म्युन्स्टरबर्ग, ह्यूगो : (१ जुन १८६३–१६ डिसेंबर १९१६). शिक्षक, वैद्यक, कायदा, उद्योगधंदे, समाजशास्त्र इ. व्यावहारिक क्षेत्रांत सर्वप्रथम मानसशास्त्राचे उपयोजन करणारे जर्मन मानसशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म सध्याच्या पोलंडमधील गदान्यस्क (म्हणजे तेव्हाच्या प्रशियातील डॅन्झिग) येथे झाला. लाइपसिक विद्यापीठातून ⇨ व्हिल्हेल्म व्हुंट यांच्या मार्गदर्शनाखाली १८८५ मध्ये त्यांनी तत्त्वज्ञानात पीएच्‌. डी. घेतली आणि १८८७ मध्ये हायडल्‌बर्ग विद्यापीठातून वैद्यकातील एम्‌. डी ही पदवी घेतली. १८८७–९१ मध्ये फ्रायबर्ग विद्यापीठात अध्यापन करत असतानाच त्यांनी तेथे प्रायोगिक मानसशास्त्राची प्रयोगशाळा उभारून संशोधनकार्याही सुरू केले. त्यांच्या ह्या कार्यावर जर्मनीत बरीच टीका झाली पण अमेरिकेत त्याचे चांगले स्वागत झाले. ⇨ विल्यम जेम्स यांनी त्यांच्या कार्याचे महत्त्व ओळखून त्यांना हार्व्हर्ड विद्यापीठात मानसशास्त्राचे प्राध्यापक आणि मानसशास्त्रीय प्रयोगशाळेचे संचालक म्हणून येण्याचे निमंत्रण दिले. त्यानुसार ते तेथे गेले. १९१०–११ या एक वर्षाचा बर्लिन विद्यापीठातील अध्यापनाचा अपवाद सोडता उर्वरित संबंध आयुष्य त्यांनी हार्व्हर्ड येथेच व्यतीत केले. पहिल्या जागतिक महायुद्धाचा त्याच्या मनावर बराच ताण आला. केब्रिंज (मॅसॅचुसेट्‌स) येथील रॅडक्लिफ महाविद्यालयात व्याख्यान देत असतानाच मेंदूतील रक्तस्त्रावाने वयाच्या अवघ्या त्रेपन्नाव्या वर्षी त्यांचे निधन झाले.

म्युन्स्टरबर्ग यांना मुख्यत्त्वे तत्त्वज्ञानात विशेष रुची होती. त्यांची तात्त्विक विचारसरणी ‘संकल्पशक्तिवादी चिद्‌वाद’ (व्हाल्युंटरी आयडियालिझम) म्हणून ओळखली जाते. त्यांनी तत्त्वज्ञान व विज्ञान असे दोन स्वतंत्र भाग मानून तत्त्वज्ञान हे हेतूंचे ‘वास्तव विश्व’ आहे, तर विज्ञान हे कारणांपुरतेच मर्यादित आहे, असे प्रतिपादन केले. नंतर त्यांनी मानसशास्त्राचे ‘कारणात्मक मानसशास्त्र’ आणि ‘हेतुयुक्त मानसशास्त्र’ असे दोन प्रकार कल्पिले. त्यांच्या ह्या विचारास तसेच त्यांच्या कृतिसिद्धांतासही (ॲक्शन थिअरी) फारसे महत्त्व प्राप्त झाले नाही. मानवी मुल्यांवर त्यांनी विशेष भर दिला. वैज्ञानिक पद्धतीची कास धरल्यामुळे प्रायोगिक मानसशास्त्रास ते गती देऊ शकले. अनुप्रयुक्त मानसशास्त्रावर त्यांचा चिरंतन ठसा उमटलेला आहे.

हार्व्हर्डमध्ये आल्यापासून त्यांनी आपला सर्व वेळ अध्ययन, अध्यापन आणि संशोधन यांत व्यतीत केला. सुरुवातीस त्यांनी मुख्यत्त्वे प्रायोगिक मानसशास्त्राय संशोधनास स्वतःस वाहून घेतले. १९०० नंतर मात्र ते अनुप्रयुक्त मानसशास्त्राकडे अधिकाधिक वळले आणि त्यांनी ह्या क्षेत्रात अत्यंत मोलाची भरही घातली. अनुप्रयुक्त मानसशास्त्राचे ते प्रवर्तक मानले जातात. अनेक विषयांतील संशोधनात त्यांना रुची होती, तथापि मानसशास्त्राचे उपयोजन औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रांत दाखविण्यावर त्यांनी विशेष भर दिला. १९१० मध्ये त्यांनी खूप परिश्रम घेऊन व्यावसायिक निवडीसाठी आवश्यक असलेल्या अभिवृत्ती कसोट्या प्रमाणित केल्या. औद्योगिक व व्यावसायिक मानसशास्त्रावर त्यांनी महत्त्वाचा ग्रंथही प्रसिद्ध केला. मानसचिकित्सेत त्यांनी सर्वप्रथम सूचन व संमोहन यांचा वापर केला. न्यायवैद्यकाच्या क्षेत्रातही त्यांनी मुलभूत महत्त्वाचे कार्य केले.

जर्मन व इंग्रजी या दोन्ही भाषांत त्यांचे लेखन असून त्यांचे उल्लेखनीय ग्रंथ पुढीलप्रमाणेः सायकॉलॉजी अँड लाइफ (१८९९), ऑन द विटनेस स्टँड (१९०८), सायकॉलॉजी अँड द टीचर (१९०९), सायकोथेरपी (१९०९), सायकॉलॉजी अँड इंडस्ट्रीयल एफिशियन्सी (१९१३), सायकॉलॉजी : जनरल अँड अप्लाइड (१९१४) इत्यादी.

पहा : औधोगिक मानसशास्त्र मानसशास्त्र, अनुप्रयुक्त.

संदर्भ : Munsterberg, Margarete, Hugo Munsterberg : His Life and Work, New York, 1922.

खंडकर, अरुंधती