एलिस, हेन्‍री हॅवलॉक : (२ फेब्रुवारी १८५९—८ जुलै १९३९). वैज्ञानिक काम-मानसशास्त्राचा प्रसिद्ध इंग्‍लिश प्रणेता व लेखक. जन्म इंग्‍लंडमधील क्रॉयडन येथे. त्याचे वडील बोटीवर कॅप्‍टन होते त्यामुळे त्याचे बालपण बहुतांशी पॅसिफिक महासागरावर गेले आणि शिक्षण खाजगीरीत्या झाले. १८७५ मध्ये तो ऑस्ट्रेलियात गेला. तेथे एका शाळेत सुरुवातीस साधा शिक्षक म्हणून व नंतर मुख्याध्यापक म्हणून त्याने चार वर्षे नोकरी केली. तेथे जेम्स हिन्टनच्या लाइफ इन नेचर ह्या ग्रंथाचा त्याच्यावर विशेष प्रभाव पडून तो इंग्‍लंडला परत आला आणि वैद्यकाचा अभ्यास करून एम्. डी. झाला (१८८९). तथापि फार काळ त्याने वैद्यकीय व्यवसाय केला नाही.

हेन्‍री हॅवलॉक एलिस

स्टडीज इन द सायकॉलॉजी ऑफ सेक्स (७ खंड – १८९७ ते १९२८) ह्या त्याच्या प्रख्यात ग्रंथाचा दुसरा खंड १८९८ मध्ये इंग्‍लंडमध्ये प्रसिद्ध झाला आणि त्यावर अश्लील म्हणून टीकेची प्रचंड झोड उठली तसेच त्यावर बंदीही घातली गेली. एका पुस्तकविक्रेत्यावर या ग्रंथाच्या विक्रीबाबत खटलाही भरला गेला. तथापि एलिसने आपल्या ग्रंथाचे इतर खंड इंग्‍लंडऐवजी अमेरिकेतून प्रसिद्ध केले. पुढे इंग्‍लंडमध्येही त्यावरील बंदी उठविण्यात आली. मानवी लैंगिकतेवरील एक अधिकृत शास्त्रीय ग्रंथ म्हणून सर्व जगभर हा ग्रंथ मान्यता पावला.

मानवी लैंगिक जीवनाचे शुद्ध वैज्ञानिक दृष्टीने आणि निर्भयपणे सर्वांगीण विवेचन करण्याचा एलिसने पायंडा पाडला. त्याने या नाजुक व गुंतागुंतीच्या विषयाचे विवेचन जीवशास्त्रीय व मानवशास्त्रीय अशा दुहेरी भूमिकेतून केले आहे. प्रेमभावनेला लैंगिक अनुभवाची सुरेख साथ मिळू शकते, हे तत्त्व बिंबवण्याचा त्याने प्रयत्‍न केला आहे. लैंगिकतेच्या अज्ञानामुळे अनेक व्यक्तींचे जीवन उद्‍ध्वस्त होते आणि त्या घातुक सवयींना आणि भयानक मनोव्याधींना नाहक बळी पडतात, हे त्याने त्यात पटवून दिले आहे. निसर्गवाद आणि मानवतावाद ह्यांचा समन्वय त्याच्या प्रस्तुत ग्रंथात झाल्याचे आढळते. आकर्षक वाङ्‍मयीन शैलीमुळेही हा ग्रंथ वाचनीय झाला आहे. समलिंगी कामुकता, हस्तमैथुन, प्रेमभावना व लैंगिकता यांतील संबंध इत्यादींबाबतचे त्याचे या ग्रंथातील विवेचन विशेष मौलिक स्वरूपाचे आहे.

एलिसच्या प्रस्तुत ग्रंथाचा ⇨ सिग्‍मंड फ्रॉइड (१८५६ ­­­— १९३९) याच्यावरही प्रभाव पडला. फ्रॉइडच्या मनोविश्लेषणविषयक सिद्धांतांचे सूतोवाच एलिसने केले असल्याची ग्वाही स्वत: फ्रॉइडनेच दिलेली आहे. एलिसच्या पावलावर पाऊल टाकून फ्रॉइडनेही ‘कामप्रेरणेची सार्वत्रिकता’ ह्या आपल्या उपपत्तीचे प्रतिपादन निर्भयपणे केले. ह्या दोघा विचारवंतांनी मानवजातीला आपल्या कामजीवनाकडे पूर्वग्रहमुक्त दृष्टीने पहावयास शिकविले.

सुरुवातीच्या काळात एलिसने सामाजिक, वाङ्‍मयीन व वैज्ञानिक विषयांवर दर्जेदार नियतकालिकांतून शैलीदार निबंध लिहिले. ‘मर्मेड ग्रंथमाले’ त त्याने १८८७ ते १८८९ ह्या काळात एलिझाबेदन आणि जॅकोबिअन काळातील नाटककारांची नाटके संपादून प्रसिद्ध केली. १८८९ ते १९१४ पर्यंत तो कंटेंपररी सायन्स  या मालेचा संपादक होता. त्याचे इतर उल्लेखनीय ग्रंथ पुढीलप्रमाणे होत : द न्यू स्पिरिट (१८९०), द मॅन अँड वूमन (१८९४), ए स्टडी ऑफ ब्रिटिश जीनियस (१९०४), द सोल ऑफ द स्पेन (१९०८), सेक्स इन रिलेशन टू सोसायटी (१९१०), द वर्ल्ड ऑफ ड्रीम्स (१९११), द टास्क ऑफ सोशल हायजीन (१९१२), लिट्‍ल एसे ऑफ लव्ह अँड व्हर्च्यू (१९२२-३१), सायकॉलॉजी ऑफ सेक्स (१९३३), माय लाइफ (१९३९), सेक्स अँड मॅरेज (१९५१) इत्यादी. द डान्स ऑफ लाइफ (१९२३) ह्या ग्रंथात त्याचे जीवनविषयक तत्त्वज्ञान आलेले असून त्याच्या मते जीवन ही एक कला आहे. इंग्‍लंडमधील सफक येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Collis, J. S. Havelock EllisArtist of Life : A Study of His Life and Work, New York, 1959.

2. Peterson, Houston, Havelock EllisPhilosopher of Love, Boston, 1928.

सुर्वे, भा. ग.