मुंडा : पूर्व भारतातील एक आदिम जमात. यांची वस्ती मुख्यत्वे बिहार राज्यात छोटा नागपूरच्या पठारी प्रदेशात विशेषतः पालामाऊ (डाल्टनगंज), हजारीबाग, रांची व सिंगभूम (छैबास) जिल्ह्यांत आढळते. १९७१ च्या जगणनेनुसार त्यांची लोकसंख्या ७, २३, १६६ होती. शारीरदृष्ट्या ही जमात सर्वसाधरण द्रविडवंशी असली, तरी तिची ऑस्ट्रो-आशियाई भाषासमूहातील मुंडारी भाषा कोलारियन ऊर्फ कोलवंशोद्भव मानली जाते. मुंडारी भाषेत विपूल कथा व गीते उपलब्ध आहेत तथापि शहरी संस्कृतीच्या संपर्कामुळे ही भाषा लोप पावत आहे. हो-संथाळ या कोलवंशी, त्याचप्रमाणे द्रविडी कंथ ऊर्फ खोंड या लोकांशीही त्यांचे साम्य आहे. मुंडा या शब्दाचा अर्थ भूमिपती असा असून ते स्वतःला हरोको (माणूस) आणि आपल्या वंशाला होरो (मानव) असे संबोधतात.
मुंडा लोकांच्या सृष्टी उत्पत्तीच्या कथा मनोरंजक आहेत त्यांपैकी एक कथेत त्यांच्यां जातीबद्दलची दैवतकथा आहे. तीत त्यांच्या आदिम सृष्टिकर्त्या देवता ओते बोराम व सिंगा बोंगा यांनी एक तरुण मुलगा आणि एक मुलगी तयार केली आणि त्यांना एका गुहेत कोंडून ठेवले. प्रथम त्यांना या कृतीचा उलगडा झाला नाही. देवांनी त्यांना तांदळाची दारू कशी करावी हे शिकवले. मद्य पिऊन उन्मत्त झाल्यावर त्यांच्या वासना तेवल्या व त्यांनी संभोग केला. त्यांना सहा मुलगे व सहा मुली झाल्या. त्यांच्या स्त्री-पुरुष अशा जोड्या सिंगा बोंगाने लावल्या. यांपैकी एका जोडप्याचे मुंडा हे वारसदार होत.
काळा, तपकिरी वर्ण, जाड ओठ, रुंद चेहरा व रुंद बसके नाक ही त्यांची काही द्रविडवंशी शारीरिक वैशिष्ट्ये असून बांधेसूद शरीर व ठेंगूपणा त्यांच्यात आढळतो. स्त्रिया साडी व पोलके आणि पुरुष धोतर व अंगरखा घालतात. स्त्रियांना दागिन्यांची आवड असून त्या कर्णफुले, हसली, वाळे व बांगड्या हे दागिने घालतात. मुंडा मुली कपाळ, हनुवटी, हात, पाय व पाठ यांवर गोंदून घेतात. मुंडांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून काही लोक शिकारही करतात. भात, मका, उडीद, कुळीथ ही पिके ते घेतात. भात हेच त्यांचे मुख्य अन्न आहे. हे लोक डोंगराच्या पठारावर झोपड्या बांधतात. एका कुटुंबाच्या दोन झोपड्या असतातः त्यांतील एक निजण्यासाठी आणि दुसरी स्वयंपाकासाठी. घराच्या भिंती मातीच्या अथवा बांबूच्या असतात व छप्पर कौलांचे असते.
मुंडांच्या भूमिज-मुंडा, खंगर-मुंडा, कोंकपाट-मुंडा या तीन मुख्य उपजमाती असून त्या संकरातून निर्माण झाल्या आहेत. मुंडांची समाजरचना कुळींवर (किलीवर) आधारित आहे. या कुळींना स्वतंत्र गणचिन्हे असून मुंडा आपल्या ध्वजांना फार जपतात. सणासुदीला वा सार्वजनिक समारंभाच्या वेळी हे ध्वज लावतात. या कुळी सु. ३२४ आहेत. ही नावे देवकपद्धतीप्रमाणे पडलेली आहेत आणि भारतातल्या इतर आदिवासींत मुंडांइतक्या कुळी क्वचितच आढळतात.
बहिर्विवाही कुळींत विवाह होतात. विशेषतः या जमातीत लहान लहान गावे एकमेकांपासून अलग असल्यामुळे व कुळींची संख्या मोठी असल्याने ग्रामबहिर्विवाहाची पद्धत प्रचलित आहे. बालवयात व क्वचित वयात आल्यानंतर वडिलधाऱ्या व्यक्तींकडून विवाह ठरविला जातो. बालविवाहाची प्रथा अद्यापि पूर्णतः नष्ट झालेली नाही. वधूमूल्याची प्रथा असून विवाह मुलीच्या घरी साजरा होतो. लग्नात वधूवरांनी एकमेकांच्या कपाळी शेंदूराचा टिळा लावणे (सिंदूरदान) हा विधी मुख्य विवाहविधी असतो. लग्नापूर्वी वधू व वर यांच्या घरी अंगणात मांडव आणि बोहले यांची स्थापना होते. बोहल्याच्या चारी कोपऱ्यांवर शालाच्या झाडाची रोपे लावून भिलावा व एक कळकाचे रोप यांनी सजवितात. लग्नापूर्वी तीन दिवस नवरा-नवरी आपापल्या घरी या बोहल्यावर बसतात. त्यांना मोहरीचे तेल-हळद लावून नाहू घालतात. लग्नाच्या आदल्या दिवशी ओ ऊर्फ चूनान हा विधी करतात. त्यानंतर वर वधूगृही मिरवणुकीने जातो. जाताना पहिल्या आंब्यापाशी तो थांबतो. झाडापुढे तो एक आकृती काढतो व त्याला दोऱ्याचा धागा गुंडाळतो. मुलाची आई गुडघे टेकून त्याला विचारते, ‘तू कुठे जातोस?’ मुलगा म्हणतो, ‘तुझी सेवा करील व तुला भातभाजी देईल असा माणूस आणायला मी जात आहे’. मुलीच्या गावाच्या सीमेवर तिच्याकडच्या सुवासिनी कळशांत पाणी घेऊन आंब्याच्या डाहाळ्याने ते वराच्या अंगावर शिंपडतात. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाला मेण्यातून मुलीच्या घरी नेतात. तिथे तो मुलीच्या अंगावर तीन मुठी तांदूळ उडवतो. त्या पालखीत मग वधू बसते आणि जवळच्या आम्रवृक्षाकडे जाते. त्याच्यावर तांदळाच्या भिजवलेल्या पिठाने एक मंगलचिन्ह काढते व त्याला सुत गुंडाळते. या विधीला उली-साखी ऊर्फ आम्रसाक्षी असे म्हणतात. हा वृक्ष तिच्या लग्नाला साक्षीदार असतो. मग वराकडच्या सुवासिनी वधूला आणि वधूकडच्या वराला तेल-हळद लावतात. मग वधूवर एकमेकांसमोर सालपायी ऊर्फ सालाच्या पत्रावळीवर त्या बोहल्याच्या मध्यभागी उभे राहतात. वधूचे मुख पश्चिमेला व वराचे पूर्वेला असते. त्यानंतर वर आपल्या डाव्या पायाने वधूचा उजवा पाय दाबतो व आपली सिनाई स्वतःच्या गळ्याला लावतो. मग ती सिनाई तिच्या गळ्याला लावतो. असे तो तीनदा करतो. मग त्यांच्या जागांची अदलाबदल होते. वधू आपली सिनाई आपल्या व वराच्या गळ्याला तीनदा लावते. सिंदूरदान होते आणि त्यांच्या पदरांच्या गाठी मारण्यात येतात आणि विवाहविधी पूर्ण होतो. अपहरण विवाह, हठागमन विवाह इ. विवाह प्रकार रूढ असून विधवा विवाह व घटस्फोट यांनाही जमातीत मान्याता आहे. वहुपत्नीकत्वही रूढ आहे.
पहिल्या गरोदरपणी गारासी बोंगा हा विधी करतात. गारासी बोंगा ही बालसंरक्षणी देवता असून तिला तांबडे कोंबडे व तांदळाची दारू दोतात. जननाशौच आठ दिवस पाळतात. आठव्या दिवशी पूजा करतात. नवव्या दिवशी झऱ्यावर अंघोळ करून नामकरण्याचा विधी उरकतात. पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षात कान टोचण्याचा विधी करतात.
मुंडा हे प्रमुख्याने जडप्राणवादी असून निसर्गदेवता व पूर्वज यांना भजतात. त्यांचा जादुटोणा व भूत-पिशाच्चांवर विश्वास आहे. त्यांचा मुख्य देव सिंगा बोंगा (सूर्यदेव) आहे. चंद्राला ते त्याची पत्नी करतात. याशिवाय बुरीबोंगा, मरंगबुरू, एकिंद् बोंगा इ. त्यांच्या देवता आहेत. गृहदेवतांना ते ओरा बोंगाको म्हणतात. आनातोंग बोंगा (देवदेवता) व बानिता बोंगा असे देवतांचे दोन वर्ग आहेत. आनातोंग-बोंगा देवता कल्याणकारी असून बानिता देवता कृद्ध व भयंकर असतात. यांशिवाय ‘हातू बोंगासो’ नावाची ग्रामदेवता असते. त्यांच्या सणांना परब म्हणतात. पौषी पौर्णिमेला पितृपूजा करतात. मुंडांचे सण कृषिप्रधान संस्कृतीशी संबंद्ध असून सुर्हूल (सुगीच्या प्रारंभीचा) हा सर्वांत मोठा सण असतो. त्यावेळा नाच, गाणे आदींनी तो साजरा करतात. यानंतर भाताच्या सुगीच्या वेळी बाथुली नावाचा उत्सव ते करतात. याशिवाय फा-गू (होलिकोत्सव), नना, जमनना इत्यादी सण तरुण-तरुणींच्या नृत्याने व गाण्याने साजरे होतात.
लावणीच्या वेळी बाताउली ऊर्फ कडलेता हा सण पाळतात. त्या दिवशी पहान (पुजारी) दिवसभर उपास करून ग्रामदेवतांना तांदळाची दारू, कोंबडे वगैरे देतो. करम हा सणही प्रसिद्ध असून त्या वेळी पहान कदंबाची फांदी गावाच्या आखाड्यात रोवून तिची पूजा करतो व नंतर स्त्री-पुरुष त्याभोवती नृत्य करतात. आग्रहायणात पीक आले की खरिहान पूजा ऊर्फ खळ्याची पूजा होते. हा मळणीचा विधी असतो. सोसोबोंगांचा विधी हा भुतांचे उच्चाटन करण्यासाठी संकटप्रसंगी करण्यात आलेला विधी असतो. हा विधी माटी ऊर्फ दवोनरा (देवऋषी) करतो.
मुंडा जमातीमध्ये ओराओंप्रमाणेच तरुण मुलामुलींसाठी शयनगृहे वा युवागृहे असून त्याला ‘गिटिओरा’ म्हणतात. ही युवागृहे अत्यंत संघटित स्वरुपीची मंडळे असल्याने त्यांचे स्वतंत्र नियम आहेत व यांतूनच मुलेमुली आपले भावी जोडीदार निवडतात. युवागृहात नाच, गाणी, गप्पागोष्टी इ. करमणुकीच्या प्रकारांबरोबरच केशभूषा करणे, अंगमर्दन करणे या गोष्टी चालतात. मुंडांची ग्रामपंचायत जमातीतील तंटेबखेडे सोडविते. पहान हा धर्मविधी करणारा प्रमुख असतो आणि महतो व गोराइत हे अनुक्रमे गावाच्या एकूण प्रशासकीय व्यवहारावर लक्ष ठेवतात. याशिवाय लोहार, गेआल हे इतर सहायत अधिकारी असतात. गुन्हे शाबीत करण्यासाठी पंचायत शपथ व दिव्य करणे यांसारखे मार्ग अवलंबिते.
मुंडा मृताला जाळतात. तत्पूर्वी प्रेताला नव्या वस्त्रात गुंडाळून तिरडीवर ठेवतात. मुलगा अग्नी देतो. अस्थीची गावात मिरवणूक काढून मग ते मडके घराजवळच्या एका झाडाला बांधून ठेवतात. तिसऱ्या दिवशी पुरुष नातेवाईक मुंडन करतात. मृताचा वारस त्याला हळद घातलेला भात नदीवर अर्पण करतो. घरी येताना हे लोक दोन नांगराच्या फाळांचा एकमेंकांवर आपटून आवाज करतात. पितरांना मधाचा नैवेद्य देतात आणि सर्वांना मिष्टान्न घालतात.
संर्दभ :1. Government of Bihar, Bihar District Gazetteers: Palamau, Patna, 1961.
2. Roy, S. C. The Mundas and Their Country, New Delhi, 1970.
3. Sachchidananda, Profiles of Tribal Culture in Bihar, Calcutta, 1965.
भागवत, दुर्गा
“