प्रतिमा व प्रतिमासृष्टी : मानसशास्त्रात आणि ललितकलांमध्ये – विशेषतः ललित साहित्यात- प्रतिमा व प्रतिमासृष्टी ह्या संज्ञा वापरण्यात येतात. मानसशास्त्राच्या दृष्टीने दृश्य वस्तूमुळे घडणाऱ्या वेदनांच्या उद्दीपनाशिवाय केवळ कल्पनाशक्तीमुळे त्या त्या वस्तूची प्रतिकृती किंवा प्रतिबिंब जेव्हा मनात साकार होते, त्या प्रतिबिंबास प्रतिमा म्हणतात. म्हणूनच प्रतिमांचा संबंध इंद्रियगम्य अशा दृक्, श्रुती, गंध, रुची व स्पर्श या वेदनांशी (सेन्सेस) असतो. प्रतिमा केवळ शून्यातून निर्माण होत नाहीत, तर त्यांना पूर्वानुभवाचे अधिष्ठान असते. ह्या पूर्वानुभवाच्या आधारे कल्पनाशक्ती प्रतिमांना जन्म देते म्हणजे प्रतिमा ह्या एका अर्थाने कल्पनाशक्तीच्या आविष्काराचे घटकच होत. प्रतिमानिर्मितीची ही प्रक्रिया सामान्यतः सार्वत्रिक असली, तरी कला-साहित्यांतून ती विशेषत्वाने प्रकट झालेली दिसून येते. कलाकृतींतून कलावंताच्या कल्पनाशक्तीने निर्माण केलेल्या वेगवेगळ्या प्रतिमा समूहरूपाने अभ्यसनीय ठरतात. प्रतिमांच्या अशा समूहास प्रतिमासृष्टी म्हणतात. वेगवेगळ्या विषयाधारे प्रतिमांचा साकल्याने वा समूहरूपाने होणारा विचार म्हणजे प्रतिमासृष्टीचा विचार म्हणता येईल. उदा., बालकाची प्रतिमासृष्टी.
सर्व व्यक्तींना प्रामुख्याने दृक्प्रतिमा ठळकपणे निर्माण करता येतात. श्रुती, गंध, रुची व स्पर्श ह्यांच्या प्रतिमा केवळ अपवादभूत व्यक्तींमध्येच साकार करण्याचे सामर्थ्य असते. त्याचप्रमाणे अशा प्रतिमांचे आकलनही सर्वांनाच व सारख्याच प्रमाणात होत नाही. त्यामुळे अशा प्रतिमांबाबत मानसशास्त्रात आणि साहित्यसमीक्षेत अनेक उलटसुलट अभिप्राय मांडलेले आढळून येतात. काही व्यक्तींमध्ये ध्वनिप्रतिमा निर्माण करण्याचे सामर्थ्य असते. भारतीय संगीतातील पारंपारिक रागचित्रे अशाच ध्वनिप्रतिमांतून आली असावीत. मात्र प्रत्येकालाच ही रागचित्रे दृग्गोचर होतात आणि ती समान स्वरुपात दिसतात, हे म्हणणे विवाद्य आहे. याहूनही अधिक विवाद्य असलेला प्रतिमांचा प्रकार म्हणजे गतिवेदनांच्या (कायनेस्थेटिक ऑरमसल- सेन्स) प्रतिमांचा होय. उदा., आपण समोरचे कपाट उघडण्यासाठी चावी फिरवीत आहोत अशी कल्पना करा. येथे आपणाला केवळ आपले मनगट फिरवल्याची मानसप्रतिमा दिसते, की आपण आपले मनगट प्रत्यक्षात थोडेसे फिरवतो? वस्तुतः आपणाला जरी तेथे काहीही शारीरिक आढळत वा जाणवत नसली, तरी अतिशय संवेदनक्षम विजेच्या उपकरणाद्वारे अशा वेळी प्रत्यक्ष स्नायूत अत्यल्प ताण निर्माण होतो, असे अनेक वेळा आढळून आलेले आहे. तात्पर्य, प्रत्येक मानसप्रतिमा प्रत्यक्ष प्रतिक्रियेशी निगडित असते. जेव्हा दृक्प्रतिमा आपल्यासमोर साकार होते, तेव्हा डोळ्यांची अत्यंत सूक्ष्म हालचाल होत असल्याचेही आढळून आलेले आहे. तेव्हा प्रतिमांचे स्वरूप केवळ मानसिक असते, असे काटेकोरपणे म्हणता येणार नाही.
प्रतिमांचे प्रकार : प्रतिमांचा अभ्यास करताना मानसशास्त्रज्ञांनी त्याचे पुढील प्रकारांत वर्गीकरण केले : (१)पश्चात्-प्रतिमा : (आफ्टर- इमेज). मूळ उद्दीपक म्हणजे दृश्य वस्तू डोळ्यासमोरून दूर केल्यावरही किंचित काल मागे रेंगाळणारी त्या उद्दिपकाची ही दृक्प्रतिमा होय. वस्तुतः पश्चात्-प्रतिमा ही स्मृतीप्रतिमा नाही. तिला दृक्संवेदनेचाच एक भाग म्हणावा लागेल. कारण दृश्य अशा उद्दीपकानंतर लागलीच ती दिसते. पूर्वानुभवाच्या प्रत्यावाहनाने (रिकॉल) ती मनात साकार झालेली नसते.
(२)संमूर्त प्रतिमा : (आयडेटिक इमेज). हा प्रकार असाधारण असून या प्रकाराची प्रतिमा ही प्रत्यक्ष वस्तू पाहत असल्यासारखी सुस्पष्ट व तपशीलवार असते. त्यामुळे अशा प्रतिमांच्या साहाय्याने आपणाला त्या वस्तूचे बारकाईने निरीक्षण करून अभ्यास करणेही शक्य होते. काही लहान मुलांमध्ये अशा प्रतिमानिर्मितीची कुवत असल्याचे आढळते परंतु प्रौढ व्यक्तींमध्ये मात्र अशी कुवत क्वचितच आढळते.
(३)स्मृतिप्रतिमा : (मेमरी इमेज). गतप्रसंगांचे त्यांच्या वैशिष्ट्यांसह प्रत्यावाहन म्हणजे स्मृतिप्रतिमा होय. सर्वसामान्यपणे असे मानले जाते, की अशा स्मृतिप्रतिमांतून कुठलीही नवीन माहिती उपलब्ध होत नाही. कारण त्या मूळ इंद्रियवेदनांइतक्या सुस्पष्टही नसतात आणि स्थिरही नसतात.
(४)संश्लिष्ट प्रतिमा : (सिंथेटिक इमेज). ह्या प्रतिमा दोन इंद्रियवेदनांच्या संयोगातून निर्माण होणाऱ्या साहचर्याच्या प्रतिमा असून त्या अत्यंत अपवादात्मक असल्याचे दिसून येते. पियानोच्या प्रत्येक स्वरास अनुलक्षून भिन्नभिन्न रंगाची प्रतिमा एखाद्याव्यक्तीसमोर येते तथापि अशा रंगात्मक ध्वनिप्रतिमा क्वचित आढळतात. मात्र ललित साहित्यात अशा प्रतिमा आढळून येतात.
(५)अर्धनिद्रेतील किंवा तंद्रिय प्रतिमा : (हिप्नोगॉजिक इमेज) ह्या प्रकारातील प्रतिमा बहुतांश दृक्स्वरुपाच्या अणि सुस्पष्ट असतात. जागृती व निद्रा यांमधील म्हणजे गुंगी किंवा डुलकीच्या अवस्थेत त्या निर्माण होतात.
(६) निर्वस्तुभ्रमातील प्रतिमा : (हल्यूसिनेटरी इमेज). ह्या प्रतिमा सुस्पष्ट आणि तपशीलवार असतात आणि त्यामुळेच साक्षात संवेदन होत असल्यासारखे व्यक्तीला वाटू लागते. अपसामान्य किंवा विकृत अवस्थेत ह्या प्रतिमा वैशिष्ट्यपूर्णतेने साकारतात. वास्तवाभास हा, त्यातील वास्तव व भास यांतील भेदाची पारख काटेकोरपणे न झाल्यामुळेच निर्माण होतो. स्वप्नातील प्रतिमाही निर्वस्तुभ्रमाहून भिन्न असतात. त्यांचा व जागृतावस्थेतील वास्तवाचा गोंधळ मात्र केला जात नाही. कारण ते स्वप्नच असते, असे भान त्या व्यक्तीस स्वच्छपणे असते.
आधुनिक मानसशास्त्राचा आधार घेऊन आय्. ए. रिचर्ड्स या इंग्रजी समीक्षकाने प्रतिमाविचार मांडलेला आहे. त्याच्या मतानुसार इंद्रियवेदनांच्या संस्काराद्वारे त्यांचेच प्रतिनिधित्व करणारी प्रक्रिया म्हणजे प्रतिमानिर्मितीहोय. ललित वाङ्मयाच्या भाषेचा प्रतिमा हा एक महत्त्वपूर्ण घटक होय. प्रतिमांमुळे लेखक आपला संपन्न अनुभव आणि त्यातील भावनिक जटिलता इतरापर्यंत पोहचवू शकतो.
कला-साहित्यांतील प्रतिमा व प्रतिमासृष्टी : प्रतिमा म्हणजे शब्दार्थांचे प्रतिबिंब. हा शब्द वाङ्मयीन संज्ञा म्हणून वापरला जाताना या सामान्य अर्थाचे विशेष अर्थ तयार होतात. साहित्य किंवा काव्यविचारात प्रतिमा म्हणजे इंद्रियगम्य अनुभूतीने निर्माण झालेल्या संवेदनांची मनोनिष्ठ आकृती. ही आकृती इंद्रियगम्य अनुभूतीशिवायदेखील तयार होऊ शकते. स्मृती, कल्पनाशक्ती, भास, स्वप्नादी व्यापारांच्या सृष्टीत निर्माण होणाऱ्या रचनांवरही ही आकृती आधारीत असेल. सुप्रसिद्ध अमेरीकन कवी आर्चिबल्ड मल्कीश यांनी काव्याच्या स्वरूपाबद्दल पुढील विधान केले आहे :
‘अ पोएम शुड बी डम्प ।
ॲज ओल्ड मेडॅल्यन टू द थम’
या ठिकाणी काव्यस्पर्शाची जुन्या पदकाच्या स्पर्शाशी तुलना केली आहे. कवितेचा स्पर्श हा इंद्रियानुभव नाही, ती एक अमूर्त संकल्पना आहे, तिची या तुलनेमुळे एक आकृती व प्रतिमा बनण्यास मदत होते. म्हणून मूर्त वस्तूचे प्रतिबिंब असे प्रतिमेचे स्वरुप नेहमीचे असेल असे नाही. अमूर्त कल्पनेचा किंवा एखाद्या संकल्पनेचा इंद्रियांना आवाहन करणारा आशय, असेही प्रतिमेचे स्वरूप असू शकते. या विषयावरील एक अधिकारी विदुषी कॅरोलिन स्पर्जन यांनी सर्व प्रकारच्या उपमा-उत्प्रेक्षांसाठी प्रतिमा हा शब्द वापरला आहे. दुसरे एक नामवंत समीक्षक सेसिल डे ल्यूइस यांनी प्रतिमेची सुटसुटीत व्याख्या दिली आहे. ‘प्रतिमा म्हणजे शब्दनिष्ठ चित्र काव्यामधला इंद्रियसंवेदनांना आवाहन करणारा भाग म्हणजे प्रतिमा.’
सर्वसामान्य ललित साहित्यातील प्रतिमांचे बंदिस्त (टाइड) आणि विमुक्त (फ्री) प्रतिमा असे भाग पाडता येतील. बंदिस्त प्रतिमा म्हणजे ज्यांचे साहचर्ययुक्त मूल्य आणि अर्थ हा सर्व काळी व सर्वांसाठी एकच असतो अशा प्रतिमा. विमुक्त प्रतिमा म्हणजे ज्यांचा अर्थ विशिष्ट संदर्भांनी मर्यादित राहत नाही, ज्यांचा संभाव्य अर्थ आणि साहचर्यमूल्यही अमर्याद असते, त्या प्रतिमा. म्हणूनच भिन्नभिन्न व्यवसायांसाठी व वेगवेगळ्या काळी त्यांचे अर्थ आणि साहचर्यमूल्यही वेगवेगळे असते.
वाच्यार्थयुक्त प्रतिमा व आलंकारिक प्रतिमा, असेही प्रतिमांचे विभाग पाडले जातात. ज्यांच्या आवश्यक अर्थात आणि व्याप्तीत बदल होत नाही, त्या वाच्यार्थयुक्त प्रतिमा होत. आलंकारिक प्रतिमा म्हणजे ज्यामुळे वस्तूंच्या शब्दार्थास कलाटणी मिळून वेगळाच अर्थ सूचित केला जातो व अशा प्रकारे तो अनुभव संपन्नतेने वाचकाच्या मनात जागृत केला जातो, अशा प्रतिमा. वाचार्थयुक्त प्रतिमा ह्या ललित गद्याचा मूलाधार होत. मात्र वरवर जरी अशा प्रतिमांतून शब्दार्थ जाणवत असला, तरी ह्या शब्दार्थापलीकडील समृद्ध अर्थाचे सूचन करण्याचे सामर्थ्यही काही ललित गद्यलेखकांच्या लेखणीत असते.
प्रतिमांच्या व्यवस्थेस किंवा व्यूहास अलीकडील समीक्षेत प्रतिमासृष्टी म्हटले जाते व त्यावर विशेष भरही दिला जातो. प्रतिमांची घडण, प्रतिमापुंज वा गुच्छ (इमेज-क्लस्टर्स), प्रतिमाबंध (इमेज–पॅटर्न्स) आणि प्राबंधिक प्रतिमासृष्टी (थीमॅटिक इमेजरी) या प्रकारांवर समीक्षक विशेष भर देताना आढळतात. त्यांच्या मते प्रतिमासृष्टीचे उपरोक्त व्यूह लेखकाच्या आणि वाचकाच्या नकळतपणे निर्माण झालेले असतात. हे व्यूह ललित कृतीचा सखोल अर्थ समजावून घेण्यासाठी आवश्यक असतात. एखाद्या ललित कृतीचा मूलभूत अर्थ समजावून घेण्यासाठी किंवा त्या कृतीचे अर्थविवरण व मूल्यमापन करण्यासाठी ह्या प्रतिमाव्यूहांचा अधिकाधिक वापर करावयास हवा, असे आधुनिक समीक्षक प्रतिपादन करतात. आधुनिक समीक्षेत एखाद्या कलाकृतीतील प्रतिपादनातून, कथावस्तूतून किंवा वाक्यातून सरळसरळपणे व्यक्त होणाऱ्या अर्थाला तितकेसे महत्त्व दिले जात नाही, तर ह्या प्रतिमाव्यूहाच्या आधारे कलाकृतीचे अर्थविवरण केले जाते. चित्रकला, शिल्पकला किंवा इतर ललित कलांबाबतही थोड्याफार फरकाने असाच दृष्टिकोन स्वीकारून अर्थविवरण करण्यात येते.
प्राचीन ग्रीक साहित्यविमर्शक ॲरिस्टॉटल याने उत्प्रेक्षा निर्माण करण्याच्या शक्तीबद्दल म्हणजे पर्यायाने प्रतिमानिर्मितीच्या शक्तीबद्दल, मननीय विचार मांडले आहेत. त्याच्या मते प्रतिमानिर्मितीची शक्ती स्वयंभू असते. ती इतरांकडून आत्मसात करण्याची शक्यता नसते. ही शक्ती म्हणजे जातिवंत प्रतिभेची एक साक्ष असते. दर्शनी विभिन्नतेत आंतरिक साधर्म्य पाहण्याची उत्स्फूर्त दृष्टी असल्याखेरीज उत्तम उत्प्रेक्षा साकार होत नाही. याच तऱ्हेचा विचार अमेरिकेतील नवसमीक्षेने मान्य केला होता. या समीक्षेच्या मते उत्प्रेक्षा हा भाषालंकार नव्हे, तर अनुभव ग्रहण करण्याची अणि तो व्यक्त करण्याची ही एक वेगळी रीत आहे. ही विज्ञानाला अभिप्रेत असलेल्या ज्ञानार्जनाच्या रीतीपेक्षा निखालसपणे भिन्न आहे. विचार व भावना, मूर्त व अमूर्त, विवेक आणि कल्पना यांचा अपूर्व संगम प्रतिमांच्या द्वारा कवी साधत असतो. काव्यप्रतिमा ही जाणिवेची वेगळी पद्धती आहे. या पद्धतीतून जड जगताचे अवलोकन केले, तर हे जग मूल्यांची प्रतिमाराशी या स्वरूपात उभे राहते. या संदर्भात आजचे नामवंत टीकाकार नॉर्थ्रप फ्राय यांनी म्हटले आहे, की स्वप्न ही व्यक्तीची आर्षकथा (मिथ्) म्हटले, तर आर्षकथा ही समष्टीचे स्वप्न होय. काही ठिकाणी प्रतिमांची मांडणी तीन वर्गांत केलेली आढळते : (१) अलंकार, (२) मनोनिष्ठ प्रतिमा व (३) स्वयंस्फूर्त प्रतीकचित्रे. हे वर्गीकरण काटेकोर आहे असा दावा नसतो. एका वर्गातील प्रतिमा दुसऱ्या वर्गात सरकू शकतात.
प्रत्येक मनाची प्रतिमानिर्मितीची अगर प्रतिमेच्या आकलनाची, आस्वादाची क्षमता सारखीच असत नाही. टी. एस्. एलियटने आपल्या वेस्टलँड या दीर्घ कवितेत शहरातील संध्याकाळ शस्त्रक्रियेपूर्वी भूल देऊन मेजावर घेतलेल्या रोग्यासारखी दिसत होती, असे वर्णन केले आहे. यातील प्रतिमेच्या द्वारा अर्धस्पष्ट व अबोध कल्पनांचे कित्येक पदर एकत्र आणले जातात. त्यात जन्ममृत्यूमधील अर्धी निद्रिस्त, अर्धी जागृत, अर्धी उल्हासित, अर्धी म्लान, अर्धी विकसित, अर्धी अवनत अशी मनाची व शहरी संस्कृतीची अवस्था साकारण्यात आली आहे. आशयाचे हे सर्व पदर प्रत्येकाला एकदम आकलन होतील असे मानता येत नाही. आधुनिक साहित्यातील प्रतिमा अधिकआशयघन व संमिश्र स्वरूपाच्या कशा बनल्याआहेत, याचे वरील प्रतिमा एक ठळक उदाहरण आहे.
प्रतिमांचे नाते मूलतः सांस्कृतिक परंपरा आणि संकेत यांच्याशी असते. त्याचप्रमाणे या परंपरांचे व संकेतांचे परिष्करण कालौघामध्ये होत राहते तसेच साहित्यिकाच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावही प्रतिमांत दिसून येत असतो. शेक्सपिअरच्या नाटकांतील आलंकारिक भाषेत कायद्याची सूक्ष्म जाण दिसते, यावरून कायद्याच्या व्यवहारात त्याने काही दिवस घालविले असले पाहिजेत, असा अंदाज समीक्षकांनी व्यक्त केला आहे. प्रतिभावान कवीच्या अगर लेखकाच्या प्रतिमासृष्टीत काही व्यवस्था अगर नियंत्रक तत्त्वे दिसून येतात. अशी तत्त्वे शोधण्याचा प्रयत्न समीक्षकांनी केला आहे. साहित्य-संशोधनाची व आस्वादाची आधुनिक समीक्षेतील ही एक दिशा होय. या दिशेने शेक्सपिअरच्यानाटकांचा अभ्यास फार ठळकपणे करण्यात आलेला आहे. त्याच्या नाटकांत विशिष्ट तऱ्हेच्या प्रतिमांचे समूह दिसून येतात व नाटकाच्या एकसंघ परिणामात या प्रतिमासमूहांचा मोठा वाटा आहे, असे समीक्षक मानतात. हे प्रतिमासमूह त्यांना संगीतरागातील मूलभूत स्वररचनेसारखे वाटले आहेत. किंग लीअर या शोकांतिकेतील पशुप्रतिमा, रोमिओ-ज्युलिएट या नाटकातील उजेड व अंधारदर्शक प्रतिमा यांचा उल्लेख या संदर्भात केला जातो.
पहा: कल्पनाशक्ति.
संदर्भ: 1. Furlong. E. J. Imagination, New York, 1961.
2. Langer, Susanne K. Problems of Arts, New York, 1957.
3. Lewis, Cecil Day, Poetic Image, Oxford, 1947.
4. Sartre, Jean Paul, The Psychology of Imagination, New York, 1961.
5. Woodworth, R. S. Experimental Psychology, Oxford, 1938.
हातकणंगलेकर, म. द. सुर्वे, भा. ग.
“