पूर्वज्ञान : (प्रीकॉग्निशन).⇨ पराप्रत्यक्ष आणि ⇨ परचितज्ञान हे प्रकार अतींद्रियज्ञानाची उदाहरणे म्हणून महत्त्वाचे आहेत त्याचप्रमाणे ‘पूर्वज्ञान’ हा प्रकारही महत्त्वाचा आहे. जी घटना अजून कोठेही घडलेली नाही, जी घडेल असे अनुमान करण्यास काहीच आधार नाही आणि कोणीतरी केलेल्या भाकिताचा परिणाम म्हणून घडून आली असेल असे जिच्याबाबत म्हणता येत नाही, अशा घटनेचे आधीच ज्ञान होणे म्हणजे पूर्वज्ञान. अशी काही माणसे आढळतात, की ज्यांना पुढे काय होणार हे स्पष्टपणे ‘दिसते’. आगबोटींना, रेल्वेगाड्यांना वगैरे झालेले अपघात ते होण्यापूर्वीच वर्णन केल्याची उदाहरणे आहेत. यत्किंचितही ठाऊक नसलेली व्यक्ती पत्नी किंवा पती म्हणून स्वप्नात दिसणे व पुढे काही कालानंतर ती प्रत्यक्षात भेटून तिच्याशी विवाह होणे जे स्थान पूर्वी केव्हाही पाहिलेले नाही व ज्याविषयी कधीही ऐकले किंवा वाचलेही नाही, त्या ठिकाणी गेल्याचे दृश्य जागेपणी दृष्टीसमोर तरळून जाणे अथवा स्वप्नात दिसणे व कित्येक दिवसांनी तसा प्रसंग प्रत्यक्ष घडणे अद्यापि छापलाच न गेलेला वर्तमानपत्राचा पुढील तारखेचा अंक व त्यातील वृत्त आधीच ‘दिसणे’ वर्षाच्या विशिष्ट तारखेस एखादी घटना स्वप्नात येत राहणे व काही वर्षांनी नेमक्या त्याच तारखेस नेमकी तशीच घटना घडून येणे, असे पूर्वज्ञानात्मक अनुभव आपाततः आल्याची विश्वासार्ह उदाहरणे मिळतात व अशी हजारो उदाहरणे श्रीमती लूईझा राइन यांच्या ड्यूक कलेक्शननामक संग्रहात आहेत. प्रयोगनिष्ठ विज्ञानाच्या दृष्टीने वरील प्रकारचा पुरावा निर्णायक मानता येत नाही. ही गोष्ट ध्यानी घेऊन अतींद्रिय मानसशास्त्रज्ञांनी पूर्वज्ञानविषयक अनेक प्रयोगही केले आहेत. अतींद्रियज्ञानशक्ती ही अवकाश-मुक्त (स्पेस-फ्री) असल्याचे पराप्रत्यक्षविषयक प्रयोगांवरून दिसून आल्यामुळे ही शक्ती काल-मुक्त (टाईम-फ्री) देखील असणे शक्य आहे, ही ओघानेच येणारी कल्पनाही त्या प्रयोगांना प्रेरक ठरली. १९३३ पासून अमेरिकेत ड्यूक विद्यापीठात डॉ.जे.बी. राइन यांनी व त्यांच्या नेतृत्वाखाली इतर अनेकांनी आणि इंग्लंडमध्ये टिरेल, कॅरिंग्टन, सोल इत्यादिकांनी केलेले प्रयोग प्रसिद्ध आहेत व त्यांवरून निघालेले निष्कर्ष सांख्यिकीय कसोट्यांनाही उतरलेले आहेत.

साहजिकच, ‘पूर्वज्ञान’ हा प्रकार तत्त्वज्ञांना आणि वैज्ञानिकांना बुचकळ्यात टाकणारा ठरला आहे. घटना खरोखरीच घ़डण्यापूर्वी तिचे ज्ञान संभवणे हे कारण-कार्यसंबंधाविषयीच्या आतापावेतोच्या गृहीत कल्पनेशी विसंगत आहे कारण हे पूर्ववर्ती व कार्य वा परिणाम अनुवर्ती असतो, हा सिद्धांत पूर्वज्ञानाने बाधित ठरतो. त्यामुळे ‘पूर्वज्ञान’ हा प्रकार वैज्ञानिकांना अस्वस्थ करतो. भावी घटनांचे यथार्थ पूर्वज्ञान होऊ शकते, याचा अर्थ पुढे घडणाऱ्या गोष्टी पूर्वीपासून ठरलेल्याच आहेत असा होईल व पूर्वनियतत्ववाद स्वीकारावा लागेल, असेही काहींना वाटते. पूर्वज्ञानाती शक्यता मान्य केली, तर माणसाच्या तथाकथित संकल्पस्वातंत्र्यास (फ्रीडम ऑफ विल) अर्थच राहणार नाही व तो केवळ भ्रामक ठरेल, असेही काहींना वाटते. परंतु पूर्वज्ञानाचे अस्तित्व सिद्ध करणारा पुरावा दुर्लक्षून चालणार नाही व विज्ञानाच्या आतापावेतोच्या गृहीत तत्त्वांमध्ये परिवर्तन करणे भाग पडत असेल, तर तसेही केले पाहिजे, असे तत्त्वज्ञ म्हणू लागले आहेत.

संदर्भ : 1. Pratt, J. G. Parapsychology, London, 1964.

2. Rhine, J. B. The Reach of the Mind, New York, 1947.

3. Rhine, L. E. ESP in Life and Lab., London, 1969.

अकोलकर, व. वि.