उद्दीपन-अवसाद चित्तविकृति : एक चित्तविकृती. उद्दीपन आणि अवसाद या दोन भिन्न विकृती आहेत असे पूर्वी मानण्यात येत असे परंतु या दोन्ही विकृती एकाच व्यापक प्रकारातील उपप्रकार आहेत, असे  एमिल क्रेअपेलीन (१८५६–१९२६) या मानसोपचारज्ञाने सर्वप्रथम प्रतिपादन केले. उद्दीपन आणि ग्लानी, हर्षवायू आणि विषण्णता, चित्तक्षोभ आणि चित्तविकलता अशा परस्परविरोधी भावनांचे चढउतार ही मूलतः एकाच विकृतीची दोन दृश्य रूपे आहेत, असे त्याला निरीक्षणांती आढळून आल्याने, त्याने या विरोधी भावनांच्या प्रक्षोभप्रकारांना एकाच व्यापक सदरात टाकले.

उद्दीपन-अवसाद चित्तविकृतीने पछाडलेल्या रोग्याच्या मनात भावनांचा प्रक्षोभ माजतो. हर्षवायूच्या झटक्याने रोगी उधळतो. याउलट, विषण्णतेच्या झटक्याने तो निष्क्रियपणे पडून अथवा बसून राहतो. मनोभावांची ऐकांतिक आंदोलने आणि सहजप्रवृत्तींचे अनावर स्फोट ही या चित्तविकृतीची प्रमुख लक्षणे आहेत. तथापि या विकृतीमध्ये रोग्याच्या बौद्धिक वा अन्य मनः शक्तींचा ऱ्हास होत नसतो. रोगी जेव्हा व्याधिग्रस्त नसतात, तेव्हा ते चांगली कर्तबगारी करून दाखवितात. या व्याधीला बळी पडणारी पुष्कळशी माणसे सुशिक्षित असतात.

सांख्यिकीय दृष्टीने पाहू जाता पाश्चात्त्य देशांत उद्दीपन-अवसाद ही चित्तविकृती एकंदर लोकसंख्येच्या अर्धा टक्का लोकांना जडते, असे आढळून आले आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या मानसिक रोग्यांपैकी शेकडा पंधरा रोगी या उद्दीपन-अवसादाच्या चित्तविकृतीने पछाडलेले असतात. या रोग्याच्या वयोमानाची सरासरी चाळीस पडते. २५ टक्के रोगी तिशीच्या आतील असतात. ५० टक्के रोगी तिशी ते पन्नाशीच्या दरम्यानचे असतात आणि उरलेले २५ टक्के रोगी पन्नाशी उलटलेले असतात. ही विकृती जडलेल्यांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक असते. स्त्रिया आणि पुरुष यांमध्ये तिचे प्रमाण ३:२ असते. स्त्रियांना तिची बाधा साधारणतः तिशीच्या आतच जडते.

या चित्तविकृतीचे तीन उपप्रकार आहेत : (१) उद्दीपन, (२) अवसाद आणि (३) मिश्र उद्रेक. उद्दीपन चित्तविकृतीने रोग्यास झटके येतात. अवसाद विकृतीत विषण्णतेचे झटके येतात. पुष्कळदा काही रोग्यांना आलटून पालटून उद्दीपनाचे व अवसादाचे झटके येत राहतात. उद्दीपनविकृत रोग्यांपेक्षा (३५ टक्के) अवसादविकृत रोग्यांची संख्या जास्त असते (४० टक्के).

उद्दीपन विकृतीचे स्वरूप आणि उपप्रकार : उद्दीपन विकृतीचे झटके रोग्याला एकाएकी येतात. त्याची मनःस्थिती एकदम उद्दीपित होते. तो अत्यानंद वा हर्षातिरेक झाल्यासारखा वागतो. त्याला स्वतःच्या कार्यशक्तीविषयी भलताच आत्मविश्वास वाटू लागतो. बेताल होऊन तो नाचू लागतो, गाऊ लागतो, तारस्वराने ओरडू लागतो. तो सारखा बडबडत राहतो. कधीकधी तो स्वतः विनोद करून स्वतःच हसत राहतो. शब्दांवर कोट्या करण्यात त्याला मौज वाटते. तसेच चमत्कारिक कल्पनांचा चाळा तो करीत राहतो. एका कल्पनेवरून तो दुसऱ्या असंबद्ध अशा कल्पनेकडे भरकटत जातो. त्याच्या बोलण्यात क्षणाक्षणाला विषयांतर होत असते. त्याच्या अंगात विलक्षण शक्ती संचारते. तो भारल्यासारखा होतो आणि अविरत हालचाल करीत राहतो. काहीतरी तातडीची अथवा महत्त्वाची कामे झटपट उरकून टाकावयाची आहेत, अशा आविर्भावाने तो खोलीतील सामानाची हलवाहलव करून, दूरच्या आप्तेष्टांना पत्रे लिही, पुस्तकातील उतारे मोठ्याने वाचून दाखव अशा प्रकारच्या गोष्टी एका पाठोपाठ एक करीत राहतो. त्याचा रक्तदाब वाढतो, नाडीचे ठोके जलद पडू लागतात, पुष्कळ धडपड केल्यामुळे तो घामाघूम होतो, तहानभूक नाहीशी होते, झोप उडून जाते. त्याच्या हालचालींत, बडबडीत, विचारप्रक्रियेत भलतीच अस्थिरता, असंबद्धता, बेफामपणा, भरकटलेपणा दिसून येतो. अशा वेळी सामान्यतः त्याच्या बोलण्यात इतरांविषयी सद्‌भाव आणि आशावाद ओसंडत असतो. परंतु जर का कोणी त्यास अडथळा अथवा विरोध केला किंवा त्याच्या म्हणण्यास रुकार मिळाला नाही तर तो संतापतो आणि मारावयास धावतो. इतर लोक आपल्या वाईटावर टपलेले आहेत असा संशय त्याच्या मनात बळावतो. क्वचित प्रसंगी त्याला भ्रम, संभ्रम आणि निराधार भ्रम होऊ लागतात. आपण थोर कर्तबगार व्यक्ती आहोत, असा मिथ्याग्रह त्याच्या डोक्यात ठाण मांडून बसतो. या रोग्याच्या वर्तनात मौखिक क्रियांना प्राधान्य असते. तो भरपूर अन्नपाणी सेवन करतो. आपण अतिशय मोठे असून सारे जग आपल्या आधीन आहे, हवे ते आपण मिळवू शकतो, अशा वल्गना करण्यात तो दंग होतो.

उद्दीपन विकृतीचे तीन उपप्रकार आहेत :(१) अल्पोद्दीपन, (२) तीव्रोद्दीपन आणि (३) भ्रांतिमय उद्दीपन.

(१) अल्पोद्दीपन : या प्रकारात रोग्याला अल्प प्रमाणातच उद्दीपनाचे झटके येतात. त्याची मनःस्थिती उत्तेजित होऊन त्याचे संभाषण चातुर्यपूर्ण आणि मनोरंजक होते परंतु क्वचित प्रसंगी एकाएकी त्याची मनःस्थिती बिघडते आणि त्याचे बोलणे अतिरेकी अथवा चिडल्यासारखे होऊन बैठकीचा रंग तो पार बिघडवून टाकतो.

(२) तीव्रोद्दीपन : या प्रकारात रोग्याला उद्दीपनाचा तीव्रतर झटका येतो. तो आत्मश्रेष्ठत्वभावनेच्या संपूर्ण आहारी जातो आणि इतरांना हुकूम फर्मावू लागतो. आनंदी वृत्ती टाकून तो संतप्त होतो आणि अर्वाच्य बोलू लागतो. शिव्याशाप आणि अभद्र, अश्लील वाक्प्रचार त्याच्या तोंडून बाहेर पडतात. इतरांना तो मारावयास धावतो. क्वचित स्वतःच्या अंगावरचे कपडे फाडून टाकतो. त्याची बुद्धी तीक्ष्ण असली, तरी विचारात मात्र भयंकर गोंधळ माजतो.

(३) भ्रांतिमय उद्दीपन : या प्रकारात रोग्याचे मन कमालीचे भ्रमिष्ट होते. आपण काय बोलत आहोत आणि काय करीत आहोत, याचे त्याला भान रहात नाही. त्याच्या विचारांना निश्चित अशी दिशा, शब्दांना अर्थ आणि क्रियांना प्रयोजन राहत नाही. भ्रम, संभ्रम आणि निराधार भ्रम यांच्या तावडीत तो सापडतो. जिभेला लज्जेचा अडसर राहत नाही वा वर्तनात शालीनताही उरत नाही.

अवसाद विकृतीचे स्वरूप आणि उपप्रकार : अवसाद विकृतीमध्ये रुग्ण निराश, हताश, निरुत्साही, विषण्ण, शोकाकुल बनतो व आपण शरीररोगग्रस्त, अपराधी, पापी, नालायक असल्याची भावना त्याला सतत होत असते. त्याच्या शरीर-मनाची सारी शक्ती मरगळून जाते. आत्मनिंदा, ⇨ न्यूनगंड, देहदौर्बल्य, मनोग्लानी, शारीरिक व्याधी इ. भावनाविकारांमुळे जणू त्याचे शरीर आणि मन ही दोन्ही थिजून, कोमेजून, मृतवत होऊन जातात. त्याची सारी उपक्रमशीलता, उत्साह आणि शक्ती नष्ट होते. काय करावे हे त्याला ठरविता येत नाही. साध्या देहधर्माच्या क्रिया करावयास देखील त्याला नीटपणे हालचाल करता येत नाही. त्याला नेहमी बिछान्यात पडून अथवा कोपऱ्यात बसून रहावेसे वाटते. उठून कामास लागावयास त्याचे शरीर आणि मन तयारच होत नाही. प्रत्येक हालचाल अत्यंत सावकाशीने व महत्प्रयासाने तो करीत असतो. अगदी साधे, सोपे व अल्पस्वल्पसे काम केले, तरी त्याला कमालीचा थकवा वाटतो. त्याची विचारशक्ती मरगळून जाते, मनाची एकाग्रता होत नाही, कोणाशी धडपणे बोलता येत नाही अथवा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही देता येत नाहीत. क्वचित त्याचे बोलणे झालेच, तर ते अडखळत, सावकाश, बद्द आवाजात आणि एकसुरी होते. आठवणीत चुका होतात, विचार सारखे अडत राहतात. तो मुळात मंद बुद्धीचा नसतानाही त्याचे वर्तन मात्र तसे असते.

त्याचे मन नैराश्याने व्याप्त होते, त्याला जगण्यात रस वाटत नाही, जीवनात काहीही प्रयोजन दिसत नाही. जगात आपण एकाकी आहोत तसेच आपण कुचकामी व अधम आहोत, असे त्याला सारखे वाटत राहते. त्याला अनावर शोक होतो. त्याची समजूत घालणे अशक्य होते. त्याच्या नैसर्गिक प्रेरणा, इच्छा-आकांक्षा आटून जातात. त्याला भूक लागत नाही, झोप येत नाही, स्नायूंची शक्ती गळून जाते. जिभेला कोरड पडते, पचनेंद्रियांची कार्यक्षमता घटते, अपचनाचा विकार जडतो, वजनही घटते, रक्तदाब कमी होतो, चव कळेनाशी होते, ओठावरचे हास्य कायमचे मावळून जाते, विषादाने चेहरा काळवंडतो पण डोळ्यांत अश्रू येत नाहीत. त्याला आपल्या स्वतःच्या जीवनाचीच घृणा वाटू लागते.

विषादग्रस्त झाल्यामुळे त्याला कामधंदा नीट सांभाळता येत नाही. तो नोकरीला मुकतो त्यामुळे त्याच्या अस्मितेला अधिकच धक्का बसतो आणि त्याची विषण्णता अधिकच वाढते. इतरांकडून त्याला अपेक्षेप्रमाणे सहानुभूती मिळाली नाही, की तो अधिकच खंगतो. वाढत्या विषण्णतेसोबतच त्याच्या डोक्यात आत्महत्येचे विचार घोळू लागतात.

सारांश, भावनांची मरगळ, शरीर व मन पार कोमेजून जाणे आणि विचारशक्तीची कमकुवतता ही अवसाद विकृतींची प्रमुख लक्षणे होत. याचसोबत आपण अधम, पापी, नीच आहोत, आपणास उपदंशासारख्या भयानक व्याधी जडलेल्या आहेत, आपले भवितव्य काळवंडलेले आहे, इतर लोक आपला तिरस्कार करतात, ते आपल्या वाईटावर टपलेले आहेत, असा विचित्र ग्रह त्याच्या मनात ठाण मांडून बसतो. त्याला नाना प्रकारचे भ्रम आणि निराधार भ्रम होऊ लागतात.

अवसाद विकृतीचे लक्षणांच्या तीव्रतेनुसार चार उपप्रकार आहेत : (१) सौम्य अवसाद : या प्रकारात या विकृतीची प्रारंभिक मानसिक लक्षणे दिसू लागतात आणि डोकेदुखी, पोटदुखी, अपचन, क्षुधानाश, निद्रानाश अशांसारख्या शारीरिक दुखण्यांनी रोगी संत्रस्त होतो. (२) साधी पीछेहाट :या प्रकारात रोगी निष्क्रिय, दुःखी, निस्तेजनेत्र होऊन, अन्नभक्षणादी नित्यनैमित्तिक कार्येदेखील धडपणे करीनासा होतो. आपण कुचकामी आणि महान अपराधी आहोत, अशी सतत खंत करीत बसतो. (३) तीव्र अवसाद : या प्रकारात मनुष्य अगदीच अबोल बनतो आणि एकाकी बसून राहतो. त्याला भलभलते भ्रम आणि निराधार भ्रम होऊ लागतात. (४) अवसादी मूर्छा :या प्रकारात अवसादाच्या तीव्रतेची परिसीमा होते आणि निरतिशय असहाय अवस्थेत तो पाषाणवत निपचित बसून अथवा पडून राहतो.

उद्दीपन-अवसाद चित्तविकृतीची कारणमीमांसा : (अ) आनुवंशिकता : आनुवंशिकता हे या विकृतीचे दूरस्थ अथवा पूर्ववर्ती कारण आहे. या विकृतीने पछाडलेल्या व्यक्तींच्या घराण्यांत या विकृतीचे प्रमाण अधिक आढळते. (आ) शरीरबांधा : एर्न्स्ट क्रेश्मरच्या (१८८८–१९६४) मते या व्याधीने पछाडलेले रोगी साधारणतः ठेंगू, धष्टपुष्ट आणि स्थूल असतात. विल्यम शेल्डनच्याही (१८९९– ) मते स्थूल, मांसल आणि जाडजूड शरीरबांधा असलेले लोकच सामान्यतः या विकृतीला बळी पडतात. (इ) व्यक्तिमत्त्व गुण : या विकृतीने ग्रस्त असलेल्या व्यक्ती स्वभावाने अत्यंत महत्त्वाकांक्षी, उद्योगी, बहिर्मुख आणि समाजप्रिय असतात. त्यांना यशःप्राप्तीचे अतिशय आकर्षण असते. ते आपल्या कामात वाकबगार, दक्ष व शिस्तप्रिय असतात. त्यांनी स्वतःला चांगल्या सवयी लावून घेतलेल्या असतात. त्यांचे नैतिक आदर्श अत्युच्च दर्जाचे असतात. (ई) बालपण आणि कौटुंबिक वातावरण :या रुग्णाचे बालपण कडक शिस्तीत गेलेले सते. मातापित्यांच्या वागणुकीचा आणि शिकवणुकीचा त्यांच्या मनावर सखोल परिणाम झालेला असतो. त्यातही त्यांचे आईवडील चंचल, लहरी, तापट, भावनाप्रधान असतील, तर त्यांच्या भावनिक अस्थिरतेचा व आंदोलनांचा विकृतिग्रस्तांच्या मनावर खोल ठसा उमटतो. (उ) तात्कालिक कारणे : आनुवंशिकता, शरीरबांधा, बालपणीचे अनुभव, कौटुंबिक परिस्थिती ही सर्व कारणे पूर्ववर्ती अथवा दूरस्थ कारणे होत. त्यामुळे उद्दीपन-अवसाद चित्तविकृतीचा आविष्कार हमखास होईलच असे नाही. या विकृतीचा प्रस्फोट करणारी तात्कालिक कारणे म्हणजे रोग्याच्या जीवनात निर्माण झालेल्या बिकट समस्या आणि त्यातून उद्‌भवलेले त्याच्या अंतरंगातील संघर्ष ही होत. उद्दीपन विकृती ही देहोद्‌भव नसून कार्यिक स्वरूपाची असते. तिचे मूळ शारीरिक व्याधीत अथवा देहदोषांत नसते. ते सहसा वर्तनविषयक अडचणीत अथवा मानसिक समस्यांत दडलेले असते. रोग्याला त्याच्या जीवनात अपार वैफल्य आणि नैराश्य अनुभवास आलेले असते. त्याचे भावनिक जीवन ज्या व्यक्तीवर अवलंबून असते त्या प्रिय अथवा आधारदायी व्यक्तीकडून त्याला कळत वा नकळत खूप मानसिक त्रास झालेला असतो आणि म्हणून त्या व्यक्तीबद्दल रोग्याच्या मनात द्वेष, तिरस्कार, घृणा निर्माण झालेली असते. परंतु अशा तापदायक व्यक्तीचा तिटकारा वा त्याग केल्यास आपलेच नुकसान होईल अथवा आपण निराधार होऊ, अशी रोग्याला भीतीही वाटत असते. परिणामी तो अतोनात विषण्ण होतो आणि अन्नपाणी वर्ज्य करून सतत शोक करीत राहतो. पण कधीकधी तो आपल्या बिकट परिस्थितीवर काबू मिळविण्याच्या ईर्ष्येने उद्दीपित होऊन आपण सर्वसमर्थ असल्याचा आविर्भाव आणतो आणि आपणास कुणाच्याही आधाराची गरज नाही, असे भासवितो. अर्थात ही सारी आपल्या आंतरिक संघर्षावर, चिंतेवर आणि दुर्बलतेवर मात करण्यासाठी त्याची केविलवाणी धडपड असते. आपल्या तापदायक परिस्थितीतून पळवाट काढण्यासाठीच त्याच्या धडपडी चालू असतात. त्याच्या असंबद्ध कल्पनाभराऱ्यांतूनही पलायनात्मक प्रवृत्तीच दिसून येते. या पलायनपर प्रवृत्तीमुळेच त्याचे वस्तुस्थितीकडे (म्हणजे स्वतःची पात्रता, कुवत, सामाजिक जबाबदारी, नीतीची बंधने इत्यादींकडे) दुर्लक्ष होते. त्याच वेळी स्वसामर्थ्याच्या पोकळ आविर्भावामुळे, त्याला चिंताग्नीतून मुक्त झाल्याचा आनंद होतो. दडपलेल्या भावनांना आणि वासनांना गलिच्छ भाषण आणि बीभत्स वर्तन यांच्याद्वारे मुक्त वाट दिल्यामुळे त्याला सुखावह असा हर्षवायू होतो. (ऊ) मॅक्डूगलची उपपत्ती : विल्यम मॅक्डूगलच्या (१८७१–१९३८) मते सुघटित व्यक्तिमत्वामध्ये आत्मगौरव आणि आत्मगौणत्व या दोन परस्परविरोधी प्रवृत्ती बरोबरीने नांदत असतात. आत्मपर स्थिरभावाच्या अथवा अस्मितेच्या भोवती व्यक्तिमत्त्वाची सुरेख गुंफण झाली, की स्वनिर्धारण आणि आत्मगौणत्व या दोन्ही प्रवृत्तींमध्ये समतोल साधला जातो. परंतु जर काही कारणामुळे व्यक्तिमत्त्वाचा समतोल बिघडला, तर या प्रवृत्तींची संवादी गुंफण सैल होते आणि व्यक्तीला उद्दीपन-अवसादाची चित्तविकृती जडते. त्याच्या मनात कधी आत्मगौरवपर प्रवृत्ती प्रबळ होते, तर कधी आत्मगौणत्वाची प्रवृत्ती बलवत्तर बनते आणि त्याचे मन उद्दीपनाच्या एका टोकापासून विषण्णतेच्या दुसऱ्या टोकापर्यंत हेलकावे खाऊ लागते. अर्थात या दोन परस्परविरोधी प्रवृत्ती जेव्हा संतुलित अवस्थेत असतात, तेव्हा ती अवस्था टिकवून धरण्याच्या कामी माणसाची शक्ती खर्च होत असते. हीच अन्यथा सत्कारणी लागणारी शक्ती जेव्हा व्यक्तिमत्त्वाचा समतोल नष्ट होतो, तेव्हा बांध फुटलेल्या धरणाच्या पाण्याप्रमाणे उफाळून, अनिर्बंध वर्तनरूपाने प्रगट होते. आत्मगौरवाची अथवा आत्मगौणत्वाची एकच एक प्रवृत्ती जेव्हा अनिर्बंध होऊन उसळी मारते, तेव्हा तिच्यासाठी सर्व आंतरिक शक्तीचा विनियोग होतो व माणसाला विलक्षण चेव, आवेश, जोश प्राप्त होतो. उद्दीपनाने भ्रमिष्ट झालेल्या माणसाच्या अंगात जी विलक्षण शक्ती संचारते तिचे हेच मानसशास्त्रीय मूळ असते. (ए) सांस्कृतिक परिसर :सांस्कृतिक परिसराशी या व्याधीचा कोणत्या प्रकारचा संबंध आहे ते निश्चित सांगता येत नाही. पण निरीक्षणात आलेल्या गोष्टी अशा, की न्यूझीलंडमध्ये छिन्नमानसाने ग्रस्त झालेल्या रोग्यांची संख्या उद्दीपन-अवसादग्रस्त रोग्यांपेक्षा अडीच पटीने मोठी आहे अमेरिकेत या दोन प्रकारच्या रोग्यांचे संख्याप्रमाण याच्या नेमके उलट आहे आणि केन्यामध्ये मनोरुग्णांना फक्त उद्दीपनाचीच बाधा होते, अवसादाची होत नाही.

उपचारपद्धती : उद्दीपनग्रस्त रोगी जेव्हा जिवाचे बरेवाईट करण्याच्या मनःस्थितीत असतो, तेव्हा त्याच्या जिवाला अपाय होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. त्याची आत्यंतिक उद्दीपनावस्था व शक्ती, कोणत्यातरी विधायक कार्यात, उद्योगात, कलाकौशल्यात अथवा खेळात गुंतविली पाहिजे.

त्याची विकृती जर फारच अनावर झाली, तर त्याला रुग्णालयात दाखल करावे आणि जलोपचार, झोपेच्या गोळ्या अथवा प्रशामके यांचा उपयोग करावा. या विकृतीवर विजेच्या धक्क्याची उपचारपद्धती चांगलीच गुणकारी ठरते. जवळजवळ ऐशी टक्के रोगी, विशेषतः अवसाद विकृतीचे रोगी, वीजधक्क्याच्या उपचाराने बरे होतात.

या विकृतीचे अनेक रोगी यथावकाश आपोआप बरे होतात. जवळजवळ सत्तर टक्के रोगी रुग्णालयात वर्ष-सहामहिने नुसते पडून राहिले व त्यांच्यावर इतर कोणताही खास उपचार केला नाही, तरी बरे होतात. अर्थात त्यांच्या व्यक्तिगत जीवनात आणि सामाजिक परिसरात जे तणाव निर्माण झालेले असतात, ते दूर करण्याचा शक्य त्या परीने प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे त्यामुळे रोग्याची मनःस्थिती सुधारावयास मदत होते.

या विकृतीतून मुक्त झालेला रोगी जवळजवळ कायमचाच पूर्ण बरा होतो. रुग्णालयात परत जाण्याची त्याच्यावर क्वचितच पाळी येते. ए माइंड दॅट फाउंड इट्‌सेल्फ या प्रसिद्ध ग्रंथाचा कर्ता क्लिफर्ड बीअर्स (१८७६–१९४३) याला हीच उद्दीपन-अवसादाची विकृती तीन वर्षे जडली होती पण नंतर तो पूर्ण बरा झाला. आपल्या ग्रंथाद्वारे त्याने मनोरुग्णांची रुग्णालये सुधारण्याच्या प्रश्नाकडे, जनतेचे लक्ष तर वेधलेच, पण त्याचसोबत ‘मेंटल हायजीन’ (मानसिक आरोग्य) नावाची एक नवी सामाजिक चळवळही सुरू केली.

पहा : अपसामान्य मानसशास्त्र; मानसिक आरोग्य.

संदर्भ : 1. Anderson, E. W. Psychiatry, London, 1964.

2. Lewin, B. D. Psychoanalysis of Elation, New York, 1950.

3. Rosenfeld, H. A. Psychotic States, London, 1965.

केळशीकर, शं. हि.