विशवन : भारतातील एक आदिवासी जमात. त्यांची वस्ती मुख्यत्वे केरळ राज्यातील एर्नाकुलम् जिल्ह्याच्या उत्तर भागात (इद्यरा खोरे-पूर्वीच्या त्रावणकोर संस्थानाचा उत्तर भाग) आणि त्रिचूर जिल्ह्यांत आढळते. विशवन स्वतःला केरळचे मूळ रहिवासी समजतात. त्यांची लोकसंख्या सु. १५० (१९६१) होती. त्यांची लोकसंख्या प्रतिकूल हवामान व रोगराई यांमुळे दिवसेंदिवस घटते आहे व हळूहळू ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. विशवन हे नाव ‘विश’ म्हणजे सापळा यावरून पडले असावे. ते माकड पकडण्यासाठी सापळ्याचा विशेषत्वाने वापर करतात, तसेच ते मासेही पकडतात. यांची वस्ती काही प्रमाणात डोंगर-उतारावर आढळते. अन्यथा ते आपल्या झोपड्या सपाट जमिनीवर चौकोनी वा आयताकार बांधतात. त्यात एक मोठी खोली असते. विस्तव पेटवण्यासाठी अद्यापही ते चकमकीचा वापर करतात.

गर्द पिंगट काळा वर्ण, मध्यम उंची, मध्यम जाडीचे ओठ, लांब डोके, चपटे नाक, उतरते कपाळ, टपोऱ्या भिवया, कुरळे केस ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये तरंगत्या तराफ्यावरील, मासेमारी करणारा विशवन, इद्यरा खोरे (जि. कोट्टयम्). होत. या लक्षणांवरून ही जमात मूळची निग्रो वंशीय असावी, असे वाटते. त्यांच्यात अनेक वंशांचा संकर झालेला दिसतो. या जमातीचे काही लोक केस मागील बाजूस वळवून त्यांचा बुचडा बांधतात, त्यांना ‘मूलिस’ असे म्हणतात. स्त्रीला ‘विशवथी’ किंवा ‘मुपथी’ म्हणतात. ती उरोभाग व कटिभाग कसाबसा झाकला जाईल एवढेच कपडे वापरते. स्त्रियांना दागिन्यांची हौस असून त्या अंगठी, कर्णफुले, रंगीत मणी, नथ इ. अलंकार घालतात. विशवनांना संगीताची आवड असून ते स्वतः बनवलेली बासरी, ढोल ही वाद्ये वाजवतात, तसेच त्यांच्या जमातीची खास गाणी ते म्हणतात. मात्र नृत्य त्यांच्यात फारसे प्रचलित नाही. ते मलयाळम् ची बोलीभाषा बोलतात. विशवन लोकांत मद्यपानाचे प्रमाण बरेच जास्त आढळते. शरीराची उष्णता टिकवून धरण्यासाठी तसेच वाईट हवामान व रोगराई यांचा प्रतिकार करण्यासाठी त्यांना हे आवश्यक वाटत असावे. त्यांच्या आहारात काळे वानर आणि मासे यांना जास्त प्राधान्य असते. तांदूळ हे त्यांचे मुख्य अन्न आहे. जंगलातील कंदमुळांचाही ते अन्नात वापर करतात. विशवन हे भातशेती करतात. ही शेती स्थलांतर पद्धतीची असते. प्रतिवर्षी हे शेतीची जागा बदलतात. काही लोक डोंगरातील कंदमुळे गोळा करून विकतात व त्या बदल्यात जीवनावश्यक वस्तू घेतात. काही मजूर म्हणूनही काम करतात. या जमातीत कुक्कुटपालन, पशुपालन तसेच शिकार व मासेमारी आढळते. शिकारीसाठी ते नळीच्या, ठासणीच्या बंदुकीचा वापर करतात. वेताच्या धनुष्यबाणाने ते मासे मारतात. त्यासाठी वापरले जाणारे बाण त्रिधारी असतात, त्यांना विशवन लेक ‘मुप्पाली’ असे म्हणतात. याशिवाय ‘थुम्बिथाना’ या वेताच्या पोकळ नळीच्या धोट्याचा ते मासेमारीसाठी वा पक्ष्यांच्या शिकारीसाठी उपयोग करतात. या पोकळ नळीच्या (फुंकनलिकेच्या) तोंडाशी छोटा तीक्ष्ण भाला बसवून, तो जोरदार फुंकर मारून लक्ष्याच्या दिशेने फेकतात व शिकार करतात.

तरंगत्या तराफ्यावरील, मासेमारी करणारा विशवन, इद्यरा खोरे (जि. कोट्टयम्).या जमातीत पितृसत्ताक कुटुंबपद्धती रूढ असून, मुलगा नसल्यास पुतण्या व तो नसल्यास बहिणीचा मुलगा यांच्याकडे वारसा जातो. हे लोक जडप्राणवादी असून , त्यांची स्वतंत्र पण प्रादेशिक नावांची आठ गणचिन्हे आहेत. गावाच्या नावावरून ही गणचिन्हे ओळखली जातात. हे गाव किंवा प्रदेश ही त्यांची मूळ वसतीची ठिकाणे मानली जातात. विशवन हे मड येथील ‘शास्ता’ (म्हणजे पाण्याचा धबधबा) या देवाची पूजा करतात. पूर्वजांची, विशेषतः त्यांच्या आत्म्याची, उपहारयुक्त पूजा करतात. हिंदू देवदेवतांपैकी विशेषतः कालीमातेला ते भजतात.

विशवनांमध्ये युवागहे असून ती चांगल्या प्रकारे कार्यरत असल्याचे प्रत्ययास येते. यांच्यात बालविवाहाची प्रथा नाही. वयात आल्यावर मुलामुलींची लग्ने होतात. ते बहिर्विवाही कुळीत विवाहसंबंध जोडतात. यांच्यात विनिमयविवाह किंवा साटेलोटेविवाह प्रचलित असून त्यात वधूमूल्य द्यावे लागत नाही. आतेमामे भावंडांचा विवाह निषिद्ध मानला जातो. वरपिता वधूला व तिच्या आईला उपहार देतो. तो स्वीकारल्यास विवाह ठरला असे समजतात. ठरलेल्या दिवशी वधूच्या घरी वर येतो आणि वधूला व तिच्या आईला कपडे भेट देतो. भेटवस्तू, मेजवानी आणि पानसुपारी देणे, हाच विवाहसमारंभ असतो. विशवन जमातीत विवाहपूर्व शरीरसंबंध निषिद्ध मानले जात नाहीत. असे संबंध कुळीबाहेर असावेत, हे मात्र पाहिले जाते. लग्नापूर्वी मुलगी गरोदर राहिली, तर मूल सांभाळले जाते व हे संबंध सामाजिक नीतिनियमांनुसार मान्य करण्यात येतात. लग्न होईपर्यंत मुली प्राण्याचे मांस खात नाहीत. विधवाविवाह, घटस्फोट आणि पुनर्विवाह यांना जमातीत मान्यता आहे. यांच्यात विधवा आईने आपल्या मुलाबरोबर विवाह करण्याची प्रथा आढळून येते. मेहुणीविवाह अधिमान्य आहे, तसेच बहुपत्नीकत्वही रूढ आहे. मूल जन्मल्यानंतर दोन वर्षांनी त्याचे कान टोचतात व नामकरण विधी करतात. रजस्वला मुलीस सात दिवस झोपडीत ठेवतात. सातव्या दिवसापर्यंत तिने पुरुषाचे तोंड पहावयाचे नसते. हे निषिद्ध समजले जाते. न पाळल्यास त्या झोपडीवर आपत्ती येते, असा समज आहे. सातव्या दिवशी मुलगी स्नान करून घरी येते. त्या दिवशी ‘थिरंडू कल्याणम्’ हा विधी करतात. स्त्रियांचे बाळंतपण स्वतंत्र झोपडीत होते. तिथे आई व मूल पंधरा दिवस राहते. सोळाव्या दिवशी स्नान करून आई व मूल घरी प्रवेश करते.

जमात पंचायतीस महत्व असून तिच्या प्रमुखास ‘कनक्करण’ म्हणतात. जमात प्रमुखाच्या पश्चात त्याचा पुतण्या ते पद चालवितो. तो अज्ञान असल्यास सज्ञान होईपर्यंत ज्येष्ठ नातेवाईक कारभार पाहतो. मांत्रिकपुरोहितास (कुर्किथाडी) जमातीत महत्त्वाचे स्थान असते. तो विवाहात पौरोहित्य करतो.

मृताला स्वच्छ वस्त्रात गुंडाळून पूर्व-पश्चिम दिशेला पुरतात. खड्ड्यात बांबूची तिरडी तयार करतात व त्यावर प्रेत ठेवून ते चटईने झाकतात. पुतण्या सर्व उत्तरक्रिया करतो. स्त्रियाही या विधीत भाग घेतात. मृताशौच सोळा दिवस पाळतात, नंतर ज्ञातिभोजन होते.

संदर्भ : 1. Hutton, J. H. Census of India, 1931 : With Complete Survey of Tribal Life and Systems,Vol. I, Part III (Anthropological Notes by Various Authors), Delhi, 1986.

       2. Krishna Iyer, L. A. Social History of Kerala, Vol. I. The Pre-Dravidians, Madras, 1968.

       3. Luiz, A. A. D. Tribes of Kerala, madras, 1962.

       ४. संगवे, विलास, आदिवासींचे सामाजिक जीवन, मुंबई, १९७२.

गारे, गोविंद शेख रुक्साना