सर्जनशीलता : (क्रिएटिव्हिटी). सर्जनशीलतेच्या क्षेत्रात बरेच संशोधन झालेले असले, तरी तिची सुस्पष्ट आणि सर्वांना मान्य होईल अशी व्याख्या करता आली नाही आणि तिच्या मूल्यमापनाचे प्रयत्नही वादग्रस्त ठरले आहेत तथापि सर्जनशीलतेचे काही निकष सामान्यतः मान्य झालेले आढळतात. ज्ञानसंपादन आणि प्रेरणा या क्षेत्रांतील मानसशास्त्रीय प्रयोगांनी कृतीला उत्तेजन देणारे नावीन्याचे सामर्थ्य स्पष्ट केले आहे. साहित्य, कला, विज्ञानादी क्षेत्रांत होऊन गेलेल्या किंवा असलेल्या सर्जनशील प्रतिभावंतांच्या जीवनांतूनही ह्या निकषांचा प्रत्यय मिळतो. ह्या निकषांपैकी एक म्हणजे सर्जनशील व्यक्तींची विचार करण्याची पद्धत सर्वसामान्य माणसांच्या चाकोरीबद्ध विचारपद्धतीपासून भिन्न असते, त्यामुळे भोवतालच्या परिस्थितीला त्यांच्याकडून मिळणारे प्रतिसादही नवे, वेगळे असतात. अनेक नवनव्या, अनोख्या कल्पना त्यांना सुचत असतात. ह्या कल्पना एखादया अनिर्बंध प्रवाहाच्या वेगाने त्यांना सुचत असल्यामुळे कल्पनांचा अस्खलितपणा त्यांच्या ठायी असतो. नवता, मौलिकता वा अनन्यसाधारणता हा सर्जनशीलतेचा अत्यंत महत्त्वाचा निकष म्हणता येईल. एखादया समस्येचे अभिनव उत्तर शोधणे, एखादया भावनेची वा कल्पनेची नव्या शैलीने अभिव्यक्ती साधणे, एखादा नवा शोध लावणे यांसारख्या कृतींतून ही मौलिकता वा अनन्यसाधारणता प्रकट होते. मात्र केवळ मौलिकता, अनोखेपणा हे निकष सर्जनशीलतेच्या संदर्भात पुरेसे नाहीत. मौलिकता ही वास्तवाशी अनुकूलन साधणारीही असली पाहिजे. उदा., ४ + ४ = १० हे उत्तर नेहमीच्या, खऱ्या उत्तरापेक्षा वेगळे असले, तरी ते वास्तवाशी जुळणारे (अडप्‌टिव्ह) नाही.

सर्जनशीलता ही विज्ञानातील एखादया उपयुक्त आणि अपूर्व अशा संशोधनातून जशी प्रत्ययाला येते तशीच ती साहित्य, संगीत, शिल्प, शिक्षण, मुद्रण, सुलेखन, जाहिरात इ. क्षेत्रांतील प्रतिभावंतांच्या कृतींतूनही दिसून येते. थोर साहित्यिक, संगीतकार, वैज्ञानिक ह्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात्मक लेखनातून स्वतःच्या सर्जनशीलतेशी निगडित अशा अनुभवांसंबंधी काही सांगण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. तसेच सर्जनप्रक्रियेच्या कमवार टप्प्यांबाबत त्यांच्या निवेदनांत लक्षणीय सुसंगती आढळते. हे टप्पे साधारणपणे असे सांगता येतील : (१) एखादी वैज्ञानिक वा कलानिर्मितीविषयक समस्या संबंधित क्षेत्रातील व्यक्तीसमोर असते. तिचे उत्तर शोधण्यासाठी निरनिराळ्या ज्ञात दिशांनी त्या व्यक्तीचा पयत्न चालू असतो, पण अनेकदा यात यश येत नाही. अशा वेळी प्रयत्न सोडून दयावा लागतो. (२) प्रयत्न सोडून दिल्यानंतरही जाणिवेच्या स्तराखाली, आतल्या आत, त्या समस्येबाबत काही तरी घडत असते. हा अंतःपोषणाचा (इनक्यूबेशन) काळ, कमीजास्त असू शकतो. (३) पण ह्या अंतःपोषणातून अकस्मात, एखादया क्षणी त्या समस्येचे उत्तर वा त्या उत्तराकडे बोट दाखविणारी एखादी मार्गदर्शक कल्पना किंवा पूर्णतः नवीन अशा कल्पनांचा समूह प्रकाशझोतासारखा समोर येतो.

सर्जनशीलतेवर अधिक प्रकाश टाकता यावा म्हणून वेगवेगळ्या सर्जनशील व्यक्तींच्या स्वभाववैशिष्टयंचाही मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्यात आला आहे. त्यांत विविधता असली, तरी सर्जनशील व्यक्तीचे एक सर्वसाधारण चित्र उभे राहील इतकी सुसंगतीही आढळते. हे चित्र असे : सर्जनशील व्यक्तींकडे बौद्धीक नेतृत्वाची क्षमता असते, त्यांची संवेदनशीलताही तीव्र असते. त्यांच्या विचारांत लवचिकता असते. जुन्या गोष्टींकडे ते अगदी नव्या दृष्टीने पाहू शकतात. जुनी माहिती आणि नवी माहिती ह्यांत अर्थपूर्ण दुवे निर्माण करून ते एक वेगळीच निर्मिती करू शकतात. ते आपल्या व्यक्तिमत्त्वाची स्वायत्तता जपत असतात आणि त्यांच्यापाशी मोठा आत्मविश्वास असतो. त्यामुळे आवश्यकतेनुसार रूळलेली वाट सोडावयाची झाल्यास बाह्य दडपणांपुढे त्या वाकत नाहीत. त्याचप्रमाणे संयम आणि अंतर्निरोधन (इन्हिबिशन) ह्यांच्यापासून मुक्त राहून नव्या अनुभवांना ते खुलेपणाने सामोरे जातात आणि विविध अनुभूतींच्या प्रवाहांनाही सामावून घेतात. ह्या व्यक्ती बहिर्मुखतेपेक्षा अंतर्मुखतेकडेच अधिक झुकलेल्या दिसतात.

सर्जनशील व्यक्तींबद्दल काही चुकीच्या समजुतीही रूढ झालेल्या असतात. अशा व्यक्ती मानसिक दृष्ट्या असंतुलित असतात, असा एक समज आहे. मनाचा तोल ढळलेल्या, अस्वस्थचित्त अशा काही व्यक्तींनी उच्च सर्जनशीलतेचा प्रत्यय देणाऱ्या कृती निर्माण केलेल्या असल्या, तरी सामान्यतः सर्जनशीलता आणि असंतुलित मानस ह्यांचा अपरिहार्य संबंध प्रस्थापित करता येत नाही.

सर्जनशीलता आणि बुद्घिमत्ता ह्यांच्यामधील संबंधांबद्दलही बरीच चर्चा, संशोधन झालेले आहे तथापि ह्याबाबत निश्चित निःसंदिग्ध असे उत्तर मिळालेले नाही. सर्जनशीलता हा एकंदर बुद्धीमत्तेचाच एक आविष्कार आहे, की बुद्धीमत्तेपेक्षा वेगळी स्वतंत्र अशी ती प्रेरणा आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याबाबतच्या संशोधनांती किमान एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, की सर्जनशीलतेच्या मानसशास्त्रीय चाचण्या घेताना, बुद्धी-गुणांकाच्या सांकेतिक कसोटयांत दुर्लक्षित झालेले काहीतरी शोधता येते. बुद्धीगुणांक माणसांच्या क्षमतांविषयी फक्त आंशिक चित्र उभे करतो. बुद्धीगुणांकाला माणसाच्या सर्जनशीलतेच्या गुणसंख्येची जोड दिल्याखेरीज त्याच्या अंतःशक्तीचे पूर्ण ज्ञान होणार नाही. सर्जनशीलता ही बुद्धीमत्तेपेक्षा वेगळी अशी शक्ती आहे काय, ह्याबाबत अकादमिक स्वरूपाची चर्चा चालू राहिली, तरी व्यवहारात सर्जनशीलतेच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव होत राहते.

विख्यात मनोविश्लेषणतज्ज्ञ ⇨ कारेन होर्नाय हिच्या मते माणसाचा अस्सल ‘स्व’ (सेल्फ) ज्या मर्यादेपर्यंत जिवंत किंवा सचेत असतो, त्या मर्यादेपर्यंतच तो सर्जन करू शकतो कारण ह्या ‘स्व’मुळेच त्याला खोल व्यक्तिगत अनुभव घेण्याची क्षमता लाभलेली असते. उत्स्फूर्त इच्छा अशा ‘स्व’मध्येच निर्माण होतात. हे खोल अनुभव आणि उत्स्फूर्त इच्छा अभिव्यक्त करण्याची शक्तीही त्याला ह्या ‘स्व’मुळेच मिळते. सामाजिक, आर्थिक तसेच माणसाचे शारीरिक आणि मानसिक घटक त्याची सर्जनशील अभिव्यक्ती घडवितात, किंवा ती घडविण्यात अडथळेही आणतात. अंतःसंघर्षांमुळे जर त्याचे मन विदीर्ण झालेले असेल, तर त्याच्या सर्जनशीलतेवर प्रतिकूल परिणाम होतो, त्याची अभिव्यक्ती सीमित होते.

उच्च प्रतिभावंत व्यक्तींमध्ये एक सततचा स्वाभाविक ताण असतो. अशा सर्जनशील व्यक्तींच्या मानसशास्त्रीय अभ्यासातून असे निदर्शनास आले आहे, की हा ताण बुद्घिमत्ता आणि अंतःस्फूर्ती, चेतन व अचेतन, मानसिक आरोग्य व मनोविकृती, प्रचलित व अप्रचलित, जटिलता व साधेपणा अशा द्वैतांमधील संघर्षातून प्रकट होतो.

संदर्भ : 1.Getzels,J.W.Jackson,P.W.CreativityandIntelligence: Explorations with Gifted Students, New York, 1962.

           2. Horney, Karen, Neurosis and Human Growth, New York, 1950.

           3. Taylor, C. W. Creativity : Progress and Potential, New York, 1964.

कुलकर्णी, अ. र.