मानसिक अवसाद: खिन्नता, विषण्णता किंवा अवसाद हा मानसिक विकारांतील एक प्रचलित व प्रमुख लक्षणसमूह असून त्यात सबळ कारणाशिवाय उदासीनता येते तसेच व्यक्तीचा आत्मविश्वास व मानसिक क्षमता खचली जाऊन, ती निराश व निष्क्रीय बनते. ही लक्षणे परिस्थितीशी अविरत चाललेल्या झगड्यात हरल्यामुळे तसेच आत्मप्रतिमा डागळल्यामुळे येतात. गेल्या एका तपात ह्या लक्षणांचा प्रादुर्भाव वाढावयाचे मुख्य कारण म्हणजे आधुनिक शिक्षणपद्धतीमुळे व स्पर्धाप्रधान संस्कृतीमुळे येणारे वैफल्य. ह्या लक्षणाचे प्रमाण जटिल आणि कृत्रिम अशा नागरी जीवनाच्या तणावमय वातावरणात, शेकडा चार टक्क्यांपर्यंत आहे, असे काही पाश्चिमात्य अभ्यासकांचे मत आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांत आणि तरुणांपेक्षा वयस्करांत त्यांचे प्रमाण जास्त आहे. चाळिशी ओलांडलेल्या आधुनिक स्त्रियांत ते बऱ्याच जास्त प्रमाणात आढळून आलेले आहे. भारतातील ग्रामीण संस्कृतीतल्या स्त्रियांत अमान्य परंतु परिस्थितीमुळे अटळ ठरलेल्या वंध्यकरणामुळे (स्टरिलायझेशन) अवसाद जडायचे प्रमाण वाढू लागले आहे.

प्राकृतांच्या दैंनदिन जीवनात उदासीनता वारंवार आढळते पण तिची तीव्रता व कालमर्यादा अल्प असून सबळ कारणाशिवाय ती येत नसते. निकटवर्तियांचा अंत, मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी, हितसंबंधास बाधा तसेच मोठे अपयश आणि चारचौघांत झालेला पाणउतारा ही तिची सर्वसामान्य कारणे आहेत.

 उदासीनता हे लक्षण बऱ्याच विकारांत दिसून येते परंतु त्याला सबळ कारण नसते आणि शिवाय तीव्रता जास्त असून कालमर्यादा दीर्घ असते. हे लक्षण पुढील विकारांत प्रामुख्याने, सातत्याने व जास्त प्रमाणात आढळते : (१) अवसादी प्रतिक्रिया, (२) उद्दीपन–अवसाद–चित्तविकृती, (३) निवर्तनीय वा वार्धक्यजन्य (इन्‌व्होलूशनल) चित्तविकृती, (४) चित्तविकृतीय अवसाद, (५) मज्जाविकृतीय अवसाद आणि (६) छिन्नमानसी–भाववृत्तीय प्रतिक्रिया (स्किझो– ॲफेक्टिव्ह रिॲक्शन).

उदासीनता हे लक्षण पुढील विकारात बहुधा आढळून येते : (१) चिंताप्रतिक्रिया, (२) भयगंडीय भावातिरेकी मज्जाविकृती (फोबिक-ऑब्सेसिव्ह न्यूरोसिस), (३) निर्व्यक्तीकरणीय मज्जाविकृती (डीपर्सनलायझेशन न्यूरोसिस), (४) उन्माद, (५) मद्यासक्ती, (६) औषधी प्रतिक्रिया (विशेषतः उत्तेजके, फिनोथायझीन्‌स ही शांतके आणि रेसरपिन ह्या वाढीव रक्तदाबविरोधी औषधाच्या सतत वापरामुळे, (७) शरीरदोषोद्‌भव चित्तविकृती (ऑर्‌गॅनिक सायकोसिस), (८) संक्रामणी (इन्फेक्टिव्ह) चित्तविकृती आणि (९) काही व्यक्तिमत्त्व विकार.

अवसादी लक्षणांचे जातिबोधक निदानीय वर्णन असे आहे : उदासीनता सतत जाणवल्यामुळे रुग्णाला बरे वाटत नाही, विशेषतः सकाळच्या प्रहरी कशातच रस वाटत नाही, काही बोलावेसे वा करावेसे वाटत नाही, काही सुचत नाही, आठवत नाही. आत्मविश्वास खचून जातो व आत्ममूल्यऱ्हास होतो (सेल्फ डेप्रीशिएशन). मानसिक प्रक्रिया तसेच शारीरिक हालचाली बऱ्याच मंदावतात. विचार उदासीन व भयसूचक असतात. भविष्यकाळ अंधारमय वाटतो. भूतकाळातील वाईट प्रसंग व केलेल्या चुका प्रखरपणे आठवतात आणि पश्चात्ताप होतो. आत्मनिंदा केली जाते. घडलेल्या सर्व दुर्घटनांबद्दल स्वतःलाच दोषी ठरवले जाऊन प्रायश्चित्ताचे आणि पुढे आत्महत्येचे विचार मनात येतात. झोप कमी लागते व फार लवकर जाग येते. भूक नष्ट होते. बद्धकोष्ठ होतो. शिवाय अनेक प्रकारच्या शारीरित तक्रारी (विशेषतः वेदना) उद्‌भवून अस्वस्थता वाढते.

 अवसादाच्या निदानीय प्रकारांचे वर्गीकरण मुख्यतः अंतर्जात व बहिर्जात (एंडॉजेनस व एक्झॉजेनस) असे केलेले आहे परंतु पूर्णपणे बहिर्जात किंवा पूर्णपणे अंतर्जात असे निदानीय प्रकार सापडणे कठीण. या दोन्ही प्रकारांत मूळचे भावनाप्रधान व्यक्तिमत्त्व आणि लक्षणाला चालना देणारे कटू प्रसंग कमीअधिक प्रमाणात आढळतात.


 अवसादाच्या काही विशेष प्रकारांचे वर्णन असे आहे : चित्त–विकृतीय अवसाद ह्या प्रकारात संभ्रमी विचार बळावतात. आपण नालायक व पापी आहोत, आपल्याला दुर्धर आणि भयानक रोगाने पछाडले आहे, आपण सर्व गमावले आहे तसेच आपला सर्वनाश झाला आहे असा ग्रह होतो. काही वेळा संभ्रमी कल्पनांना पूरक असे निर्वस्तुभ्रमही होतात. उदा., लोकांनी मारलेल्या काल्पनिक हाका तसेच त्यांच्या धमक्या व अपशब्द ऐकू येतात. ⇨ आत्महत्येचे विचार बळावतात व तसा आत्महत्येचा प्रयत्नही केला जातो. तीव्र प्रकारात अन्नत्याग, निश्चलता आणि शेवटी अर्धमृर्छा (एक प्रकारचे मृत्युसमान जडत्व) येते.

उद्दीपन–अवसाद–चित्तविकृतीच्या रुग्णाला अवसाद ह्या लक्षणसमूहाशिवाय, उद्दीपन ह्या विरुद्ध टोकाच्या लक्षणांचा समूहसुद्धा जडत असतो. बऱ्याच वेळा दोन लक्षणसमूह आलटून पालटून दिसून येतात. काही वेळा असे रूपांतरण औषधोपचारानेही होऊ शकते. हा प्रकार अंतर्जात असून काही काळानंतर लक्षणे उपचाराशिवाय लुप्त होतात. बहुधा दोन लक्षणसमूहांमधला काळ लक्षणविरहित असतो. ह्या विकाराची कालमर्यादा बरीच वर्षे टिकून राहू शकते.

 निवर्तनीय वा वार्धक्यजन्य अवसाद वयाच्या ४५ वर्षांच्या पुढे, विशेषतः बायकांत, आढळून येतो. इतर चित्तविकृतीय अवसादात न आढळणारी लक्षणे म्हणजे कमालीची अस्वस्थता, येरझाऱ्या, आक्रंदन व आपल्या संभ्रमी कल्पनांचा वारंवार उच्चार तसेच उद्वेगामुळे केलेले विलाप, आपल्यासमोर नसलेल्या मुलांना किंवा नवऱ्याला आपल्या हितशत्रूंनी पळवले असून त्यांना मारताहेत अशी संभ्रमी कल्पना व तसलेच निर्वस्तुभ्रम (मुलांच्या किंकाळ्या व शत्रूंची दमदाटी) शिवाय पोटात कर्करोगासारखा भयंकर रोग असल्याचा संभ्रम व मृत्यूच्या विचारांचे थैमान. पुढे या यातना असह्य झाल्यास किंवा स्वतःच्या काल्पनिक पापांचे प्रायश्चित म्हणून आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा संभव असतो.

 मज्जाविकृतीय अवसाद, ही प्रतिक्रिया मुख्यत्वे मज्जाविकृतीय व्यक्तिमत्त्व असेलल्यांना कटू परिस्थितीचे दडपण वा अपयशासारख्या बहिर्जात कारकांच्या तीव्र प्रभावामुळे जडत असते. चित्तविकृतीच्या  तुलनेने एकंदर लक्षणे सौम्य असतात. आत्महत्येचे विचार आले, तरी तसा प्रयत्न सहसा केला जात नाही. मंदपणाऐवजी अस्वस्थता आणि चिंता जास्त प्रमाणात दिसून येते. चिडचिड, उद्वेगाने बोलणे, स्वतःला दोष देणे व पुढची काळजी करीत राहणे अशी लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात. झोप उशिरा लागून सकाळी उठावेसे वाटत नाही, संध्याकाळी उदासीनता जास्त जाणवते. कुणीही दिलासा दिल्यास तात्पुरते बरे वाटते.

उपचार : बहुतेक सर्व प्रकारची अवसादी लक्षणे अवसादविरोधी औषधाने आटोक्यात येतात. मात्र सुधारणा मंदगतीने होते. चित्तविकृतीय व निवर्तनीय प्रकारावर विद्युत् उपचार प्रभावी ठरतात. मज्जाविकृतीय अवसादी रुग्णांना शांतके व आधारदायी मानसोपचाराची अत्यंत गरज असते. शांतकांमुळे सर्व अवसादी रुग्णांना झोप लागून आराम पडतो. उद्दीपन-अवसाद-चित्तविकृतीतील लक्षणांचे प्रतिबंधन लिथियम कार्बोनेट हे औषध सातत्याने घेतल्यास होऊ शकते.

पहा : चित्तविकृति छिन्नमानस मज्जाविकृति.

संदर्भ : 1. Dominian, J. Depression, London, 1976.

             2. Jacobson, E. Depression, New York, 1971.

             3. Kaplan, H. I. and Others, Modern Synopsis of Comprehensive Textbook of Psychiatry III, Baltimore, 1981.

             4. Kolb, L. C. and Others, Modern Clinical Psychiatry, Philadephia, 1982.

             5. Parkes, C. M. Bereavement : Studies of Grief in Adult Life, New York, 1972.

             6. Stern, J. A. and Others, Ed. Costello, C. G. “Depression”, in Sumptoms of Psychopathology, New York, 1970.

शिरवैकर, र. वै.