काट्झ, डेव्हिड  : (१ ऑक्टोबर १८८४ – २ फेब्रुवारी १९५३). जर्मन मानसशास्त्रवेत्ता. जर्मनीतील कासेल येथे ज्यू कुटुंबात जन्म. म्यूनिक, बर्लिन व गटिंगेन विद्यापीठांत शिक्षण. १९०६ मध्ये गटिंगेन विद्यापीठातून त्याने डॉक्टरेट घेतली. गटिंगेन येथे तो ⇨ जी. ई. म्यूलरचा शिष्य होता व तेथील मानसशास्त्रीय प्रयोगशाळेत त्याला म्यूलरच्या खालोखाल महत्त्वाचे स्थान होते. रॉस्टॉक (१९१९), मँचेस्टर (१९३३) व लंडन (१९३५) येथील विद्यापीठांत त्याने मानसशास्त्राचे अध्यापन व संशोधन केले. सर्वसाधारणपणे ⇨प्रक्रियावादी मानसशास्त्राचा पुरस्कर्ता म्हणून तो ओळखला जातो.

एकोणिसाव्या शतकातील मूलघटकवादी (ॲटोमिस्टिक) व साहचर्यवादी मानसशास्त्र यांविरुद्ध पहिल्या महायुद्धानंतर जी प्रतिक्रिया झाली, त्यात काट्झही सामील होता. त्याचा दृष्टिकोन ⇨ व्यूह मानसशास्त्राशी बराच मिळताजुळता असल्याचे, त्याच्या १९४४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या Gestaltpsychologie (इं. भा. गेश्टाल्ट सायकॉलॉजी : इट्स नेचर अँड सिग्निफिकन्स, १९५०) ह्या विवरणात्मक ग्रंथावरून दिसून येते. प्रायोगिक मानसशास्त्रात हुसर्लप्रणीत रूपविवेचनात्मक (फिनॉमिनॉलॉजिकल) पद्धतीचा त्याने वापर व पूरस्कार केला [ → रूपविवेचनवाद]. त्याने प्राण्यांच्या वर्तनावर केलेल्या विविध प्रयोगांसाठी आणि बालकांच्या  वर्तनाबाबतच्या  सखोल अभ्यासासाठी तो विशेष प्रसिद्ध  आहे. त्याचे सर्वच लेखन जर्मन भाषेत असून त्यातील बहुतांश लेखन इंग्रजीत भाषांतरितही झाले आहे.

रंग-संवेदन आणि स्पर्श-संवेदन यांबाबतचे त्याचे महत्त्वपूर्ण संशोधन त्याच्या १९११ मधील जर्मन ग्रंथात (इं. भा. द वर्ल्ड ऑफ कलर, १९३५) आले आहे. त्याने प्राण्यांवर केलेल्या विविध प्रयोगांधारे प्रत्यक्ष क्षुधा हीच अन्नग्रहणास सर्वस्वी कारणीभूत असते असे नसून, त्यावेळच्या परिसरातील भौतिक तसेच सामाजिक घटकही त्यास कारणीभूत असतात ते दाखवून, त्याने प्रेरणाविषयक द्विघटक सिद्धांत मांडला. ॲनिमल्स अँड मेन : स्टडीज इन कंपॅरेटिव्ह सायकॉलॉजी (१९३७) ह्या ग्रंथात त्याने प्राण्यांचे व मनुष्याचे संवेदन, स्मृती व इतर उच्चतर मनोव्यापार संशोधन सादर करून, प्राणी व मानव यांच्यातील उत्क्रांतीचा दुवा मानसशास्त्रीय दृष्ट्या स्पष्ट केला आहे.

स्टॉकहोम येथे तो निधन पावला.

सुर्वे, भा. ग.