वेबर, एर्न्स्ट हाइन्रिख : (२४ जून १७९५–२६ जानेवारी १८७८). जर्मन शरीरक्रियावैज्ञानिक व मानसभौतिकी शास्त्रातील एक आद्य संशोधक. यांचा जन्म जर्मनीतील व्हिटन्बेर्क येथे. लाइपसिक विद्यापीठात शिक्षण पूर्ण केल्यावर त्याच विद्यापीठात १८१८ पासून त्यांनी शरीररचनाशास्त्र हा विषय शिकविण्यास आरंभ केला. १८४० पासून ते तेथे शरीरक्रियाविज्ञान हा विषय शिकविण्यास आरंभ केला. १८४० पासून ते तेथे शरीरक्रियाविज्ञान हा विषय शिकवू लागले. १८७१ पर्यंत ते ह्या विद्यापीठात प्राध्यापक होते.

स्पर्श आणि स्नायुवेदन या क्षेत्रांमधील उद्दीपकांच्या परिणामांचे त्यांनी केलेले सखोल अध्ययन हा उद्दीपक व प्रतिक्रिया यांच्यातील संबंधाच्या संख्यात्मक मापनाचा श्रीगणेशा ठरला. कोणत्याही उद्दीपकाचे मूल्य किती प्रमाणात वाढविल्याने तो उद्दीपक पूर्वीपेक्षा वेगळा, म्हणजेच अधिक प्रबळ असल्याचे जाणवेल हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दोन उद्दीपक मूल्यांमध्ये वेगळेपण जाणवण्यासाठी त्यांच्यात कमीत कमी फरक किती असायला हवा, यासंबंधीची माहिती त्यांना या प्रयत्नातून मिळाली. दोन उद्दीपक मूल्यांमध्ये किमान फरक ठेवल्याने त्यांच्यात जी भिन्नता जाणवते तिला `आलक्षमात्र भेद’ (जस्त नोटिसिएबल डिफरन्स – जे. एन्‌. डी.) किंवा `अल्पतम अनुभवित तफावत ‘ (अ. अ. त.) असे संबोधिण्यात आले. ही संकल्पना प्रायोगिक मानसशास्त्रातील मानसभौतिकी या क्षेत्रात महत्त्वाची ठरली.

  कोणत्याही उद्दीपकात वेगळेपण जाणवण्यासाठी जो किमान फरक त्याच्या मूल्यात करावा लागतो, त्याचे `प्रमाण त्या किमान फरकाचे मूळ उद्दीपक मूल्याशी गुणोत्तर किती आहे, यावर अवलंबून असते, असे त्यांना आढळून आले. मूळ उद्दीपक मूल्य कितीही असले, तरी त्यात वेगळेपण जाणवण्यासाठी त्याच्या मूल्यात कराव्या लागणाऱ्याफरकाचे हे प्रमाण कायम असते, हे त्यांच्या निदर्शनास आले. उदा., ३० ग्रॅम वजन असलेल्या एका मापाची ३१ ग्रॅम वजनाच्या मापाशी तुलना केली असता ३१ ग्रॅम मापाचे वजन आलक्षमात्र वेगळे, म्हणजेच जड असल्याचे जाणवले. याचा अर्थ असा होईल की, एक ग्रॅम एवढा किमान फरक केल्याशिवाय हे दुसरे माप वेगळे असल्याचे व्यक्तीला जाणवणार नाही. हा एक ग्रॅम फरक आणि ३० ग्रॅम हे छोट्या मापाच्या वजनाचे मूल्य यांच्यातील गुणोत्तर १:३० किंवा ०.०३ एवढे आहे. म्हणजेच छोट्या मापाच्या तुलनेत मोठे माप १:३० इतक्या प्रमाणात मोठे किंवा वजनाने अधिक आहे. समजा, छोटे किंवा हलके माप ३० ग्रॅमच्या ऐवजी ६० ग्रॅम इतक्या वजनाचे असेल, तर मोठे माप ६२ ग्रॅम इतक्या वजनाचे असल्याशिवाय छोट्या मापाहून ते आलक्षमात्र वेगळे किंवा जड असल्याचे जाणवणार नाही. ६० आणि ६२ ग्रॅम या दोन मापांमधील दोन ग्रॅम या फरकाचे प्रमाण १:३० एवढेच आहे.

वेबर यांच्या संशोधनाचे प्रतिपादन ज्या सूत्राद्वारे व्यक्त केले जाते ते सूत्र असे :

ΔS/S=K या सूत्रातून असे सूचित होते की, कोणत्याही उद्दीपकात आलक्षमात्र वेगळेपण अनुभवता येण्यासाठी त्याच्या मूल्यात जो कमीत कमी बदल करावा लागतो, त्या बदलाचे प्रमाण स्थिर (K) असते. हे प्रमाण `किमान बदल (ΔS) आणि मूळ उद्दीपक मूल्य (S) यांच्यातील गुणोत्तराएवढे असते. वेबर यांच्या या सूत्रबद्ध प्रतिपादनालाच `वेबर नियम असे म्हणतात. दोन उद्दीपक मूल्यांमधील भिन्नतेचे संवेदन होताना त्या दोहोंमधील प्रत्यक्ष फरकाऐवजी त्या फरकाचे प्रमाण आपण लक्षात घेत असतो, असे मत वेबर यांनी व्यक्त केले होते. जितके हे मूल्य कमी तितकी संवेदनशीलता अधिक असे मानण्यात येते. तेजस्वितेच्या (ब्राइटनेस) बाबतीत हे मूल्य .१६, तर ध्वनीच्या उच्चतेच्या (लाउडनेस) बाबतीत हे मूल्य .३३ इतके आहे.

वेबरच्या नियमाच्या बाबतीत पुढे जे संशोधन झाले, त्यात या नियमाच्या मर्यादा स्पष्ट करण्यात आल्या. वेबरचा नियम (सूत्र) हा फक्त मूळ उद्दीपकाचे मूल्य जेव्हा मध्यम पातळीत असते, त्याच ठिकाणी लागू पडतो. अगदी टोकाच्या मूल्याच्या बाबतीत हे सूत्र लागू होत नाही. उदा., मानवी व्यक्तीस होणारे एखादे वेदन उदाहरणादाखल घेतले, तर त्या वेदनाच्या बाबतीत मानवाची क्षमता लक्षात घेऊन त्याची दोन्ही टोके जर विचारात घेतली तर त्या टोकांकडील दोन उद्दीपकांमधील वेगळेपणा जाणून घेताना वेबरचे सूत्र म्हणजेच त्या बदलाचे प्रमाण स्थिर राहत नाही.

गुस्टाफ टेओडोर फेक्‌नर (१८०९८७) हे वेबरचे समकालीन मानसास्त्रज्ञ व भौतिकीविज्ञ. वेदन आणि उद्दीपक यांच्यातील संबंध फेक्‌नर ह्यांनी थोड्या वेगळ्या प्रकारे सूत्रबद्ध केला. मात्र या नव्या सूत्रबद्ध नियमाचा आधार वेबर यांचा नियम हाच असल्याने या नियमाला `वेबर-फेक्‌नर नियम’ असे संबोधण्यात आले. वेदनाच्या तीव्रतेत एकेक मात्रेने वाढ होण्यासाठी उद्दीपकाच्या तीव्रतेत करावी लागणारी वाढ बरीच जास्त, म्हणजेच भौमितीय प्रमाणातील असते, असे वेबर – फेक्नर नियमाचे सार सांगता येईल. हा नियम पुढीलप्रमाणे सूत्रबद्ध केला गेला आहे : R=K Log S या सूत्रात R (वेदनाची तीव्रता), S (उद्दीपकाची तीव्रता), K (स्थिरांक) आणि Log (लॉगरिथम अशी अंकव्यवस्था की ज्यात १० पासून सुरुवात करून १० म्हणजे ११०० म्हणजे २१,००० म्हणजे ३ अशा भौमितीय प्रमाणात अंकांची मांडणी केलेली असते) असे संकेत वापरले असून या सूत्राचा अर्थ वर सांगितल्याप्रमाणे लावला जातो.

स्पर्शवेदनाप्रमाणेच भार वेदन, उष्ण – शीत वेदन आणि दाब वेदन या वेदनक्षेत्रांमध्ये वेबर ह्यांनी संशोधन केले. `द सेन्स ऑफ टच अँड द कॉमन सेन्सिबिलिटी’ (१८५१, इं. शी.) या त्यांच्या ग्रंथाने शास्त्रज्ञांमध्ये बरीच उत्सुकता निर्माण केली होती. त्यांच्यामुळे मानसभौतिकी क्षेत्रातील संशोधन आणि शास्त्रीय अध्ययनाला सुरुवात झाली. परिणामत: उद्दीपक व त्याला अनुसरून केलेली अनुक्रिया यांच्यातील संबंधाच्या परिमाणात्मक अभ्यासाला चालना मिळाली व यातूनच मानसभौतिकी पद्धतीचा जन्म झाला.

लाइपसिक येथे त्यांचे निधन झाले.

पहा : मानसभौतिकी वेदन शरीरक्रियामानसशास्त्र.

गोगटे, श्री. ब. कुळकर्णी, अरुण