थकवा : (फटीग) : शारीरिक अगर मानसिक कष्ट केल्यानंतर थकवा वाटणे हे नैसर्गिक आहे. काही काळ सतत काम केल्यावर ते काम तसेच रेटण्याची ताकद न राहणे म्हणजे थकवा होय. कामाचा कस कमी होणे, कामाची गती मंदावणे, याला थकव्याचा सर्वसाधारण परिणाम म्हणता येईल. थकव्यामध्ये शारीरिक अगर ऐंद्रिय फेरफार, रासायनिक बदल आणि काही अंशी भावना अंतर्भूत असते. आवडीच्या कामात मनुष्य न थकता दीर्घकाळपर्यंत कष्ट करू शकतो, तर एखाद्या वेळी गोडी नसलेले काम लादले गेल्यास पुरेशा प्रेरणाबलाच्या अभावी सुरुवातीपासूनच त्याला दमल्यासारखे वाटणे, अशा मानसिक घटकाचा त्यात समावेश करावा लागेल.

श्रमाचा आणि थकव्याचा संबंध प्रायोगिक संशोधनात सिद्ध झालेला आहे. स्‍नायू कामात गुंतलेले नसतात तेव्हा ते मधुजन (ग्‍लायकोजेन) नावाचे पोषक द्रव्य निर्माण करून साठवत असतात परंतु शारीरिक क्रियेत आकुंचन व प्रसरण अशा प्रकारचे कार्य स्‍नायूंवर पडते तेव्हा मधुजनाचे दुग्धाम्‍ल (लॅक्टिक ॲसिड) आणि कार्बन डाय–ऑक्साइड यांमध्ये विघटन होऊन ती द्रव्ये स्‍नायूंभोवती साचतात. शिवाय औष्णिक व वैद्युत् स्वरूपाचेही बदल होतात. स्‍नायूंचा लवचिकपणा मधुजन या पोषक द्रव्यावर आणि निरुपयोगी द्रव्यांच्या निचऱ्यावर अवलंबून असतो. श्रम झाल्यानंतर मधुजनाचा पुरवठा अपुरा पडतो आणि निरुपयोगी द्रव्ये साचून अडथळा निर्माण करतात. काही काळ विश्रांती घेतली, की प्राणवायूच्या पुरवठ्यामुळे निकामी द्रव्यांचा निचरा होऊन स्‍नायू पुन्हा काम करू शकतात. मिठाच्या सौम्य द्रवात स्‍नायू धुऊन काढल्यास ते परत काम करण्यास समर्थ ठरतात, असे प्रयोगांत आढळून आले आहे. त्यामुळे निरुपयोगी द्रव्ये निघून जाऊन पोषक द्रव्यांत वाढ होते.

अँजेलो मॉसो या इटालियन शास्त्रज्ञाने थकवामापक वा स्‍नायुकार्यमापक असे ‘अर्गोग्राफ’ नावाचे उपकरण बनवले. त्या उपकरणावर हात अशा प्रकारे अडकवला जातो, की एक मधले बोट सोडून बाकी सर्व बोटे बांधली जातात. मधील बोट ठराविक कालांतराने एक कळ दाबत राहते. त्या कळीच्या साहाय्याने स्प्रिंगला अडकवलेले वजन उचलले जाते. सतत काही काळ ती क्रिया घडल्यानंतर कळ पुरेशा जोराने दाबली जात नाही आणि त्यामुळे वजन ठराविक अंतरापर्यंत उचलले जाण्याची क्रिया मंदावते.

स्‍नायू काम करण्यास असमर्थ होण्यापूर्वीच थकल्यासारखे वाटू लागते. त्यामुळे स्‍नायू पूर्णपणे असमर्थ होण्यापूर्वी श्रम कमी होऊ लागून स्‍नायूंना एक प्रकारचे संरक्षण मिळते. श्रमानंतर रुधिर परिवहनावर परिणाम होतात. ते फेरफार मोजण्याची साधनसामग्री उपलब्ध आहे. थकव्यात ज्ञानेंद्रियाच्या क्षमतेत बदल होतो. उदा., सतत काही काळ वास घेण्याने वास जाणवेनासा होतो.

शरीरातील कोणत्याही भागावर कामाचा भार पडला, तरी सबंध शरीर दमते कारण रुधिर परिवहनाने श्रांत स्‍नायूंची वेदना शरीरभर पसरली जाते. अर्थात येथे मानसिक घटकही डोकावतोच. उदा., काम संपत आल्यावर शेवटी शेवटी पुष्कळ वेळा स्वयंप्रेरणेने कामाचा वेग वाढून लवकर काम संपते. कामाचे स्वरूप बदलण्याने किंवा दुसरे काम अंगीकारण्यानेही थकवा कमी होतो. मानसिक थकवा हे एक महत्त्वाचे अंग आहे परंतु त्यास स्वतंत्र स्थान देता येत नाही. शारीरिक व मानसिक थकवा असा काटेकोर भेद करणे अयोग्य ठरेल. तथाकथित निव्वळ मानसिक कष्टांचे रूपांतर हालचालींच्या परिभाषेत सांगणे कठीण नाही. प्रायोगिक संशोधनात काम करणाऱ्या व्यक्तीला प्रेरणेची आवश्यकता असल्याचे सिद्ध झाले आहे. विश्रांती, अवधान विचलित करणाऱ्या गोष्टींचे निर्मूलन, प्रेरणेची जरूरी, सुरुवातीचा उत्साह राखण्याचा प्रयत्‍न वगैरे गोष्टींवरून महत्त्वाचे निष्कर्ष काढता येतात.

कामगाराला श्रमाने भासणारा थकवा सर्व शरीराला जाणवत असतो. शारीरिक आणि मानसिक क्रिया झपाट्याने करणारा लवकर थकतो. याउलट स्‍नायूंची आणि मानसिक कार्याची गती सावकाश असेल, तर थकवा उशिरा जाणवतो. शारीरिक कार्यात अनुस्यूत असलेल्या थकव्याविषयी मानसिक थकव्यापेक्षा अधिक माहिती मिळते.

बौद्धिक कामानंतर येणाऱ्या थकव्याविषयी सर्वसाधारण असे मत आहे, की त्यामुळे अवधानविषयावर चित्त ठरेनासे होते. बौद्धिक कामातील एकाग्रता कमी होऊन त्यात चूक होत जाणे, हे थकव्याचे निदर्शक होय. एकाग्र चित्तावस्थेत कार्याशी संलग्‍न नसलेल्या कल्पना आणि प्रवृत्ती दबलेल्या स्थितीत असतात. एकाग्रता कमी होताच त्या कामावरील दुर्लक्षास कारणीभूत होतात.


थकव्यामधील ‘कंटाळा’ (बोअरडम) या मानसिक वृत्तीला वाव न देण्याचा प्रयत्‍न औद्योगिक क्षेत्रात करण्यात येत असतो. एखादे काम करण्यात सुरुवातीचा उत्साह शेवटपर्यंत क्वचितच आढळतो. कामाच्या नावीन्यामुळे सुरुवातीला वाटणारे आकर्षण थोड्या काळानंतर कमी होत जाते. अशा वेळी निर्धार न राखल्यास काम शेवटास नेणे दुरापास्त होते. कंटाळा वाटण्याच्या बाबतीतील वैयक्तिक भेद वगळले, तरीदेखील आजच्या औद्योगिक क्षेत्रातील कार्यपद्धतीतही त्याची काही कारणे सापडतात. श्रमविभागणीच्या तत्त्वानुसार एक वस्तू निर्मिताना तिला शेकडो कामगारांचे हात लागत असतात परंतु वस्तूचे सबंध स्वरूप कोणाच्याच नजरेखालून जात नसल्यामुळे त्या अनेकांच्या हातून जाणाऱ्या वस्तूबद्दल त्यांना गोडी वा आस्था वाटत नाही. मोटारींच्या कारखान्यात काम करणाऱ्या काही कामगारांना वर्षानुवर्षे फक्त स्क्रूच करावे लागतात. असे एकाच प्रकारचे काम सतत करावे लागल्यामुळे कंटाळा येतो. कंटाळ्यावर इलाज म्हणून यंत्राच्या वेगात व कामाच्या वेगात ताल साधला जातो किंवा प्रेरणा देणारे अन्य उपाय योजिले जातात. कमीअधिक विश्रांतिकालही ठेवण्यात येतो. चंचल वृत्तीच्या लोकांना यांत्रिक हालचालींचा लवकर कंटाळा येतो, तर धीम्या व शांत वृत्तीच्या लोकांना तो लवकर जाणवत नाही. कामातील तोचतोपणा कमी व्हावा म्हणून कामाची अशा रीतीने योजना असावी, की आलटून पालटून विविध शारीरिक क्रियांची तीत अपेक्षा असावी.

थकवा येणे जितके स्वाभाविक तितकेच थोड्या विश्रांतीने तो जाणेही स्वाभाविक आहे. विश्रांतीनंतरही थकवा न जाणे अनैसर्गिक आहे. थकलेल्या स्थितीत काम रेटत गेल्यास त्याचे अनिष्ट परिणाम संभवतात. थकल्याबरोबर शरीरात बाधक, निरुपयोगी द्रव्ये वाढत जाऊन गंभीर प्रकारचा रोग जडण्याची शक्यता असते. कामगाराच्या आठवड्याच्या कामात थकवा वाढत गेल्याचे आलेखावरून निदर्शनास येते परंतु आठवड्याच्या शेवटी एखाद्या रजेने तो भरूनही येत असतो.

थकवा हा चित्ताची एकाग्रता, आवडीनिवडी, भावनिक गुण इ. मानसिक घटकांपासून अलग करता येत नसल्यामुळे थकव्याचे स्वरूप पाहिजे तितके स्पष्ट नाही. औद्योगिक क्षेत्रात थकवामापक यंत्रापेक्षा कामाचे आलेख, कामाच्या क्षेत्रात असलेल्या बारीकसारीक गोष्टींचा चिकित्सक अभ्यास यांचाच अधिक उपयोग होतो.

संदर्भ : 1. Bartley, S. H. Chute, E. Fatigue and Impairment in Man, New York, 1947.

            2. Vernon, H. M. Industrial Fatigue and Efficiency, London, 1921.

खंडकर, अरुंधती