साहचर्यवाद : (असोसिएशनिझम). मानसशास्त्रातील एक विचारप्रणाली. जेव्हा वस्तू, घटना आणि व्यक्ती ह्यांच्याशी संबंधित अशा पूर्वानुभवांमध्ये परस्परसंबंध प्रस्थापित होऊन त्यांची एक शृंखला बनते, तेव्हा त्यांच्यामधील ह्या परस्परसंबंधांना ‘साहचर्य’ असे म्हणतात. उदा., मेघांच्या गडगडाटानंतर विजांचा लखलखाट होतो. पाव हा शब्द आठवला, की लोणी, चहा असे पावाशी संबंधित असलेले शब्द तत्काळ आठवतात. त्याचप्रमाणे एखाद्या फळांच्या दुकानात फळीवर रचून ठेवलेली संत्री आपण पाहतो, तेव्हा आपल्याला त्यांचा केवळ रंगच दिसतो परंतु हे रंगाचे संवेदन होताच, ती फळे संत्री आहेत, मोसंबी नाहीत, असा अर्थबोध आपणास त्वरित होतो. एवढेच नव्हे, तर ती फळे हिरवी आणि लहान नाहीत, हे पाहताच ती गोड असावीत असेही आपल्याला वाटते. याचा अर्थ, संत्र्यांचा रंग पाहताच त्यांच्या काही गुणधर्मांशी (वास, चव इ.) संबंधित असे आपले पूर्वानुभव जागृत होऊन आपण पाहात असलेली फळे ही संत्री असून ती गोड असावीत, असे अनुमान आपण काढतो. संत्र्यांचा रंग आणि त्यांचे इतर गुणधर्म ह्यांच्याशी संबंधित असलेले आपले पूर्वानुभव येथे जोडले जाऊन त्यांची एक शृंखला बनते आणि त्यांच्यात साहचर्याचे संबंध निर्माण होतात. अशा साहचर्य-संबंधांचा ज्ञानप्राप्तीत आणि अध्ययनप्रक्रियेत महत्त्वाचा भाग असतो, असे साहचर्यवादाच्या पुरस्कर्त्यांचे म्हणणे आहे.

साहचर्यवादाच्या इतिहासातले काही महत्त्वाचे टप्पे असे : प्लेटोच्या (इ. स. पू. सु. ४२८– सु.३४८) संवादांत फीडो हा जो संवाद आहे, त्यात प्लेटोने साहचर्याचा विषय आणला आहे. अध्ययन म्हणजे स्मरण असे म्हणून आपल्या अनुभवांत ज्या गोष्टी अनेकदा संयोगित वा जोडलेल्या असतात, त्या परस्परांची स्मृती पुनरुज्जीवित करतात, असे प्रतिपादन केले आहे. उदा., जे नेहमी परस्परांबरोबर असतात, अशा दोन मित्रांपैकी एकाचे दर्शन झाले, की दुसऱ्याची आठवण स्वाभाविकपणेच होते, तसेच साधर्म्ययुक्त गोष्टी वैधर्मी स्मरण करून देतात. साहचर्यकल्पनेचा हा एक प्राचीन आविष्कार होय. प्लेटोनंतर त्याचा शिष्य ⇨ ॲरिस्टॉटल (इ. स. पू. ३८४–३२२) ह्याने सान्निध्य, सारखेपणा, वैधर्म्य किंवा विरोध इत्यादींतून साहचर्यसंबंध कसे प्रस्थापित होतात आणि ज्ञान कसे प्राप्त होते, याचे विवेचन केले. विख्यात स्कोलॅस्टिक तत्त्वज्ञ ⇨ टॉमस अक्वाय्‌नस (१२२५ ?–७५) ह्याच्या मतानुसार आपण ज्या गोष्टी अनुभवतो, त्या स्वभावतःच परस्परांशी साधर्म्य असलेल्या, परस्परांशी विरोध असलेल्या किंवा परस्परांशी सामीप्य असणाऱ्या अशा असतात. आपल्या स्मृतीत हे अनुभव त्याच बंधांनी म्हणजे साधर्म्य, विरोध आणि सामीप्य यांनी परस्परांशी निगडित झालेले असतात. ⇨ रने देकार्त (१५९६–१६५०) या आधुनिक तत्त्वज्ञानाच्या जनकाने मन आणि शरीर ह्यांच्यातील निकटचा संबंध दाखविण्यासाठी साहचर्यावर आधारित युक्तिवाद केला होता. ⇨ टॉमस हॉब्ज (१५८८–१६७९) हा देकार्तचा समकालीन होता. तत्त्वज्ञानाच्या ब्रिटिश परंपरेत त्याने साहचर्याच्या संकल्पनेचा पद्घतशीर उपयोग करून घेतला. साधर्म्य, स्थळकाळाचे सामीप्य तसेच कार्यकारण ह्यांतून साहचर्याचे महत्त्वाचे प्रकार निर्माण होतात, असे प्रतिपादन त्याने आपल्या ह्यूमन नेचर ऑर, द फंडमेंटल् एलिमेंट्स ऑफ पॉलिसी (१६५०) ह्या ग्रंथात केले. ब्रिटिश तत्त्वज्ञ ⇨ जॉन लॉक (१६३२–१७०४) ह्याने असे प्रतिपादले, की समग्र ज्ञान हे कल्पना आणि त्यांचे परस्परांशी असलेले संबंध ह्यांनी बनलेले असते. ज्ञान म्हणजे आपल्या कल्पनांमधील संवाद आणि विसंवाद यांचे किंवा अनुबंध आणि प्रतिबंध (विरोध) यांचे आकलन होय. काही कल्पनांमध्ये तार्किकीय अनुबंध असतात, तर काही परस्परविरुद्घ असतात, हे ओळखणे म्हणजे ज्ञान. मानसशास्त्र आणि ज्ञानशास्त्र ह्यांत ⇨ जेम्स मिल (१७७३–१८३६) ह्याने साहचर्यवादाचा पुरस्कार केला. त्याच्या मते आपल्याला लाभणाऱ्या संवेदना ह्या मूलतः मानसिक घटना असून जेव्हा अनेक संवेदना सतत एका कालीच प्राप्त होतात, तेव्हा त्यांचे परस्परांत साहचर्य निर्माण होते, तसेच एकामागून दुसरी ह्या क्रमाने ज्या संवेदना प्राप्त होतात, त्यांच्यातही साहचर्य प्रस्थापित होते. सर्व मानसिक घटनांच्या स्वरूपाचे स्पष्टीकरण संवेदना आणि त्यांच्यातील साहचर्य ह्यांच्या साहाय्याने करता येते. मिलने शिक्षणाबद्दलचा विचारही मानसिक साहचर्यावर आधारला. शिक्षणाने व्यक्तीच्या मनात अशी साहचर्ये निर्माण केली पाहिजेत, की ज्यांच्या योगे व्यक्तीचे स्वतःचे आणि समाजातील अन्यांचे सुख वृद्घिंगत होईल.

अठराव्या शतकात ⇨ डेव्हिड ह्यूम (१७११–७६), ⇨ डेव्हिड हार्टली (१७०५–५७) एकोणिसाव्या शतकात ⇨ अलेक्झांडर बेन (१८१८–१९०३) आणि ⇨ हर्बर्ट स्पेन्सर (१८२०–१९०३) यांनी साहचर्यवादाचा पुरस्कार केला. विसाव्या शतकात अध्ययनप्रक्रियेचे स्पष्टीकरण देण्यासाठी साहचर्यवादाचा खूप उपयोग करण्यात आला. विख्यात अमेरिकन मानसशास्त्रज्ञ व शिक्षणशास्त्रज्ञ ⇨ एडवर्ड थॉर्नडाइक (१८७४–१९४९) ह्याच्या विचारांवरही साहचर्यवादाचा मोठा प्रभाव पडलेला आहे.

अध्ययनाच्या क्षेत्रात साहचर्यवादाचे महत्त्व बहुतेक मानसशास्त्रज्ञ मान्य करीत असले, तरी एक सर्वस्पर्शी स्पष्टीकरण देणारे तत्त्व म्हणून त्याचा स्वीकार करण्याच्या भूमिकेवर टीका झालेली असून तिचा काही भाग समर्थनीयही आहे.

स्मरण, अध्ययन इ. मानसिक प्रकियांचे स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर ‘साहचर्यामुळे पूर्वानुभव पुनरुज्जीवित होणे’ हे तत्त्व त्यात अंतर्भूत आहे, असे साहचर्यवादाचे पुरस्कर्ते म्हणतात पण काही उच्च मानसिक प्रकियांचा कार्यभाग ज्यांच्यात महत्त्वाचा मानला जातो, अशा काही घटना इतक्या जटिल असतात, की काही ठरावीक पूर्वानुभव आणि त्यांच्यातील साहचर्यामुळे ते पुनर्जीवित होणे, हे स्पष्टीकरण त्यांचे स्वरूप विशद करण्यास असमर्थ ठरते.

कुळकर्णी, अरुण देशपांडे, चंद्रशेखर