संगीतप्रेमी तुरी

तुरी : एक आदिवासी जमात. हे लोक छोटा नागपूर, बिहार, आसाम व सिमला पर्वतरांगांत राहतात. सिमला पर्वतावरील तुरी वादक म्हणून प्रसिद्ध आहेत. जेव्हा प्रेतयात्रा स्मशानाकडे निघते, तेव्हा हे ढोल वाजवीत पुढे चालतात. मृताला जे जे वाहतात त्यांत यांचा भाग असतो, मृताची वस्त्रे त्याशिवाय मृताच्या आप्तांच्या ऐपतीप्रमाणे त्यांना पैशाचे दानही मिळते. शेतात पीक आले, की शेतकरी त्यांना धान्य देतात. प्रेताची वस्त्रे आणि तेथील अन्न ते घेतात, म्हणून त्यांना निकृष्ट दर्जाचे समजतात. गाऊन व वाद्ये वाजवून ते उदरनिर्वाह करतात. बांबूपासून सुपे, पंखे, शिपतरे व टोपल्या विणणे हा यांचा मुख्य धंदा असून काही तुरी शेती करतात. चालीरीती, शारीरिक ठेवण, भाषा व धर्म यांबाबतीत त्यांचे मुंडा जमातीशी बरेच साम्य आढळते. बहुधा ही मुंडांचीच एक शाखा असावी, असे एच्. रिस्ली म्हणतात. तुरींत चार पोटभेद आहेत : किसान, ओर, डोम व डोमरा. या सर्वांचा धंदा सामान्यतः एकच असून पक्षी, जनावरे व झाडे अशी त्यांची देवके आहेत. एकाच गोत्रात लग्न होत नाही. लग्नात वधूमूल्य देण्याची प्रथा असून  विवाहसमारंभ वधूच्या किंवा वराच्या घरी होतो. वधूवरांपेक्षा अन्य गोत्री इसम पौराहित्य करतो. तुरींमध्ये बहुपत्नीत्वाची पद्धत असून विधवेला दिराशी लग्न करता येते. बाळंतपणानंतर आठ दिवस जननशौंच पाळतात. आठव्या दिवशी मुलाचे जावळ काढतात व शकुन पाहून नाव ठेवतात.

तुरींत धार्मिक विधींसाठी पौरोहित्य करणाऱ्यास पहान म्हणतात. तो वंशपरंपरागत असतो. ते भुताखेतांना भजतात.

मृतांना तुरी पुरतात. पुरताना मृताच्या हातात पैसे ठेवतात आणि शेजारी त्याची थाळी ठेवतात.  

संदर्भ : Russell, R. V. Hiralal, Rai Bahadur, Tribes and Castes of the Central Provinces of India, Vols. 4, Delhi, 1975.

मुटाटकर, रामचंद्र