मार्गदर्शन व सल्लामसलत: (गायडन्स अँड काउन्सेलिंग). कोणाही व्यक्तीच्या कमाल मर्यादेपर्यंत विकास, चांगले समायोजन आणि निसर्गत: व्यक्तीला ज्या क्षमता प्राप्त झालेल्या असतात त्यांचा अधिकाधिक अविष्कार होण्यासाठी जी सुसंघटित सेवा पुरविली जाते, त्या सेवेस मार्गदर्शन असे म्हणतात. व्यक्तीजीवनामध्ये कोणत्याही वयात मार्गदर्शनाची जरूरी असू शकते. लहानपणी शाळेमध्ये, तरूणपणी जीवनातील प्रश्न सोडविण्यासाठी, किंवा व्यवसाय निवडण्यासाठी व त्यात स्थिर होण्यासाठी, अगदी म्हातारपणी सभोवतालच्या मंडळींशी जमवून घेण्यासाठी अशा विविध प्रकारे मार्गदर्शनाची जरूरी असते. सामान्यतः मार्गदर्शन आणि सल्लामसलत या प्रक्रियांचा विचार शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने प्रामुख्याने करण्यात येतो. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये व्यक्तीगत विकासासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन, व्यवसाय मार्गदर्शन आणि त्याचबरोबर शैक्षणिक मार्गदर्शन अशा तीन प्रकारच्या मार्गदर्शनांची जरूरी असते.

अलीकडे शाळांत शिक्षकांना आणि कुटुंबांमध्ये वडिलधाऱ्या मंडळींना वेळ नसतो. चढाओढीच्या जगामध्ये व्यक्तीची सतत दुसऱ्याशी तुलना होत असते. गुंतागुंतीच्या सामाजिक परिस्थितीत व्यक्तीच्या भावनिक गरजा बदललेल्या आहेत. वाढत्या औद्योगिकरणामुळे आणि शहरीकरणामुळे विविध प्रकारच्या आव्हानांना व्यक्तीला सामोरे जावे लागते. बालगुन्हेगारी, प्रौढांचे अव्यवस्थित वागणे इ. कारणांमुळे काहींना परिस्थितीशी ⇨ अनुकुलन व समायोजन करणे अवघड जाते. अशा वेळेस मार्गदर्शनाची जरूरी भासते. शाळा-महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शनयंत्रणेमध्ये विद्यार्थ्यांची बुद्धिमता, विशेष कल, आवडनिवड, समायोजन, अभ्यासाच्या पद्धती इ. मोजणे शाळा-महाविद्यालयांबाहेरील क्षेत्रांत उपलब्ध असलेले अभ्यासक्रम आणि व्यवसाय यांची माहिती देणे मुलांच्या पात्रतेचा विचार करून त्यांना योग्य त्या अभ्यासक्रमाकडे किंवा व्यवसायाकडे पाठविणे विद्यार्थ्याना जेथे पाठविले असेल तेथे त्यांचे समायोजन योग्य तऱ्हेने होते किंवा नाही हे समजून घेणे आणि विद्यार्थिजीवनामध्ये व्यक्तीगत अडचण आल्यास त्याबाबत त्याला सल्लामसलत देणे या विविध गोष्टींसाठी अशा यंत्रणांची आवश्यकता असते.

शाळा-महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शनयंत्रणा स्थापन करताना प्रशिक्षित तज्ञ शिक्षकांची मार्गदर्शक म्हणून नेमणूक करावी लागते. इतर सहकारी शिक्षकांच्या साहाय्याने ते ही मार्गदर्शन व्यवस्था पाहतात. मुख्याध्यापक या बाबतीत त्यांना सल्ला देतात. मात्र जेव्हा व्यवसाय किंवा व्यक्तीमत्त्वविषयक विशेष प्रश्न निर्माण होतात, तेव्हा असे प्रश्न तज्ञांकडे सोपविले जातात. बहुतेक पाश्चिमात्य देशांमध्ये मार्गदर्शनयंत्रणा हा शालेय यंत्रणेचाच एक अविभाज्य भाग समजला जातो.

सल्लामसलत हा मार्गदर्शनयंत्रणेचाच एक आवश्यक भाग आहे. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आलेली अडचण सोडवण्यासाठी मोकळेपणाने व विश्वासाने केलेले साहाय्य म्हणजे सल्लामसलत होय. त्या दोघांमध्ये पूर्ण विश्वास असल्याखेरीज सल्लामसलत होऊ शकत नाही. सल्ला देणारा स्वतः प्रश्न न सोडविता ज्याला सल्ला दिला त्यास त्यास प्रश्न सोडविण्यास साहाय्य करतो. सल्ला मसलत ही प्रक्रिया सल्ला घेणारा व देणारा यांमध्ये विशेष आपुलकी आणि जवळीक प्रस्थापित होण्याची एक प्रक्रिया असते. या प्रक्रियेमार्फत ज्याला सल्ला दिला जातो तो आपल्या पायावर स्वतंत्रपणे उभा राहावा आशी अपेक्षा असते. ज्यांना व्यक्तीगतजीवनामध्ये तीव्र मानसिक समस्या निर्माण होतात अशा व्यक्तींना या बाबतीत मानसोपचारतज्ञांकडे पाठवावे लागते. किंबहूना मानसोपचारतज्ञ अधिक प्रमाणात सल्लामसलतशास्राचाच उपयोग करतात.

वाढत्या वयोमानाच्या व विकासाच्या विविध टप्पांवर व्यक्तीला अनेक गोष्टी कराव्या लागतात. बहुतेक व्यक्तींच्या बाबतीत त्या सहजपणे होतातही परंतू अनेकांना त्यांमध्ये काही अडचणी निर्माण होतात. अशा अडचणींच्या वेळेस मार्गदर्शनाची जरूर असते. शिक्षण घेताना शाळेमधील प्रवेश, पर्यायी ऐच्छीक विषयांची निवड, शाळेतील वातावरणाशी समायोजन, शाळेतील यशापयश, शिक्षणाचा एक टप्पा पुरा झाल्यानंतर पुढील शिक्षणक्रमाची निवड अशा विविध प्रश्नांच्या बाबतीत मुलांना मार्गदर्शनाची जरूर असते. शिक्षण पुरे झाल्यानंतर व्यवसायाची निवड, व्यावसायिक समायोजन, जोडीदाराची निवड, पतिपत्‍नीतील संबंध, कौटुंबीक जबाबदारीत सहभाग, म्हातारपणी तरूण मंडळींशी करावयाचे समायोजन अशा विविध प्रश्नांच्या बाबतीतही मार्गदर्शनाची जरूरी असते. आवश्यक तेव्हा योग्य ते मार्गदर्शन आणि सल्लामसलत मिळाल्यास जीवन सुसह्य व यशस्वी होते.

अनेक वेळा सामाजिक प्रसंगात अनेक व्यक्तींना एकाच वेळेस समान प्रश्नांना तोंड द्यावे लागते उदा., शाळेतील विद्यार्थ्यांचे शिस्तीचे प्रश्न, सैनिकांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न वगैरे. हे व तत्सम प्रश्न सोडविण्यासाठी सामूहिक सल्लामसलतीचे तंत्र वापरावे लागते.

फुरसतीचा वेळ कसा घालवावा, निरोगी लैंगिक जीवन कसे व्यतीत करावे, आर्थिक अडचणींना तोंड कसे द्यावे, सामाजिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांनी स्वतःची उन्नती कशी करून घ्यावी, स्रियांनी आत्मोद्धार कसा करून घ्यावा तसेच शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या अपंग व्यक्तींनी आपल्या प्रश्नांना तोंड कसे द्यावे इ. प्रश्नाबाबत वैशिष्ट्यपूर्ण आवश्यकता असते.

पहा : मनोदौर्बल्य मानसचिकित्सा मानसिक आरोग्य.

संदर्भ : 1. Bengalee, Mehroo, Guidance and Counselling, Bombay, 1984.

             2. Downing, L. N. Guidance and Counselling Services: An Introduction, New York, 1968.

             3. Jones, A. J. Steffire, Buford. Principles of Guidance, New York, 1970.

          ४. गोगटे, श्री. ब. पलसाने, म. न. माध्यमिक शाळेतील विद्यार्थी : मार्गदर्शन आणि समायोजन, पुणे, १९८४.

गोगटे, श्री. ब.