भाव : (फीलिंग). अंतर्निरीक्षणपद्धतीचा अवलंब करून अनुभवाचे शास्त्रीय दृष्ट्या स्वरूप-विश्लेषण करणाऱ्या बहुतेक मानसशास्त्रज्ञांनी ‘भाव’ ही संज्ञा अनुभवाच्या एका विशिष्ट पैलूस अनुलक्षून वापरलेली आहे. सुखात्मता किंवा तद्विरूद्ध म्हणजे अशी असुखात्मता हा तो पैलू होय. कोणतेही संवेदन असो किंवा अन्य स्वरूपाचे मनोव्यापार घडून येत असोत त्या त्या वेळी जी ‘सुख वा असुख’, ‘प्रसन्न वा अप्रसन्न’, ‘अनुकूल वा प्रतिकूल’ या शब्दांनी वाच्य अशी जी मानसिक अवस्था असते, तिचा उल्लेख ‘भाव’ ह्या संज्ञेने बहुतेक मानसशास्त्रज्ञ करतात.

एका बाजूस जाणीव अथवा मन आणि दुसऱ्या बाजूस जाणिवेचा (मनाचा) ‘विषय’ असा भेद करून अनुभवाचे विश्लेषण केले, की विषयाच्या संबंधात मनाची वृत्ती त्रिविध असल्याचे दिसून येतेः बोधस्वरूप (कॉग्‍निटिव), भावस्वरूप (अफेक्टिव) आणि प्रेरणात्मक (कोनेटिव).

बाह्य वस्तूंच्या रूप, रूची, गंध, स्पर्श इ. गुणधर्मांचे, स्वतःच्या हालचालींचे तसेच शरीरांतर्गत परिस्थितीचे संवेदन, विचारक्रिया, स्मरण, कल्पन इ. मनोव्यापारात मनाचा विषयाशी असलेला संबंध बोधात्मक होय. ते संवेदन, रूचणे किंवा न रूचणे. तो विचार रोचक किंवा अरोचक वाटणे, ती स्मृती घोळत रहावी किंवा नकोशी असे वाटणे, ती कल्पना रंजक किंवा अरंजक वाटणे, म्हणजे भावात्मक संबंध अथवा भावात्मक वृत्ती होय आणि ते संवेदन, तो विचार, ती स्मृती, ती कल्पना तशीच राहू देण्याची किंवा त्यापासून पराङ्‍मुख होण्याची इच्छा आणि प्रवृत्ती म्हणजे प्रेरणातमक संबंध अथवा प्रेरणात्मक वृत्ती होय.

बोध, भाव आणि प्रेरणा अथवा प्रवृत्ती या गोष्टी अवियोज्य होत. बोधत्मक अशा प्रत्येक मनोव्यापाराशी सुख-असुखभाव संलग्‍न असतोच पूर्णपणे सुख-असुखभावरहित अथवा संपूर्णपणे उदासीन अशी वृत्ती कधीच नसते तथाकथित निर्विषय अशा मानसिक अवस्थेत देखील भावात्मकत्व लक्षात येत नसेल, तरी त्या अवस्थेलादेखील भावात्मकत्व लक्षात येत नसेल, तरी त्या अवस्थेलादेखील भावत्मक पैलू असतोच असे ⇨ जी. एफ्. स्टाउट (१८६०-१९४४) यांनी प्रतिपादन केले आहे.

बोध, भाव आणि प्रवृत्ती यांच्यासारखे अग्रक्रम कोणाचा मानावयाचा, या प्रश्नाबाबत मानसशास्त्रज्ञांमध्ये मतभेद आढळतात. बोधात्मक मानसिक प्रक्रियांविना सुख-असुखभाव संभवत नाही व म्हणून ‘भावा’ची बोधसापेक्षता स्टउट यांनी मान्य केली आहे. विल्यम मॅक्‍डूगल यांनी प्रेरणा (प्रवृत्ती) मूलभूत मानल्या आहेत व भावाचे प्रेरणासापेक्षत्व प्रतिपादन केले आहे. साखरेची चव क्षुधा उत्तेजित करते म्हणून ती सुखद वाटते आणि खाण्याची इच्छाच नसली की साखर नकोशी वाटते, असा त्यांनी युक्तिवाद केला आहे. परंतु यावर स्टाउट यांनी असे म्हटले आहे, की अशी वस्तुस्थिती असल्याचे जरी मान्य केले, तरी प्रवृत्तीस (प्रेरणेस) अग्रक्रम दिला पाहिजे असे ठरत नाही कारण, सुख-असुखत्व हे प्रवृत्तिसापेक्ष असल्याचे दिसते हे जरी खरे आहे, तरी पण हेही तितकेच खरे आहे की संबंधित प्रवृत्ती टिकून रहाणे किंवा न रहाणे किंवा त्या प्रवृत्तीशी संबंधित असलेल्या प्रयत्‍नांची दिशा, या गोष्टी सुखद-असुखदभावावर अवलंबून असतात.

भाव व वेदने : काही मानसशास्त्रज्ञ भाव (फीलिंग) आणि इंद्रियजन्य वेदने यांमध्ये काटेकोर भेद करीत नसल्याचे दिसते. उदा., ⇨ आर्. एस्. वुडवर्थ (१८६९-१९६२) यांनी असे म्हटले आहे, की ज्याला आपण ‘फीलिंग’ म्हणतो त्यामध्ये-उदा., ‘सुस्तावल्यासारखे वाटते’-‘जाड्य आल्यासारखे वाटतेय’ वगैरेसारखे शब्द ज्या अवस्थांना अनुलक्षून वापरलेले असतात, त्या अवस्थांमध्ये-अत्यंत सौम्य अशी अनेक अस्पुष्ट वेदने अंतर्भूत असतात.परंतु भाव म्हणजे वेदन समुच्चय अथवा वेदन-संयुगे असे ध्वनित करणारे हे मत सर्वमान्य नसून विवाद्य आहे. भाव आणि वेदने यांमध्ये पुढील मेद अनेक मानसशास्त्रज्ञांनी दर्शविला आहेः एक म्हणजे, वेदने ही शरीरबाह्य परिस्थितीचा म्हणा किंवा शरीरांतर्गत परिस्थितीचा म्हणा बोध करून देत असतात भाव ही अवस्था मात्र बोधजनक नसते. भाव म्हणजे वेदने नव्हते असे म्हणण्याचे आणखी कारण म्हणजे सुखभाव आणि असुखभाव हे विचार, स्मृती, कल्पना वगैरे मनोव्यापारांशीदेखील संलग्‍न असतात. शिवाय असे की, विशिष्ट वेदक मज्‍जातंतूंचे उद्दीपन झाले की विशिष्ट प्रकारचेच संवेदन होते पण ते संवेदन कधी सुखद, तर कधी असुखद असू शकते. आणखी एक गोष्ट अशी, की अनेकविध वेदने समाविष्ट असलेला असा प्रत्यय असू शकतो आणि तो प्रत्यय संमिश्र असला, तरी खुद्द त्या प्रत्ययाकडे दृष्टी वळवल्यास त्यातील घटकवेदने निराळेपणाने लक्षात येऊ शकतात. उदा., विविध रंगांच्या, ध्वनींच्या किंवा स्पर्शाच्या संमिश्र अनुभवातील भिन्नभिन्न वर्णच्छटांची, ध्वनींची किंवा स्पर्शाची आपापल्या वैशिष्ट्यांसह जाणीव होऊ शकते. सुख व असुख यांची गोष्ट तशी नाही. एकाच वेळी सुख व असुख असा संमिश्र भावप्रत्यय-एका नेत्रात हसू तर दुसऱ्या नेत्रात आसू-ही वास्तवास धरून नसलेली व एक मानसशास्त्रीय असत्य म्हणून म्हणता येईल अशी केवळ कविकल्पनाच होय, असे जी. एफ्. स्टाउट यांनी म्हटले आहे. शिवाय असे, की दिवंगत प्रियजनांच्या आठवणी व त्यांच्या विरहाची जाणीव या दोहोंमुळे ‘सुखद विषण्णता’ म्हणता येईल अशी एक भावस्थिती उत्पन्न होते हे जरी खरे असले, तरी तिच्या बाबतीत सुख व असुख हे भावघटक निरनिराळे करता येत नाहीत व निराळेपणाने अनुभवता येत नाहीत. म्हणून ती एक आगळ्याच स्वरूपाची अवस्था असते, असे स्टाउट यांनी प्रतिपादन केले आहे.

भाव आणि मनोभाव : भाव आणि मनोभाव वा भावना (इमोशन) यांची सामान्यपणे एकाच वर्गात गणना केली जात असते. याचे कारण त्या दोहोंमध्ये दिसून येणारे व त्या दोहोंमध्ये असणारा संबंध हे होय. एक म्हणजे, सुखात्मक व असुखात्मक अनुभव व्यक्तीस अनुक्रमे अभिमुख व पराङ्‍मुख करतात त्याप्रमाणेच आनंद, प्रेम, दुःख, भय, घृणा, विषाद इ. भावनात्मक अवस्थांमुळेदेखील अभिसरणात्मक किंवा अपसरणात्मक प्रतिक्रिया घडून येत असतात. दुसरे साम्य म्हणजे, आरोग्यदृष्ट्या आवश्यक व हितकारक वस्तू साधारणतः  सुखद व आरोग्‍यास बाधक वस्‍तू साधारणतः अरोचक वाटतात व अशा तर्‍हेने भावनुभवास जसे जैविक प्रयोजन असल्याचे दिसते त्याप्रमाणेच आनंद, प्रेम यांसारख्या काही भावना जैविक दृष्ट्या उपकारक असतात व भय, क्रोध यांसारख्या भावनादेखील जीवरक्षणदृष्ट्या प्रसंगोचित असतात. तिसरी गोष्ट म्हणजे, कोणतीही विशिष्ट भावनात्मक अवस्था निर्माण होण्याच्या अगोदर सुखात्मक अथवा असुखात्मक भाव जाणवत असतो. उदा., एखाद्या प्रसंगामुळे क्रोध, भय वा घृणा उत्पन्न होण्याची सुरूवात तो प्रसंग असुखद वाटण्यापासून होत असते आणि प्रेम, आनंद यांसारख्या भावनांच्या प्रारंभीचा भाव सुखात्मक असतो.


तथापि, बोरिंग यांनी म्हटल्याप्रमाणे भाव आणि मनोभाव यांमध्ये भेदही आहे. कारण, सुख व असुखभाव हे केवळ मनोभावात्मक अवस्थांशीच निगडित असतात असे नसून संवेदने, स्मृती, कल्पना, संदेह इ. बोधात्म प्रक्रिया किंवा अवस्थादेखील सुखद/असुखद असतात. महत्त्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे, सुखात्मक व असुखात्मक भाव आपल्याला अनुक्रमे अभिमुख किंवा पराङ्‍मुख करतात आणि प्रयत्‍नाची दिशा ठरविण्यास कारणीभूत होत असतात इतकेच. प्रेम, क्रोध, भय, दुःख इ. मनोभावांच्या ठिकाणी आपापले स्वरूपवैशिष्ट्य (स्पेसिफिसिटी) तसेच कृतिप्रेरकता असते, तसे भावांच्या ठिकाणी नसते.

भाव आणि उद्दीपके : काही उद्दीपके स्वभावतःच सुखद तर काही स्वभावतःच असुखद वाटतात, असे अंतर्निरीक्षणाच्या आधारे आपण सांगू शकतो. कोणती उद्दीपके सुखद व कोणती असुखद जाणवतात हे ⇨ जी. टी. फेक्‍नर (१८०१-८७) आदी मानसशास्त्रज्ञांनी तीन पद्धतींचा अवलंब करून निश्चित करण्याचाही प्रयत्‍न केला आहे: (१) विशिष्ट चव, विशिष्ट गंध, विशिष्ट स्पर्श वगैरे कितपत सुखद/असुखद वाटतो ते अनेक व्यक्तींना विचारणे (२) सुखद/असुखद बाबतीत भिन्नभिन्न चवींचा, रंगांचा, वासांचा वगैरे श्रेणीक्रम लावण्यास सांगणे आणि (३) एकेका चवीची, रंगाची, वासाची वगैरे इतर एकेका चवीशी, रंगाशी, वासाशी तुलना करावयास सांगणे, या त्या तीन पद्धती होत. गोड चव, सफाईदार रंग, मुलायम तसेच उबदार स्पर्श सुखद, तर भडक रंग, बोचरा स्पर्श, तारस्वर, कुबट वास वगैरे असुखद वाटतात. तथापि त्याबरोबरच असेही दिसून येते, की उद्दीपकामुळे झालेल्या वेदनाच्या तीव्रतेचे प्रमाण, वेदनाचा कालावधी, वेदनाची वारंवारता, त्या त्या वेदनासमवेत असलेली (सहचारी) वेदने, त्या त्या वेळची व्यक्तीशी शारीरिक गरज, त्यावेळचा मनोव्यापार, त्यावेळची मनःस्थिती (मूड) इत्यादींवरदेखील उद्दीपकाची सुखदता वा असुखदता काही अंशी अवलंबून असते.

जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून काही मानसशास्त्रज्ञांनी असा सिद्धांत प्रस्तुत केला आहे, की व्यक्तीच्या शरीरप्रकृतीस हितकारक त्याचप्रमाणे व्यक्तीची कार्यक्षमता टिकवून धरण्यासाठी आवश्यक अशी उद्दीपके सुखद, तर विषारी पदार्थांसारखी उद्दीपके असुखद वाटत असतात. हा सिद्धांतदेखील स्थूलमानाने खरा म्हणता येईल. कारण, आरोग्यास अपायकारक असणारे काही पदार्थ सुखद वाटतात आणि आरोग्यास उपकारक असे काही पदार्थ अरोचक वाटतात, असेही दिसून येते.

भावमापन: ‘भावा’नुभव मापनीय आहे व त्याला तीन परिमिती असतात, असे ⇨ व्हिल्हेल्म व्हुंट (१८३२-१९२०) यांनी प्रतिपादन केले होते. ‘अत्यंत सुखद, काहीसा सुखद, काहीसा असुखद … अत्यंत असुखद’ असा भेद करता येतो. म्हणून ‘सुख-असुख’ ही एक परिमिती अत्यंत क्षोमात्मकपासून तो अत्यंत शांतभावात्मक अशी श्रेणी लावता येते म्हणून ‘क्षोम-शांतत्व’ ही दुसरी परिमिती आणि व्यक्तीस कमीअधिक प्रमाणात तंग किंवा शिथिल वाटत असते म्हणून ‘तंगपणा-शिथिलता’ ही तिसरी परिमिती. सध्या मात्र बहुतेक मानसशास्त्रज्ञ ‘सुख-असुख’ ही एकच परिमिती मूलभूत मानतात. व्हुंट यांनी ‘भाव’ आणि ‘वेदने’ विशेषतः- स्‍नायूंशी संबद्ध असणारी वेदने व आंतरावयवमूलक वेदने – यांची गल्लत केली व त्यामूळे त्यांनी बाकीच्या दोन परिमिती कल्पिल्या, अशी टीका करण्यात आली आहे.

भावाचे शारीरिक अधिष्ठान : सुखद व असुखद अनुभवाचा संबंध एखाद्या वेदक इंद्रियाशी लावता येत नाही. कारण, विचार, स्मृती, कल्पना इ. मानसिक अवस्थादेखील सुखद/असुखद असतात. शरीरशास्त्रीय दृष्टीकोनातून करण्यात आलेल्या प्रायोगिक अन्वेषणातून असे दिसून आले आहे, की मध्यमेंदूतील अभिवाही-मस्तिष्क केंद्र (थॅलॅमस) नामक भागातील विशिष्ट केंद्रावर सुख व असुख हे भाव अवलंबून असतात. वेदक इंद्रियांकडून मोठ्या मेंदूकडे जाणारे मज्‍जातंतू अभिवाही-मस्तिष्क केंद्राच्या मार्गे जात असल्यामुळे वेदने सुखद/असुखद बनत असली पाहिजेत तसेच स्मृती, कल्पना इ. मनोव्यापारांच्या वेळीही अभिवाही-मस्तिष्क केंद्रामधील ती ती केंद्रे उद्दीपित होत असली पाहिजेत, असा तर्क करण्यात आलेला आहे.

पहा: चित्तवृत्ति व स्वभावधर्म मनोभाव समानुभूति सहानुभूति स्थिरभाव.

संदर्भ :1. Boring, E. G. Sensation and Perception in the History of Experimental Psychology, Chicago, 1942.

           2. Feleky, A. Feelings and Emotions, New York, 1924.

           3. Gardiner, H. N. Metcalf, R. C. Beebet-Centre, J. G. Feeling and Emotion : A History of Theories, New York, 1937.

           4. Stout, G. F. Manual of Psychology, Oxford, 1929.

           5. Wood-worth, R. S. Marquis, D. G. Psychology, London, 1964.

अकोलकर, व. वि.