मन : पाश्चात्य तत्वज्ञानात मन या वस्तूच्या स्वरूपाविषयीचा पध्दतशीर विचार प्लेटोपासून सुरू होतो. ह्या विचाराला पायथॅगोरसचा पंथ, ऑर्फिक पंथ इ. धार्मिक-आध्यात्मिक पंथांची पार्श्वभूमी आहे. माणसाचा आत्मा त्याच्या देहापासून भिन्न असतो तो देहात वसत असला तरी अशी वसती करण्यापूर्वी आणि ती संपल्यानंतरही तो अस्तित्वात असतो, असे ⇨प्लोटो मानीत असे. (आत्मा आणि मन ह्या जवळजवळ एकमेकींसारख्या असलेल्या संकल्पना आहेत. आत्मा ही संकल्पना प्रामुख्याने धार्मिक-आध्यात्मिक संदर्भात वापरली जाते. हाच काय तो त्या दोन्हीतील भेद आहे. माणसाला अमर असा आत्मा आहे हे विधान आणि माणसाचे मन त्याच्या देहाचा नाश झाल्यानंतरही कायमचे अस्तित्वात असते. हे विधान यांच्या आशयात काही भेद नाही.)

आधुनिक तत्वज्ञानाचा जनक असलेल्या ⇨रने देफार्तने मन आणि जडवस्तू (मेंटर) यांच्यामध्ये स्पष्ट भेद केला. मन आणि जडवस्तू ही दोन पूर्णपणे भिन्न अशी द्रव्ये (सब्स्टन्स) आहेत. हा सिध्दांत त्याने मांडला. विस्तार हा जडद्रव्याचा व्यवच्छेदक धर्म आहे आणि विचार किंवा जाणीव चैतन्य (कॉन्शसनेस) हा मनाचा व्यवच्छेदक धर्म आहे. हे दोन मूलतः भिन्न आणि परस्परविरोधी असे धर्म आहेत, ते एकाच वस्तूच्या ठिकाणी असू शकत नाहीत व म्हणून मन व जडवस्तू ही दोन भिन्न द्रव्ये आहेत असे मानावे लागते, असा ह्या सिध्दांताचा आशय आहे.

विचार किंवा जाणीव ही संकल्पना देकार्तने अतिशय व्यापक अर्थाने वापरली आहे. विचार,कल्पना, राग किंवा प्रेम यांसारख्या भावना, इच्छा, सुखदुःख या वेदना, इंद्रियसंवेदना ही सर्व जाणिवेची रूपे आहेत आणि म्हणून त्या मानसिक घटना आहेत. असे तो मानीत असे. अशा मानसिक घटना ज्या द्रव्यात किंवा द्रव्याला घडतात ते म्हणजे मन अशी ही मनाची संकल्पना आहे.

पण ⇨द्रव्य ही संकल्पना असावी तितकी स्पष्ट नाही. जे टिकून रहाते आणि ज्याच्या ठिकाणी एकामागून एक अशा अनेक घटना घडतात ते म्हणजे द्रव्य अशी द्रव्याची संकल्पना आहे. उदा. आंब्यांचे फळ हे एक भौतिक द्रव्य आहे आणि कच्ची कैरी आणि पिकलेला आंबा ह्या एकाच द्रव्याच्या भिन्न काळांच्या अवस्था आहेत. असे आपण मानतो. त्याचप्रमाणे मन हे एक द्रव्य आहे आणि त्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या काळी वेगवेगळ्या घटना घडतात. असा देकार्तचा सिध्दांत आहे. पण घटनांहून भिन्न असलेले आणि ज्याच्या ठिकाणी या घटना घडतात असे जे मन हे द्रव्य आहे, त्याचे स्वरूप काय आहे असा जर प्रश्न उपस्थित केला , तर त्याचे स्पष्ट उत्तर मिळत नाही. तेव्हा मन हे द्रव्य आहे ही कल्पना बाजूला सारून इंद्रियसंवेदना प्रतिमा, वेदना, इच्छा, भावना, विचार इ. मानसिक घटनांची एक विशिष्ट मालिका म्हणजेच मन हा सिध्दांत पुढे आला.⇨डेव्हिड हूम ह्या तत्ववेत्याने ह्या सिध्दांताची स्पष्ट मांडमी आणि समर्थन केले आहे.

समजा, एक मन म्हणजे मानसिक घटनांची विशिष्ट मालिका हा सिध्दांत मान्य केला तरी व्यवहारात आपण ज्याला मन म्हणतो त्याची आणखी काही वैशिष्ट्ये ध्यानात घ्वावी लागतात. एकतर मन हे समान्यतः सुटे असलेले आढळत नाहीच ते नेहमी एका देहाशी संलग्न असते. ह्याचा अर्थ मनाला देहापासून अलग असे अस्तित्व असणे तर्कच अशक्य आहे, असा होत नाही. अशी अशरीरी मने अस्तीत्वात असतात आणि त्याच्याशी आपल्याला संपर्क साधता येतो.असा दावा ⇨ अतिद्रिय मानसशास्त्र (पॅरासायकॉलॉजी) ह्या क्षेत्रात संशोधन करणार्याआ अनेकांनी केला आहे आणि तो सत्य असणे अशक्य नाही तसेच तो सत्य किंवा असत्य ठरो पण तो तर्कतः विसंगत आहे असे म्हणता येणार नाही. मनाचे दुसरे वैशिष्ट्ये असे, की मानसिक घटना ज्याप्रमाणे जाणिवेची रूपे असतात त्याप्रमाणे मानवी मनाच्या ठिकाणी आत्मजाणीवही असते. उदा. मला जो राग येतो ती भावना हे जसे जाणिवेचे एक रूप आहे किंवा अवस्थआ आहे त्याप्रमाणे मला राग आला आहे ही जाणीवही मला असते. ही आत्मजाणीव होय. ह्या आत्मजाणीवेत मी ह्या विषयीची (सब्जेक्ट) व त्याच्या एका अवस्थेची (उदा. राग) जाणीव अंर्भूत असते. ह्या जाणिवेत एका मानसिक अवस्थेचे मी शी नाते जोडलेले असते. तिसरे वैशिष्ट्ये असे, की मानसिक अवस्था खाजगी असतात. माझ्या रागाची किंवा माझ्या मनात चाललेल्या विचारांची मला जशी जाणीव असते तशी ती इतरांना असत नाही. माझ्या मनात कोणते विचार चालले असतील ह्याविषयी फारतर इतर तर्क करू शकतात.पण मला आणि फक्त मलाच त्यांची साक्षात जाणीव असते. माझ्या मानसिक अवस्थाची मला विशेषोपलब्धी (प्रिव्हिलेज्ड अँक्सेस) असते.

आता मन म्हणजे मानसिक घटनांनी केवळ एक मालिका असे मानले, तर जो प्रश्न उपस्थित होतो तो असा की ही मालिका एक कशामुळे ठरते. म्हणजे एक मालिका ही इतर मालिकांहून (मनांपून) वेगळी कशामुळे ठरते. आणि एका मालिकेतील वेगवेगळ्या वेळचे अनुभव हे त्या विशिष्ट मालिकेतील अनुभव आहेत हे कशाच्या आधाराने निश्चित करता येते. मन ही एक अनुभवांची मालिका आहे तिच्या एकतेचे सूत्र काय. ह्याचे शक्य असलेले एक उत्तर असे, की अनुभव किंवा मानसिक घटना ह्या नेहमी देहाशी संलग्न असतात. मानसिक घटना ह्या नेहमी देहाच्या विशिष्ट अवस्थांचे, विशेषतः मेंदूच्या स्थितीचे परिणाम म्हणून निष्पण होत असतात. तेव्हा एका विशिष्ट देहाशी संलग्न असलेल्या आणि कार्यकारणसंबंधाने संबंधित असलेल्या मानसिक घटनांची मालिका म्हणजे एक मन. हा सिध्दांत अधिक स्पष्टपणे असा मांडता येईल. जडद्रव्य हेच द्रव्य आहे आणि त्याहून वेगळे असणारे मन असे द्रव्य नाही. एका विशिष्ट स्वरूपाच्या जडद्रव्याचा, म्हणजे प्राण्यांच्या शरीरांचा धर्म असा आहे की ह्या शरीरांत घडणार्या काही घटनांची कार्ये म्हणून, त्या घटनांचे परिणाम म्हणून अनुभव (जाणिवेची रूपे) अस्तित्वात येतात. मनाला, मानसिक घटनांना स्वतंत्र अस्तित्व नसते. ह्या सिध्दांतात आणखी एक भर घालण्यात येते.ती अशी की भौतिक घटनांच्या ठिकाणी जसे कार्यकारित्व असते. परिणाम घडवून आणण्याची शक्ती असते तशी मानसिक घटनांच्या ठिकाणी नसते. भौतिक घटना ह्या त्यांच्या पूर्वी घडलेल्या भौतिक घटनांची कार्य असतात आणि त्या स्वतःकारणे म्हणून कार्य घडवून आणतात. उलट मानसिक घटना ह्या शारीरीक घटनांची केवळ कार्ये असतात. त्या कोणतेही कार्ये घडवून आणू शकत नाहीत. मानसिक घटना ह्या केवळ शारीरिक घटनांच्या सावल्यांसारख्या असतात. ह्या सिंध्दांताला गौणघटनावाद (एपिफिनॉमेनालिझम) म्हणतात.

ह्या सिध्दांतातील अडचण अशी, की मला आलेला राग हा मी सरळ माझा राग म्हणून ओळखतो. म्हणजे माझ्या रागाच्या अवस्थेचे मी ला उद्देशून सरळ विधेयन करतो. वर दिलेला सिध्दांत सत्य असता, तर हा राग माझ्या मेंदूच्या अवस्थेचा परिणाम आहे हे समजल्याशिवाय तो माझा राग आहे हे म्हणता आले नसते. पण मेंदूच्या अवस्थेविषयीचे काहीही ज्ञान मला नसताना हा राग माझा म्हणून मी स्वीकारू शकतो. तेव्हा विशिष्ट देहाशी कार्यकारणसंबंधाने निगडित असलेल्या अनुभवांची मालिका हे मनाच्या एकतेचे तत्व आहे, असे म्हणता येत नाही. 


ह्यूमने मनाच्या एकतेचा केलेला खुलासा वेगळा होता. जे अनुभव एकमेकांच्या लगतचे असतात. ज्यांच्यात साम्य असते. ज्यांच्यात कार्यकारणसंबंध असतो आणि विशेषतः स्मृतीने जे एकमेकांशी जोडलेले असतात ते एका मालिकेत एका मनात मोडतात. उदा. मी जर एका खोलीत पाच मिनिटे बसलो, तर मला ह्या अवधीत जे अनुभव येतील ते कालिक दृष्ट्या एकमेकांच्या जवळचे असतील आणि त्यांच्यात साम्यही असेल. तेव्हा ते एका मालिकेत समाविष्ट होतील. तसेच मला चहा पिण्याची इच्छा झाली आणि लगेच मला चहा प्यायला मिळाला,तर मला आनंद होईल. हा आनंद माझ्या चहा पिण्याच्या इच्छेशी कार्यकारण संबंधाने निगडित आहे.पण मनाच्या एकतेचे हे निकष निर्णायक नाहीत. दोन माणसे एकाच अवधीत एकाच खोलीत असली, तर त्यांचे अनुभव काळात लगतचे असतील व त्याच्यात साम्यही असेल, पण ते भिन्न मनांतील अनुभव आहेत. माझी इच्छा तृप्त झाली तर त्यामुळे माझ्या आईला आनंद होईल. इच्छातृप्तीचा माझा अनुभव आणि माझ्या आईचा आनंदाचा अनुभव यांच्यात कार्यकारणसंबंध आहे. पण ते भिन्न मनांतील अनुभव आहेत. स्मृतीचा निकष अधिक बळकट आहे . मला फक्त माझ्या स्वतःच्या पूर्वीच्या अनुभवांचे स्मरण होऊ शकते. इतरांच्या अनुभवांचे मला स्मरण होऊ शकत नाही. समजा मला क ह्या अनुभवाचे स्मरण आहे. क ह्या अनुभवाचे स्मरण हा जो अनुभव आहे त्याला ख असे नाव देऊ. आता ख आणि क हे एकाच मनाचे अनुभव आहेत हे मान्य करावेच लागेल. कारण ख ज्या मनात आहे त्याच मनात (पूर्वी)  क नसता तर ख असा अनुभव असणे अशक्य झाले असते. पण स्मारणाचा मला आहे हा पुरावा हे माझे (पूर्वीचे) अनुभव आहेत हे सिध्द करायला पूरेसा आहे. परंतु अमुक अनुभवांचे मला स्मरण नाही म्हणून ते माझे (पूर्वीचे) अनुभव नाहीत, असे सिध्द होत नाही. कारण मी विस्मरलेले असे माझे खूप अनुभव असू शकतात. आणखी एक अडचण अशी , की हा निकष लावण्यात अन्योन्याश्रयाचा दोष घडून येतो. समजा मी लहानपणी नागपूर येथील एका घराच्या आवारात भटकत होतो असे मला स्पष्ट स्मरण आहे. पण मी लहानपणी कधी नागपूरला गेलोच नाव्हतो हे पुराव्याने सिध्द होते. मग हे स्मरण खरे स्मरण नाही, ती केवळ माझी कल्पना आहे असे आपण म्हणू. तेव्हा अ हा अनुभव माझा पूर्वीचा एक अनुभव आहे, हे सिध्द झाल्याशिवाय त्याचे स्मरण मला आहे असे म्हणता येत नाही. तेव्हा स्मरणाच्या आधारे काही अनुभव माझे पूर्वीचे अनुभव आहेत असे ठरविता येणार नाही. [⟶ स्मृति व विस्मृति] .

सारांश मन ही अडचणींनी ग्रासलेली संकल्पना आहे. मनाला जडद्रव्याहून भिन्न असे द्रव्य मानण्यात अडचणी आहेत आणि मन असे वेगळे द्रव्य नाही असे मानण्यातही अडचणी आहेत. ह्या अडचणींतून काढण्यात आलेला आणखी एक मार्ग म्हणजे ⇨ वारूक स्पिनोझाने मांडलेली उपपत्ती. हिचा आशय असा, की जडतत्व व मन ही द्रव्येच नव्हेत आणि म्हणून भिन्न द्रव्ये नव्हते. तर एकाच अपक्ष (न्यूट्रल) द्रव्यांचे ते दोन धर्म किंवा अंगे होत. म्हणजे असे, की ज्या वस्तू आहेत किंवा ज्या घटना घडतात त्यांचे जड वस्तू आणि जडघटना व मने आणि मानसिक घटना अशा दोन वर्गात वर्गीकरण करता येत नाही. तर ह्या ज्या वस्तू आणि घटना आहेत त्याच एका दृष्टीने पहाता जडवस्तू आणि जडघटना असतात आणि दुसर दृष्टीने पहाता मने आणि मानसिक घटना असतात. उदा. एकच घटना मेंदूत आणि मज्जासंस्थेत घडणारी भौतिक घटना असते. व तीच घटना रागाची भावना ही मानसिक घटना असते. पण हे दोन दृष्टीकोन कोणते आणि ते कसे उपलब्ध होतात हे स्पष्ट करता येत नाही आणि जर तीच घटना दोन भिन्न दृष्टीकोनातून वेगळी दिसते असे असेल, तर तिचे स्वतःचे स्वरूप काय आहे हेही सांगता येत नाही.

जडद्रव्य आणि मन अशी दोन भिन्न द्रव्ये आहेत ह्या सिध्दांतातून निर्माण होणार्या अडचणींमधून एक वेगळा मार्ग काढण्याचा ⇨वर्ट्रड रसेल यांनी प्रयत्न केला. त्यांनी मांडलेली उपपत्ती अशी एखाद्या भौतिक वस्तू्च्या स्वरूपाचे विश्लेषण आपण केले तर रंग, आकार, वास इ. संवेदना हाती लागतात तसेच आपल्या मनःस्थितीचे किंवा अनुभवांचे विश्लेषण केले तरीही संवेदना व त्यांच्या प्रतिमा हाती लागतात. तेव्हा भौतिक वस्तू आणि मने यांचे जे अंतिम घटक आहेत ते एकच आहेत. हे घटक म्हणजे संवेदन आणि प्रतिमा होत .ह्या घटकांची एका प्रकारे रचना झाली की भौतिक वस्तू प्राप्त होते आणि दुसर्याघ प्रकारे रचना झाली की मानसिक घटना, मन प्राप्त होते. पण संवेदना व प्रतिमा ह्याज्या अंतिम सामग्रीच्या ह्या दोन्ही प्रकारच्या वस्तू बनलेल्या असतात. त्या सामग्रीचे स्वतःचे स्वरूप भौतिकही नसते किंवा मानसिकही नसते. ते अपक्ष असते. ह्या सिध्दांताला अपक्ष एकतावाद (न्यूट्रल मॉनिझम) म्हणतात.

हा सिंध्दांत स्वीकारण्यातही लोक अडचणी आहेत. विशेषतः जाणिवेच स्वरूप आणि मनाच्या एकतेचे स्वरूप यांचा समाधानकारक उलगडा त्याच्याकडून होऊ शकत नाही. 

स्पिनोझाच्या उपपत्ती ची एक अलीकडची आवृत्ती म्हणजे काही तत्ववेत्यांनी पुरस्कारिलेली तादात्म्य उपपत्ती (आयडेन्टिटी थिअरी). ह्या उपपत्तीप्रमाणे शारीरिक (भौतिक) घटना आणि मानसिक घटना असे घटनांचे दोन भिन्न वर्ग नसतात. तर कित्येक घटनांची अशी दोन भिन्न वर्णने करता येतात. उदा. सातारा जिल्ह्याचा कलेक्टर आणि सातारा नागरिक क्लबाचा अध्यक्ष ही दोन भिन्न अर्थाची वर्णने आहेत. पण ती एकाच व्यक्तीची सत्य वर्णने असू शकतात. त्याचप्रमाणे मेंदूत घडलेली अमुक अमुक स्वरूपाची घटना हे वर्णने आहेत. पण ती एकाच घटनेची दोन भिन्न पण सत्य अशी वर्णने आहेत. ह्या उपपत्तीप्रमाणे मानसिक घटना घेतली, उदा. माझी रागाची भावना घेतली, तर ती म्हणजे कोणती भौतिक घटना आहे, तिचे कोणते भौतिक वर्ण योग्य ठरेल हे मला किंवा कुणालाही माहीत नसणे शक्य असते. सातारा जिल्ह्याचा कलेल्टर हे वर्णन कोणत्या व्यक्तीला लागू पडते हे समजा मला माहित आहे. त्या व्यक्तीला सातारा जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून मी ओळखतो. पण सातारा नागरिक क्लबाचा अध्यक्ष हे वर्णनही त्याच व्यक्तीला लागू पडते हे मला माहीत नसेल. तीच व्यक्ती सातारा नागरिक क्लबाचा अध्यक्षही आहे हे ज्ञान मला नसेल आणि हा शोध मला पुढे लागेलही. त्याचप्रमाणे माझी रागाची भावना हे वर्णन ज्या घटनेला लागू पडते माझ्या मेंदूत किंवा मज्जासंस्थेत घडलेली अमुक स्वरूपाची घटना असे वर्णन हे मला माहीत नसेल हा शोध मला पुढे लागू शकेल.  पण हा शोध लागला नसतानाही ती मानसिक घटना एक शारीरिक घटना असतेच.

ह्या मुद्याला पुढील कारणामुळे महत्व आहे. मनासंबंधीच्या अडचणी ध्यानात घेऊन अनेक तत्ववेत्यानी मन आहे किंवा मानसिक घटना असतात ही गोष्टच नाकारली आहे. त्यांच्या मताप्रमाणे फक्त जडद्रव्य अस्तित्वात आहे, म्हणजे फक्त भौतिक वस्तू आणि घठना यांना अस्तित्व आहे, मानसिक घटना असे काही नसते. पण सकृतदर्शनी पहाता राग, कल्पना इ. मानसिक घटनांचा निर्देश करणारे शब्द आणि शब्द प्रयोग आपण व्यावहारात वापरतो . ह्यांच्या अर्थाची व्यवस्था कशी लावायची हा प्रश्न मग उपस्थित होतो. त्याचे उत्तर असे देण्यात येते, की राग ह्या शब्दाने मेंदूतील घटनाच व्यक्त होते. पण मग प्रश्न निर्माण होतो तो असा, की मला राग आला आहे. अशी विधाने मेंदूविषय़ी मला काही माहीत नसतानाही मी कशी करू शकतो. ह्या अडचणीचे निरसन वरील भूमिकेप्रमाणे होऊ शकते. भौतिक घटना आणि मानसिक घटना असे दोन भिन्न वर्ग नाहीत. एकाच प्रकारच्या घटना आहेत. त्यांतील कित्येकांना भौतिक व मानसिक अशी दोन्ही वर्णने लागू पडतात. परंतु एखाद्या घटनेचे एका प्रकारचे वर्णन मला माहित असते तेव्हा दुसरे वर्णन मला माहीत असेलच असे नाही. एका घटनेला मी राग म्हणून ओळखतो तेव्हा त्या घटनेचे भौतिक वर्णन मला माहित नसणे शक्य असते. पण तिचे कोणतेतरी योग्य असे भौतिक वर्णन असतेच एकाच प्रकारच्या घटना असतात असे मानने (ते योग्य असेल तर) विज्ञानाला उपकारक आहे. कारण विश्वातील सर्व घटना जर एकाच प्रकारच्या असतील तर त्यांचे एक शास्त्र ,एक समावेश विज्ञान असले पाहिजे असे मानता येते. तादात्म्य उपपत्ती विकसित करण्यामागे हा महत्वाचा हेतू आहे.


हा उद्देश मान्य करूनही काही महत्वाच्या अडचणींचे निरसन ही उपपत्ती करू शकत नाही.हे ध्यानात घेणे आवश्यक आहे. त्यातील एक अडचण अशी ज्या घटनेचे भौतिक वर्णन आपण करतो ती कुठे घडते. हा प्रश्न आपण उपस्थित करू शकतो. आता त्याच घटनेचे जर मानसिक वर्णनही करता येत असेल, तर अशा मानसिक  वर्णनाने निर्दिष्ट केलेली तीच घटना कुठे घडत आहे हे आपण विचारू शकत नाही.उदा. एकाच घटनेची मेंदूतील प्रक्रिया आणि वाचर करणे अशी दोन वर्णने आहेत असे मानूया. मेंदूतील प्रक्रीया कुठेतरी घडत असते. पण विचार कुठे तरी घडत असतो, ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही. दुसरी महत्वाची अडचण अशी की मानसिक घटनांची त्या त्या व्यक्तीला विशेषोपलब्धी असते हे आपण पाहिले .भौतिक घटनांची अशी विशेषोपलब्धी असत नाही. मानसिक घटना जर भौतिक घटनाच असतील तर त्या विशिष्ट व्यक्तीलाच का उपलब्ध असतात, ह्याचा उलगडा करता येणार नाही. 

केवळ भौतिक वस्तू व घटना असतात. मानसिक घटना असे त्यांच्याहून भिन्न असेकाही नसते. ह्या ⇨जडवादी भूमिकेचे विकसित स्वरूप म्हणजे ⇨जे.बी. वॉटसन इत्यादींनी प्रसृत केलेला ⇨वर्तनवाद होय. ह्या उपपत्तीप्रमाणे व्यवहारात मानसिक घटना, प्रक्रिया इत्यादींचा निर्देश करण्यासाठी म्हणून आपण जे शब्द वापरतो ,त्यांनी वास्तविक फक्त शारीरिक घटना व वर्तन ह्यांच्याच निर्देश होत असतो. कोणत्याही मानसिक घटनेचे शारीरिक घटना व वर्तना यांच्यात निःशेष करता येते. मानसिक घटनेत अधिक काही नसते. ⇨गिल्बर्ट राईल या ब्रिटिश तत्ववेत्याने ह्या भूमिकेचे तत्वज्ञानात्मक समर्थन केले आहे. पण मानसिक घटनांच्या विशेषोलब्धी संबंधीच्या अडचणीचे निरसन ही उपपत्ती करू शकत नाही.

मन हे जडद्रव्यातून भिन्न आहे पण ती जडद्रव्याची उन्निर्मिती आहे अशी उपपत्ती ⇨सॅम्युअल अलेक्झांडर इ. तत्ववेत्यांनी मांडली आहे. मनाविषयीची मार्क्सवादी उपपत्तीही याच वळणाची आहे. [⟶ मार्क्सवाद].ह्या उपपत्तीप्रमाणे मानसिक प्रक्रियांचे एक विशिष्ट असे स्वरूप असते. त्या जाणिवेतील घटना असतात. त्यांची विशेषोपलब्धी असते इत्यादी . म्हणून त्यांचे शारीरिक,भौतिक घटनांत निःशेष विश्लेषण करता येत नाही. परंतु मानसिक घटना भौतिक घटनांवर आधारलेल्या असतात. एका विशिष्ट भौतिक-रासायनिक स्वरूपाचा देहपिंड जेव्हा अस्तित्वात येतो तेव्हाच त्या देहाच्या आणि त्याच्या शारीरिक प्रक्रियांच्या अधिष्ठानाच्या आधारे मानसिक घटना घडतात. म्हणून एकतर मन हे स्वतंत्रपणे अस्तित्वात असू शकत नाही. मानसिक घटनांना नेहमी शारीरिक अंग असते. आणि हे शारीरिक अंग त्या त्या मानसिक घटनेचे अधिष्ठान असते. पण मानसिक घटना ही ह्या शारीरिक अंगापलीकडे जाणारी असते व ह्या अर्थाने उन्निर्मिती असते.

ह्या उपपत्तीविषयी असे म्हणता येईल की आपल्याला सर्वसाधारण मनांचा व मानसिक घटनांचा जो अनुभव आहे त्याप्रमाणे पहाता मानसिक घटना शारीरिक घटनांवर आधारलेल्या असतात, हे म्हणणे योग्य ठरते. उदा. मेंदूवर आघात झाला तर मानसिक घटनांत बिघाड होतो. पण तर्कतः पहाता मन शरीराहून स्वतंत्र आहे की नाही, याचा निर्णय ह्या अनुभवावरून करता येत नाही. दुसरी गोष्ट अशी की, मनाला उन्निर्मिती म्हटल्यामुळे शारीरिक घटनांपासून मानसिक घटना का व कशा घडून येतात, याचा उलगडा होत नाही. हे गूढ तसेच राहते व उन्निर्मिती हा शब्द त्याच्यावर पांघरून घालतो.

सिग्मंड फ्रॉइड व त्यांचे अनेक भिन्नपंथी मनोविश्लेषक अनुयायी यांनी एका अभिनव उपपत्तीचा पुरस्कार केला आहे. [⟶ मनोविश्लेषण].त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मानसिक घटना ह्या केवळ बोधरूप वा जाणिवेच्या घटना नसतात, तर अनेक मानसिक घटना व कृती इच्छा स्मृती इ.–नेणिवेत घडणा अबोध (अनकॉन्शियस) घटना असतात.उदा. माझी खूप दिवस दुर्धर रोगाने अंथरूणाला खिळलेली अपंग आई मरावी अशी माझी इच्छा असते. पण ती अबोध इच्छा मनोविश्लोषक मानसशास्त्रज्ञांनी मानसिक प्रक्रियांविषयी लावलेल्या अनेक चमत्कारिक व रहस्यमय शोधांचे महत्व मान्य करूनही अबोध मानसिक घटना ह्या संकल्पनेचा नेमका आशय काय आहे हे अजून स्पष्ट व्हायचे आहे, असे म्हणणे भाग आहे. आणि जाणीव ह्या संकल्पनेचे स्वरूप जेव्हा होईल तेव्हाच अबोध मानसिक घटना ह्या संकल्पनेचे स्वरूपही स्पष्ट होईल. उदा. मला जर क्ष ची इच्छा असेल तर सामान्यतः मला क्ष हवे आहे, हे मला माहीत असते. हिला क्ष ची सजाण व बोधरूप इच्छा म्हणूया.  मला माझ्या आईचा मृत्यू घडायला हवा असला, पण तो मला हवा आहे हे मला माहित नसले, तर ही अजाण वा अबोध इच आहे असे म्हणूया. पण पुढे प्रश्न असा आहे, की एखाद्या वस्तूची इच्छा असण्यातच ती वस्तू हवी असण्यातच जाणीव अंतर्भूत असते का. इच्छा हा जाणिवेचाच एक प्रकार आहे का. क्ष ची कल्पना माझ्या मनात असल्याशिवाय क्ष ची इच्छा मला आहे असे म्हणता येईल का. आणि क्ष ची कल्पना मनात असणे ही सजाण घटना असते की नाही. ह्या प्रश्नांचा उलगडा झाल्याशिवाय अबोध मानसिक घटना, ही संकल्पना कितीही उपयुक्त ठरली, तरी तिचा आशय अस्पष्टच राहिला आहे, असे म्हणावे लागते.        

रेगे,मे.पु.

भारतीय विचार : मनस या सकारान्त शब्दाचे मन हे अकारान्त रूप मराठी, हिंदी इ. भारतीय भाषांमध्ये रूढ झाले आहे. परंतु मानसशास्त्र, मनोविश्लेषण, मनोविकार, मनोवृत्ती इ. मराठीतील शब्द मूळच्या संस्कृतमधील मनस या सकारान्त शब्दावरूनच बनविलेले आहेत. नुसत्या अकारान्त मन शब्दावरून बनविलेले नाहीत.चार्बाकाचे जडवादी दर्शन सोडल्यास मन हे या स्थूल देहातून वेगळे आहे, असेच सर्व भारतीय तत्वदर्शने मानतात. न्याय-वैशेषिक दर्शनांप्रमाणे मन हे अणुरूप स्वतंत्र द्रव्य होय. सांख्य व योग दर्शनाप्रमाणे मन हे २४ तत्वांपैकी एक तत्व असून अहंकार या तिसर्याद तत्वातील सत्वप्रधान अहंकारातून विकसित झालेले तत्व होय. यास योगदर्शनात चित्त अशी संज्ञा आहे. रामानुजांच्या वेदान्तात त्याचप्रमाणे सांख्य दर्शनातील प्रकृतितत्वाचा अंतर्भाव करून निर्माण झालेल्या शैव व वैष्णव धर्मामध्ये मन हे सांख्यांप्रमाणेच अहंकाराच्या सात्विक भागातून विकसित झालेले तत्व मानले आहे. मनाला अंतःकरण अशीही संज्ञा सर्व भारतीय दर्शने देतात. शांकरवेदान्त दर्शनात मन किंवा अंतःकरण हे सूक्ष्म पंचमहाभूतांच्या सात्विक गुणाच्या प्रभावाने निर्माण झालेले तत्व होय. पण यासंबंधी या दर्नाचा आग्रह नाही. सांख्याची उपपत्तीसुध्दा हे दर्शन मान्य करते. 


मन हे आत्म्यात ज्ञान निर्माण करणारे आत्म्याचे साधन आहे. नेत्र, श्रोत्र, त्वक, रसना आणि व्राण या बाह्य ज्ञानेंद्रियांप्रमाणेच सर्व बाह्य ज्ञानेंद्रिंयाना आणि कर्मेद्रियांना समानपणे आधार देऊन त्यांच्या तून होणारी ज्ञाने आणि कार्ये निर्माण करण्याचे साधन आहे.ते अनुभव व स्मृती देणारे आत्म्याचे विशिष्ट साधन आहे म्हणून त्यास अंतःकरण म्हणतात. करण म्हणजे असाधारण साधन. नेत्र, श्रोत्र इं.इंद्रियांचा शब्द ,रूप इ. बाह्य विषयांशी संपर्क झाला म्हणजे बाह्य विषयाचे प्रत्य़क्ष ज्ञान होते. परंतु मनाचा आणि त्या इंद्रियांचा दृढ संपर्क म्हणजे सन्निकर्ष नसेल, तर विषयाचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. माझे मन दुसरीकडे होते म्हणून मला ऐकू आले नाही. दिसले नाही, असे मनुष्य म्हणतो. बाह्य नेत्रादी इंद्रियांशिवाय मन हे वेगळे तत्व आहे, असे अनुमान वैशेषिक व न्यायदर्शनात मांडले आहे. ते असे अनेक विषयांची एकाच वेळी बाह्य ज्ञानेंद्रियांचा सन्निकर्ष झालेला असतो. ध्वनी उमटत असतात. प्रकाशात वस्तू झळकत असतात. अंगावरून वारा जात असतो, नाकात सुगंध वा दुर्गंध शिरत असतो, तोंडात तंबाखू चघळली जाते असे हे एकाच क्षणी घडत असताना त्या एकाच क्षणी या सर्व पाची ज्ञानेंद्रियांच्या विषय़ांचा प्रत्य़क्ष अनुभव घडत नाही. यावरून या बाह्येंद्रियांना सहकारी असे इंद्रीय असले पाहिजे असे अनुमान होते. दुसरे असे,की आपल्याला बसल्याबसल्या भूतकाळातील घटनांची स्मृती होत असते.स्मृतीचे प्रवाह सुरू असतात. पुत्रजन्माचे श्रवण झाल्यावर सुख होते. प्रिय व्यक्तीच्या मरणाची वार्ता आली की दुःख होते, शत्रूची आठवण झाली की द्वेषचा विकार उत्पन्न होतो आणि प्रिय व्यक्तीची आठवण झाली की प्रेमवृत्ती निर्माण होते. या सर्व मानसिक अवस्थांचा अनुभव घेणारा आत्मा जरी असला, तरी त्या आत्माला अनुभवाचे विशिष्ट साधन म्हणून बाह्य ज्ञानेंद्रियांशिवाय आवश्यक असे अंतरिंद्रिय आवश्यक ठरते. तेच मन होय.

मनाच्या निरनिराळ्या कार्यांवरून त्याचे २, ३ किंवा ४ असे भाग निरनिराळ्या दार्शनिकांनी कल्पिले आहेत. मन, बुध्दी, चित्त आणि अहंकार असे अंतःकरणाचे विभाग काही वेदान्त्यांनी केले आहेत. संकल्प व विकल्प ही मनाची कार्ये होत. इंद्रियांना प्रत्यक्ष दिसणार्य वस्तूंचे समान धर्म आणि वेगवेगळे धर्म लक्षात घेणे हे मनाचे कार्य. अनेक प्रकारचे प्राणी पाहिल्यावर ते प्राणी असा समान संकल्प मनात निर्माण होतो आणि त्या प्राण्यांमध्ये गो, अश्वगर्दभ, हस्ती, पक्षी, सर्प इ. वेगळेपणा दर्शविणारे धर्म मनात येणे म्हणजे विकल्प होय. समोर अश्व धावत आहे. नदीला पूर आला आहे. हे फळ मधुर आहे. अशा तर्हचा निश्चित बोध अंतःकरणाला होतो तेव्हा त्याला बुध्दी म्हणतात. निरनिराळ्या अनुभवांचा किंवा बोधांचा अंतःकरणावर संस्कार होतो आणि पुन्हा त्याच त्या वस्तू पहिल्या की ते संस्कार जागृत होतात. हा पूर्वानुभवांचा किंवा बोधांचा संग्रह होतो. अनुसंधानाचे सामर्थ्य असते. म्हणून अंतःकरणास चित्त असे म्हणतात. तोच हा मनुष्य तीच ही गाय अशी अनुसंधानात्मक वृत्ती निर्माण होते. तेव्हा अंतःकरणास चित्त म्हणतात. बालपणापासून मृत्यूपर्यंत बाल्य, तारूण्य आणि वृध्दत्व या तिन्ही अवस्थांमध्ये मीच तो आणि बाकीच्या जगाहून, पुत्र-मित्र-शत्रुहून मी हा असा वेगळा आहे, अशा तर्हेने मनोवृत्ती-ज्याला अस्मिता म्हणतात. अशी मनोवृत्ती-माणसांमध्ये असते म्हणून अशी मनोवृत्ती निर्माण होणार अंतःकरणाच्या विभागाला अहंकार म्हणतात. असे विभाग पाडण्याची गरज नाही. मनाचीच ही विविध कार्य आहेत म्हणून विभाग मानण्याची जरूर नाही. असे अनेक दार्शनिक सांगतात.मन आणि बुध्दी या दोन विभागांतच चित्त व अंहकार यांचा समावेश काही दार्शनिक करतात. काही बुध्दी, मन आणि अहंकार असे तीन प्रकार मानून सगळ्या मानसिक कार्याची उपपत्ती लावतात.

पातंजल योगदर्शनामध्ये मन म्हणजे चित्त व तेच अंतःकरण असे एकच तत्व मानून स्वतःचे मानसशास्त्र सांगितले आहे. समाधियोग रूप अंतिम साध्याच्या दृष्टीने चित्ताची मीमांसा या दर्शनात केली आहे. सांख्य, योग, न्याय वैशेषिक, धर्ममीमांसा आणि वेदान्त दर्शन त्याचप्रमाणे बौध्द व जैन दर्शन यांच्यामध्ये समाधियोगाच्या उद्दिष्टाने मनोमीमांसा केली आहे. यांपैकी बौध्द दर्शन सोडल्यास मन हे द्रष्ट्या आत्म्याचे मुख्य साधन मानून मनोमीमांसा केली आहे.पातंजल योगदर्शनातील मनोमीमांसेचा यांपैकी प्रत्येक दर्शन आपल्या तात्विक भूमिकेतून व्याख्या करून, स्वीकार करू शकते.

पाच प्रकारच्या चित्तभूमी पातंजल ⇨योगदर्शनात विवरण करून सांगितल्या आहेत. त्या अशा . क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र व निरूध्द. क्षिप्त म्हणजे जागृतीतील व स्वप्नातील निरनिराळ्या विषयांवर फिरत राहणार्या् मनाची चंचल प्रवृत्ती .मूढ म्हणजे सुस्त, नशेतील व निद्रेतील तमोमय मनोवृत्ती .विक्षिप्त म्हणजे त्या त्या विषयावर मधून मधून स्थिरावणारी मनःप्रवृत्ती विशिष्ट उद्देशाने मन काही वेळ स्थिरावते व पुन्हा भटकू लागते अशी ही स्थिती होय. एकाग्र म्हणजे एकतान झालेले मन, गणिती, चित्रकार, शास्त्रज्ञ यांचे मन एकतान होते. भक्त पूजनात किंवा भजनात रंगतो ही चित्तभूमी एकाग्र होय. सगळ्या मनोवृत्तींचा संयम करून केवळ शुध्द सत्यामध्ये तन्मय झालेली राग-द्वेष –भ्रम इत्यादिकांचा निरास झालेली शुध्द बोधात्मक मनःस्थिती निरूध्द होय. या मनःस्थितीलाच समाधी किंवा योग अशी संज्ञा आहे. या स्थितीमध्ये आत्मा, द्रष्टा स्वतःच्या चैतन्य स्वरूपात स्थिरावलेला असतो.

                                                                   जोशी, लक्ष्मणशास्त्री

[या संदर्भात अधिक माहितीसाठी मानसशास्त्र विषयांतर्गत असलेल्या विविध संप्रदायांवरील व संबंधित महत्वाच्या संकल्पनावरील तसेच भारतीय तत्वज्ञानातील आस्तिक व नास्तिक दर्शनाखाली येणार्या विविध दर्शनांवरील व विविध संप्रदायांवरील नोंदी पहाव्यात].

संदर्भ :  1. Broad C.D .The Mind and Its Place in Nature London, 1925.

            2. Maclntyre A.C. The Unconusious A. Conceptual analysis, New York, 1958.

            3. Russell, Bertrand ,The Analysis of Mind London, 1921.

            4. White A.R. The Phillosophy of Mind New York, 1967.