लॅड-फ्रँक्लिन, क्रिस्टीन : (१ डिसेंबर १८४७-५ मार्च १९३०). अमेरिकन गणितशास्त्रवेत्ती, तर्कशास्त्रवेत्ती व मानसशास्त्रवेत्ती विदुषी. तिचा जन्म अमेरिकेतील कनेक्टिकट राज्यातील विंडसर या गावी झाला. तिने वासार महाविद्यालयामधून १८६९ मध्ये गणितशास्त्रात प्रथम पदवी संपादन केली व नंतर उच्च शिक्षणासाठी जॉन्स हॉपकिंझ विद्यापीठात प्रवेश केला. तेथे विख्यात तर्कशास्त्री ⇨चार्ल्स सँडर्स पर्स (१८३९-१९१४) याच्या प्रभावाने ती तर्कशासत्र व मानसशास्त्राकडे वळली.  १८८२ मध्ये तिचा विवाह विख्यात गणितज्ञ फेबियन फ्रँक्लिनबरोबर झाला व तिने लॅड-फ्रँक्लिन हे संयुक्त नाव धारण केले. जॉन्स हॉपकिंझ विद्यापीठाने सुरुवातीस तिला केवळ ती स्त्री होती म्हणून पीएच.डी. पदवी नाकारली पण पुढे १९२६ साली तिचा ती पदवी देऊन सन्मान केला.

क्रिस्टीन लॅड-फ्रँक्लिन ही गणित, तर्कशास्त्र व मानसशास्त्र ह्या तीनही विषयांवर सारख्याच अधिकारवाणीने लेखन करणारी आद्य अमेरिकन महिला होती. तिने काही वर्षे जर्मनीमधील गटिंगेन विद्यापीठात ⇨जी. ई. म्यूलरबरोबर त्याच्या प्रयोगशाळेत संशोधन केले. त्याचप्रमाणे तिने ⇨ हेल्महोल्ट्सबरोबरही बर्लिन येथे संशोधन केले. ह्या संशोधनाची परिणती १८९२ मध्ये तिच्या उत्क्रांतिवादी रंग वा वर्णसंवेदनाच्या सिद्धांतात झाली. या सिद्धांताप्रमाणे प्राणिजीवनाच्या उत्क्रांतीबरोबर नेत्रेंद्रियाच्या वर्णसंवेदनाच्या क्षमतेचीही उत्क्रांती झाली आहे. ह्या उत्क्रांतीचे तीन टप्पे आहेत : पहिल्या टप्प्यामध्ये नेत्रपटलात फक्त धवल-कृष्ण वर्णाच्या वेदनग्राहकांचा विकास झाला दुसऱ्या टप्प्यात नील-पीत वर्णग्राहकांचा विकास झाला तर तिसऱ्या  टप्प्यात म्हणजे सर्वात शेवटी हरित-रक्त वर्णवेदनग्राहकांचा विकास झाला. यामुळे नेत्रपटलाच्या केंद्रक्षेत्रामध्ये सर्व वर्णांचे संवेदन होते. त्याच्या बाहेरच्या मर्यादित क्षेत्रामध्ये फक्त धवल-कृष्ण व नील-पीत वर्णांचेच संवेदन होते, तर नेत्रपटलाच्या सीमावर्ती क्षेत्रामध्ये फक्त धवल-कृष्ण वर्णांचेच संवेदन होते. ह्या सिद्धांताने हेल्महोल्ट्सच्या व हेरिंगच्या वर्णसंवेदनाविषयक सिद्धांतांचे संयोजन झाले. या सिद्धांताच्या योगाने वर्णांधता व नेत्रपटलाच्या निरनिराळ्या भागांच्या वर्णसंवेदनाच्या क्षमतेची मीमांसा करता आली. लॅड-फ्रँक्लिनने १९१९ साली प्रकाशित केलेल्या कलर अँड कलर थिअरीज ह्या पुस्तकात हा सिद्धांत विस्ताराने मांडला आहे.

क्रिस्टीन लॅड-फ्रँक्लिनने १९०५ ते१९०९ पर्यंत जॉन्स हॉपकिंझ विद्यापीठात प्राध्यापिका म्हणून काम केले व नंतर १९१४ ते १९३० पर्यंत न्यूयॉर्क येथे कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापिका म्हणून काम केले. शेवटपर्यंत ती तर्कशास्त्र व दृष्टिसंवेदनांवर लेखन करत होती. पुरुषाबरोबर स्त्रीच्या समानतेची ती कडवी पुरस्कर्ती होती. न्यूयॉर्क येथे ती निधन पावली. 

भोपटकर, चिं. त्र्यं.