बालुबा : पश्चिम आफ्रिकेतील झाईरेमधील कासाई नदीच्या खोऱ्यात विषुववृत्ताजवळ वस्ती असणाऱ्या बांतू-निग्रो जमातींपैकीच हा गट आहे. लुवा गटाचा एक प्रांत आहे. तेथे अनेक उपजमाती आहेत. त्यांपैकीच बालुबा हा एक गट आहे. पूर्वीच्या लुंडा साम्राज्याच्या संस्थापनेत त्यांचा हात होता. १८७० मध्ये या जमातींत क्रांती घडून आली व हेम्प वनस्पतीच्या पूजेची प्रथा नव्याने अंमलात आली. केवळ राजाज्ञेमुळेच मूळच्या धर्मकल्पना संपुष्टात आल्या व जमातीजमातींत एकात्मकता घडून आली.

सुंता करणे, दात तासणे, शरीरावर ओरखडे काढून गोंदणे, डोक्याचे केस चित्रविचित्र आकारात कापणे अशा पद्धती त्यांच्यात रूढ आहेत. धाब्याची लांबट चौकोनी घरे रस्त्याच्या दुतर्फा बांधलेली असून ती बांधण्याचे काम स्त्रियाच करतात. पंचायतीचा कारभार जमात प्रमुख पाहतो. मुख्य धंदा शेतीचा असून बालुबा शेळ्या, मेंढ्या, कुत्री, कोंबड्या इ. पाळतात. गाय मात्र त्यांच्याकडे नाही. शिकार हा व्यवसाय क्वचित आढळतो. छोटी लोखंडी हत्यारे, तांब्याच्या तारेची वेटोळी किंवा लहान तुकडे यांचा नाण्यासारखा उपयोग करतात. त्यांचे लाकडी व हस्तिदंती कोरीव काम आणि धातूचे मूर्तिकाम प्रसिद्ध आहे. तसेच भिंतींवरचे रंगकाम, कापड विणणे, लोखंडी हत्यारे तयार करणे यांत हे लोक कुशल आहेत.

मानवी तसेच अमानवी गोष्टींना विशिष्ट प्रकारची आत्मिक शक्ती मूलत:च असते केवळ त्या शक्तीच्या जोरावरच सर्व व्यवहार सुरळीत चालतो, असा विश्वनियंत्रणाबद्दलचा यांचा दृष्टिकोन आहे.

संदर्भ : 1. Frazer, J. G. Native Races of Africa and Madagascar, London, 1938.

2. Herskovits, M. J. The Human Factor in Changing Africa, London, 1962.

कीर्तने, सुमति