ऱ्हाईन, जोसेफ बँक्स : (२९ सप्टेंबर १८९५-२० फेब्रुवारी १९८०). अतींद्रिय मानसशास्त्राची स्वतंत्र विज्ञानशाखा सुप्रतिष्ठित करणारे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ. सामान्य मानसशास्त्रात सामावून घेतले न गेलेले, परंतु मानवाच्या स्वरूपाच्या सम्यक् आकलनात भर घालणारे प्रकार-उदा., परचित्तज्ञान, पूर्वज्ञान, मनोगती इत्यादींचा-अतींद्रिय मानसशास्त्रात प्रयोगनिष्ठ पद्धतीने अभ्यास करण्यात येतो. त्याचे बहुतांश श्रेय ऱ्हाईन याना दिले जाते.

त्यांचा जन्म टूनीटा (पेनसिल्व्हेनिया, अमेरिका) येथे झाला. महाविद्यालयीन शिक्षण वुस्टर कॉलेज, ओहायओ येथे चालू असताना, पहिल्या महायुद्धकाळात १९१७ मध्ये त्यांनी नौदलात नोकरी केली. १९२० मध्ये ते विवाहबद्ध झाले. त्यानंतर १९२५ मध्ये शिकागो विद्यापीठातून जीवविज्ञान व वनस्पतिशारीर क्रियाविज्ञानात (प्लँट फिजिऑलॉजी) त्यांनी डॉक्टरेट घेतली. नंतर त्या विषयांचे पश्चिम व्हर्जिनिया विद्यापीठात त्यांनी एक वर्ष अध्यापन केले. १९२६-२७ मध्ये हार्व्हर्ड विद्यापीठात तत्त्वज्ञान व अतींद्रिय मानसान्वेषणाचा (सायकिकल रिसर्च) अभ्यास केला. अतींद्रिय मानसान्वेषणाविषयीची त्यांची आस्था ⇨विल्यम जेम्सच्या लेखांमुळे आणि ⇨विल्यम मॅक्‌डूगल यांच्या बॉडी अँड माइंड या ग्रंथामुळे टिकून राहिली. हार्व्हर्ड येथेच त्यांना वॉल्टर फ्रँकलिन प्रिन्स ह्या अत्यंत साक्षेपी संशोधकांसमवेत ‘माध्यमत्व’ (मीडिअमशिप) विषयक अन्वेषण करण्याची उत्तम संधीही मिळाली. माध्यमांच्या बैठकीबाबतच्या स्वतःच्या तसेच जे. एफ्. टॉमस यांच्या टिपणांचा वैज्ञनिक दृष्ट्या मूल्यमापनात्मक अभ्यास करण्यासाठी १९२७ मध्ये ते ड्यूक विद्यापीठात (डरॅम, नॉर्थ कॅरोलायना) मॅक्‌डूगल यांच्याकडे सपत्नीक गेले. तेथेच, १९२८ मध्ये, मानसशास्त्र विभागात त्यांची सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. तेथे ते १९३५ ते १९५० पर्यंत मानसशास्त्राचे पूर्णवेळ प्राध्यापक होते. विश्वासाह माध्यमांद्वारे आलेल्या ‘संदेशां’शी ⇨परचित्तज्ञानाचा संबंध असावा, ही कल्पना स्वीकारून अध्यापनकार्याबरोबरच, १९३० पासून त्यांनी परचित्तज्ञान व ⇨पराप्रत्यक्ष (क्लेअरव्हॉयन्स) विषयक प्रयोगांची सुरूवात केली. पूर्वी इतरांनी केलेल्या प्रयोगांतील उणिवा ध्यानी घेऊन ऱ्हाईन यांनी सुटसुटीत आणि सांख्यिकीय मूल्यनास सुकर अशा चाचण्या उपयोगात आणून ⇨पूर्वज्ञान आणि ⇨मनोगतिविषयक प्रयोगही केले. सांख्यिकीच्या आधारे अतींद्रिय क्षमतेची सत्यता सिद्ध केल्यावर तिला अनुकूल ठरणाऱ्या घटकांचा शोध घेणारे प्रयोगही त्यांनी स्वतः तसेच सहकाऱ्यांसमवेत केले.

त्यांनी १९३४ मध्ये प्रसिद्ध केलेल्या एक्स्ट्रासेन्सरी पर्सेप्शन ह्या ग्रंथाने लोकांचे लक्ष वेधून घेतले काही मानसशास्त्रज्ञही त्यामुळे अस्वस्थ झाले. सहकारी मानसशास्त्रज्ञांशी संघर्ष नको म्हणून व स्वतःचे प्रयोगकार्य निर्वेधपणे करता यावे म्हणून त्यांनी मॅक्‌डूगल यांच्या संमतीने आपल्या संशोधनविषयासाठी ‘पॅरासायकॉलॉजी’ (अतींद्रिय मानसशास्त्र) ही संज्ञा पसंत केली व त्यांच्याच प्रोत्साहनाने १९३५ मध्ये ड्यूक विद्यापीठातच स्वतःच्या संचालकत्वाखाली या संशोधनासाठी स्वतंत्र प्रयोगशाळाही स्थापन केली. १९३७ मध्ये त्यांनी जर्नल ऑफ पॅरासायकॉलॉजी सुरू केले. वरील प्रयोगशाळेत मिळणारा मार्गदर्शकपूर्वक वाव, तेथे होणारे वैचारिक आदान-प्रदान, तसेच अन्यत्र झालेल्या प्रयोगकार्याचे समीक्षण यांमुळे ही वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगशाळा एक आकर्षणस्थान बनली.


त्यांनी ‘फाउंडेशन फॉर रिसर्च ऑन द नेचर ऑफ मॅन’ (एफ्. आर्. एन्. एम्.) हे प्रतिष्ठान १९६२ साली स्थापन केले. ह्या प्रतिष्ठानाशी संलग्न ‘इन्स्टिट्यूट फॉर पॅरासायकॉलॉजी’ सुरू केली व १९६५ मध्ये ड्यूक विद्यापीठातून निवृत्त झाल्यावर तेथील प्रयोगशाळाही ह्या नव्या संस्थेत हलविली. १९७६ पर्यंत ऱ्हाईन यांनी तिचे संचालकत्व सांभाळले.

आव्हाने स्वीकारण्याची व प्रतिकूल प्रसंगाशी झुंज देण्याची वृत्ती, चिकित्सक दृष्टी, विज्ञानपद्धतीवर निष्ठा, नव्या परंतु प्रयोगक्षम कल्पनांना प्रोत्साहन, खोटेपणाची चीड हे त्यांचे स्वभावविशेष होते. यंत्रवादी विज्ञान आणि प्रार्थनेचे बळ, अंतर्ज्ञान इत्यादींवर विश्वास असणारी आध्यात्मिक विचारधारा यांच्यातील संघर्ष अतींद्रिय मानसान्वेषणाच्या क्षेत्रात वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून टाळता येईल व त्यांच्यात समन्वय साधता येईल, अशी ऱ्हाईन यांची पक्की धारणा होती.

संपादकीय व इतर लेखांव्यतिरिक्त त्यांचे ग्रंथ असे : एक्स्ट्रासेन्सरी पर्सेप्शन (१९३४), न्यू फ्राँटिअर्स ऑफ द माइंड (१९३७), एक्स्ट्रासेन्सरी पर्सेप्शन आफ्टर सिक्स्टी यीअर्स (१९४०), रीच ऑफ द माइंड (१९४७), न्यू वर्ल्ड ऑफ द माइंड (१९५३), पॅरासायकॉलॉजी (१९५७), पॅरासायकॉलॉजी फ्रॉम ड्यूक टू एफ्. आर्. एन्. एम्. (१९६५), पॅरासायकॉलॉजी टुडे (सहकाऱ्यांसह संपादित, १९६८), प्रोग्रेस इन पॅरासायकॉलॉजी संपादित १९७१).

अकोलकर, व. वि.