वॉर्ड, जेम्स : (२७ जानेवारी १८४३- ४ मार्च १९२५). ब्रिटिश तत्त्वज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ. जन्म हल्, यॉर्कशर येथे. ऑक्सफर्ड येथील स्प्रिंग हिल कॉलेजमधून ईश्वरविद्येचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर त्याला गटिंगेन विद्यापीठाची एका वर्षासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ⇨रूडॉल्फ लोत्से ह्या तत्त्वज्ञाच्या मार्गदर्शनाखाली तो अभ्यास करू लागला. त्याचे विचार सांकेतिक स्वरूपाचे नसल्यामुळे धर्मोपदशेक (काँग्रिगेशनल प्रीचर) म्हणून तो लोकप्रिय होऊ शकला नाही तेव्हा त्या पदाचा राजीनामा देऊन केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजात तो पुढे शिकू लागला. पुढे तो तेथे अधिछात्र झाला (१८७५-१९२५). तेथे शरीरशास्त्रीय अथवा जैव मानसशास्त्राच्या (फिजिऑलॉजिकल सायकॉलॉजी) संशोधनासाठी त्याने १८९१ साली एक प्रयोगशाळा स्थापन केली. त्याच्या काळी प्रचलित असलेल्या साहचर्यवादाला त्याचा विरोध होता. एनसायक्लोपीडिआ ब्रिटानिकाच्या नवव्या आवृत्तीत (१८८६) ‘सायकॉलॉजी’ हा लेख लिहून त्याने साहचर्यवादावर टीका केली. सायकॉलॉजिकल प्रिन्सिपल्स (१९१८) हा त्याचा ग्रंथ म्हणजे उपर्युक्त लेखाचाच विस्तार होय. सायकॉलॉजी अप्लाइड टू एज्युकेशन (१९२६) हा त्याचा अन्य ग्रंथही निर्देशनीय आहे.

केंब्रिज, केंब्रिजशर येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.