ऑल्पोर्ट, गॉर्डन विलर्ड : (११ नोव्हेंबर १८९७–९ ऑक्टोबर १९६७). एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म इंडियाना राज्यातील माँटे झूमा येथे झाला. हार्व्हर्ड, बर्लिन, हँबर्ग आणि केंब्रिज विद्यापीठांत त्यांचे शिक्षण झाले. कॉन्स्टँटिनोपल येथील रॉबर्ट कॉलेजात त्यांनी काही काळ मानसशास्त्राचे अध्यापन केले. नंतर ते हार्व्हर्ड विद्यापीठात मानसशास्त्राचे उपप्राध्यापक म्हणून गेले. तेथेच १९४२ मध्ये त्यांची प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. १९३९ मध्ये ते ‘अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन’चे अध्यक्ष होते. जर्नल ऑफ ॲब्नॉर्मल अँड सोशल सायकॉलॉजी  ह्या नियतकालिकाचे ते १९३७ ते १९४९ ह्या काळात संपादक होते.

त्यांच्या द नेचर ऑफ प्रेज्युडिस (१९५४) ह्या ग्रंथात त्यांनी पूर्वग्रहांचे विश्लेषण करुन त्यांबाबत महत्त्वाचे विचार मांडलेले आहेत. मानवी व्यक्तिमत्त्वाबाबत संशोधन करून त्यांनी मांडलेले सिद्धांत विशेष मोलाचे आहेत. पर्सनॅलिटी : ए सायकॉलॉजिकल इंटरप्रिटेशन (१९३९) आणि बिकमिंग (१९५५) हे त्यांचे व्यक्तिमत्त्वावरील महत्त्वाचे ग्रंथ आहेत. त्यांच्या मते व्यक्तिमत्त्व हे एक क्रियाशील अथवा गतिमान व स्वायत्त संघटना असून त्याला नावीन्याची, मुक्त संशोधनाची ओढ लागलेली असते. ‘स्व’ (सेल्फ) हे व्यक्तिमत्वाचे सार असून ते सदा विकसनशील असते.

या ग्रंथाव्यतिरिक्त त्यांनी स्वंतत्रपणे, तसेच इतरांच्या सहकार्याने पुढील ग्रंथ लिहिले : स्टडीज इन एक्स्‌प्रेसिव्ह मूव्हमेंट (१९३३), द सायकॉलॉजी ऑफ रेडिओ (१९३५), ट्रेट नेम्स, ए सायकोलेक्सिकल स्टडी (१९३६) व सायकॉलॉजी ऑफ रुमर (१९४७).

ऑल्पोर्ट यांच्या विचारांचा व्यक्तिमत्वविषयक मानसशास्त्रावर खूपच प्रभाव पडला. त्यांनी ‘स्व’ च्या संकल्पनेमधील परंपरागत गूढवादी आशय दूर करून ती वैज्ञानिक मानसशास्त्रात प्रस्थापित केली. त्यांच्या विचारांचे ॲड्लर, मॅस्लो, ल्यूइन या मानसशास्त्रज्ञांच्या विचारांशी पुष्कळ साम्य आहे. यूरोपातील आधुनिक अस्तित्ववादी तत्त्ववेत्त्यांच्या विचारसरणीलाही त्यांची विचारसरणी बरीच जवळची आहे.

सुर्वे, भा. ग.