संज्ञाप्रवाह : (कॉन्शस्नेस) संज्ञा म्हणजे जाणीव. ही जाणीव एखादया प्रवाहाप्रमाणे अखंड, सदावाहती अशी असते हा अर्थ संज्ञा-प्रवाह – ‘ स्ट्रीम ऑफ कॉन्शस्नेस ’ – ह्या शब्दांत सामावलेला आहे. ‘ स्ट्रीम ऑफ कॉन्शस्नेस ’ हा शब्दप्रयोग प्रथम विख्यात अमेरिकन मानसशास्त्रज्ञ ⇨ विल्यम जेम्स (१८४२-१९१०) ह्याने प्रिन्सिपल्स ऑफ सायकॉलॉजी (दोन खंड, १८९०) ह्या आपल्या गंथात केला आणि संज्ञाप्रवाहाचा सिद्धांत मांडला. ह्या सिद्धांताने संज्ञा वा जाणीव ही वेगवेगळ्या मानसिक अवस्था एकमेकींना तुकडयांप्रमाणे जोडणारी नसून संततपणे वाहणाऱ्या एका अखंड प्रवाहासारखी असते हे स्पष्ट केले. त्यामुळे बौद्धीक जगात कांती घडून आली. त्याचप्रमाणे साहित्याच्या क्षेत्रातही महत्त्वाच्या घटना घडून आल्या. या अखंड संज्ञाप्रवाहातून व्यक्तीची संवेदने, विचार, भावना, तत्संबंधित प्रतिमा इ. वाहत असतात. ह्या प्रवाहाचे शब्दचित्रण करण्यासाठी प्रचलित भाषा अपुरी पडते त्यामुळे नवी भाषा, नवी शब्दकळाही तयार करावी लागते.
विल्यम जेम्सने मांडलेल्या ह्या संज्ञाप्रवाहाच्या मानसशास्त्रीय सिद्धांतावर अनेक यूरोपीय साहित्यिकांनी आपले लेखनतंत्र उभे केलेले असले तरी हा सिद्धांत मांडला जाण्याच्या कितीतरी आधी शेक्सपिअरच्या नाटकांतून, तसेच ⇨ जॉन डन सारख्या इंग्रज कवीच्या कवितांतून संज्ञाप्रवाहाची जाणीव प्रकट होत असल्याचे अभ्यासकांना जाणवले आहे. ⇨ सॅम्युएल रिचर्ड्सनपासून हेन्री जेम्सपर्यंतच्या (हा विल्यम जेम्सचा भाऊ) कादंबरीकारांतही ही जाणीव आढळते. उदा., हेन्री जेम्सच्या द पोर्ट्रेट ऑफ ए लेडी (१८८१) ह्या कादंबरीतील एक संपूर्ण प्रकरण ह्या कादंबरीतील एक प्रमुख व्यक्तिरेखा इसाबेल हिच्या मनातील स्मृती, विचार आणि भावना यांच्या प्रकियेचे वर्णन करण्यास वाहिले आहे. १९२० नंतर संज्ञाप्रवाह हे कथा-कादंबऱ्यांतील एक वैशिष्टयपूर्ण तंत्र झाले. ह्या तंत्रात निवेदकाच्या कोणत्याही हस्तक्षेपावाचून एखादया व्यक्तिरेखेच्या मानसिक प्रकियेचा पूर्ण पट आणि संततपणे पुढे जाणारा संज्ञेचा ओघ यांचे चित्रण केले जाते. यात संबंधित व्यक्तिरेखेची ऐंद्रिय संवेदने ही सबोध (कॉन्शस) आणि अर्धसबोध (हाफ-कॉन्शस) विचार, स्मृती, भावना आणि साहचरी कल्पना ह्यांच्यात मिसळून जाताना दिसतात.
काही समीक्षक संज्ञाप्रवाह आणि अंत:स्वगत (इन्टिरिअर मोनोलॉग) ह्या संज्ञा एकाच अर्थाने आलटून पालटून वापरतात तथापि अंत:स्वगतामध्ये व्यक्तिरेखेच्या मनातला जाणिवेचा ओघ आणि ताल ज्या ज्या वेळी जसा असतो, तसा नेमकेपणाने वाचकांना सादर करण्याचा हेतू असतो. तो साध्य करताना लेखक कोठेही हस्तक्षेप करत नाही कसले भाष्य करीत नाही. व्यक्तिरेखेच्या जाणिवेत येणाऱ्या लहरींना भाषेच्या व्याकरणाचे वा तार्किकतेचे भान ठेवून नेटके रूप देण्याचा प्रयत्न करीत नाही तथापि ऐंद्रिय संवेदना, मानसिक प्रतिमा, भावना आणि विचारांचे काही पैलू ह्यांना शब्दरूप नसते. त्यांना भाषिक रूप देण्याचे काम लेखकांना करावे लागते. विल्यम जेम्सने संज्ञाप्रवाहाचा सिद्धांत मांडल्यानंतर ज्यांनी त्याचा उपयोग आपल्या लेखनात केला, त्या लेखकांत ⇨ जेम्स जॉइस, ⇨ व्हर्जिनिया वुल्फ, ⇨ विल्यम फॉक्नर, डॉरथी रिर्चड्सन अशांचा समावेश होतो.
जेम्स जॉइसने त्याच्या यूलिसीझ (१९२२) ह्या कादंबरीत संज्ञाप्रवाहाच्या चित्रणासाठी अनेक भाषिक प्रयोग केले. जवळपास ३०,००० नवे शब्द त्याने तयार केले. भाषेच्या नवनव्या शक्यतांची उकल केली सांकेतिक शब्दरचना उसकटून टाकली. विल्यम फॉक्नरने द साउंड अँड द फ्यूरी (१९२९) ह्या कादंबरीच्या पहिल्या तीन भागांत संज्ञाप्रवाहाधारित तंत्राचा प्रभावी उपयोग केला. डॉरथी रिचर्ड्सनने पिलग्रिमेज ह्या तिच्या कादंबरीत तिच्या नायिकेच्या मनाच्या चित्रणासाठी तो केला.
मराठीत ⇨ बा. सी. मर्ढेकर यांनी त्यांच्या रात्रीचा दिवस (१९४२), पाणी (१९४३) आणि तांबडी माती (१९४८) ह्या कादंबऱ्यांत संज्ञाप्रवाह तंत्राचा प्रयोग केला. ह्या कादंबऱ्यांपैकी रात्रीचा दिवस ही कादंबरी पूर्णत: संज्ञाप्रवाही तंत्राने लिहिलेली असून उपर्युक्त अन्य दोन कादंबऱ्यांत त्याचा अंशत: उपयोग केलेला आहे. वसंत कानेटकरांची घर (१९५१) ही कादंबरीही याच प्रकारात मोडते.
कुलकर्णी, अ.र.