लहवाला : उत्तर भारतातील एक अनुसूचित जमात-समूह. लाहूल, लाहुली, लाहौल इ. नावांनी तो परिचित आहे. हिमाचल प्रदेशातील लाहूल खोऱ्यात त्यांची प्रामुख्याने वस्ती असल्यामुळे त्यांना हे नाव प्राप्त झाले असावे. या समूहात मुख्यतः ब्राह्मण व ठाकूर आहेत. ठाकूर गोत्रात गौतम, बुरामशिंगपा, फागपा व लहवाला युवतीजमशेरपा ही प्रमुख गोत्रे अंतर्भूत होतात. या जाति-जमाती स्थलवैशिष्ट्याने व भाषा वैशिष्ट्याने एकत्र गणल्या गेल्यामुळे लहवालांची १९६१ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातीत जरी नोंद झाली असली, तरी त्यांची गणना भारतातील इतर आदिवासींशी करता येणार नाही कारण त्यांच्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र अशा हिंदू संस्कारनिष्ठ जाती-धर्माचा प्रादुर्भाव आढळून येतो. लहवालांमध्ये भोट लोक असल्यामुळे भूतानातला बौद्ध, शैव व वैष्णव धर्मही त्यात आढळतो. पंजाब आणि उत्तर प्रदेशांतील हिंदू संस्कार व तिबेटमधील बौद्ध व मंगोलॉइड सामाजिक संस्कार त्यांच्यात आढळतात.

संदर्भ : 1. Bahadur, K. P. Casic, Tribes and Culture of India, Vol. VI, New Delhi, 1978.

           2. Negi, T. S. Scheduled Tribes of Himanchal Pradesh, Simla, 1976.

           3. Shashi, S. S. Himachal:Nature’s Peaceful Paradise, Delhi, 1971.

भागवत, दुर्गा