मुथुवन : दक्षिण भारतातील एक आदिवासी जमात. यांची वस्ती मुख्यतः केरळमधील एर्नाकुलम, त्रिचुर, कोट्ट्यम आणि त्रावणकोर या जिल्ह्यातील आढळते. पांड्य राजांनी मदुराईवर स्वारी केल्यावर हे लोक केरळमध्ये आले असावेत. येताना ते आपली मुले व देवदेवता पाठीवर (मुदुक) घेऊन डोंगर चढले. म्हणून त्यांना मुथुवन म्हणतात, असे एक मत आहे. अद्यापि मुथुवन पुरुष आपल्या पाठीवरून ओझे वाहतो व स्त्रिया पाठीवर मुले घेतात. हे लोक मुथुवन मुदुगर वा मुदुवन इ. नावांनीही ओळखले जातात. यांची लोकसंख्या १९७१ च्या जनगणनेनुसार ७,९७२ होती.

यांची शारीरिक ठेवण द्राविडियन सदृश आहे, असे तज्ञांचे मत आहे. मध्यम उंची, तपकिरी वर्ण, अरुंद कपाळ, बसके नाक आणि लंबशीर्ष ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये होत. हे लोक सुदृढ बांध्याचे असून स्त्री-पुरूष दोघेही अलंकार वापरतात व केसही वाढवितात. केसांची गाठ डोक्याच्या मागील बाजूस बांधतात. मुथी किंवा मुथवती (स्त्री) नाकात नथ, कानात बाळे, हातात रंगीत बांगड्या व मणी वापरते. आधुनिकीकरणामुळे त्यांच्या राहणीमानात खूप बदल झाला आहे. हे लोक डोंगरातील मध, वनस्पती गोळा करतात तसेच शेती, पशुपालन व कुक्कुटपालन हे व्यवसाय करतात. काही जण शिकारीवर उपजीविका करतात तर काही कामगार म्हणूनही काम करतात.

यांची वस्ती दाट जंगलात झोपड्यांच्या समूहाने असते. या जमीतीतील युवागृहे विशेष प्रसिद्ध आहे. या जमातीत मुलामुलींची युवागृहे स्वतंत्र असतात. मुलींच्या युवागृहात विधवा व प्रौढ अविवाहित स्त्रियाही राहतात. यांच्या झोपड्यात चटयांचा वापर केला जातो.

या जमातीत मातृसत्ताक कुटुंबपद्धती रूढ आहे. केन्या कुट्टोम, पुथानी कुट्टोम आणि केन्ना कुट्टीम अशा तीन कुळी असून या कुळी बहिर्विवाही आहेत. वारसाहक्क पुतण्याला असतो. पुतण्या नसल्यास संपत्तीचा अधिकार मोठ्या बहिणीस मिळतो. मुलेमुली वयात आल्यानंतर विवाह करतात. आतेमामे भावंडांच्या विवाहास अग्रक्रम दिला जातो. औपचारिक अपहरण विवाह प्रचलित आहे. यांच्या विवाहविधीत कंगवा देण्याला महत्त्व असते. विवाहविधी वधूच्या घरीच साजरा होतो तरीसुद्धा वधूचे आई-वडील या समारंभास उपस्थित राहत नाहीत. बहुपत्नीकत्व मान्य आहे. घटस्फोट, पुनर्विवाह आणि विधवाविवाह रूढ आहेत. घटस्फोट मान्य असला तरी क्वचित घेतला जातो. दत्तकप्रथा मान्य असूनसुद्धा आवश्यक तेव्हाच आणि तोही बहिणीचाच मुलगा दत्तक घेतात. रजस्वला मुलीस व स्त्रीस सात दिवस स्वतंत्र झोपडीत राहावे लागते. बालकाचे नाव सहा महिन्यानंतर मातेकडील नातेवाईकांकडून ठेवले जाते.

या जमातीत पंचायत असून त्याच्या प्रमुखास कानी म्हणतात. तोच गावप्रमुख असतो. गावातील वादविवाद तोच मिटवतो. त्याच्या पश्चात हे पद त्याच्या पुतण्याकडे जाते. जमातीत पुजारी असतो तोच वैदूही असतो.

या जमातीतील लोक जडप्राणवादी असून कुळींची स्वतंत्र गणचिन्हे आहेत. हिंदूंप्रमाणे हेही हिंदूंचे सण साजरे करतात. विशेषतः ओणम् आणि पोंगलचा सण महत्त्वाचा मानला जातो. तमिळनाडूमधील मीनक्षी देवी ही त्यांची अत्यंत लोकप्रिय देवता आहे.

मृतास वस्तीपासून दूर पुरतात. स्त्रियांना अलंकारांसह आणि पुरुषांना हत्यारांसह पुरतात. पुतण्या सर्व अंत्यविधी करतो आणि तो तीस दिवस कर्णभूषणे वा अलंकार न घालता दुखवटा पाळतो. मृतास पुरण्यापूर्वी ब्रह्मचारी व्यक्तीने शिजवलेला भात तीन पानांवर स्वतंत्रपणे ठेवतात आणि मृतात्म्याने आपले संकटापासून संरक्षण करावे म्हणून प्रार्थना करतात. मांत्रिक-पुजारी उत्तरक्रिया करतो. थडगे हे सूर्याचे शरीर आहे, अशी त्यांत समजूत असल्यामुळे ते त्याच्यावर छत बांधतात. अंत्यविधी पद्धतीप्रमाणे केला नाही तर वाघ मृताच्या नातेवाईकास खातो, अशी समजूत रूढ आहे. मृताशौच पंधरा दिवस पाळतात.

संदर्भ : 1. Iyer, L. A. Krishna, Social History of Keral, Madras, 1968.

             2. Luiz, A. A. D. Tribes of Keral, New Delhi, 1962.

शेख, रुक्साना