कलर, व्होल्फगांग : २१ जानेवारी. १८८७ – ११ जून १९६७). प्रसिद्ध जर्मन-अमेरिकन मानसशास्त्रज्ञ व व्यूह (समष्टिवादी) मानसशास्त्राच्या तीन प्रणेत्यांपैकी एक. त्याचा जन्म पूर्व जर्मनीतील टाल्यिन (पूर्वीचे रेव्हाल) येथे झाला. ट्यूबिंगेन, बॉन व बर्लिन विद्यापीठांत त्याचे शिक्षण झाले. १९०९ मध्ये बर्लिन विद्यापीठातून तो पीएच्‌. डी. झाला. नंतर तो फ्रँकफर्ट विद्यापीठातील मानसशास्त्रीय प्रयोगशाळेत साहाय्यक म्हणून गेला. तेथेच ⇨कुर्ट काफ्का आणि  ⇨माक्स व्हेर्थायमर यांच्या सोबत त्याने संशोधन करून व्यूह मानसशास्त्राचा पुरस्कार केला. १९०९ ते १९१३ पर्यंत तो फ्रँकफर्ट येथे होता. १९१३ ते १९२० ह्या काळात तो कानेरी बेटांवरील ‘अन्थ्रोपॉइड रिसर्च स्टेशन’चा संचालत होता. १९२१ ते १९३५ पर्यंत तो बर्लिन विद्यापीठात मानसशास्त्रीय प्रयोगशाळेचा संचालक आणि मानसशास्त्र व तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक होता. स्वत: ज्यू नसूनही नाझी राजवटीवर उघड व परखड टीका करणार्‍या वैज्ञानिकांत तो आघाडीवर होता आणि त्यामुळेच त्याला १९३५ मध्ये जर्मनी सोडून अमेरिकेतील स्वॅर्थमोर कॉलेजात मानसशास्त्राचा प्राध्यापक म्हणून जावे लागले. सेवानिवृत्ती पर्यंत (१९५५) तो तेथेच होता. अमेरिकेतील एन्‌फील्ड येथे त्याचे निधन झाले.

तत्कालीन विश्लेषणात्मक अंतर्निरीक्षणवाद, ⇨साहचर्यवादाचे काही प्रकार आणि ⇨वर्तनवाद यांच्या विरोधी प्रतिक्रिया म्हणून व्यूह मानसशास्त्राची विचारप्रणाली उदयास आली. कलरने आयुष्यभर ह्या प्रणालीचे विविध प्रकारे परीक्षण करून तिच्या विविध अंगोपांगांचा विकास केला. इतर मानसशास्त्रीय संशोधनपर निबंधांतून आणि ग्रंथांतूनही त्याने व्यूह मानसशास्त्राचीच भूमिका घेतलेली आढळते. प्राणि-मानसशास्त्रातील [→ तुलनात्मक मानसशास्त्र] त्याचे संशोधनही महत्त्वपूर्ण आहे. एप्स व चिंपँझी यांच्या ज्ञानसंपादनाबाबतचे व संवेदनाबाबतचे त्याचे प्रयोग विशेष महत्त्वाचे आहेत. मानवाप्रमाणेच प्राणीही  ⇨मर्मदृष्टीचा वापर करतात, ते त्याने दाखवून दिले. त्याच्या प्रयोगांनी ज्ञानसंपादन प्रक्रियेबाबतच्या सिद्धांतात महत्त्वाचे परिवर्तन घडवून आणले. आकृतिक अणू परिणामांबाबतचे तसेच दृक्‌संवेदनेशी संबंधित अशा मेंदूतील विविध विद्युत्‌प्रक्रियांबाबतचे त्याचे संशोधनही महत्त्वाचे आहे [→ ज्ञानसंपादन संवेदन].

त्याचे अभ्यासक्षेत्र अत्यंत व्यापक होते. भौतिकीपासून ते ज्ञानमीमांसा आणि नीतिशास्त्रापर्यंतच्या विविध विषयांत त्याने महत्त्वाची भर घातली. त्याच्या कार्याबाबत त्याला अनेक बहुमानही मिळाले. ‘अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन’ चा तो अध्यक्ष होता आणि १९५७ मध्ये याच संस्थेकडून त्याला ‘डिस्टिंग्विश्ड सायंटिफिक कॉन्ट्रिब्यूशन ऍवॉर्ड’ही मिळाले. १९३४ मध्ये हार्व्हर्ड विद्यापीठात ‘विल्यम जेम्स व्याख्यानमाले’चा तो निमंत्रित व्याख्याता होता. ‘नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेस’चा तो निर्वाचित सदस्यही होता.

त्याने लिहिलेल्या जर्मन व इंग्रजी ग्रंथांतील पुढील ग्रंथ विशेष महत्त्वाचे होत : Die Physischen Gestalten (१९२०), द मेंटॅलिटी ऑफ एप्स (१९२५), गेश्टाल्ट सायकॉलॉजी (१९२९), द प्लेस ऑफ व्हॅल्यू इन ए वर्ल्ड ऑफ फॅक्ट्स (१९३८) व डायनॅमिक्स इन सायकॉलॉजी (१९४०).

पहा : व्यूहमानसशास्त्र.

सुर्वे, भा.ग.