अहं : (एगो). मानवी वर्तनाचे आकलन करण्यासाठी व्यक्तीच्या अहंची सत्ता लक्षात घ्यावी लागेत. ‘मी’ व ‘माझे’ अशी मीपणाची व ममत्वाची तसेच ‘मी’ व ‘इतर’ अशी द्वैती भाषा व्यक्तीच्या अहंजाणिवेची द्योतक होय. स्वत:च्या अहंविषयीची काहीएक कल्पना व्यक्तीच्या ठिकाणी असते व त्या कल्पनेचा व्यक्तीच्या भावजीवनावर व वर्तनावर प्रभाव असतो. व्यक्तीचा अंह जोवर सुस्थित असतो, तोवर तिची सामाजिक संस्कारिता सुस्थित असते व तिच्याकडून ऐहिक पुरुषार्थ केला जातो. अहंविहीन वर्तन सामान्यांच्या चौकटीत बसत नाही.

व्यक्तीचा अंह हा अंतर्यामी वास करणारे निराळे द्रव्य व तत्त्व नसून हे पद कार्यवाचक आहे व त्या अर्थाने व्यक्तीचा अहं हा तिच्या अंत:करणाचा (मेंटल ॲपरेटसचा) भाग आहे, हे मत योग्य ठरते. व्यक्तिमानसाची प्रेरणात्मक, संयमात्मक वा नियमनात्मक आणि आदर्शात्मक अशी जी तीन अंगे प्रत्ययास येतात, ती त्याचे जणू तीन प्रांतच किंवा व्यक्तिमत्त्वाचे तीन घटकच असतात, असे विवेचनाच्या व स्पष्टीकरणाच्या सोयीखातर सिग्मंड फ्रॉइडने म्हटले आहे व त्यांना अनुक्रमे ‘इड’ (इदं), ‘एगो’ (अहं)व  ‘सुपरएगो’ (पराहं) ही नावे दिली आहेत.

इदं म्हणजे व्यक्तीचे अबोध मन. व्यक्तिमानसाचा हा आद्य स्तर अबोध असतो आणि सुखलुब्धता हे एकच त्याचे नियामक तत्त्व असते [ →  इदम्].

परंतु ज्ञानेंद्रियांचा कार्यात्मक विकास होऊन बाह्य परिसराशी व्यक्तीचा संपर्क जसाजसा वाढत जातो, तसेच त्याच्या बौद्धिक शक्तींचाही जसजसा विकास होत जातो, तसतसे व्यक्तीच्या अबोध मनात परिवर्तन घडून येते. त्याचा काही भाग वास्तवलक्षी बनतो भोवतालच्या वस्तूंच्या व व्यक्तींच्या अस्तित्वाचे व गुणधर्मांचे भान, त्यांचे परस्परांशी तसेच स्वत:शी येणाऱ्या संबंधांचे ज्ञान, स्वत:च्या क्षमतांची व अक्षमतांची जाणीव, अनुभवांची स्मृती व संघटन, वास्तवाचे मानसचित्रण आणि या सर्व गोष्टी जमेस धरून होणारी विचारक्रिया असे या परिवर्तनाचे स्वरूप असते. अशा रीतीने व्यक्तीच्या आदिमानसाचा जो भाग उत्क्रांत होऊन वास्तवाभिमुख बनतो, त्यास ‘अहं’ ही संज्ञा आहे. हा सर्व प्रकार अजाणताच घडत असतो व म्हणूनच व्यक्तीचा अंह सामान्यत: व बहुतांशी अबोध असतो, असे फ्रॉइडने म्हटले आहे.

अहंच्या कार्याची यर्थाथ कल्पना येण्यासाठी, व्यक्तिमानसात घडून येणाऱ्या आणखी एका घटनेचा उल्लेख आवश्यक आहे. लहानपणी मातापिता व मातृपितृसम इतर व्यक्तींशी बालकाचे मानस तादात्म्य पावत असते, त्यांचे अनुकरण केले जात असते आणि समाजसंस्कृतीशी सुसंगत असे विधिनिषेधात्मक वळणही त्यास लागत असते. परिणामी वर्तनाचे मानदंड व आदर्श बालमनात विणले जात असतात व अशा रीतीने व्यक्तिमानसामध्ये आदर्शनिष्ठतेचे अंग अस्तित्वात येते. हे अंग म्हणजेच पराहं किंवा सदसद्विवेकबुद्धी होय. ही घटनादेखील अजाणताच घडून येत असते व म्हणून फ्रॉइडने म्हटले आहे, की व्यक्तीच्या पराहं हादेखीली सामान्यत: व बऱ्याच अंशी अबोध पातळीवर असतो. 

आता व्यक्तीच्या अहंच्या कार्याची कल्पना येईल. स्वभावत: डोळस नसलेल्या प्रेरणांना विषयाभिमुख करणे, वास्तवाचे चित्रही सतत मनात बाळगणे, प्रेरणांना योग्य दिशा देणे, त्यांचे बलाबल पाहून त्यांचे नियमन करणे, त्याबरोबच श्रेष्ठ अहंच्या विधिनिषेधात्मक आदेशांचे उल्लंघन न करणे आणि म्हणून क्वचित प्रसंगी प्रेरणांचे केवळ निरोधन नव्हे, तर दमन करणे या सर्व गोष्टी व्यक्तिमत्त्वाचा अहंनामक घटक करू पाहत असतो. परंतु अधीर प्रेरणांचे विचारपूर्वक सारथ्य व अहमादर्शाची म्हणजे पराहंची ताबेदारी हे दुहेरी कठीण कार्य प्रत्येक व्यक्तीस नेहमीच जमते, असे नाही. ते जमले नाही तर परिणामी मानसिक ताण, न्यूनतेचा व अपराधित्वाचा भावा आणि चिंतास्थिती या गोष्टी उत्पन्न होतात व मानसविकृतीची लक्षणेही दिसू लागण्याचा संभव असतो. कधीकधी दमन केल्या गेलेल्या प्रबळ प्रेरणांचा सवता सुभा निर्माण होतो व व्यक्तिमत्व दुभंगते. कधीकधी तर व्यक्तिमत्त्वाचे विघटनही होऊ लागते.

पहा : मनोविश्लेषण.

अकोलकर, व. वि.