परंपरा: विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात एकत्र राहणाऱ्या व्यक्तींच्या समूहापुढे काही सार्वत्रिक व सामूहिक स्वरूपाच्या समस्या असतात. अन्नपाणी, निवारा, स्वरक्षण, कामवासनातृप्ती, अपत्यसंगोपन, रुग्णांची देखभाल, मृतशरीराची विल्हेवाट इ. प्रश्न प्रत्येक समाजास सोडवावे लागतात. व्यक्तिव्यक्तींनी परस्परांशी कसे वागावयाचे, हाही प्रश्न असतोच. वारंवार उद्‌भवणाऱ्या अशा प्रश्नांच्या बाबतीत आपापल्या भौगोलिक परिस्थित्यनुरूप तसेच उदरनिर्वाहार्थ उपलब्ध असलेल्या गोष्टींनुसार काही मार्ग शोधून काढण्यात येत असतात व दरवेळी नवीन प्रयोग करून पाहण्याऐवजी अनुभवाने समाधानकारक ठरलेले व सरावाचे झालेले मार्ग आचरण्याकडेच लोकांची प्रवृत्ती असते. निरीक्षण, अनुकरण, अनुभवांची देवाणघेवाण यांमुळे हे मार्ग त्या सर्व समाजांत प्रसृत होऊन रूढ बनतात. या विविध वर्तनप्रकारांशी काही कल्पनाही निगडित असतात. या रूढ आचारविचारांची एक विशिष्ट प्रणाली बनून जाते व ती एका पिढीकडून पुढल्या पिढीकडे सांस्कृतिक वारसा या रूपाने संक्रमित होत असते. तिलाच परंपरा म्हणण्यात येते. ही परंपरा त्या त्या समाजाच्या एकतेस, स्थैर्यास, सातत्यास व वैशिष्ट्यास कारणीभूत तसेच पोषक असते. भौगोलिक व आर्थिक स्थित्यंतरे, अन्य समाजांशी संपर्क व दळणवळण इ. कारणांनी परंपरेमध्ये बदल होत जातात हे खरे तथापि नव्याची जुन्याशी सांगड घातली जाते व समन्वयही साधला जातो. काही आचारविचार तर नवीन परिस्थितीस अनुरूप नसले, तरी पूर्वापार चालत आले म्हणून लोक त्यांना चिकटून राहतात.

माणसात वांशिक व नवीन संपादित गुण असतात. हे सर्व जीवनार्थ कलहात यशस्वी होण्याकरिता उपयुक्त होतात. हे दोन्ही मिळून परंपरा निर्माण होते. मागच्या मानवी पिढीकडून पुढील पिढीस प्राप्त झालेली पद्धती म्हणजे परंपरा होय. मनुष्याची विशिष्ट प्रकृती असते. तेवढ्यावर जीवनार्थ कलहात मानव यशस्वी होऊ शकत नाही. माणूस निसर्गाचा विचार करून नवे गुण, ज्ञान, कलाकौशल्ये, आचरणपद्धती वा जगण्याची साधने संपादन करतो व यशस्वी होतो. हे सर्व संपादित विशेष पुढील पिढीला मिळतात. त्यांची ठराविक पद्धती वा चाकोरी बनते. सर्व मानवी संस्कृती ही अशी परंपराच होय. पण परंपरेतील अपूर्णता व दोष ध्यानात आल्यावर नवी मानसिक तसेच भौतिक साधने व त्यांच्या पद्धती माणूस शोधतो. त्यामुळे नवी परंपरा निर्माण होते. मानवी जीवनाच्या म्हणजे संस्कृतीच्या सर्व शाखा वा क्षेत्रे यांत जुनी परंपरा, परिवर्तन व नवी परंपरा अशी मालिका असते आणि तीमुळेच जीवनार्थ कलहात मनुष्य यशस्वी होतो.

परंपरेमध्ये समाजाची रचना, व्यक्तिवर्तनाचे संघटन, श्रद्धा आणि सांस्कृतिक प्रतीके यांचा समावेश होतो. काहींच्या मते समाजात जे दिसते, जे मानवी वर्तनप्रकार आढळतात, त्यांनाच परंपरा म्हणावे. इतर काहींच्या मते राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक एकात्मकतेची प्रतीके म्हणजेच परंपरा होय. समाज आपल्या समस्या कसा सोडवितो, समाजाचे घटक सामाजिक संकटांना कसे तोंड देतात, भूतकाळात त्यांनी या समस्या कशा सोडविल्या आणि सामाजिक संघर्षातून समाजाची रचना कशी तयार झाली, यावरूनही परंपरा म्हणजे काय हे कळू शकते. सामाजिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे सातत्य म्हणजे परंपरा, अशीही व्याख्या केली जाते. कोणतीही गोष्ट पारंपरिक आहे की नाही, हे तिच्या मूल्यावरून ठरत असते. व्यक्तिसमूहास संस्थांची जरूरी असते व जुन्या पिढीकडून संस्थात्मक जीवन निवडलेले असते. संस्था ही परंपरा नसून संस्थेच्या मूल्यांविषयीची श्रद्धा ही परंपरा असते. म्हणूनच परंपरा म्हणजे मूल्य असलेली कल्पना होय. धार्मिक ग्रंथांचे सातत्य आणि त्यांते पिढ्यान्‌पिढ्या होणारे संक्रमण हाही परंपरेचा भाग  असतो. जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे जतन करण्यासाठी दिलेला ठेवा, असाही परंपरेचा अर्थ आहे. या कल्पनेत, जे जुन्या पिढीकडून  आलेले आहे त्यात भर न घालता अथवा त्यातून काहीही न वगळता जसेच्या तसे जतन करावयाचे हा अर्थ आहे. 

परंपरेची व्याख्या करतानाच, परंपरा ह्या स्थिर असतात आणि त्या परिवर्तनीय असतात, असे दोन्हीही विचार मांडले गेले आहेत. आधुनिक काळात वर्तनाचे जे काही प्रकार समाजाने जतन करून ठेवले आहेत, त्यांचे सातत्य म्हणजे परंपरा, ही कल्पना पुढे येत आहे. धार्मिक परंपरांच्या बाबतीत त्या परमेश्वराकडून अथवा प्रेषिताकडून आल्या आहेत, असे मानले जाते. ऐतिहासिक परंपराही धार्मिक परंपरेप्रमाणे रूढ होतात. या परंपरांना प्रतीकात्मक अर्थ असतो. त्यातूनच राष्ट्रवाद व समूहनिष्ठा जोपासल्या जातात. धार्मिक, ऐतिहासिक तसेच सामाजिक परंपरांचे खरे दर्शन चित्रकला, वास्तुकला, वाङ्मय इत्यादींमध्ये घडते. कोणत्याही समाजाची सांस्कृतिक घटना कशी असावी, समाजाची सांस्कृतिक व सामाजिक उद्दिष्टे कोणती असावीत, सांस्कृतिक घटनेच्या मर्यादा कोणत्या असाव्यात इ. गोष्टींचा परंपरेशी जवळचा संबंध असतो.

समाजाच्या सांस्कृतिक परंपरेची दोन अंगे असतात : (१) बहिरंग वा मूर्त संस्कृती व (२) अंतरंग वा अमूर्त संस्कृती. त्या त्या प्रदेशाचे भौगोलिक विशेष अन्नपाण्याची उपलब्धता वा कमतरता ऋतुमानातील बदल त्या भागातील प्राणी इत्यादींच्या निमित्ताने काही ठरीव प्रकारच्या प्रसंगांना त्याला वारंवार तोंड द्यावे लागते. नातेवाईक, अतिथी व अपरिचित व्यक्ती यांच्याशी वागण्याचे प्रसंगही वारंवार येत असतात. अशा वारंवार येणाऱ्या प्रसंगांच्या बाबतीत वर्तनप्रकार बहुतांशी सर्वसामान्य झालेले आढळतात, असे वर्तनप्रकार म्हणजे त्या त्या भूप्रदेशातील समाजाची मूर्त अथवा दृश्य संस्कृती होय. त्या त्या समाजाची भाषा, खानपान, अवजारे व हत्यारे, वस्त्रावरणे, घरे, प्रवासाची साधने, विवाहविषयक चालीरीती, नातीगोती ठरविण्याच्या पद्धती, औषधोपचारपद्धती, शासनपद्धती, इतरांच्या स्थान व दर्जानुसार त्यांच्याशी वागण्याच्या रीती इत्यादींचा समावेश मूर्त संस्कृतीच्या सदरात होतो.

या प्रत्यक्ष वर्तनाच्या मुळाशी काही समजुती वा श्रद्धा, काही मूल्यकल्पना, काही मानदंड तसेच काही गृहीतेही असतात. या सर्व गोष्टी परस्परांशी निगडित असतात. या सर्व मिळून बनलेली विचारप्रणाली म्हणजे संस्कृतीचे अंतरंग होय.

सांस्कृतिक समजुतींच्या सदरात त्या त्या समाजातील लोकांचे विचार, ज्ञान व विज्ञान, अंधश्रद्धा, पुरणकथा या गोष्टी येतात. यांपैकी ⇨ पुराणकथांचे महत्त्व सांस्कृतिक जीवनात फार असते. त्या त्या समाजातील लोक पुराणकथा म्हणजे केवळ कल्पितकथा किंवा कलात्मक कल्पनाविलसिते मानीत नाहीत, तर ऐतिहासिक घटना मानतात. बायबलातील गोष्ट म्हणजे ऐतिहासिक वृत्तान्त होत, अशी श्रद्धाळू खिस्ती धर्मीयांची श्रद्धा असते. याप्रमाणेच प्रत्येक समाजाचा जीवनव्यवहार त्याच्या पुरणकथांनी प्रभावित झालेला असतो, असे ⇨ ब्रॉनीस्लॉ मॅलिनोस्की (१८८४–१९४२) या सांस्कृतिक मानवशास्त्रज्ञाने दाखवून दिले आहे.

इष्ट व हितकर काय, याविषयीच्या कल्पना प्रत्येक समाजात असतात. उदा., संयम, सहकार्य, प्रेम, अस्तेय, अव्यभिचार हे गुण सामूहिक जीवनाच्या दृष्टीने इष्ट मानले गेले आहेत. ज्ञानानंद, सौंदर्यानुभव व आध्यात्मिक गूढ अनुभूती या गोष्टी व्यक्तीचे जीवन संपन्न बनवितात, म्हणून मोलाच्या गणल्या जातात. ही मूल्ये सिद्ध होतील अशा तऱ्हेची समाजव्यवस्था घडविण्यात आलेली असते व समाजातील व्यक्तीही आपापली उद्दिष्टे या मूल्यांशी सुसंगत ठेवीत असतात. काही मूल्ये समाजाच्या जीवनात केंद्रीभूत असतात, तर काही साधनीभूत असतात. ज्या गोष्टी करण्यात लोकांच्या शक्तीचा व वेळेचा बराचसा भाग खर्च होत असतो, ज्या गोष्टी त्यांच्या चर्चा-संभाषणाचे व वाद-विवादाचे विषय बनतात, ज्या गोष्टी वडीलधारी मंडळी लहानांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करीत असतात, ज्या चारित्र्यगुणांची व वृत्तींची समाजात प्रशंसा होत असते, त्यांवरून त्या त्या समाजाची केंद्रीभूत मूल्ये कोणती आहेत, हे कळते.


एखाद्या समाजातील लोकांचा काही गोष्टी करण्यावर आणि काही गोष्टी न करण्यावर कटाक्ष असतो असे आढळून येते. त्या गोष्टी कटाक्षाने टाळण्याच्या मुळाशी काही सांस्कृतिक गृहिते असतात. उदा., इतरांच्या वाईट इच्छांचा परिणाम होऊ शकतो आणि त्यांची दृष्ट लागू शकते, हे गृहीत धरून बालकांना काळी तीट लवणे व इतरांच्या देखत त्यांना उघड उघड दूध न पाजणे जादूटोण्याची सत्यता गृहीत धरून बालकाची नखे, केस वगैरे इतरांच्या हाती न लागतील याची काळजी घेणे स्वतःचे नाव परक्यास समजू न देणे मौंजीबंधनाच्या वेळी देण्यात आलेले नाव गुप्त राखणे वडील मनुष्य जेवत असताना त्यास नमस्कार न करणे इ. प्रकारांची कारणमीमांसा करू लागले, की वरील विधानाची सत्यता पटते.

सांस्कृतिक मानदंडांच्या सदरात, लोकरीती (फोकवेज), रूढी, प्रथा व नैतिक संकेत यांचा समावेश होतो. शेतीची कामे, स्वयंपाक, जेवणखाण, भिन्नभिन्न प्रसंगी करावयाचा पेहराव, इतरांना त्यांच्या त्यांच्या सामाजिक दर्जानुसार अभिवादन, आतिथ्य, वधूवरनिवड, शोकप्रदर्शन वगैरे गोष्टी करण्याच्या ज्या रीती जनसामान्यांकडून योग्य गणल्या जातात, त्यांना लोकरीती अशी संज्ञा आहे. या लोकरीती म्हणजे व्यक्तीच्या वर्तनावर असलेल्या सामाजिक अंकुशाचाच एक प्रकार होय. मात्र हा अंकुश अनौपचारिक व सौम्य स्वरूपाचा असतो. जी व्यक्ती लोकरीती अनुसरीत नाही तिला लोक हसतात, इतकेच.

रूढी आणि प्रथा हे सामाजिक वर्तनाचे नियमन करणारे अंकुश अधिक महत्त्वाचे व प्रभावी होत. वडीलधाऱ्यांना, बरोबरीच्यांना व इतरांना संबोधणे अभ्यागताचे आतिथ्य सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचे असे विवाहादी प्रसंग निरोप देणेघेणे इत्यादींच्या संबंधांत रीतिरिवाज रूढ झालेले असतात व ते न पाळणाऱ्या व्यक्तीशी लोक कमी संबंध ठेवू लागतात. या दृष्टीने रीतिरिवाजांचा अंकुश अधिक प्रभावी व जाचक असतो.

समूहिक जीवन व समाजाची धारणा यांचा विचार करण्याइतपत जो समाज प्रगत झालेला असतो, त्या समाजात काही वर्तनप्रकार इष्ट, आवश्यक व नैतिक, तर काही अनैतिक समजण्यात येतात आणि कर्तव्याकर्तव्यविषयक विधिनिषेधही अस्तित्वात असतात. हे नैतिक संकेत म्हणजे एक प्रकारच्या लोकरीतीच होत परंतु त्यांना समाजहितविषयक तत्त्वज्ञानाची बैठक असते. वैवाहिक एकनिष्ठा, गृहस्थधर्माचे पालन, प्रामाणिक व्यवहार, अहिंसा अस्तेय ही नैतिक संकेतांची उदाहरणे होत. समाजातील परंपरागत नैतिक संकेतांचे उल्लंघन खपवून घेतले जात नाही. त्यांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस बहिष्कार, देहदंड, कारावास इ. स्वरूपाच्या शिक्षा करण्यात येतात.

सामाजिक परंपरेचा आणखी एक अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे संस्थात्मक वर्तनप्रबंध. अमुक अमुक गोष्टी समाजाच्या संस्थितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत, या जाणिवेतून समाजामध्ये ज्या व्यवस्था निर्माण झालेल्या असतात, त्यांना ⇨ सामाजिक संस्था ही संज्ञा आहे. वस्तूंचे उत्पादन, देवघेव, आयातनिर्यात, आरोग्यरक्षण, मृतदेहाची विल्हेवाट, शत्रूपासून संरक्षण, प्रजोत्पादन, मुलांचे शिक्षण इ. गोष्टी एकंदर समाजाच्याच गरजा आहेत. या जाणिवेतूनच विवाहसंस्था, कुटुंबसंस्था, शिक्षणसंस्था, वित्तसंस्था, राज्यसंस्था, न्यायदानसंस्था, धर्मसंस्था वगैरे अस्तित्वात आलेल्या आहेत. समाजजीवन या प्रकारे संस्थात्मक झाले, की व्यक्तीला काही प्रसंगांतून जावेच लागते आणि काही भूमिका स्वीकाराव्या व पार पाडाव्याच लागतात.

विधिपूर्वक व शपथपूर्वक विवाह वा शरीरसंबंध अपत्याच्या योग्य संगोपनाच्या दृष्टीने योग्य त्या वयात अन्नसंस्कार व्रतबंधासारखे दीक्षाविधी विद्यार्थिदशेची परिसमाप्ती म्हणून दीक्षान्त विधी आपापली व्यावसायिक भूमिका व कर्तव्ये समाजाच्या अपेक्षांनुसार बजावणे वगैरे संस्थात्मक वर्तनप्रबंधाची उदाहरणे होत. यांपैकी पुष्कळ वर्तनप्रबंधांशी ठराविक पद्धती निगडित झालेल्या असतात अणि त्या परंपरेने टिकूनही राहतात. त्याचे एक कारण असे, की सामूहिक जीवनाच्या दृष्टीने त्या अर्थपूर्ण आहेत, ही जाणीव समाजातील पोक्त व्यक्तींना असते. दुसरे कारण म्हणजे प्रजोत्पत्ती, मृत्यू इ. घटनांशी माणसाच्या भावना व भावनात्मक समजुती निगडित असतात. या विधींना पारंपरिक प्रतिष्ठा प्राप्त झालेली असल्यानेही लोक त्या चालू ठेवतात व अशा रीतीने ही परंपरा अखंडित राहते. यांपैकी काही विधींच्या निमित्ताने माणसाची समारंभाची हौस, संपत्तीच्या प्रदर्शनाची इच्छा, कलात्मक प्रवृत्ती, सामूहिक आनंदाची इच्छा वगैरेही पूर्ण होतात व त्यामुळेही पुष्कळसे विधी त्यांतील अर्थ समजला नाही, तरी टिकून राहतात. काही विधी तर उत्सवप्रियतेस आणि वैभवप्रदर्शनास केवळ निमित्त म्हणून पार पाडण्यात येतात.

परंपरागत लोकरीती, रूढी नैतिक आचारसंकेत व विधिनिषेध, संस्थात्मक वर्तनप्रबंध, तत्त्वज्ञान, धार्मिक समजुती व श्रद्धा इत्यादींमुळे समाजातील व्यक्तींच्या आचारविचारांत व उद्दिष्टांत सारखेपणा राहतो व समाजजीवनही बहुतांशी सुस्थिर राहते. ‘बहुतांशी’ असे म्हणण्याचे कारण असे, की परिस्थितीतील बदल, विज्ञानाची प्रगती, अन्य समाजांच्या संस्कृतींशी संपर्क, व्यक्तिमत्त्वविकासाची ओढ, आध्यात्मिक जाणिवा इ. अनेक कारणांमुळे समाजाचे परिवर्तनही होत असते व चालत आलेल्या परंपरेत नवनवीन विचार, मूल्ये, नैतिक संकेत, विधी इ. सामावून घेतले जात असतात. कालबाह्य ठरलेल्या, जाचक, अनिष्ट, समाजहितास अपकारक ठरलेल्या परंपरा बदलण्यासाठी पुष्कळ वेळा समाज चळवळी, आंदोलने व बंडखोरीही करताना इतिहासावरून दिसून येते. अर्थातच जुन्या टाकाऊ परंपरांचा त्याग केल्यावर त्यांची जागा घेणाऱ्या नव्या अनुरूप गोष्टींचेही कालांतराने परंपरेत रूपातंर होते. 

पहा : धर्मसुधारणा आंदोलन प्रबोधनकाल संस्कृति सामाजिक सुधारणा. 

संदर्भ : 1. Eisenstadt, S. N. Tradition, Change and Modernity, New York, 1973.

   2. Scott, R. C. Tradition and Experience, London, 1964.

   3. Shah, A. B. Rao, C.R.M.Ed. Tradition and Modernity in India, Bombay, 1965.

अकोलकर, व. वि. गोगटे, श्री. ब.