फॅशन: फॅशन हा एक वर्तनप्रकार आहे. तिचा संबंध वेशभूषा, आभूषणे, सजावट, फर्निचर, गृहरचना यांच्याशी असतो. विचारसरणीच्या बाबतीतही फॅशनचा प्रभाव दिसून येतो. फॅशनवरून व्यक्तीचे समाजातील स्थान, तिचा दर्जा लक्षात येऊ शकतो. शैली किंवा स्टाइल कलेसंबंधी असते. शैलीतून सौंदर्यरचना, सौंदर्यनिर्मिती प्रकट होते. एखादी गोष्ट ठराविक कालावधीकरिता फारच प्रचलित असते, उदा., एखादा सजावटीचा प्रकार. अभिरुची ही मूल्यासंबंधी असते. यात आत्मनिष्ठ निर्णयाला अधिक महत्त्व असते. काही रंग डोळ्यांना सुखावतात म्हणून त्यामध्ये अभिरुची असते, तर केवळ फॅशन म्हणूनही काही रंग निवडले जातात. कधीकधी फॅशनमध्ये अभिरुची आढळते, तर कधी तिला मुरड घालावी लागते. कित्येक वेळा असे हाते, की एका समूहात फॅशन कालबाह्य झालेली असते, तर तीच दुसऱ्या समूहात लोकप्रिय असते.

 

फॅशन हा एक सामूहिक वर्तनप्रकार आहे. नेतृत्व, व्यापक सूचन, सामाजिक सुलभीकरण, विवेकी आणि अविवेकी घटक त्यात अंतर्भूत असतात. फॅशनमुळे अभिवृत्ती आणि कृती यांत झपाट्याने बदल होतो. फॅशनचे अनुकरणदेखील फार झपाट्याने होते. फॅशनमध्ये मान्यतेचा आणि अमान्यतेचा अंश असतो. त्यात भावनिकता समाविष्ट असते. तथाकथित सद्‍वर्तनी (मॉरलिस्ट) व्यक्ती फॅशनकडे काहीशा उपहासाने पाहते, तर सामान्य माणसाला त्याचे काहीच वाटत नाही. फॅशन आणि ⇨ खूळ (फॅड) यांच्यात फरक आहे. खूळ हे व्यक्तिविशिष्ट असते व ते कित्येकदा समाजमान्य नसते. खूळ काही ठराविक लोकांपुरतेच मर्यादित असते, तर फॅशन ही मोठ्या जनसमूहाची प्रातिनिधिक असते. एखाद्या फॅशनविरहित व्यक्तीत काही आगळी  अभिरुची दिसत असेल, तर ते खूळ समजावे. त्यात अनपेक्षितता, बेजबाबदारपणा असतो आणि ते अल्पजीवीही असते.

 

फॅशन आणि ⇨ रूढी ह्यांतही फरक आहे. रूढी ह्या कायमस्वरूपी असतात. सामाजिक वर्तनामध्ये त्या मोडतात. त्या लवकर बदलत नाहीत. रूढींच्या बदलात व्यक्तीचा कार्यभाग फारच थोडा असतो. मानवी संबंधांमध्ये रूढी महत्त्वाचे कार्य करतात. काहीतरी वेगळे करण्याची प्रवृत्ती फॅशनमध्ये असते. कित्येक वेळा फॅशन इतकी रूढ होते, की तिचे रूपांतर कालांतराने रूढीत होते. फॅशनचा विचार संस्कृतीच्या व्यापक संदर्भात केला पाहिजे. रूढी  आणि ⇨ परंपरा यांच्या तुलनेत फॅशन्स बऱ्याच अस्थिर असतात आणि त्या अल्पकाल टिकतात. रूढीतील बदल अतिशय मंदगतीने होतो. नीतिनियम आणि कायदेशीर वर्तन यांच्याशी रूढीचा संबंध असतो, म्हणून त्या अधिक स्थिर असतात. सातत्य आणि वर्तनातील मानदंडांमुळे (नॉर्म्स) त्या दृढ होतात. फॅशनची निर्मिती होत असताना ती कायदा आणि नीतिनियमांच्या कक्षेच्या बाहेर जाऊ शकत नाही. कपडे घातलेच पाहिजे हा दंडक आहे (रूढी) पण ते कसे व कोणते वापरावेत हे फॅशनवर अवलंबून राहील. फॅशन ही एका प्रकारे सामाजिक कर्मकांड आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. गेल्या शतकात जपानमध्ये खाणे-पिणे, पेहराव करणे, घरे बांधणे यांबाबत अत्यंत कडक नियम होते, त्यामुळे तेथे फॅशन जवळजवळ नव्हतीच.

 

बहुतेक सर्वसामान्य व्यक्तींमध्ये आपण काहीतरी वेगळे करावे, रूढींचे दास असू नये अशी जाणीवपूर्वक अथवा नेणीवपूर्वक इच्छा असते. त्यामध्ये प्रचलित रूढींविरूद्ध बंड करण्याची प्रवृत्ती नसते, तर वैयक्तिक वेगळेपण दाखविण्याची इच्छा असते. मात्र असे करताना तथाकथित उच्च अभिरुची आणि सद्‍वर्तनाला धक्का पोहोचणार नाही इतकी काळजी व्यक्ती घेते. व्यक्तीच्या अंतर्गत सूक्ष्म अशा संघर्षांतून बाहेर पडण्याचा फॅशन हा एक मार्ग आहे. पोशाखात किंवा रहाणीमानात केलेला किंचितसा बदल व्यक्तीला विजयाचा आनंद मिळवून देतो. आपल्यासारखे इतरही ‘तसे’ करावयास प्रवृत्त होतात ह्या जाणिवेने ती अधिकच समाधानी होते. व्यक्तिवैशिष्ट्ये (इंडिव्हिज्युॲलिटी) आणि सामाजिक अनुसरण (कन्फॉर्मिटी) यांचा समन्वय फॅशनमध्ये अभिप्रेत असतो. फॅशनमधील मानसिक गुंतवणुकीत व्यक्तीला स्वारस्य नसते, तर आपण इतरांसारखे असावे ह्या भावनेतून फॅशनचा स्वीकार केला जातो. तसे न केल्यास आपण प्रतिगामी व सनातनी गणले जाऊ अशी तिला भीती वाटते.

 

फॅशनची निर्मिती आणि तिचा स्वीकार आणि प्रसार अनेकविध कारणांतून होतो. प्रगत अशा समाजामध्ये भरपूर फावला वेळ उपलब्ध असल्यामुळे आणि अतिविशिष्ट साचेबंद कामाच्या आधिक्यामुळे अस्वस्थता, उबग निर्माण होते. त्यातून काहीतरी नवीन करण्याची ऊर्मी प्रकट होते. संथ साचेबंद जीवन नकोसे झाल्यामुळे फॅशन निर्माण होते. प्रबल अशा समाजामध्ये व्यक्तीचा अहम् (एगो) दबला जातो. आपले ‘मीपण’ (स्वत्व) पुन्हा प्रस्थापित व्हावे ही भावना त्यामागे असते. आपणही कोणीतरी आहोत असे दाखवण्याची ईर्षा त्यामागे असू शकते. मात्र असे करताना प्रचलित व्यवस्थेपासून फारच दूर गेल्यास, त्या व्यक्तीचे समाजाशी असलेले संबंध ताणले जाण्याचा, तुटण्याचा संभव असतो. म्हणूनच फॅशनचा स्वीकार सावधानतेने केला जातो. राजेशाहीचा अस्त झाल्यामुळे आणि लोकशाहीचा प्रभाव वाढून सामान्य माणसाला महत्त्व प्राप्त झाल्यामुळे फॅशन ही आज कोणा एका वर्गांची मक्तेदारी राहिली नाही. तिचा प्रसार समाजाच्या सर्व थरांमध्ये होतो. मात्र फॅशन प्रथम वरिष्ठ वर्गात निर्माण होते व हळूहळू कनिष्ठ वर्गात ती झिरपते. फॅशनचा संबंध प्रतीके, सुव्यवस्था आणि ऐहिक मूल्यांशी आहे. धर्म, राज्यशासन, कायदा इत्यादींचे नियंत्रण जसे सुनिश्चित वा सुनिर्धारित व विधिनिषेधात्मक असते, तसे फॅशनचे नसते. फॅशन न करणारी व्यक्ती सामाजिक बहिष्कारास किंवा इतर कोणत्याही शिक्षेस पात्र समजली जात नाही. व्यक्ती फॅशन स्वीकारतात त्या ती शिक्षेच्या भीतीमुळे नव्हे, तर आपण चारचौघांहून निराळे दिसावे ह्या इच्छेमुळे.

 

कित्येक वेळा प्रतिष्ठा, प्रसिद्धी, लोकप्रियता मिळवण्यासाठीही फॅशनमध्ये परिवर्तन घडविले जाते. एखाद्या मान्यवर समूहाचे सदस्यत्व आपल्याला मिळावे ही सुप्त इच्छा तिच्यामागे दडलेली असते. आपला सामाजिक दर्जा आणि आपल्यापेक्षा श्रेष्ठ दर्जा ह्यांच्यातील दरी कमी करण्यासाठी, त्यांच्यातील दुवा जोडण्यासाठी फॅशनचे अनुकरण केले जाते. फार मोठ्या संख्येने फॅशनचा स्वीकार झाल्यास तिचे आगळेपण संपते आणि ती फॅशन रहात नाही. अशा वेळी नव्या फॅशनच्या निर्मितीची वेळ समीप आलेली असते. म्हणूनच फॅशन अस्थिर समजली जाते.

 

एके काळी चमत्कारिक, अस्ताव्यस्त, गबाळी वाटणारी शैली कालांतराने सुंदर वाटू लागते. अभिरुचीतदेखील विवेकापेक्षा भावनिक आणि अविवेकी आव्हान अधिक वरचढ असते. फॅशनला काही इतिहास असतो. आपल्याकडील स्त्रियांची केशभूषा व अजिंठ्याच्या लेण्यातील केशभूषा ह्यांत कोठेतरी समान धागा आढळतो. मागच्या पिढीने जे काही केले त्यापेक्षा काहीतरी वेगळे करून दाखवण्यात फॅशनचा आशय दडलेला असतो. संस्कृती आणि सामाजिक आदर्श यांवर फॅशनमधील बदल अवलंबून असतात. संस्कृतीच्या अथांग पातळीखाली प्रभावी असे मानसिक प्रवाह दडलेले असतात त्यांना वाट हवी असते. एखाद्या लोकशाहीप्रधान समाजात अस्पष्ट अशी वर्गविग्रहाची भावना दडलेली असते. ती प्रकट करण्यासाठी फॅशनचा आश्रय घेतला जातो. समजा एखाद्या समाजात नैतिकतेला खूप महत्त्व असेल, तर लैंगिक जिज्ञासेला वाट करून देण्यासाठी निरनिराळ्या फॅशन्स अस्तित्वात येतात. एखाद्या फॅशनचा संपूर्ण इतिहास तपासता आला, तर लोकांच्या भावना आणि अभिवृत्ती कसकशा बदलत गेल्या, त्यांत कसे चढउतार झाले हे समजून येते. मात्र फॅशनचा स्वीकार करताना नैतिकता अजिबात गुंडाळून ठेवली जाते असे नव्हे. स्त्रियांच्या वस्त्राची लांबी कितीही कमी झाली, तरी ती मर्यादेपर्यंतच, लांब बाह्याच्या चोळ्या जाऊन बिनबाह्याची पोलकी आली पण त्या पलीकडे जाता आले नाही. म्हणून पुन्हा बाह्यांची लांबी वाढत गेली. यालाच फॅशनची चक्राकारता म्हणता येईल. किंब्‌ल यंग यांची केशभूषा व वेशभूषा यांच्या चक्राकारतेबाबतची उपपत्ती अशी, की मानवी शरीराची रचनाच अशी आहे, की शरीराशी संबंधित असलेल्या संभाव्य फॅशन्सची संख्या ही मर्यादितच राहणार.


कधीकधी फॅशनचा उपयोग व्यक्ती स्वतःच्या उणिवा वा वैगुण्ये झाकण्यासाठी किंवा त्यांची भरपाई (कॉम्पेन्सेशन) म्हणून करतात. केश व वेशभूषेच्या बाबतीतील फॅशन्सच्या मुळाशी भिन्नलिंगी व्यक्तीचे लक्ष वेधून घेण्याची इच्छा अर्थात कामप्रेरणा असावी, असे काहींचे मत आहे. या मतात तथ्यांश असला, तरी ते एकमेव स्पष्टीकरण नव्हे.

 

करोडो रुपये खर्च करून फॅशनची निर्मिती होते, तिच्या जाहिरातीसाठी अमाप पैसा खर्च होतो म्हणून उत्पादक, फॅशनचे रचनाकार आणि विक्रेते हेच फॅशनचे निर्माते असतात, असा अर्थशास्त्रज्ञांचा दावा आहे. वास्तविक वरिष्ठ वर्गाचे अनुकरण करण्याच्या प्रवृत्तीतून कनिष्ठ वर्गातील लोक नवीन फॅशनचा माल खरेदी करतात. फॅशनच्या सतत बदलामुळे तिची उपयुक्तता कमी होते व फॅशन झपाट्याने बदलते. आत्मगौरवाच्या प्रेरणेतून, आलंकारिकतेच्या लालसेतून, फॅशनचा प्रादुर्भाव होतो. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ जे. सी. फ्‍लूगेल यांच्या मते आकर्षण आणि लज्जारक्षण हा फॅशनचा पाया होय. शरीराचा कोणता भाग उघडा ठेवायचा आणि कोणता झाकावयाचा ह्यावर विनयशीलता (मॉडिस्टी) अवलंबून असते. त्यात सामाजिक दडपणाचा भागदेखील असतो. फॅशनमुळे व्यक्तिमत्व उठावदार दिसते. मात्र त्यासाठी काही तडजोडही करावी लागते. आत्मप्रदर्शनाची (एक्झिबिशनिझम) हौसही त्यातून भागते.

 

आत्मविस्तार (इक्स्टेन्शन ऑफ सेल्फ) हे एक फॅशनचे आवाहन आहे. कपडे (वेशभूषा) हे त्याचेच एक अंग होय. दैनंदिन जीवनातील तोचतोचपणा घालविण्यासाठी, निराश मनोवृत्तीतून मुक्त होण्यासाठी, मानसिक व शारीरिक व्यंग झाकण्यासाठी, आत्मप्रौढीसाठी (व्हॅनिटी) आणि सामाजिक मान्यतेसाठी फॅशनमध्ये सतत बदल आवश्यक असतात. आधुनिक समाजात फॅशनने एक नवीन परंपरा निर्माण केली आहे. त्यात एक नवा अनुभव, एक नवी जाणीव, एक नवा आविष्कार एक नवा दिमाख अंतर्भूत असतो. एखादी व्यक्ती काळाच्या बरीच पुढे असते, ती नवी शैली निर्माण करते, तिचे कौतुक होते. अमान्यतेपासून मान्यतेकडे वाटचाल सुरू होते. इतरांना वैषम्य वाटू लागते आणि त्यातून इतर लोकांच्या प्रवृत्तींत नकळत बदल होतो. तरुण पिढीत मोहकपणाचे आकर्षण जात्याच असते. गेओर्ख झिमेल (१८५८-१९१८) ह्या जर्मन समाजशास्त्राच्या मते अनुसरण आणि अलिप्तता (आयसोलेशन) या दोन सामाजिक प्रवृत्ती होत. त्यांपैकी एक जरी नसेल, तरी फॅशन निर्माण होणार नाही.

 

कोणतीच फॅशन संपूर्णतः प्रचलित होऊ शकत नाही, कारण त्यात आगळेपणाचा लोप होतो. सुरक्षितता, दृढता आणि अनुसरण यांच्या सोबतच व्यक्तीभेदालाही फॅशनमध्ये महत्त्व आहे. फॅशनमध्ये आत्मविस्ताराचा मोठा भाग असतो. कपडे घालण्यामागे शरीर संरक्षणाचा भाग असला, तरी आरोग्यशास्त्रदृष्ट्याही त्याला महत्त्व आहे. माणसाची नम्रता, विनयशीलता ही त्याची सहजप्रवृत्ती होय. त्यामुळेच तो गुप्त अवयवांचे प्रदर्शन करीत नाही.

 

हल्लीचे झपाट्याने बदलणारे जीवनमान आणि वरपांगी सामाजिक संबंध ह्यांमुळे फॅशन्स अधिकच अस्थिर होत आहेत. लोकांना काय हवे आणि काय नको ही दूरदृष्टी ठेऊन, त्यांच्या वासनेला चाळवून, जाहिरातीच्या माध्यमाचा व्यापक उपयोग करून उत्पादक आणि फॅशन्सचे रचनाकार फॅशन्सची निर्मिती आणि प्रसार करतात. धडाडी, प्रतिष्ठा आणि समाजमान्यता यांना आव्हान केले जाते. सामाजिक नियंत्रणाची तत्त्वे अंमलात आणण्याचा तो बुद्धिपूर्वक प्रयत्न असतो.

 

पुरुषांच्या फॅशनचा विचार केल्यास मोठेमोठे धनिक, विलासी लोक फॅशनच्या मागे असतात. चैनी , विलासी वृत्ती, भरपूर खर्च करण्याची ऐपत यांमुळे या वर्गात फॅशनचा लवकर प्रसार होतो. त्यांच्या स्वतःच्या फॅशन्स मात्र मर्यादित असतात. ते आपल्या स्त्रिया अधिक आकर्षक, मोहक दिसाव्या यासाठी वाटेल तेवढा खर्च करावयास तयार असतात. त्यात त्यांना प्रतिष्ठा वाटते. स्त्रियांच्या फॅशनमध्ये चंचलता अधिक असते. स्त्री काय करते यापेक्षा ती कशी आहे व कशी दिसते (इतरांच्या दृष्टीने) यांवर तिचे आकर्षण अवलंबून असते. त्यामुळे स्त्रियांच्या वेशभूषेत, केशरचनेत, सौंदर्यप्रसाधनात कमालीचे वैचित्र्य दिसते. पुरुषी जगात आपले न्यूनत्व झाकण्यासाठीही स्त्रियांना फॅशन उपयोगी पडते.

 

एखादी फॅशन चालू राहील की खंडित होईल, हे तत्कालीन सामाजिक-आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असते. स्पर्धा वरच्या स्तरावर जाण्याची धडपड फॅशनच्या प्रसाराला आणि परिवर्तनाला कारणीभूत होते. हुकूमशाही राजवटीत मात्र असा फारसा वाव नसतो. चीनमध्ये स्त्रीपुरुषांचे पोशाख जवळजवळ एकाच प्रकारचे आहेत, त्यात विविधता अशी नाहीच. मनातील न्यूनगंड झाकणे, प्रतिष्ठित वर्गाशी एकरूप होणे हाही फॅशनचा हेतू असतो.

 

आकार, रंगछटा, पोत ह्यांच्याशी संलग्न अशी स्पष्ट प्रतीके निश्चित माहीत नसल्यामुळे फॅशन समजावून घेणे अवघड होते. एका समूहात विशिष्ट प्रतीकांना जो अर्थ असतो, तो दुसऱ्या समूहात असत नाही त्यांचा त्या समूहात वेगळाही अर्थ असतो. रानटी टोळ्यांमध्ये वागण्याच्या तऱ्हा लवकर बदलत नाहीत, कारण त्यांच्या परंपरांना एक पावित्र्य असते, त्यात वैयक्तिक प्रकटीकरणाला फारच थोडा वाव असतो. म्हणून त्यांच्यात फॅशनचा जवळजवळ अभाव असतो.

 

आधुनिक समाजात नावीन्याची आवड झपाट्याने वाढत आहे. औद्योगिक क्रांती, राजेशाहीचा अस्त आणि सामान्य माणसाला आलेले महत्त्व यांमुळे फॅशन्सला अधिकच चालना मिळत आहे. दळणवळणाची साधने वाढल्यामुळे फॅशन्सच्या प्रसाराचे काम अधिक सुकर झाले आहे.

 

पहा : अलंकार केशभूषा पोशाख व वेशभूषा फॅशन-प्रदर्शन सौंदर्यप्रसाधने सौंदर्यसाधना.

 

संदर्भ : 1. Bergler, Edmund, Fashion and the Unconscious, New York, 1953.

           2. Flugel. J. C. Trans. The Psychology of Clothes, London, 1950.

           3. Hurlock E. B. The Psychology of Dress An Analysis of Fashion and Its Motive, New York 1929.

           4. Sills. D. L. Ed. International Encyclopaedia of the Social Sciences, Vol. 5. New York 1968.

           5. Young, A. B. Recurring Cycles of Fashion, 1760-1937. New York. 1937.

 

बोरूडे, रा. र.