चिंता : (अँग्झायटी). चिंताविकृती म्हणजे सर्व शरीरभर विखुरल्यागत असणारा भावनिक ताण किंवा जिला निश्चित विषय नाही अशा प्रकारची निराधार, अनामिक परंतु निरंतर अशी भीती व चिंता. चिंतात्मक प्रतिक्रियांची ती सारभूत व्याधी होय.

साहजिकच, व्यक्तीच्या भावनिक ताणास आणि भीतीस तिच्या स्नायूंच्या द्वारा तसेच तिच्या स्वायत्त तंत्रिकातंत्राचे अधिक उद्दीपन होऊन त्याद्वारा वाट मिळत असते. परिणामी, धडधड, कंप, स्नायूंमध्ये चमका, वेदना, श्वासोच्छ्‌वासात अडचण, पचनाच्या तक्रारी इ. लक्षणे उद्‌भवतात. एखाद्या भयभीत पहारेकऱ्यास काय करावयाचे, कुठे पहावयाचे, काय ऐकावयाचे हे ठाऊक नसल्यामुळे जसे वाटत असते व तो जसा वागत असतो, तशी चिंताविकृती जडलेल्या व्यक्तींची ‘सततजागती’ अवस्था असते. सतत चिंतेमुळे या व्यक्तींची आराम करण्याची, आनंद उपभोगण्याची आणि नीटपणे काम करण्याची क्षमता कमी झालेली असते. चिंतेमुळे त्यांचे इतर व्यक्तींशी व्यवहारही निर्वेधपणे चालू शकत नाहीत.

तसे पाहता भयगंड, पछाडणारे विचार, भावातिरेकी सक्तीची प्रतिक्रिया, रूपांतरोन्माद वगैरे इतर मनोमज्जाविकृतींच्या मुळाशी देखील मानसिक ताण व चिंता असतातच. तथापि इतर मनोमज्जाविकृती आणि चिंताविकृती यामध्ये पुढील फरक असतो : एक म्हणजे, चिंताविकृती जडलेल्या व्यक्तीस मानसिक ताणाची व ‘कोण जाणे कशाची तरी चिंता वाटते आहे’ अशी जाणीव असते. दुसरी गोष्ट म्हणजे, तिचा ताण स्नायू व अंतरावयव यांच्या बिघडलेल्या समतोलाच्या रूपाने उघड उघड व्यक्त होत असतो.

चिंताविकृती जडलेल्या काही व्यक्ती मात्र आपली ही विकृत चिंता कह्यात ठेवू शकतात व स्वतःची कामे व्यवस्थितपणे करू शकतात. काहीजण मात्र सतत काही ना काही उद्योग, उपद्व्याप वा चळवळी करीत राहून स्वतःचा ताण ओसरवीत असतात.

या निराधार, अनामिक अर्थात विकृत चिंतेच्या तीव्रतेनुसार तिचे : (१) चिरकारी वा जीर्ण चिंता, (२) तीव्र चिंता व (३) पराकोटीची भयावस्था (पॅनिक) असे तीन प्रकार पडतात.

चिरकारी वा जीर्ण चिंतेच्या बाबतीत व्यक्तीस मोघम स्वरूपाची ‘काहीतरी भयंकर घडणार आहे’, ‘काहीतरी आपत्ती कोसळणार आहे’, अशी धास्ती वाटत असते. परिणामी, तिची स्नायुयंत्रणा सतत तंग व स्वायत्त तंत्रिकातंत्र सतत उद्दीपित अवस्थेत असते. त्यामुळे हृदयाची धडधड, जलद श्वासोच्छ्‌वास, भूक मंदावणे, अतिसार, बद्धकोष्ठ, कामवासना मंद होणे, वंध्यत्व, अनियमित मासिक स्राव, थकवा, शरीरकंप इ. लक्षणे दृग्गोचर होतात. व्यक्तीच्या चेहऱ्यावर तसेच तिच्या बोलण्यातून, हावभावांतून, बसण्या-उठण्यातूनही तिची चिंताग्रस्त अवस्था दिसून येते. या स्थितीत अनपेक्षित अशा लहानसहान घटनांनीही (उदा., अनपेक्षित आवाज, एखाद्याचे अनपेक्षित आगमन) व्यक्ती बिचकते. कोणतीही नवीन गोष्ट आपल्याला जमेल की नाही अशी शंका तिला नेहमीच वाटते. रोजची कामे, आदरातिथ्य इ. साध्या गोष्टी करतानादेखील तिला चिंता वाटत असते. मनाची एकाग्रता न होणे, गोष्टी विसरायला होणे, पूर्वीच्या, सध्याच्या व भविष्यातील गोष्टींविषयी सतत कल्पना करीत बसणे, दचकूम उठावयास लावणारी दुःस्वप्ने पडणे, ही लक्षणेही या प्रकारात आढळतात.

तीव्र चिंतेच्या प्रकारात, भीतीची एरवीचीच लक्षणे, परंतु एकाएकी व अतिरेकी प्रमाणात दिसून येतात. व्यक्ती क्षुब्ध होते, तिचे डोळे विस्फारतात, चेहरा पांढरा पडतो, कंप सुटतो व घाम फुटतो, घशाला कोरड पडते, श्वासोच्छ्‌वास जलद होतो, गुदमरल्यासारखे होते, मळमळते, मलमूत्र विसर्जनास वारंवार जावे लागते व गलितगात्रता येते. कदाचित आपले हृदय बंद पडेल, किंवा आपल्याला वेड लागेल, किंवा काहीतरी भयंकर प्रसंग गुदरेल या भीतीने व्यक्ती भेदरून जाते व जवळपासच्या लोकांना काहीतरी ताबडतोब करा, म्हणून विनवू लागते.

पराकोटीच्या भयावस्थेत व्यक्तीची भीती इतकी अनावर होते, की त्यापायी कधीकधी व्यक्ती दुसऱ्याच्या अंगावर धावण्यास, किंवा पळून जाण्यास, किंवा आत्महत्या करण्यासही प्रवृत्त होते. ही अवस्था काही तास, काही दिवस वा काही महिनेही टिकू शकते. या अवस्थेत दुसरे लोक आपल्याला त्रास देत आहेत, धाकदपटशा दाखवीत आहेत, टोमणे मारत आहेत वगैरे स्वरूपाचे भ्रम पुष्कळदा होतात.

चिंतात्मक मनोमज्जाविकृतींचे मूळ व्यक्तीच्या वर्तमानकाली लैंगिक जीवनात असते, असे फ्रॉइडचे मत होते. लैंगिक उद्दीपनाच्या मानाने कामतृप्तीचे प्रमाण कमी असले, की उर्वरित उद्दीपन धडधड, भीती व चिंता या स्वरूपाने व्यक्त होऊ पाहते. ॲड्लरच्या मते, स्वप्रतिष्ठापनेची प्रेरणा तृप्त झाली नाही, म्हणजे चिंतास्थिती निर्माण होते. डी. के. हेंडरसन व आर्. डी. गिलेस्पी यांच्या मते व्यक्तीच्या गरजा व तिचा वास्तव परिसर यांच्यातील सर्व प्रकारचे संघर्ष चिंतास्थितीच्या मुळाशी असू शकतात.

चिंताविकृती जडलेल्या व्यक्तींचा पूर्वेतिहास पाहिल्यास, या व्यक्ती लहानपणी इतरांवर अवलंबून राहणाऱ्या होत्या तसेच त्यांना स्वतःच्या प्रेरणांना यशस्वी आवर घालणे पुरेसे जमलेल नव्हते आणि त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या ठिकाणी चिंतात्मक मनःस्थिती होती, असे सर्वसामान्यतः आढळून आले आहे.

औन्मादिक विकृतींप्रमाणेच चिंतात्मक विकृत  अवस्थेच्या बाबतीतही ‘सर्व काही ठीक होईल, मनातून चिंता काढून टाका’, असे आश्वासनपर म्हणणे जरी आवश्यक असले, तरी तेवढ्याने व्यक्तीची चिंता नष्ट होत नाही. कारण, तिची चिंता काल्पनिक नसून ‘खरी’ असते व तिला काहीतरी मानसिक मूळ असते. म्हणून, ‘तुमच्या चिंतेची कारणे आपण शोधून काढूया तुमच्या व्यक्तिमत्त्वाला हानी पोहोचलेली नाही सर्व काही व्यवस्थित होईल’, असा दिलासा व्यक्तीस प्रथम देऊन मग तिच्या सहकार्याने केलेली मानसचिकित्साच फलप्रद ठरते.

या मानसचिकित्सेचे स्वरूप दुहेरी असते : वास्तवाशी (रिॲलिटी) ज्या कोणत्या प्रेरणेच्या संबंधात संघर्ष निर्माण झाल्यामुळे चिंतेची लक्षणे दिसण्यास सुरुवात झाली, ती प्रेरणा व ते संघर्षप्रसंग रुग्णाशी बोलून आणि त्याला बोलायला लावून शोधून काढणे ही एक गोष्ट, दुसरी गोष्ट म्हणजे त्या प्रसंगांची चर्चा करून रुग्णाच्या मनातली लज्जेची म्हणा, अपराधाची म्हणा घर करून बसलेली भावना घालविणे. या चर्चेच्या निमित्ताने रुग्णाने ते प्रसंग मानसोपचारज्ञाच्या सान्निध्यात आठवणीने पुन्हा अनुभवले म्हणजे त्या प्रसंगांशी निगडित असलेल्या भावनेची तीव्रता हळूहळू कमी होते आणि त्या प्रसंगांकडे पाहण्याची त्याला नवी दृष्टीही येते. अशा रीतीने त्या प्रसंगांबाबतचे व्यक्तीचे हळवेपण दूर करणे (डीसेन्सीटायझेशन) व तिला त्यांविषयी पुनर्विचार करण्यास शिकविणे (रीएज्युकेशन) हाच चिंतावस्था समूळ आणि कायमची नाहीशी करण्याचा मार्ग होय.

संदर्भ : 1. Cameron, N. Personality Development and Psychopathology, Boston, 1963.

    2. Jacobson, E. Anxiety and Tension Control, Philadelphia, 1964.

अकोलकर, व. वि.