हाजोंग : ईशान्य भारतातील एक आदिम जमात. त्यांची वस्ती प्रामुख्याने मेघालयाच्या पूर्व व पश्चिम खासी हिल्स जिल्ह्यांत असून काही गारो हिल्स जिल्हा तसेच आसामच्या गोलपारा व नवगाँग जिल्ह्यांतही ते आढळतात. त्यांची एकूण लोकसंख्या ७१,००० (२००१) होती. बुटके, मध्यकपाल आकाराचे डोके, रुंद चेहरेपट्टी व पसरट नाक ही हाजोंगांची शारीरिक वैशिष्ट्ये असून त्यांचे खटाल व हाजोंग असे सर्वसाधारण दोन विभाग आढळतात.

पारंपरिक वेशभूषेतील हाजोंग स्त्रिया

हाजोंग यांना मानवशास्त्रज्ञ व्यवहारी हाजोंग व परमार्थी हाजोंग अशी नावे देतात. खटाल हे वैष्णव धर्मी असून व्यवहारी हाजोंगांपेक्षा अधिक धार्मिक वळणाचे आहेत. ते मद्यपान निषिद्ध मानतात व मांस खात नाहीत; मात्र व्यवहारी हाजोंग तांदळाची बीअर तयार करतात व मांसही खातात. दोन्ही विभाग आंतर्विवाही व सहभोजी आहेत. त्यांच्यात मातृप्रधान बहिर्विवाही कुळी (निकिनी) असून मातेच्या नातलगातील विवाह निषिद्ध मानतात; मात्र सांप्रत बहिर्विवाही पितृसत्ताक कुळींनी (गोत्र) निकिनीची जागा घेतलीआहे. त्यांच्यात कश्यप, शांडिल्य, भारद्वाज, वसिष्ठ, अस्तिनंद, मनू आणि अलिमन ही प्रमुख गोत्रे आढळतात. जमातीत एक पत्नीकत्वाची चाल असून क्वचित बहुपत्नीत्व आढळते. वयात आलेल्या मुला-मुलींची लग्ने वाटाघाटीने मुलीच्या दारी संपन्न होतात. क्वचित प्रेमविवाह व पळून जाऊनही लग्न केल्याची उदाहरणे आढळतात. वधूमूल्याची पद्धत असून घटस्फोट व पुनर्विवाहास जमातीत मान्यता आहे; पण त्यांना पंचायतीची अनुमती लागते. वडिलोपार्जित संपत्ती मुलांत सारख्या प्रमाणात वाटली जाते. बाळाच्या जन्मानंतर सात ते दहा दिवस सोयर पाळतात. त्याला ‘सुआ’ म्हणतात. मुलाचे जावळ काढल्यानंतर (सुआ कामनी) सोयर संपते.

हाजोंग शेती करतात. भात हे त्यांचे प्रमुख पीक असून ताग, कडधान्ये, मोहरी ही पिके घेतात. ज्यांना जमीनजुमला नाही, ते शेतात व अन्यत्र मजुरी करतात. त्यांच्या बायका सुती कपडे विणतात. बांबू व वेताच्या टोपल्या, खुर्च्या, टेबले वगैरे बनवितात. नियुक्त ज्येष्ठांची ग्रामपंचायत असून तिचा सरपंच सर्व सामाजिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवतो. बहुसंख्य हाजोंग हिंदू धर्मीय असून ‘मनसा’ ही त्यांची प्रमुख देवता होय. आसाममधील हाजोंग दुर्गा व कालीमाता या देवतांची पूजा करतात. ते शाक्तपंथी आहेत. त्यांच्यातील प्रमुख देवता ‘बाऊस्तो’ आहे. जमातीत तीन प्रकारचे पुजारी असून त्यांना अनुक्रमे देओशी, अधिकारी व हिंदू ब्राह्मण म्हणतात. देओशी पैतृक दैवतांची पूजा करतात, तर अधिकारी विवाह लावतात व अन्त्यविधी करतात. त्यांच्यातील उपवर वधू स्वतःचे कपडे स्वतः शिवते वा विणते. स्त्री-पुरुष दोघेही पटनी नावाची ओढणी किंवा उपरणे वापरतात. हाजोंग मृताला जाळतात व दहा दिवस सुतक पाळतात.

भागवत, दुर्गा