डफला : भारताच्या अरुणाचल प्रदेशातील एक वन्य जमात. डफालांचे मूळ नाव निशांग उर्फ निसी आहे परंतु इतरेजन त्याना डफला असे संबोधतात. सुबनसिरी नदीकाठच्या डोंगराळ भागात त्यांची दाट वस्ती आढळते. त्यांची लोकसंख्या १९६१च्या जनगणनेनुसार ३५, १२३ होती. आपला पूर्वज आबोतेनी हिमालयाच्या पूर्व भागातील सुपुंग नावाचा गावात राहत होता, तेथून त्यांचे पूर्वज आसमातल्या डोंगरभागांत आले, असे ते सांगतात. औरंगजेबाच्या करकीर्दीत काझीम याने असे लिहिले आहे, की डुफले (डफला) आसामच्या राजाच्या आधिपत्याखाली नसून स्वतंत्र आहेत व आपल्या डोंगराळ मुलखाच्या आसपासच्या भागात ते लूटमार करतात. जवळच्या आहोम लोकांना ते लूटमार करीत असत, अशी आख्यायिका प्रचलित आहे. १८३५ मध्ये त्यांनी मैदानी प्रदेशांतील लोकांची लूटमार केल्याची नोंद आहे.

डफला पुरुष

हे लोक पॅलीयो-मंगोलॉइड वंशाचे असून गोल तोंडवळा, रुंद व नकटे नाक, गालाची वर आलेली हाडे, पिंगट वर्ण ही त्यांची सर्वसाधारण शारीरिक वैशिष्ट्ये होत. डफला लोकांची घरे एकमेकांना लागून नसतात. प्रत्येक घराला ऐसपैस अंगण असते. डफलाची झोपडी म्हणजे लाकडी सोटांवर उभारलेले एक लांबलचक दालनच होय. त्या घराची रुंद सु. ६ ते ७ मी. असते पण लांबी अधिक असते. एका घरात दहांपेक्षा अधिक कुटुंबे राहतात. घराच्या भिंती चटयांच्या व जमिनी सपाट केलेल्या बांबूंच्या असतात. घराचे छप्पर केळीच्या अगर बांबूंच्या सुक्या पानांचे केलेले असते. डफला ‘झूम’ शेती करतात, तसेच पारध व मच्छीमारी हेही त्यांचे आवडते व्यवसाय आहेत. त्यांचे मुख्य अन्न मका व भात पण मांस. कंद व बांबूचे कोबंही ते खातात. तांदळापासून केलेली दारू त्यांना फार आवडते व ती दररोज घरातच तयार करतात. त्यांची वस्त्रे पूर्वी लोकर व झाडाच्या साली यांची असत पण अलीकडे कापडही ते वापरू लागले आहेत. डफला पुरुष कमरेला एक खरबरीत लुंगी गुंडाळतात आणि वर घोंगडी पांघरतात. डोकीला मात्र जीरेटोपासारखे धनेश पक्ष्याची पिसे खोचलेले शिरस्त्राण घालतात आणि गळ्यात पांढऱ्या, तांबड्या, निळ्या व हिरव्या रंगांच्या मणिमाळा घालतात. स्त्री लेहंगा नेसते आणि वर घोंगडी पांघरते. कमरेला वेताने विणलेला सुबक पट्टा घालते. गळ्यात धातूंची कड्याकड्यांची साखळी घालते. या लोकांत गोंदण्याची प्रथा नाही. डफला लोक दिवे वापरीत नाहीत ते पलिते वापरतात. विस्तव चकमकीने पेटवतात. कळक व वेत यांचा सुकाळ असल्यामुळे डफला त्यांच्या विविध व सुंदर वस्तू बनवतात. भांडी, थाळ्या व विविध हत्यारे ते बांबूपासून बनवितात. ते उत्तम चटया विणतात, पंखे तयार करतात, टोप्या विणतात आणि पिशव्याही करतात. डफलांच्या प्रदेशात कापूस पुष्कळ होतो. त्यामुळे डफला लोक सुती आणि वल्कली अशी दोन्ही तऱ्हेची वस्त्रे वापरतात. डफला लोक पक्षी, उंदीर व खारी पकडतात आणि इतरही अनेक जनावरांची शिकार करतात.

ते मिथुन, डुकरे, गायी, शेळ्या, कोंबड्या, कुत्री पाळतात. मिथुन (वनगाईचा एक प्रकार) वा गायीचे दूध ते काढीत नाहीत. त्यांचा देवांना बळी देण्यासाठी वा मुलीचे देज म्हणून लग्नात उपयोग करतात.

सर्वसाधारणपणे मुलामुलींची लग्ने आई-बाप ठरवितात. विवाहात वधूमूल्य द्यावे लागते व ते वार्षिक किंवा सहामाही हप्त्यानेही देतात. डफलांत बहुपत्नीत्वाची चाल आहे. कुटुंबात नवरा, त्याच्या अनेक बायका आणि त्यांची अविवाहित मुले एवढी माणसे असतात. मुलगा वयात आला, की तो कपाळावर येईल असा आकर्षक बुचडा बांधतो. त्याला ‘पोडुम’ म्हणतात.

डफला हे युद्धप्रिय असल्याने त्यांच्या जवळ तऱ्हेतऱ्हेच्या शस्त्रांचा साठा असतो. पूर्वी मारलेल्या माणसांचा पंजा व पोडुम विजयचिन्ह म्हणून कापून नेत व त्याच्या शरीराचे तीन तुकडे करून टाकीत. तो पंजा एका झाडाला खिळवीत. हे पंजा व टांग खिळवण्याचे विधियुक्त झाड प्रत्येक गावात अजूनही आढळते. पकडल्या गेलेल्या शत्रूला ते पायात खोडाबेडी घालीत.

डफला समाजात पुरोहिताचे स्थान महत्त्वाचे असते. व्रतवैकल्ये करूनच माणसाला हे पद प्राप्त करून घेता येते. आने डुइनी किंवा सूर्यमाता ही कृपाळू असते. मंत्र, तंत्र, आणि पूजा यांत वियू हा पुरोहित प्रवीण असतो. मृताजवळ दारूचा तुंबा व भात ठेवतात आणि मग त्याला उचलतात, मृताला पुरतात. दफनभूमीत बांबू व लाकडांचा एक मनोरा उभारतात. तो पानांनी, बळी दिलेल्या पशूच्या शिंगांनी व त्यांच्या गळ्याला बांधायच्या दोऱ्यांनी सजवितात. हा मनोरा वियूंसाठी बांधलेला असतो.

संदर्भ : Shukla, B. K. The Daflas of the Subansiri Region, Shillong, 1959.

देशपांडे, सु. र.