ब्रॉइअर, योझेफः (१५ जानेवारी १८४२ – २० जून १९२५). प्रख्यात शरीरक्रियाविज्ञ, वैद्यकविशारद व मनोविश्लेषणाचे एक प्रमुख अर्ध्वयू. जन्म व्हिएन्ना येथे एका धर्मप्रवण ज्यू कुटुंबात. १८५८ मध्ये व्हिएन्ना येथून पदवी संपादन केल्यावर त्यांनी १८६७ मध्ये व्हिएन्ना विद्यापीठातून वैद्यकातील डॉक्टरेट संपादन केली. १८६८ मध्ये त्यांचा विवाह झाला. काही काळ त्यांनी व्हिएन्ना विद्यापीठात वैद्यकाचे अध्यापनही केले. १८७१ मध्ये त्यांनी नोकरी सोडून व्हिएन्ना येथेच आपला स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. व्हिएन्ना येथील अनेक वैद्यकीय संस्थांचे ते तज्ञ सदस्य म्हणून होते. १८९४ मध्ये त्यांची व्हिएन्ना अकॅडेमी ऑफ सायन्सेसवर निवड झाली. धार्मिक बाबतीत त्यांची मते संशयवादी स्वरूपाची होती. व्हिएन्ना येथे त्यांचे निधन झाले. त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात नमूद केल्यानुसार त्यांचे ज्यू धर्मप्रथेप्रमाणे दफन न करता दहन करण्यात आले.

एकोणिसाव्या शतकातील एक श्रेष्ठ शरीरक्रियाविज्ञ म्हणून त्यांची गणना होते. १८६२ मध्ये त्यांनी मानवी श्वसनयंत्रणेचा सखोल अभ्यास करून ‘हेरिंग-ब्रॉइअर- प्रतिक्षेपा’चा (रिफ्लेक्स) शोध लावला. त्यांचा हा शोध श्वसनयंत्रणेवरील तंत्रिकेचे नियंत्रण आणि त्याचे स्वरूप समजून घेण्याच्या दृष्टीने मूलभूत महत्वाचा आहे. हे नियंत्रण ‘स्वयं-नियंत्रणा’च्या (सेल्फ रेग्युलेटिव्ह) स्वरूपाचे असते, असे त्यांनी दाखवून दिले. १८७३ मध्ये त्यांनी कर्णेंद्रियामधील अर्धवलयाकृती नलिकांतील द्रवाचा आपल्या शरीराचा तोल व अंगस्थिती सांभाळली जाण्याच्या वेदनाशी (पोश्चर-सेन्स) महत्त्वाचा संबंध असतो हे प्रस्थापित केले. आजही त्यांचे हे संशोधन अंगस्थिती व हालचालींच्या वेदनाबाबत मूलभूत महत्त्वाचे मानले जाते.

त्यांनी १८८० – ८२ मध्ये बेर्था पापेनहाइम नावाच्या उन्मादपीडित तरुणीच्या विकृतीवर संमोहनाचे तंत्र वापरून उपचार केले. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले, की तिला जेव्हा आपल्या पूर्वायुष्यातील अप्रिय भावनात्मक प्रसंगांचे स्मरण झाले व तिने ते बोलून टाकले तेव्हा तिच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून आली. त्यावरून त्यांनी निष्कर्ष काढला, की उन्मादासारख्या मज्जाविकृतींच्या लक्षणांना आपल्या अबोध मनातील प्रक्रिया कारणीभूत असतात आणि ह्या अबोध प्रक्रिया जाणिवेच्या क्षेत्रात आणल्या, की मज्जाविकृतीची लक्षणे नाहीशी होतात. ब्रॉइअर यांनी बेर्थाचा अपवाद सोडल्यास इतर कोणाही मानसिक रुग्णावर आपल्या मानसिक चिकित्सेचा वापर केला नाही. एक तर त्यांच्या वैद्यकीय व्यवसायामुळे त्यांना तितका वेळ नसे आणि दुसरे एक कारण म्हणजे, बेर्थाच्या चिकित्सेत तिच्या प्रेमभावनेचे संक्रमण व केंद्रीकरण खुद्द ब्रॉइअरवरच होऊ लागल्यामुळे ह्या चिकित्सापद्धतीतील अशा भावनिक संक्रमणाचा (ट्रान्सफरन्स) धोका लक्षात आल्यामुळे त्यांनी इतर मानसिक रुग्णांवर उपचार करणे सोडून दिले. ब्रॉइअर यांनी बेर्थावरील आपली चिकित्सापद्धती व तिची फलिते सिग्मंड फ्रॉइड यांना सविस्तरपणे वर्णन करून सांगितली व आपल्याकडे आलेले मानसिक रुग्णही फ्रॉइडकडे पाठवले. ब्रॉइअर व फ्रॉइड यांनी मिळून १८९५ मध्ये Studien uber Hysterie (इं. शी. स्टडीज इन हिस्टेरिआ) हा महत्वपूर्ण ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यात बेर्थाच्या व्याधीची संपूर्ण माहिती आली असून तिच्यावर वापरलेल्या पद्धतीस ‘मानसिक विरेचन’ (मेंटल कॅथार्सिस) ही संज्ञा दिली. तत्पूर्वी १८८० पासून ब्रॉइअर व फ्रॉइड परस्परांशी बेर्था व इतर मानसिक रुग्णांबाबत चर्चा व विचार विनिमय करीत होते तथापि १८९५ च्या सुमारास त्यांच्यात चिकित्सेबाबत मूलभूत स्वरूपाचे सैद्धांतिक मतभेद झाले. तरीही फ्रॉइड यांनी मनोविश्लेषणाचा पाया घालण्यात ब्रॉइअर यांच्या योगदानाचा फार महत्वपूर्ण वाटा असल्याचे मान्य केले आहे.

पहाः फ्रॉइड, सिग्मंड मनोविश्लेषण.

अकोलकर, व. वि.