संवेदन : (पर्सेप्शन). बोधात्मक अनुभवाच्या संदर्भात संवेदन ही ⇨ वेदना नंतर येणारी प्रक्रिया आहे. वेदनाच्या प्रक्रियेत डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ ह्या पाच ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला एखादया उद्दीपकाची जाणीव होते; तथापि ही बोधात्मक अनुभवातील प्रारंभिक वा मूलभूत अवस्था होय. वेदनानंतर येणाऱ्या संवेदन ह्या प्रक्रियेत व्यक्तीचे पूर्वानुभव, स्मृती, भावना, कल्पना इत्यादींचा वेदनाला लाभलेला संदर्भ ह्यांच्या साहाय्याने वेदनाचा अर्थ लावला जातो, म्हणून वेदनाच्या तुलनेत संवेदन ही प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची असते.

विशिष्ट संवेदन होत असताना आपल्या स्मृतींची, पूर्वानुभवांची आपल्याला मदत होत असते आणि अनेकदा संवेदनामुळे आपल्या भावनाही उत्तेजित होत असतात.

संवेदन प्रक्रियेचे एक मुख्य वैशिष्ट्य असे, की कोणत्याही संवेदनात अनेक प्रकारचे वेदन अंतर्भूत असू शकते. म्हणूनच एखादया फुलाकडे जेव्हा आपण पाहतो, तेव्हा त्याचा रंग, आकार इत्यादींची जाणीवच दृष्टिवेदनातून प्राप्त होते असे नव्हे; तर त्या फुलाचा वासदेखील आपण आपल्या घ्राणेंद्रियाव्दारे अनुभवतो. शिवाय ते फूल हातात घेतल्यावर त्याचा स्पर्शही आपणाला जाणवतो. अर्थात ही सर्व जाणीव आपल्याला संबंधित वेदनेंद्रियांच्या साहा-य्याने होत असते आणि ती प्राथमिक स्वरूपाची असते. मात्र प्राथमिक स्वरूपाच्या जाणिवेशी निगडित असे पूर्वानुभवही संवेदनात जागृत होत असतात. म्हणूनच एखादे फूल पाहताना ते गुलाबाचे आहे, की मोगऱ्याचे हेही आपल्याला जाणवते. त्या फुलाला अमुक एक प्रकारचा गुलाब असे म्हणतात, हा आपला पूर्वानुभव असेल, तर तो स्मृतीत साठवून ठेवलेला असल्याने जागृत होतो आणि तसे संवेदन आपल्याला होते.

कोणत्याही वस्तूची जाणीव होत असताना मूळ अनुभवाची प्रतीके कोणत्या तरी प्रकारे चेतासंस्थेत निर्माण होतात आणि त्यामुळेच त्या वस्तूशी संबंधित पूर्वानुभव जागृत होऊन मूळ वेदनाला विशेष अर्थ प्राप्त होत असतो. म्हणूनच गुलाबाच्या फुलाकडे पाहताना केवळ ‘ एखादे फूल दिसणे’ एवढीच मर्यादित जाणीव आपल्याला होत नसते. उलट आपण पाहिलेले गुलाबाचे फूल हे लाल गुलाबाचे असून त्याचा समावेश अमुक एका प्रकारात होतो, हेही आपल्याला जाणवते. हेच संवेदन होय.

संवेदनात भावनात्मक अनुभवही सामावलेले असू शकतात. म्हणूनच एखादया वस्तूचे वा घटनेचे आपल्याला होणारे संवेदन सुखद वा दु:खद असू शकते. अर्थात हे त्या अनुभवाशी निगडित पूर्वीची भावना कोणती होती, यावर अवलंबून असते. आपल्या प्रिय व्यक्तीला लाल गुलाब आवडत असल्याचा जर आपला पूर्वानुभव असेल, तर नंतर जेव्हा हे फूल आपण पाहतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या आठवणीने आपल्या मनात सुखद भावना उचंबळून येते.

संवेदन प्रक्रियेचे स्पष्टीकरण देणाऱ्या काही विचारप्रणाली आहेत. ⇨ एडवर्ड बॅडफर्ड टिचनर च्या रचनालक्षी विचारप्रणालीनुसार वेदने, प्रतिमा आणि भावना हे मानसशास्त्रीय दृष्टया अनुभवाचे तीन मूलभूत घटक आहेत. संवेदन होण्यापूर्वी विशिष्ट वस्तू किंवा आवाज यांमुळे निर्माण झालेल्या वेदनांमध्ये साठविलेल्या असंख्य प्रतिमांपैकी काही आवश्यक प्रतिमा एकवटतात आणि परिणामी आपल्याला वस्तूचे, गंधाचे किंवा आवाजाचे संवेदन होते. आवश्यकतेनुसार वेदनात मिसळणाऱ्या ह्या प्रतिमा निरनिराळ्या असतात. कार्यवादाच्या (फंक्शनॅलिझम) विचारप्रणालीनुसार संवेदन ही महत्त्वाची बोधनप्रक्रिया असून त्यामुळे आपल्याला पर्यावरणाशी समायोजन करण्यास मदत होते. ह्या प्रणालीनुसार संवेदन हे चयनपूर्ण, संघटनात्मक आणि अर्थपूर्ण असते. तसेच संवेदनात अध्ययनाचा महत्त्वाचा सहभाग असतो.

व्यूहात्मक आणि वर्तनात्मक ह्या दोन प्रणालींनुसार मेंदूतील संवेदन प्रक्रियेत मेंदूतील मज्जापेशींचा (न्यूरॉन्स) सहभाग असतो; तो कशा प्रकारचा असतो ह्याबाबत मात्र त्यांच्यात मतभिन्नता आहे. व्यूहात्मक प्रणालीनुसार आपण ज्या वेळी एखादी वस्तू पाहतो, त्या वेळी आपल्या मेंदूच्या पेशींमध्ये हालचाल सुरू होऊन मेंदूस्तरावर त्या विशिष्ट वस्तूच्या रूपाप्रमाणे वा आकाराप्रमाणे (शेप) मज्जापेशींचे रूप तयार होते. यालाच ‘समरूपण’ (आयसोमॉर्फिझम) असे म्हणतात. मेंदूतील मज्जापेशींचे हे रूप त्या प्रत्यक्ष वस्तूप्रमाणे तंतोतंत जुळणारे नसते. ते समरूप (आयडेंटिकल) म्हणता येईल, असे असते. एकंदरीत आपले संवेदन हे मेंदूतील पेशींनी निर्माण केलेल्या रूपसादृश्यावर अवलंबून असते.

वर्तनात्मक विचारप्रणालीनेसुद्धा मेंदूतील मज्जापेशींच्या कार्याला महत्त्व दिले असून त्यांचा संवेदनात कार्यभाग असतो, असे प्रतिपादिले आहे. परंतु संवेदनाचे स्पष्टीकरण देण्यासाठी ह्या प्रणालीने मज्जापेशीरचना ह्या संकल्पनेचा आधार घेतला आहे. आपण अनुभवत असलेल्या प्रत्येक वस्तूसाठी वा व्यक्तीसाठी आपल्या मेंदूत त्या व्यक्तीला किंवा वस्तूला अनुलक्षून विशिष्ट मज्जापेशीरचना तयार होत असते. आपण ज्या वेळी विशिष्ट वस्तू वा व्यक्ती पाहतो, त्या वेळी त्या व्यक्तीला वा वस्तूला अनुलक्षून जी मज्जापेशीरचना मेंदूत अगोदर तयार झालेली असते, ती लगेच उद्दीपित होते आणि आपल्याला विशिष्ट व्यक्तीचे वा वस्तूचे संवेदन होते.

कुळकर्णी, अरूण; देशपांडे, चंद्रशेखर