प्रेम : एका व्यक्तीला दुसऱ्या एक किंवा अनेक व्यक्तींची गरज असते. त्या एक किंवा अनेक व्यक्ती गरज भागविण्यास उपयुक्त ठरतात. अशा गरजवंत आणि गरज भागविणाऱ्या व्यक्तींची जी मानसिक नाती तयार होतात, त्यांतील एक भावना म्हणजे प्रेम होय. उदा., मातेचे अपत्यवात्सल्य. याच्या मुळाशी मातेची कामवासना आहेच त्या कामवासनेतूनच, वासनेच्या तृप्तीतूनच अपत्यजन्म झालेला असतो. पण वात्सल्य हे कामवासना नव्हे. अपत्याचे मातेबद्दलचे आकर्षण हेही साक्षात् प्रेम या सदरात अंतर्भूत होवो न होवो परंतु त्यातूनच मातृप्रेम निर्माण होते. स्त्री-पुरुषांचे लैंगिक आकर्षण हे प्रेमाचे मूळ होय. स्त्री आणि पुरुष या दोघांनाही एकमेंकाची गरज असते. अपरिहार्य अशा संगवासनेच्या योगाने ही गरज सिद्ध होते आणि त्याचेच रूपांतर स्त्री-पुरुष मैत्रीत होते. कलावंत वा विद्यावंत हा विद्यार्थी किंवा शिष्य यास विद्या वा कला यांचे प्रदान करून विद्यार्थ्याच्या प्रेमाचा विषय बनतो. या प्रेमाचे रूप म्हणजे गुरुभक्ती होय. राजा प्रजेचे रक्षण करतो, म्हणून राजनिष्ठा निर्माण होते.

प्रेम या शब्दाचे दोन पातळ्यांवर दोन अर्थ आहेत. एक प्रत्यक्ष गरज भागविणारी, नैसर्गिक देवघेवीतून निर्माण होणारी भावना. याच भावनेला शुद्ध रूप येते. त्या शुद्ध रूपामध्ये पुत्र, पती, शिष्य, मित्र इ. नैसर्गिक प्रेमास पात्र होणारे किंवा प्रेम करणारे स्त्री-पुरुष, गरज संपल्यानंतरही एकमेकांच्या जीवनाची कदर करतात. त्याकरता स्वार्थत्यागही करतात. सकाम प्रेमाचे निष्काम प्रेमात रूपांतर होते. धर्माचा एक असा सिद्धांत आहे, की ईश्वराने मनुष्यास निर्माण केले आणि शुद्ध प्रेम दिले. हे शुद्ध प्रेम म्हणजे निष्काम प्रेम होय. ईश्वर प्रेम करतो, त्याप्रमाणे त्याच्यावर माणूसही प्रेम करतो. हे प्रेम म्हणजेच भक्ती. ही भक्ती प्राथमिक स्तरावर सकाम असते आणि ती उच्च स्तरावर निष्काम व शुद्ध स्वरूपाची बनते. [⟶ भक्तिमार्ग].

व्यापक अर्थाने प्रेम म्हणजे कामना, इच्छा, अपेक्षा. माणसे, पशू, पक्षी, अन्य प्राणी या सर्वांच्या ठिकाणी प्रवृत्तिनिवृत्तिरूप व्यवहार घडत असतात. या प्रवृत्तिनिवृत्तिरूप व्यवहारांना कामनेची प्रेरणा असते. [⟶ प्रेरणा – १]. कामना म्हणजे आकर्षण. त्यामुळे निसर्गप्रेम निर्माण होते आणि ते प्रेम म्हणजे गरजांच्या स्पष्ट जाणिवेतून निर्माण होत नाही. निसर्गाची, भोवतालच्या माणसांची, प्राण्यांची, वनस्पतींची, भू-जल-तेज-वायु-आकाश-प्रकाश इत्यादिकांची नैसर्गिक गरज आहे, म्हणून त्यातून कामनेला विषयानुरूप नवे नवे आकार येतात. सामाजिक स्नेहमय संबंध अनेक प्रकारचे असतात. पितापुत्रांचे वात्सल्य, मातृभक्ती, पितृभक्ती, गुरुभक्ती, देशभक्ती, मैत्री, मानवतेची सहानुभूती, सहकार्याची उत्कंठा इ. सामाजिक संबंध ही प्रेमाचीच विविध रूपे होत. सामाजिक जाणिवांचे विविध थर असतात व त्यांच्यामध्ये उत्कट वा अनुत्कट असे तारतम्य असते. निसर्गप्रेम, प्राणिमात्राबद्दलची सहानुभूती, तारकांनी भरलेले आकाश, समुद्र अथवा सर्व विश्व याबद्दलची भव्य भावना हे सर्व निसर्गप्रेमाचेच आविष्कार होत. ते मानवी मनातच स्वभावतः रुजलेले आहेत. कारण, मानवी जीवन सबंध विश्वाचाच एक घटक आहे.

कामनेबरोबरच द्वेष हीदेखील तितकीच मूलभूत भावना आहे. ज्या परिस्थितीच्या योगाने गरजेचा विच्छेद होतो किंवा गरजेला धोका प्राप्त होतो, अशा तऱ्हेच्या सर्व परिस्थितीबद्दल द्वेषभावनेने आकार धारण केलेले असतात. गरजांची पूर्ती करणारे जे विषय असतात, त्यांच्यामध्येसुद्धा गरजांचा विच्छेद करणाऱ्याही प्रवृत्ती असतात. त्यामुळे कामना ही भावना संमिश्र स्वरूपाची बनते. जीवजातीला वा मनुष्यजातीला जे पूर्वानुभव आलेले असतात, त्या पूर्वानुभवांच्या संस्काराने प्रत्येक भावना संमिश्र स्वरूप धारण करीत असते. उदा., आईबद्दलच्या आकर्षणामध्ये पिता ही विच्छेद उत्पन्न करणारी शक्ती असते, त्याचबरोबर गरज पूर्ण करणारीही ती शक्ती असते. पिता मातेचा पती होय. पतीबद्दलही तिला आकर्षण असते. त्यामुळे अपत्याची मातापित्यांबद्दलची प्रेमभावना ही संमिश्र रूप धारण करते.

कामनेचे उच्च प्रेमभावनेमध्ये रूपांतर होत असते तेव्हा त्याला सामाजिक किंवा नैतिक मूल्य प्राप्त होते. उदा., प्राणिमात्राबद्दल वा मानवमात्राबद्दल सहानुभूती, देशभक्ती, पितृभक्ती, मातृभक्ती इत्यादी.

या नैसर्गिक कामनेवर द्वेषभावनेचा प्रभाव पडू शकतो आणि त्याच्यातून सामाजिक संकेताने मान्य झालेल्या उच्च नैतिक मूल्य असलेल्या प्रेमभावनेशी त्या द्वेषभावनेची विसंगती उत्पन्न होते व त्यातून प्रमादप्रवृत्ती निर्माण होते. गुन्हा होतो. कौटुंबिक किंवा सामाजिक जीवनात प्रेम किंवा द्वेष या द्वंद्वाच्या संघर्षातच व्यवहार घडत असतात आणि संमिश्र मनोरचना तयार होते. या संमिश्र मनोरचनेतून मनुष्य जीवनाकडे व विश्वाकडे पाहतो. पूर्ण प्रेमविच्छेद झालेल्याला जग हे द्वेष्य वाटते याचे कारण ही संमिश्र मनोरचना होय. भावनांच्या ग्रंथी या विश्वानुभवाला आकार देत असतात.

या सर्व प्रकारच्या मनोरचनेतील गुंतागुंतीचे धागे जीवनाचा दृष्टिकोन बनविण्यास कारण होतात परंतु विश्वाची माणसाला गरज आहे, त्या गरजेतून विश्वाचा अनुभव घेत असताना जीवनाच्या उणिवा भरून निघू लागतात. जीवनातील अर्थाचा प्रत्यय येऊ लागतो. त्यामुळे भोवतालचे अर्थपूर्ण विश्व समजून घेण्याची आणि ⇨ साक्षात्काराची प्रेरणा सूक्ष्म, अंतर्वेधी व समग्रग्राही बनू लागते. ही अर्थपूर्णता म्हणजेच जीवनाची मूल्ये होत. [⟶ मूल्यशास्त्र]. त्यांच्यातील सुसंगतीचा प्रत्यय आणून देणारी कामना प्रतिभेचे [⟶ लोकोत्तर बुद्धिमत्ता] रूप धारण करते. कामना म्हणजे आकर्षणाचेच मूळ रूप होय. हे आकर्षण आणि सुसंस्कृत अनुभवसंपन्न अशी प्रतिभा यांना कलामूल्यांचा प्रत्यय येतो. [⟶ कला – २ कलासमीक्षा]. ही प्रतिभा म्हणजे ⇨ सर्जनशीलतेचे वा निर्माणशक्तीचेच एक रूप होय. जीवनाच्या गरजा निर्मितीशिवाय पूर्णच करता येत नाहीत. प्राथमिक गरजांची पूर्ती होत असताना प्रतिभा म्हणजेच कल्पनाशक्ती नवनिर्मितीसाठी प्रवृत्त होते. तिच्या पाठीशी अर्थवत्तेचा म्हणजे मूल्यांचा संदर्भ असतो.

जोशी, लक्ष्मणशास्त्री

इतर व्यक्तींचा सहवास ही माणसाची एक गरज आहे आणि ती गरज पूर्ण करणारी वस्तुस्थितीही आहे. इतर व्यक्तींशी जी मानसिक नाती, जे जाणवणारे संबंध निर्माण होतात, त्यांची एका मितीवर मांडणी केली, तर एक टोक जवळीक दर्शविणारे आणि दुसरे टोक दुरावा दर्शविणारे असेल. या दोन्ही टोकांवरील व त्यांमधील मानवी नात्यांचे स्वरूप अनेक पदरी, अनेक थरांनी बनलेले असते. अशा नात्यांमधील भावनिक बंधाचा प्रेम हा एक प्रकार आहे.

प्रेम (लव्ह) आणि जिव्हाळा (अफेक्शन) या शब्दांनी मानवी भावनांची एक रचना सांगितली जाते. त्या रचनेत दुसऱ्या व्यक्तीशी आपले स्वत्व निगडित झाल्याचा प्रत्यय हा गाभा आहे. स्वत्व निगडित होताना माणसाच्या अनुभव घेण्याच्या सर्व क्षमता सहभागी होऊ शकतात. प्रेमभाव व्यक्त करण्याच्या बाजूनेही अशीच समग्र ⇨व्यक्तिमत्त्वाची आविष्कारशीलता दिसून येते. त्यामुळेच कृती, विचार, कल्पना, अध्यात्म, धर्म, काव्यादी ललित कला, तत्त्वज्ञान यांसारख्या आविष्काराच्या सर्वच क्षेत्रांत ‘प्रेम’ हा भावविषय झालेला दिसतो.


कामव्यवहारातून प्रेम उद्‌भवते आणि प्रत्येक प्रेमभावात कामवासनेचा एक पदर असतो, असे ⇨  मनोविश्लेषणवादी मानतात परंतु त्यांनी मांडलेल्या आत्मसंरक्षक यंत्रणांपैकी उन्नयन (सब्लिमेशन) ही यंत्रणा, म्हणजे कामुकतेतून पलीकडे जाणारी प्रेमाविष्काराची यंत्रणा होय. ⇨ विल्यम जेम्स (१८४२- १९१०) व ⇨ विल्यम मॅक्‌डूगल (१८७१-१९३८) या मानसशास्त्रज्ञांनी प्रेमाला एक ⇨ मनोभाव वा भावना (इमोशन) व ⇨ स्थिरभाव (सेंटिमेंट) म्हणून मान्यता दिली होती. प्रेम सहजप्रवृत्त असते, त्यांची उत्पत्ती आणि आविष्कार हेही ⇨सहजप्रेरणेतूनच होतात, असा त्यांचा विचार होता. ⇨सिग्मंड फ्रॉइड (१८५६- १९३९) प्रेमाचा जन्म जीवनाभिमुख सहजप्रेरणेमधून होतो, असे मानतो. ⇨जे. बी. वॉटसन (१८७८ – १९५८) या वर्तनवादी मानसशास्त्रज्ञाने भावनिक वर्तनाचा वैकासिक अभ्यास केला. प्रेमाची स्पष्ट, शारीर प्रतिक्षेप किंवा प्रतिक्रिया यांसारखी मूर्त आशय असणारी संकल्पना विकसित करण्याचा त्याने आरंभ केला. सी. बी. ब्रिजेझने भावनिक विकासाचा जो आरेख तयार केला, त्यात मूल सहा महिने ते एक वर्ष या काळात प्रेमभावनेचा अनुभव घेऊ शकते व आविष्कार करू शकते, असे दिसून आले. या संदर्भात झालेल्या अभ्यासामधून भावनांचा विकास ढोबळ आणि सर्वसमावेशक क्षोभावस्थेपासून सूक्ष्म व विशिष्ट भावनिक प्रत्यय आणि आविष्कार येथपर्यंत होतो, असे दिसून आले.

एच्. हार्लो याने केलेल्या अभ्यासात प्रेम ही एकसंध भावघटना न मानता ती किमान पाच वेगवेगळ्या परंतु परस्परसंबद्ध भावनिक व्यवस्थांची एकत्र जुळणी मानलेली आहे. या व्यवस्था आणि त्यांतील भावविषय व प्रतिक्रिया यांची जुळणी पुढीलप्रमाणे आहे : (१) मुलाचा आईशी संबंध : यात मुलाला सुरक्षिततेची भावना देणारी, आधार व शारीरिक सुस्थिती देणारी व्यक्ती म्हणून आईचा संपर्क मिळत असतो. मुलाचा भोवतालच्या परिस्थितीचा शोध घेण्याचा प्रारंभ या सुरक्षिततेच्या पायावर उभा असतो. यात शरीराचा स्पर्श, वास, स्तनपान, बोलण्याचा आवाज, आईचा चेहरा, आईने उचलून घेणे, खेळवणे या सर्वांचा मुलाला येणारा अनुभव महत्त्वाचा आहे. (२) मुलाचा इतर मुलांशी संबंध : यात खेळ, त्यातून येणारे सहकार्य आणि सह-अस्तित्व, त्यांचे ‘खास’ कार्यक्रम आणि त्यांत एकमेकांबरोबर राहण्याची बरोबरीच्या नात्याची वागणूक यांचा समावेश असतो. यातून ‘मैत्री’ या आविष्काराची मुळे रुजतात. (३) भिन्नलिंगी व्यक्तींचे कामजीवन : शारीरिक संपर्क हा या नात्यात आवश्यक व महत्त्वाचा आहे. कामक्रीडा भावदृष्ट्या ‘खेळा’शी निगडित आहे. वयात येताना भावनांना प्राप्त होणारी समजूत आणि खोली, तीव्रता आणि आवेग यांच्या वैशिष्ट्यांना कामवर्तन सामावून घेते. समर्पण आणि स्वीकार, विश्वास आणि आश्वासकता, स्वत्वाचे मोल आणि शोध यांचे मित्रमैत्रिणींच्या पातळीवर सुरू झालेले प्रवाह या पातळीवर परिणत आणि परिपक्व अवस्थेत दिसतात. (४) आईचा मुलाशी संबंध : यात आईच्या बाजूने मुलाचा स्पर्श, त्याचे संगोपन करतानाचे अनुभव, भरणपोषणाची जबाबदारी आणि डोळ्यादेखत मुलाची वाढ होताना स्वतःचे आविष्कारही बदलत जाणे, हे गतिमान वर्तनविशेष मोडतात. मुलाचा नाजुक, कोमल देह आणि त्याची हलक्या हाताने करावयाची जपणूक हा या भावनिक बंधांचा महत्त्वाचा भाग असतो. (५) वडील आणि मूल यांचे संबंध : यामध्ये आधार देणे, रक्षण करणे, सामाजिक शिकवण देणे या भूमिकांना महत्त्व आहे.

वरील प्रकारचे विश्लेषण प्रेम या गुंतागुंतीच्या आणि वस्तुनिष्ठ विचाराला अवघड असणाऱ्या संकल्पनेच्या सर्व छटा पकडू शकते की नाही, ह्याबाबत मतभेद आहेत. प्रेम म्हणजे काय ते माहीत आहे, पण सांगता येत नाही अशी स्थिती असेल, तर याबाबत कोणतीही एकवाक्यता मुळातच संभवत नाही पुन्हा प्रेमाच्या प्रत्ययातही विविधता असू शकते. प्रेमविषयाला शरण जाणे, त्यावर मालकी वा वर्चस्व स्थापन करणे, प्रेमविषयात मिसळून जाणे किंवा त्याला आपलेसे करणे, स्वतःचे आकलन संपन्न करणे हे किंवा यांसारखे ते प्रत्यय असू शकतात. त्यामुळे प्रेमाने निर्दिष्ट होणारा नेमका एकच एक प्रत्यय मानता येत नाही. तसा आग्रह अनाठायीही आहे. त्यातील व्यक्तिभेदांची मिती मांडता येते का, हा शास्त्रीय विश्लेषणाचा प्रश्न आहे.

दुसऱ्या व्यक्तीशी जवळीक प्रत्ययाला येणे ही माणसाच्या निकोप विकासाची गरज आहे. ज्या मुलांना संगोपनकालात निष्प्रेम, रुक्ष संबंध अनुभवावे लागतात, त्यांच्यात अस्थिरता तसेच विकृतिप्रणवता आढळते. मानवी पातळीवर हार्दिक संबंधांना एक पोषक मूल्य आहे. अनाथाश्रमांत वाढणाऱ्या मुलांमध्ये अकारण खंगत जाणे, अतिरेकी अंतर्मुखता, बाह्य जगाशी संपर्क राखण्याची अक्षमता, भावनिक बधिरता-मूकता हे वर्तनप्रकार आढळतात. त्यात प्रेमाचा अभाव, मातृवंचितता ही मुख्य कारणे असतात. [⟶ बालगुन्हेगारी]. प्राण्यांवरील अभ्यासातही ज्या प्राण्यांचा संगोपनकाल आईच्या सान्निध्यात जातो – उदा., माकड-त्यांना आई मिळू दिली नाही, तर एकतर ते सतत आई-सदृश उद्दीपनाच्या शोधात असतात आणि दुसरे म्हणजे त्यांचा विकासही निकोप होत नाही.

मानवी पातळीवर प्रेमविषयही व्यक्ती, वस्तू, विचार इ. असू शकतात. प्रेमाचे आविष्कार मूर्त शारीर संवेदनांपासून अमूर्त साक्षात्कारी रूपांपर्यंत असू शकतात. परंतु प्रेम ही माणसाची गरज आहे. ती केवळ ‘उणेपणा भरून काढणे’ अशी नाही ती सुदृढ करणे, संपन्न करणे अशा स्वरूपाची आहे. तिचे मूळ खोल जैविक चैतन्यात आहे.

  

संदर्भ : 1. Berl, Emmanuel, The Nature of Love, New York, 1924.

            2. Bridges, J. W. The Meaning and Varieties of Love, Cambridge, 1935.

            3. From, Erich, The Art of Loving, New York, 1956.

            4. Montague, Ashley, The Meaning of Love, New York, 1955.

            5. Reik, Theodor, A Psychologist Looks at Love, New York, 1944.

            6. Solovyev, V. The Meaning of Love, London, 1945.

            7. Sorokin, P. Ed. A Symposium : Explorations in Altruistic Love and Behaviour, Boston, 1950.

            8. Sorokin, P. The Ways and Power of Love, Boston, 1954.

            9. Suttie, I. D. The Origin of Love and Hatred, London, 1935.

वनारसे, श्यामला