही करतात. आठ दातांची वरती त्रिकोणी टोक असलेली फणी चेंचू लोकांचे एक शिरोभूषण असते. वेळूच्या बासऱ्या करून त्या वाजवण्याचा शोक त्यांना असतो. याशिवाय पुंगीही ते वाजवतात. एकतारी (किनेरी) हे त्यांचे आणखी एक आवडते वाद्य आहे. चेंचू लोकांची वसाहत सारखी बदलत असली, तरी वर्षभर ते एकाच ठिकाणी राहतात. या गावात  त्यांचा पेद्दामंची या नावाचा ग्रामप्रमुख असतो. एकेका गावात साधारणपणे सहापासून वीसपर्यंत घरे असतात. चेंचूंचे घर कुडाच्या भिंतीचे असून त्याचे छप्पर वाटोळे व निमुळते असते. हे स्थायिक स्वरूपाचे घर असते. हंगामी घरे म्हणजे पानांच्या झोपड्या होत.

  

चेंचूंचे अन्न कंदमुळे, रानफळे वगैरेंचेच मुख्यतः असते. शेतीही ते करतात. त्यात सावा, ज्वारीवगैरे पिकवितात. आता स्थायी शेतीसाठी ते गुरे पाळू लागले आहेत. गोमांस ते खात नाहीत. मासे पकडतात. दूध विरजून ताक करतात. तूप डोकीला लावण्यासाठी वापरतात व बाजारात विकतात. चेंचूंच्या दहा कुळी चार कुलसमुहांत विभागल्या आहेत. त्या अशा : (१) मेन्‌लूर व दसेरोलू, (२) सिंगर्लू व उर्तलू, (३) टोकल, नल्लपोटेरू व कत्रज, (४) निमल, एरवलू व पुल्‌सरू. नवराबायको व मुले यांचेच बहुधा चेंचू कुटुंब असते. चेंचूंत पेद्दामंचीचा मान मोठा असतो. घराची बांधणी असो, लग्न असो, धर्मकृत्य असो, भांडण तोडणे असो की मर्तिक असो, त्यांत पेद्दामंचीची भूमिका प्रमुख असून त्याचा आदेश मानला जातो. चेंचूंत लग्न नवरा व नवरी वयात आल्यावर होते. ज्या स्त्रीला नवरा आवडत नाही, ती खुशाल घटस्फोट घेते. चेंचू स्त्रिया बहुप्रसव असतात.

  

मृताला पुरतात किंवा जाळतात पण पुरण्याचा प्रघात पूर्वीपासून चालत आलेला आहे. मृताच्या तिसऱ्या दिवशी शिजवलेले अन्न थडग्यावर ठेवतात. या विधीला चिन्न दिनाल म्हणतात. पेद्दा दिनाल म्हणजे मोठे श्राद्ध दहाव्या दिवशी करायचे असते पण या वेळी गावभोजन असल्यामुळे खर्च बराच येतो, त्यामुळे ते सवडीप्रमाणे करतात.

 

चेंचूने शिकार केली की ते जनावर प्रथम तो गरेलमैसम्माला अर्पण करतो. ही देवता केवळ शिकारीचीच देवता नसते, तर ती वनदेवताही मानण्यात येते. तीच फुले फुलवते व फळे फळवते अशी त्यांच्यात समजूत आहे. फळे पिकावी व विपुल मिळावी म्हणून चेंचू तिची भक्तिभावाने प्रार्थना करतात. नृत्य व गीत यांनी तिला ते आळवतात. भगवंतरू अगर ज्याला हिंदू लोक ईश्वर म्हणतात तो हाच देव. लिंगमय्या व पोस्तम्मा, या दोन त्यांच्या दुसऱ्या देवता आहेत.

  

चेंचू व येनाडी यांच्यामध्ये सांस्कृतिक व वांशिक साम्यही आहे. चेंचू येनाडी असेही येनाडींना म्हणतात. खणण्याची काठी, उंदीर वगैरे प्राणी खाणे आणि एकंदर राहण्याची  पद्धत यांत या दोन जमातींत बरेच साम्य आहे. चेंचू अलीकडे स्थायिक होत आहेत व शेती किंवा शेतमजुरी करतात.

  

संदर्भ : Furrer-Haimendorf, C. The Chenchus, London, 1943.

भागवत, दुर्गा.