क्यूल्पे, ओस्वाल्ट : (३ ऑगस्ट १८६२–३० डिसेंबर १९१५). जर्मन मानसशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व मानसशास्त्रातील वुर्ट्सबर्ग संप्रदायाचा प्रणेता. प्रायोगिक मानसशास्त्रात अंतर्निरीक्षण पद्धतीचा अवलंब प्रथम करण्याचा मान क्यूल्पेला दिला जातो. जन्म लॅटव्हियातील कँडौ येथे. लाइपसिक विद्यापीठात ⇨ व्हिल्हेल्म व्हुंट (१८३२–१९२०) याच्या मार्गदर्शनाखाली त्याचे शिक्षण झाले. १८८७ मध्ये त्याने मानसशास्त्रात लाइपसिक विद्यापीठाची पीएच्. डी. मिळविली. नंतर लाइपसिक, वुर्ट्सबर्ग, बॉन (१९०९) व म्यूनिक (१९१३) ह्या विद्यापीठांत त्याने प्राध्यापक म्हणून काम केले. १८९४ मध्ये त्याची वुर्ट्सबर्ग विद्यापीठात तत्त्वज्ञानाचा व सौंदर्यशास्त्राचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. वुर्ट्सबर्ग येथे त्याने प्रायोगिक मानसशास्त्राचे केंद्र सुरू केले. या केंद्रातील प्रायोगिक संशोधनातूनच वुर्ट्सबर्ग संप्रदाय उदयास आला  [ मानसशास्त्र]. पहिल्या महायुद्धापर्यंतच्या काळात ह्या संप्रदायाचा चांगला विकास झाला. पुढे बेल्जियममध्ये हा संप्रदाय आल्बर्ट मिशोत याच्या नेतृत्वाखाली चालू राहिला.

मानसशास्त्रातील काही समस्यांबाबत क्यूल्पेची मते व्हुंटच्या मतांहून भिन्न होती. स्मृती, विचारप्रक्रिया, संवेदन इ. मानवी उच्चतर मनोव्यापारांचे प्रायोगिक अन्वेषण करता येणे शक्य नाही, ह्या समजुतीतून व्हुंट व ⇨ ई. बी. टिचनर  (१८६७१९२७) यांनी या मनोव्यापारांची उपेक्षा केली. तथापि क्यूल्पेने मात्र या मनोव्यापारांचे प्रायोगिक अन्वेषण केले आणि संवेदन, स्मृती, विचारप्रक्रिया यांमध्ये  केवळ कल्पनांचे साहचर्यच नसते तर व्यक्तींचे अंगीकृत कार्य आणि तिची अभिवृत्ती ह्यांद्वारे ह्या क्रियांचे जे नियमन होत असते, त्याचा त्यांवर प्रभावही पडत असतो, असे दाखवून दिले. एखादे कार्य करण्यासाठी व्यक्तीची मानसिक तयारी होते आणि त्या तयारीमुळे व्यक्तीचे आपल्या कार्यासंबंधीचे प्रत्यावाहनही (रिकॉल) प्रभावित होत असते, असे त्याने स्मृतिविषयक प्रयोगांच्या आधारे सिद्ध केले. उदा., ‘कुत्रा’ याची ‘जाती’ सांगणे हे जर अंगीकृत कार्य असेल, तर ‘पशू’ ह्या शब्दाचे प्रत्यावाहन होईल आणि ‘कुत्रा’ ह्या जातीचे विवक्षित उदाहरण देणे, हे जर अंगीकृत कार्य असेल तर ‘शिकारी कुत्रा’ ह्या उदाहरणाचे प्रत्यावाहन होईल. सारांश, व्यक्तीपुढे असलेले कार्य आणि त्याबाबत असलेली व्यक्तीची जाणीवयुक्त अभिवृत्ती यांचा स्मृतीवर प्रभाव पडत असतो [ स्मृति व विस्मृति]. 

व्यक्तीच्या विचारप्रक्रियेलाही हेच तत्त्व लागू पडते, असे त्याने प्रयोगाधारे सिद्ध केले व विचारांचा ओघ हा केवळ साहचर्याधिष्ठित नसतो, असे दाखवून दिले. विचारप्रक्रिया म्हणजे केवळ प्रतिमांचे प्रत्यावाहन व त्यांचा वापर एवढीच प्रक्रिया असते, या साहचर्यवादी मताचे खंडन ⇨ आल्फ्रेड बीने  याने आपल्या प्रयोगांच्या आधारे करून प्रतिमारहित विचारक्रिया असू शकते, असे प्रतिपादन केले. क्यूल्पेच्या प्रयोगांनीही बीनेच्या मतास पुष्टी मिळाली [→ विचारप्रक्रिया].

क्यूल्पेने आपल्या मानसशास्त्रीय प्रयोगांच्या आधारे ‘वेदन’ (सेन्सेशन) व ‘आकलन’ (ॲप्रिहेन्शन) यांतील फरक व पर्यायाने ‘अस्तित्वात असणे’ (बीइंग) आणि ‘संवेदन होणे’ (बीइंग पर्सिव्ह्‌ड) यांतील फरक स्पष्ट केला. भाबडा वास्तववाद आणि चिद्‍वाद या दोन्हीही प्रकारच्या ज्ञानमीमांसात्मक भूमिका टाळणारी अशी चिकित्सक वास्तववादाची भूमिका त्याने प्रतिपादन केली. त्याच्या मानसशास्त्रीय विचारांशी त्याची ही भूमिका सुसंगत आहे. सौंदर्यप्रत्यय हा नेहमीच समानुभूतिमूलक असतो असे नसून, वस्तूची प्रमाणबद्धता, विशिष्ट मांडणी, आकार, सुसंवाद इ. वस्तुनिष्ठ गुणधर्मांमुळेही आपणास सौंदर्यप्रत्यय येतो, असा त्याचा दृष्टिकोन होता.

त्याचे ग्रंथ जर्मन भाषेत असून त्यांपैकी काही ग्रंथांची इंग्रजी भाषांतरे झाली आहेत. त्याचे उल्लेखनीय ग्रंथ पुढील प्रमाणे होत : Grundriss der Psychologie (१८९३, इं. भा. टिचनर, ई. बी. ॲनआउटलाइन्स ऑफ सायकॉलाजी, १९०१), Einleitung in die Philosophie (१८९५), Die Philosophie der Gegenwart in Deutschland (१९०२), Immanuel Kant (१९०७), Psychologie und Medizin (१९१२), वGrundlagen der Aesthetik(१९२१). म्यूनिक येथे त्याचे निधन झाले.

अकोलकर, व. वि. केतकर, भा. ग.