मानसौषधी: (सायकोट्रॉपिक ड्रग्ज). मनाच्या कार्यावर अंमल असणाऱ्या औषधांना मानसौषधी असे संबोधले जाते. आजच्या मानसिक विकारांच्या उपचारक्षेत्रात मानसौषधींचे स्थान फार महत्त्वाचे आहे. जवळजवळ ९५% मनोरुग्णांवर ह्या औषधांचा वापर केला जातो. व १०% मनोरुग्ण  फक्त मानसौषधींमुळेच बरे होतात. त्यामुळे मानसचिकित्सेची प्रतिमा सुधारली आहे. ह्या औषधांच्या वापरामुळे मनोरुग्णांचा उपचार मनोरुग्णालयांच्या बाहेर करणेही सुलभ झाले आहे त्याचप्रमाणे मनोरुग्णालयांतील बरेच जुने रुग्ण सुधारू शकले आहेत व घरीही जाऊ शकले आहेत.

 १९३० पर्यंत फक्त निद्राजनक वा संमोहन आणि शामक औषधे (हिप्नॉटिक अँड सेडेटिव्ह) वापरात होती. त्यानंतर उत्तेजक औषधे (स्टिम्युलंट्स) वापरण्यात येऊ लागली. १९५२ मध्ये पहिले शांतक (ट्रॅंक्विलायझर) औषध क्लोरप्रोमॅझिन हे फ्रेंच डॉक्टरांनी शोधून काढले. त्याच सुमारास अमेरिकेत मेप्रोबॅमेट ह्या चिंतानाशक औषधाचा शोध लागला व त्यानंतर अशा औषधांवर संशोधन जोरात सुरू झाले. आज अनेक मानसौषधी प्रचलित आहेत आणि त्याशिवाय शेकडो नवीन औषधांवर संशोधनही चालू आहे.

 आयुर्वेदात सर्पगंधा ह्या वनस्पतीच्या मुळांचा वापर रक्तदाब व मानसिक अस्वास्थ्यासाठी पुरातन कालापासून केला जात होता. आधुनिक वैद्यकशास्त्रात ह्या औषधाची गणना १९५३ च्या सुमाराला केली गेली. सुरुवातीला मानसिक विकारांसाठी ‘रेसरपीन’ ह्या सर्पगंधेच्या मुळांपासून बनविलेल्या रसायनाचा वापर बराच झाला परंतु हल्ली ते विशेष वापरात नाही.

 मानसौषधींचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केले जाते : (१) संमोहक किंवा निद्राजनक, (२) महाशांतक (मेजर ट्रॅंक्विलायझर), (३) लघुशांतक (मायनर ट्रॅंक्विलायझर), (४) अवसादविरोधी (अँटिडिप्रेसंट), (५) उत्तेजक आणि (६) मनोविकृतिअनुकृतिकारक अथवा संभ्रमकारक (सायकोटोमिमेटिक).

 (१) संमोहक अथवा निद्राजनक औषधांचा वापर सध्या फक्त प्रक्षोभ शमविण्यासाठी व झोप आणण्यासाठी केला जातो.

 (२) महाशांतक औषधांचा उपयोग छिन्नमानसारख्या तीव्र मानसिक विकारांसाठी केला जातो. त्यांच्यामुळे तीव्र संताप, अतिहर्ष, बडबड, हिंसकता, अस्वस्थता, निद्रानाश ही लक्षणे आटोक्यात येतात. त्यात दोन प्रमुख रासायनिक प्रकार असून ते फिनोथायाझीन्स आणि ब्युटीरोफिनोन्‌स ह्या नावांनी ओळखले जातात. ह्यांच्यापैकी बहुतेक औषधे घुमेपणा, निर्विकार अवस्था, संभ्रम (डिलूझन) व निर्वस्तुभ्रम (हॅलूसिनेशन) या लक्षणांवरही फार प्रभावी आहेत. म्हणून त्यांना मनोविकृतिसुधारक (सायकोकरेक्टिव्ह) असेही संबोधिले जाते.

 (३) लघुशांतक औषधांचा उपयोग मनोमज्जाविकृतीमुळे होणाऱ्या चिंता, ताण, अस्वस्थता, भयगंड इ. लक्षणांसाठी करतात. अशा औषधांना चिंतानाशक (अँग्झिओलायटिक) असेही म्हणतात. या औषधांमध्ये क्लोरडायझेपॉक्साइड, डायझेपॅम, लॉरॅझेपॅम ही प्रमुख आहेत.

 (४) अवसादविरोधी औषधांना मनोदशा-उत्तेजक (मूड एलिव्हेटर्स किंवा सायकिक एनर्जायझर्स) असेही संबोधले जाते. यांचा उपयोग अवसादविकृतीतील (डिप्रेशन) उदासीनता सावकाश पण परिणामकारक रीत्या नष्ट करून उल्हास वाटण्यासाठी व आत्मविश्वास वाढवण्यासाठी केला जातो. या औषधांनी अवसादविकृतीतील अस्वस्थता व निद्रानाशही बरा होतो. या औषधाचे दोन रासायनिक प्रकार आहेत : एक प्रकार ट्रायसायक्लिक डेरिव्हेटिव्ह्‌ज या रसायनांचा आहे व दुसरा प्रकार एम्. ए. ओ. (मोनोअमाइन ऑक्सिडेज) इनाहिबिटर्स या रसायनांचा आहे.

 (५) उत्तेजक औषधांचा उपयोग तात्पुरता पण खूप उल्हास आणण्यासाठी केला जातो.

 (६) मनोविकृतिअनुकृतिकारक औषधे काही वेळा वास्तवाशी असलेला मनाचा संपर्क तोडून गंभीर मनोविकृतीचा आभास निर्माण करतात. त्यांच्यायोगे विशेषतः निर्वस्तुभ्रम व भ्रम (इलूजन) घडवून आणून त्यांचा वापर कधीकधी मनोविश्लेषणात सुप्त आठवणी जागृत करण्यासाठी केला जातो. बहुधा संशोधनकार्यासाठीच त्यांचा वापर केला जातो.

 बहुतेक मानसौषधींमुळे इच्छित परिणामांशिवाय नको असलेले असे आनुषंगिक दुष्पपरिणाम देखील होतात. उदा., फिनोथायाझीन्स आणि ब्युटीरोफिनोन्स ह्या रासायनिक समूहातल्या औषधांमुळे पारकिन्सोनिझम हा तंत्रिका तंत्राचा लक्षणसमूह जडतो त्यामुळे हालचाली जड, मंद व कंपमय होतात. यासाठी ह्या औषधांबरोबर प्रतिबंधक म्हणून पारकिन्सोनिझमरोधी औषधे (अँटी पारकिन्सोनियन ड्रग्ज) दिली जातात. त्याशिवाय रक्तदाबात उतार, गुंगी, घशाची कोरड इ. लक्षणेही पुष्कळ वेळा आढळतात. एम्. ए. ओ. इनहिबिटर्स ही औषधे चालू असताना दुसरी अवसादनाशक औषधे अथवा काही विशिष्ट खाद्यपदार्थ उदा., ‘चीज’ वगैरे प्रथिनयुक्त पदार्थ तसेच मद्य व हिस्टॅमीनसारखी काही रसायने दिल्यास गंभीर परिणाम होतात. उदा., मेंदूत रक्तस्त्राव व्हायचा संभव असतो. ह्यासाठी ही औषधे फार जपून द्यावी लागतात. उत्तेजक औषधांमुळे अस्वस्थता, रक्तदाबात वाढ व निद्रानाश होऊ शकतो. मनोविकृतिअनुकृतिकारक औषधाने काही वेळा काही नाजूक मनोवृत्तीच्या व्यक्तींना खरोखरच मनोविकृती जडण्याचा संभव असतो.

 गेल्या १५ वर्षांत मानसौषधींच्या यादीत भर पडलेल्या औषधांत उल्लेख करण्याजोगी चार औषधे आहेत : एक पायरिथियॉक्सीन हे असून ते मतिमंद मुलांना काही अंशी गुणकारक ठरले आहे. दुसरे लिथियम कार्बोनेट हे लेश-मूलद्रव्यांपासून (ट्रेस एलेमेंट्स) बनलेले असून ⇨ उद्दीपन-अवसाद चित्तविकृतीवर प्रतिबंधक म्हणून प्रभावी आहे. मात्र त्याचे विषारी परिणाम तीव्र असल्यामुळे वारंवार रक्ततपासणी करणे आवश्यक असते. तिसरे औषध फ्ल्यूफेनॅझिन डेकॅनोएट हे इंजेक्शन, फिनोथायाझीन या वर्गातले असून त्याचा मुख्य उपयोग गोळ्या न घेणाऱ्या छिन्नमानसी रुग्णासाठी आहे. ह्या इंजेक्शनचा प्रभाव दीर्घकालीन असल्यामुळे महिन्यातून एकदा किंवा दोनदा देऊन सुद्धा उपचार महिनाभर सतत चालू राहतो. चौथे औषध पिमोझाइड हे आहे. इतर औषधांच्या गोळ्या जास्त प्रमाणात घ्याव्या लागत असल्यामुळे छिन्नमानसी रुग्ण त्याला कंटाळतात. अशा रुग्णांसाठी पिमोझाइडची फक्त एकच गोळी दिवसातून फक्त एकदाच दिली तरी चालते. सामाजिक जीवन नष्ट झालेल्या रुग्णांना त्याचा विशेष फायदा होतो.

 मानसौषधी जितक्या प्रभावी असतात तितक्याच विषारीही असतात. म्हणून सध्या संशोधनाचा भर प्रभावी पण बिनविषारी अशी औषधे बनविण्यावर दिला जातो. विशेषतः ⇨ छिन्नमानसावर व अवसादविकृतींवर प्रभावी अशा नवीन औषधींवर फार संशोधन केले जात आहे. भारतातही अशा नवीन मानसौषधींचे अत्याधुनिक संशोधनकेंद्र मुबंई येथे आहे.

पहा : मानसचिकत्सा.

संदर्भ : 1. Arieti, S. Ed. American Handbook of Psychiatry, Vol. V. Treatment, New York, 1975.

           2. Denber, H. C. Textbook of Clinical Psychopharmacology, New York, 1979.

           3. Kliue, N. S. Ed. Psychopharmacology, Washington, D. C. 1956.  

           4. Sliverstone, T. and Others, Drug Treatment in Psychiatry, London, 1974.

शिरवैकर, र. वै.