इदम् : (इड). मनोविश्लेषणातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना. मनोविश्लेषणात इदं हा सहजप्रवृत्तिपर अशा मूळ जैव प्रेरणांचा स्रोत मानला आहे. व्यक्तींच्या मनाची प्रेरणात्मक (इड), संयमात्मक (एगो) व आदर्शात्मक (सुपर एगो) अशी तीन अंगे फ्रॉइडने विवेचनाच्या सोयीसाठी मानलेली आहेत.

इदं म्हणजे व्यक्तीचे आदिमानस. अबोध व अंतर्निरीक्षणासही अप्राप्य असा हा व्यक्तिमनाचा प्रांत आहे. स्वप्‍नांची निर्मिती व प्रक्रिया तसेच मज्‍जाविकृतीची लक्षणे यांच्या अभ्यासाधारे फ्रॉइडने या आदिमानसाचे स्वरूप मांडण्याचा प्रयत्‍न केला आहे. अर्भकावस्थेत तसेच नंतरच्या काळातही शरीरांतर्गत प्रक्रियांमुळे जी ऊर्जा उपलब्ध होते, तिचा वापर अन्न, स्वसंरक्षण व प्रेम या गरजांच्या तात्काळ तृप्तीसाठी करणे व सतत सुखावस्थेत राहणे एवढेच हे आदिमानस जाणत असते. व्यक्तिमनाचा हा आद्यस्तर अबोध स्वरूपाचा असतो आणि असंघटित अशा प्राकृत प्रेरणांच्या आधीन असतो. संघटक अशा संकल्पशक्तीचा तसेच मूल्यांच्या जाणिवेचा व नीतिकल्पनेचा तेथे प्रकर्षाने अभाव असतो. सुखलुब्धी हेच त्याचे एकमेव नियामक तत्त्व असते. इदंमधील ऊर्मींना व प्रेरणांना काळ नष्ट करू शकत नाही. या प्रांतात गाडल्या गेलेल्या अनुभवस्मृतीदेखील दीर्घकाळ अबोध पण अगदी ताज्या राहतात. कधीकधी त्यांच्या प्राबल्यामुळे व्यक्तिवर्तनावरील अहंचा अंकुश दुर्बळ ठरतो व या आंतरिक संघर्षातून चिंता, अपराधभावना व मानसिक विकृती निर्माण होतात.

सर्वसामान्यपणे कालांतराने व्यक्तीचा विकास होऊन तिच्या आदिमानसात (इदंमध्ये) परिवर्तन घडून येते. आदिमानसाचा जो भाग विकसित होऊन वास्तवाभिमुख बनतो, त्यासच फ्रॉइडने ⇨अहम्  म्हटले आहे. वास्तवता, नीतिमत्ता, सामाजिक बंधने इत्यादींचे बंधन सुरुवातीसच इदंवर नसते तथापि बाह्य जगाशी येणाऱ्या संपर्कामुळे ह्या बंधनांतूनच व्यक्तीतील अहंचा उदय व विकास होतो आणि कालांतराने त्याची अधिसत्ता इदंवर चालते.

पहा : मनोविश्लेषण.

अकोलकर, व. वि.