समूहगतिकी : (गूप डायनॅमिक्स). सामाजिक मानसशास्त्रातील एक महत्त्वाचे अभ्यासक्षेत्र. यात समूहाचे स्वरूप व समूहजीवन यांसंबंधीचा अभ्यास व संशोधन केले जाते. समूहगतिकी या जोडशब्दातील ‘गतिकी’ हा शब्द फार महत्त्वाचा आहे. समूहात अनेक प्रकारच्या बोधनिक, भावनिक, सामाजिक व आंतरव्यक्तिक प्रकिया सुरू असतात. त्या कोणत्याही क्षणी स्थिर स्वरूपाच्या नसतात. त्यांच्यामुळे समूहातील अनेक व्यक्तींचे किंवा समूहातील कोणत्याही दोन व्यक्तींचे परस्परसंबंध बिघडतात सुधारतात, तसेच या संबंधांत कधी कधी ताण निर्माण होतो, तर कधी-कधी ह्या संबंधांत जवळीकही साधली जाते. परिणामी समूहातील व्यक्तींच्या वर्तनात बदल होतो आणि त्यामुळे समूहाचे स्वरूप व जीवन बदलते परंतु हा बदलही कायम टिकणारा नसतो. पुन्हा काही लहानमोठया घटना घडतात आणि समूहाच्या स्वरूपात व जीवनात पुन्हा बदल होतो. ही निरंतर चालणारी प्रकिया असल्यामुळे समूहात सतत होणाऱ्या सर्व प्रकारच्या किया व आंतरक्रियांना आणि त्यांच्या परिणामांना ‘समूहगतिकी ’ म्हणून संबोधण्यात येते.

समूहगतिकी या नवीन क्षेत्राच्या अभ्यासास १९३० च्या दशकाअखेरीस सुरूवात झाली. समूहगतिकीचा विकास घडवून आणण्यासाठी केल्या गेलेल्या पायाभूत प्रयत्नांशी अमेरिकन सामाजिक मानसशास्त्रज्ञ ⇨ कुर्ट ल्यूइन (१८९०-१९४७) यांचे नाव प्रामुख्याने निगडित आहे. त्यांनीच सर्वप्रथम ‘समूहगतिकी’ या संज्ञेचा उपयोग केला आणि ती रूढ केली. १९४५ साली समूहगतिकीच्या संशोधनार्थ त्याने ‘रिसर्च सेंटर फॉर गूप डायनॅमिक्स’ ही संस्था स्थापन केली. व्यक्तीच्या मनोव्यापारांची व वर्तनाची उपपत्ती लावण्यासाठी त्याने भौतिकी तसेच गणितातील संकल्पनांचा मुक्तपणे आणि नवीन प्रकारे वापर करून स्वत:चा क्षेत्र-सिद्धांत (फिल्ड थिअरी) विकसित केला. समूहात एखादया व्यक्तीच्या वर्तनात बदल झाला की, त्याचा समूहातील सर्व किंवा काही विशिष्ट व्यक्तींवर परिणाम होतो आणि समूहातील व्यक्ती पुन्हा त्यांच्या वर्तनाची जुळवाजुळव करतात.

माणसाचे वर्तन समजून घ्यावयाचे असेल आणि त्याच्या वर्तनात योग्य ती सुधारणा घडवून आणावयाची असेल, तर मानवाच्या निरनिराळ्या समूहांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यामुळेच समूहगतिकी ही संकल्पना सर्व प्रकारच्या मानवी समूहांना लागू पडते. परिणामी समूहगतिकी या अभ्यासक्षेत्रातील संशोधनाचे निष्कर्ष मानसोपचार समूह, कौटुंबिक समूह, सामाजिक समूह, औदयोगिक समूह या समूहांचा तसेच इतर क्षेत्रांतील समूहांचा अभ्यास करण्यासाठी उपयोगी ठरतात.

समूहगतिकी या क्षेत्रातील अभ्यास व संशोधन व्यक्तिवर्तनाचे सखोल ज्ञान मिळविण्यासाठी उपयुक्त ठरते कारण प्रत्येक व्यक्ती ही विशिष्ट समूहाची वा एकाहून जास्त समूहांची घटक असते. कुर्ट ल्यूइन यांनी आपली उपर्युक्त संशोधनसंस्था स्थापन करण्यामागे व्यक्तिवर्तनाचे सखोल ज्ञान मिळविणे हाच हेतू होता.

समूह आणि सामूहिक वर्तन यांच्या बाबतींत काही मूलभूत प्रश्र्न समोर येतात. त्यांची योग्य ती उत्तरे शोधल्याखेरीज मनुष्याचे एकूण चित्र डोळ्यासमोर येणार नाही. हे प्रश्न असे : (१) लोक समूहांशी कसे जोडले जातात आणि समूह अधिक व्यापक अशा समाजाशी कसे जोडले जातात ? (२) मानवी समूह कधी आणि कोणत्या परिस्थितीत निर्माण होतात? (३) ह्या समूहांचा विकास होण्याकरिता तसेच त्यांचे कार्य अधिक परिणामकारक व्हावे, म्हणून कोणत्या प्रकारची परिस्थिती आवश्यक असते? (४) समूहातले कोणते घटक त्याच्या ऱ्हासाला आणि विघटनाला कारणीभूत होतात ? (५) समूहांचे वेगवेगळे असे कोणते प्रकार शक्य आहेत? (६) समूहातील व्यक्तीचे विचार, प्रेरणा यांचा संपूर्ण समूहाच्या कार्यावर कसा परिणाम घडून येतो ? (७) काही समूहांचा त्यांच्या सदस्यांवर फार मोठा प्रभाव असतो, काही समूहांचा फारच थोडा असतो, तर काही समूहांचा जवळजवळ नसतोच. समूहाचा प्रभाव कमी-जास्त होण्याची कारणे कोणती? (८) समूहातील व्यक्तींची कोणती वैशिष्टये त्या विशिष्ट समूहाचे स्वरूप आणि समूहजीवन ठरविण्यास कारणीभूत ठरतात? (९) समूहांच्या सदस्यांपाशी असलेली कौशल्ये, त्यांच्या प्रेरणा व मूल्ये, ही त्या समूहांचे स्वरूप आणि कार्यपद्धती यांवर कोणते परिणाम घडवून आणतात ? (१०) निरनिराळ्या समूहांतील संबंधांचे स्वरूप कशामुळे निश्चित होते ? (११) जेव्हा समूह एखादया व्यापक समाजव्यवस्थेचा भाग असतात, तेव्हा त्यांच्यामुळे ती व्यवस्था सामर्थ्यवान होते, किंवा दुबळी बनते. ह्या घटना कोणत्या परिस्थितीत घडतात ? (१२) एखादया समूहाचे सामाजिक पर्यावरण त्या समाजाच्या गुणवैशिष्टयांवर कसा परिणाम घडवून आणते ?

मानवी स्वभाव आणि मानवी वर्तन यांचे सखोल आकलन व्हावयाचे असेल, तर अशा प्रकारच्या प्रश्र्नाची उत्तरे मिळविणे आवश्यक आहे.

सी. बी. बोडेरिक यांच्या मते समूहाचे कार्य परिणामकारक होण्याकरिता समूहांतील व्यक्तींमध्ये एकवाक्यता असणे अत्यंत आवश्यक असते. त्यांनी या घटकाला फार महत्त्व दिले आहे. समूहसंमतीच्या बाबतीत समूहातल्या कोणत्या घटनांविषयी संमती आहे, किती प्रमाणात संमती आहे आणि संमती असण्याची किंवा नसण्याची कारणे कोणती इ. बाबी जाणून घेणे आवश्यक असते कारण या घटकांवर समूहातील सभासदांची आंतरक्रिया व देवाणघेवाण ठरत असते.

समूह ज्या कारणांकरिता निर्माण झाला, ती कारणे टिकून राहणे आणि समूहातील सभासदांमध्ये परस्परांविषयी आपुलकी राहणे, या दोन घटकांवर समूह टिकून राहतो. परंतु अनेकदा व्यक्तिगत स्वार्थामुळे किंवा मतभेदांमुळे सभासदांच्या आपुलकीत चढउतार होतो. त्यांच्यांत लहानलहान गट निर्माण होतात. तसेच ज्या कारणाकरिता समूह निर्माण झाला, ते कारण नेहमीच टिकून राहते असे नाही. अशा परिस्थितीत समूहगतिकीला म्हणजेच निरनिराळ्या समूहप्रक्रियांना सहजपणे सुरूवात होते. बेल्सच्या मते आपण अशा समूहप्रक्रियांचा अभ्यास केला, तर समूहगतिकीवर अधिक प्रकाश पडू शकतो. अशा आणखी काही प्रक्रिया याप्रमाणे : (१) समूहातील व्यक्तींचे परस्परांशी असणारे सामाजिक-भावनिक संबंध. (२) कोण कोणाला कशा प्रकारचे प्रश्न विचारतो. (३) कोणत्या व्यक्ती कोणाला विरोध करतात. (४) कोणती व्यक्ती कोणाविषयी आपुलकी दर्शविते. (५) कोणती व्यक्ती कोणाला पाठिंबा देते आणि (६) कोणती व्यक्ती इतरांना समजावून घेते. या सर्व प्रक्रिया मनोगतिकीत येत असल्या, तरी त्यामुळे समूहातील व्यक्तींच्या आंतरव्यक्तिक संबंधांचाही बोध होतो.


 नेतृत्वामुळेही समूहगतिकीला चालना मिळते. नेता इतरांचे न ऐकता स्वत:च निर्णय घेतो, इतरांवर केवळ अधिकार गाजवतो, की सर्वांचे ऐकून घेतल्यानंतर स्वत: निर्णय घेतो हे महत्त्वाचे असते. त्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीमुळे त्याच्या अनुयायांच्या वर्तनामध्ये बदल होत असतो. आपण नेत्याशी कसे वागावे, त्याला खूष करण्याकरिता काय करावे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याचा विचार समूहातील सभासद करीत असतात. याच स्थितीत समूहगतिकीला सुरूवात होते. समूहात पूर्वीचा नेता बदलून नवीन नेता आला, तर समूहगतिकीचे स्वरूप आपोआप बदलते. नेता बदलल्यामुळे समूहातील सभासद त्याला पटेल, अशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतात.

मनोगतिकीमुळे समूहाचे नियम, अभिवृत्ती, वर्तन, सवयी, कार्यपद्धती, समस्या सोडविण्याच्या तऱ्हा इ. ठरत असतात. एकूण समूहाचे कार्य, आंतरव्यक्तिक संबंध, समूहाची परिणामकारकता आणि समूहाचे स्थैर्य इ. जाणून घेण्याकरिता मनोगतिकी या संकल्पनेचा अभ्यास करणेही आवश्यक आहे.

समूहगतिकी ही संज्ञा लोकप्रिय झाल्यामुळे आणि सतत वापरली गेल्याने तिच्या अर्थाचा नेमकेपणा पुसट होत गेला. तिचे वेगवेगळे अर्थ लावले जाऊ लागले. तथापि समूहजीवनाचे स्वरूप हीच कल्पना केंद्रस्थानी ठेवून पाहिल्यास समूहगतिकी हे एक विशेष प्रकारचे ज्ञानक्षेत्र ठरते. ‘मानवी वर्तन आणि सामाजिक नातेसंबंधांचा त्यात विचार होत असल्यामुळे समूहगतिकीचे स्थान सामाजिक शास्त्रांत निश्चित करावे असे वाटले, तरी तसे करता येणार नाही. किंबहुना कोणत्याच पारंपरिक शास्त्राचा एक उपविभाग म्हणून समूहगतिकीची ओळख सांगता येणार नाही’. त्यामुळे समूहगतिकीचे वेगळेपण दाखवून देणारी काही वैशिष्ट्ये नमूद करावी लागतील, ती अशी :

(१) सैद्धान्तिक दृष्टया महत्त्वपूर्ण अशा अनुभवाधिष्ठित संशोधनावर भर : समूहांमध्ये विचारी व्यक्तींचे असलेले स्वारस्य अनेक शतकांचे आहे हे खरे पण समूहांचा अभ्यास कोणत्या पद्धतीने केला जातो, ह्यातून हे पूर्वकालीन स्वारस्य आणि समूहगतिकीच्या प्रयत्नांची दिशा यांच्यात वेगळेपणा आहे. विसाव्या शतकाचा आरंभ होण्यापूर्वी, समूहांसंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी अभ्यासक मूलत: व्यक्तिगत अनुभव आणि ऐतिहासिक नोंदींचे दस्तऐवज यांवर अवलंबून राहत. मात्र समूहगतिकीत वस्तुनिष्ठ अशी अनुभवसिद्ध माहिती, काळजीपूर्वक केलेले निरीक्षण, मोजमाप, परिगणन आणि प्रयोग यांवर भर राहिला. पण केवळ एवढेच नव्हे समूहगतिकी आकार घेत असतानाच्या काळातही सिद्धान्तांची रचना आणि त्या रचनेतून तपासून पाहता येतील असे अभ्युपगम निर्माण करणे, यात ह्या क्षेत्राच्या अभ्यासकांना रस होता.

(२) घटनांची गतिकी आणि त्यांचे आंतर-अवलंबित्व : (इंटरडिपेंडन्स) ह्यांत असलेला रस : समूहगतिकीचे अभ्यासक समूहजीवनाच्या गतिकीवर आपले लक्ष केंद्रित करतात. समूहाच्या गुणधर्मांचे वर्णन, समूहाशी निगडित असलेल्या घटना, समूहांच्या प्रकारांचे अथवा समूहवर्तनाच्या प्रकारांचे वर्गीकरण एवढेच त्यांच्या दृष्टीने पुरेसे नसते, तर ते निरखित असलेल्या घटना परस्परांवर कशा अवलंबून असतात, हे त्यांना जाणून घ्यायचे असते. त्याचप्रमाणे पूर्वी जिचे कधीही निरीक्षण झाले नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्यास तिच्यातून कोणत्या नवीन घटना निर्माण होऊ शकतील, हेही त्यांना पाहावयाचे असते. कोणती परिस्थिती कोणते परिणाम घडवून आणू शकते, याबाबतची सामान्य तत्त्वे शोधण्याचा ह्या अभ्यासकांचा प्रयत्न असतो.

निरनिराळ्या घटनांमधील आंतर-अवलंबित्व शोधण्यास अभ्यासकाला प्रवृत्त करणारे काही प्रश्न असे : (१) एखादया समूहाच्या सदस्यत्वात काही बदल झाला, तर त्या समूहाच्या स्वरूपाची कोणती वैशिष्ट्ये बदलतील आणि कोणती स्थिर राहतील ? (२) एखादया समूहाचे नेतृत्व कोणत्या परिस्थितीत बदलते? (३) समूहाच्या सदस्यांच्या विचारपद्धतीतील एकविधता समूहातील कोणत्या दडपणांमुळे निर्माण होते, इत्यादी.

(३) आंतरशास्त्रीय दृष्टिकोण : समूहगतिकीचे संशोधनक्षेत्र कोणत्याही एकाच समाजविज्ञानाशी निगडित नाही. कुटुंब, टोळ्या, कार्यगट, लष्करी पथक, स्वयंसेवी संघटना यांसारख्या समूहांचे संशोधन समाजशास्त्रज्ञ करतात. मानसशास्त्रज्ञ अशाच प्रकारच्या काही समूहांकडे लक्ष केंद्रित करतात. मानवी वर्तन, अभिवृत्ती, विविध प्रकारची व्यक्तिमत्त्वे यांच्यावर समूह कोणकोणत्या मार्गांनी प्रभाव टाकत असतात आणि व्यक्तींच्या स्वभाववैशिष्टयांचा समूहाच्या कार्यावर काय परिणाम होतो, हाही त्यांच्या अभ्यासाचा विषय असतो. समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ जे विषय हाताळतात, त्यांतील बरेच सांस्कृतिक मानवशास्त्रज्ञही अभ्यासतात. शिवाय आधुनिक औदयोगिक समाज जिच्यात राहतो, त्या परिस्थितीपेक्षा अगदी वेगळ्या अशा स्थितीत राहणाऱ्या समूहांबद्दलची माहितीही ते मिळवितात. राज्यशास्त्राचे अभ्यासक, विधिमंडळांत काम करणारे गट, दबाव गट, विशिष्ट समूहाच्या सदस्यत्वाचा मतदानावर होणारा परिणाम, ह्या व अशा विषयांच्या अंगाने समूहांचा अभ्यास करीत असतात. कुटुंबातून होणारी पैशांची बचत आणि त्यांचा खर्च ह्यांसंबधी घेतले जाणारे निर्णय, कुटुंबाच्या गरजा आणि नातेसंबंध ह्यांचा परिणाम श्रमशक्तींवर कसा होतो, कामगार संघटनांच्या ध्येयधोरणांचा प्रभाव उदयोगक्षेत्रातील धोरणांवर कसा पडतो, हे पाहण्यासाठी अर्थशास्त्रज्ञ समूहांचा विचार करीत असतात. अशा प्रकारे विविध सामाजिक शास्त्रे समूहांमध्ये स्वारस्य बाळगतात. त्यामुळे समूहांच्या गतिकीबद्दलचे कोणतेही ज्ञान सर्व सामाजिक शास्त्रांसाठी महत्त्वाचे ठरते.

(४) समूहजीवनाच्या नियमांचे ज्ञान व त्याचे उपयोजन : समूहांची कार्यपद्धती आणि व्यक्ती व समाज ह्यांवर तिच्या होणाऱ्या परिणामांची गुणवत्ता ह्यांत सुधारणा घडवून आणावयाची असेल, तर समूहजीवनाचे नियंत्रण करणाऱ्या नियमांच्या पक्क्या ज्ञानावर ती घडवून आणण्याचे प्रयत्न होणे आवश्यक आहे. व्यक्तींच्या आणि समाजाच्या विशिष्ट गरजांशी निगडित असलेल्या विशेषज्ञांच्या व्यवसायांत समूहांच्या वैज्ञानिक अभ्यासाचा मोठा फायदा होतो. उदा., कामगार-व्यवस्थापन, वैवाहिक समस्यांबाबतचे मार्गदर्शन, प्रौढ शिक्षण, सार्वजनिक प्रशासन, मानसोपचार इत्यादी. अशा व्यवसायांत लोकांबरोबर काम करावे लागते. लोक म्हणजे केवळ वेगवेगळ्या व्यक्ती नसतात, तर कोणत्या ना कोणत्या समूहाच्या सदस्य असतात. त्यामुळे समूहांचा, त्यांच्या नियमांचा विचार आणि त्यांचे उपयोजन करावेच लागते.

विज्ञानाच्या पद्धती समूहांच्या अभ्यासासाठी लागू करता येतात, हा विचार समूहगतिकीच्या मुळाशी आहे. मनुष्य, त्याचे वर्तन आणि त्याचे सामाजिक संबंध ह्यांची वैज्ञानिक चिकित्सा होऊ शकते, हा विचार सर्वसाधारणपणे मान्य झाल्यानंतरच समूहगतिकीचा उपर्युक्त आधारविचार किंवा गृहीत स्वीकारार्ह ठरू शकते. एकोणिसाव्या शतकात ह्या दृष्टीने सुरू झालेली चर्चा समूहगतिकीच्या विकासाला उपयुक्त ठरली. फ्रेंच तत्त्वज्ञ ⇨ऑग्यूस्तकाँत (१७९८-१८५७) ह्याचे विचार, ⇨डार्विनचा (१८०९-१८८२) क्रमविकासवाद आणि त्याच्यावर झालेले वादविवाद यांतून मानवी वर्तनाचा अभ्यास वैज्ञानिक दृष्टिकोणातून करण्यास चालना मिळाली. १८७९ साली पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा निघाली. अशा वैज्ञानिक दृष्टिकोणाला विरोध करणारेही होते. ते निष्प्रभ झाले, म्हणून समूहगतिकी अस्तित्वात येऊ शकली विकास पावली.

संदर्भ : 1. Cartwright, Dorwin Zander, Atvin, Group Dynamics : Research and Theory, London,              1960.

    2. Corsini, Raymond J. Auerbach, Alan J. Ed. Concise Encyclopedia of Psychology, New           York, 1996.

देशपांडे, चंद्रशेखर कुलकर्णी, अ. र.