ॲड्‌लर, ॲल्फ्रेड : (७ फेब्रुवारी १८७०–२८ मे १९३७). व्यक्तिमानसशास्त्राचा प्रणेता आणि मानसोपचारज्ञ. ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना शहराच्या उपनगरात, हंगेरियन ज्यू कुटुंबात त्याचा जन्म झाला. व्हिएन्ना विद्यापीठाची एम्. डी. पदवी मिळवून त्याने वैद्यकीय पेशात पदार्पण केले परंतु लवकरच त्याचे लक्ष मानसोपचाराकडे वळले. ⇨ सिग्मंड फ्रॉइड याच्या मानसशास्त्रीय आणि हान्स व्हाइंगर याच्या अध्यात्मशास्त्रीय विचारांचा त्याच्यावर प्रभाव पडला. १९०२ ते १९११ पर्यंत त्याचा फ्रॉइडशी घनिष्ट संबंध आला परंतु पुढे फ्रॉइडशी तात्त्विक मतभेद झाल्याने १९११ मध्ये त्याने आपली स्वत:ची नवी प्रणाली काढली. स्कॉटलंडमधील ॲबर्डीन येथे तो मरण पावला.

मानवी वर्तनाच्या मुळाशी मुख्यत: कामप्रेरणा असते आणि कामप्रेरणेचे यशस्वी निरोधन केल्यानेच व्यक्तीचे सामाजीकरण होते, अशी जी फ्रॉइडची उपपत्ती होती, ती ॲड्‌लरने त्याज्य ठरविली. त्याच्या मते व्यक्तीच्या जन्मजात समाजप्रियतेमुळेच तिचे सामाजीकरण होते. बालपणी प्रत्येक व्यक्ती असहाय, दुर्बळ आणि परावलंबी असते. त्यामुळे तिच्या अंतरंगात न्यूनतेची भावना निर्माण होते. या न्यूनतेच्या जाणिवेवर मात करण्यासाठी मनुष्य सामर्थ्य, वर्चस्व, श्रेष्ठत्व, परिपूर्णता यांसारख्या कल्पित उद्दिष्टांमागे धाव घेतो. प्रत्येकजण आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण जीवन-शैलीनुसार धडपडत असतो. या धडपडीत काहींना नेत्रदीपक यश प्राप्त होते, तर काही मनोविकृतींना बळी पडतात. जे परिस्थितीशी अनुकूलन साधून आपली वैगुण्ये भरून काढतात, त्यांचे जीवन निकोप राहते. काही व्यक्तींच्या अंतरंगांत शारीरिक वैगुण्ये, मातापित्यांनी केलेली हेळसांड अथवा फाजील लाड, कुटुंबियांकडून झालेली वंचना इ. कारणांमुळे ⇨न्यूनगंड बळावतो आणि परिणामी ते चिंताक्रांत व मनोविकृत बनतात.

ॲड्‌लरची शिकवण ही मनोविश्लेषण, मानसोपचार, अपसामान्य मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्र यांना लाभलेली बहुमोल देणगीच होय. त्याचे बहुतांश ग्रंथ जर्मन भाषेत असून त्यांची इंग्रजी भाषांतरेही झालेली आहेत. त्यांतील महत्त्वाचे भाषांतरित ग्रंथ पुढीलप्रमाणे होत : द प्रॅक्टिस अँड थिअरी ऑफ इंडिव्हिज्युअल सायकॉलॉजी (१९२७), अंडरस्टँडिंग ह्यूमन नेचर (१९२७), द सायन्स ऑफ लिव्हिंग (१९२९), द एज्युकेशन ऑफ चिल्ड्रेन (१९३०) आणि सोशल इंटरेस्ट : ए चॅलेंज टू मॅनकाइंड (१९३९).

पहा : व्यक्तिमानसशास्त्र.

संदर्भ : 1. Ansbacher, H. L. Ansbacher, R. R. Ed. The Individual Psychology of Alfred Adler, New York, 1956.

           2. Way, Lewis, Adler’s Place in Psychology, London, 1950.

बोरूडे, रा. र. कानिटकर, ग. मो.