ऐनू: जपानच्या होक्काईडो व कूरील आणि रशियाच्या सॅकालीन या बेटांवर रहाणारे आदिवासी. १९५६ साली त्यांची संख्या साधारणत: १५,००० होती. ती हळूहळू घटत असून अस्तप्राय होण्याच्या मार्गावर आहे. ते जपान्यांप्रमाणे मंगोलवंशीय नसून कॉकेशियन वंशातील ऑस्ट्रेलॉइड शाखेचे आहेत. कमी उंची, गौर वर्ण व गोल डोळे असलेल्या या लोकांच्या उत्पत्तीबद्दल निर्णायक पुरावा नाही. यांच्या शरीरावरील केसाळपणा शेजारी राहणाऱ्या मंगोलवंशीयांच्या केसविरहित शरीराच्या तुलनेने फार जास्त वाटतो. मासेमारी, शिकार व रानटी वनस्पती गोळा करणे, हे यांचे मुख्य उद्योग होत. अलीकडे ते उद्यान व्यवसाय करू लागले आहेत. त्यांच्या बऱ्याच बोली आहेत, परंतु त्यांचा कोणत्याही भाषेशी संबंध नाही. ते जडप्राणवादी असून पितरांची पूजा व अस्वलास बळी देणे, हे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण विधी आहेत. ह्याकरिता अस्वलांची पिले पाळण्यात येतात. ऐनू पुरुष लांब दाढ्या वाढवितात, तर स्त्रिया मिशीच्या जागी गोंदवितात. नव्या पिढीतील ऐनू आधुनिक बनत असून जपानी लोकांशी विवाह करीत आहेत.

वृद्ध ऐनू

संदर्भ : Munro, N. G. Ainu Creed and Cult, New York, 1963.

भागवत, दुर्गा