पारंपरिक नृत्य करताना हमार युवतीहमार : भारताच्या ईशान्येकडील राज्यांत आढळणारी एक आदिम जमात. हमारचा शब्दशः अर्थ उत्तर दिशा असा असून हे लोक उत्तरेकडील सिनलूंगमधून आले. त्यांची वस्ती प्रामुख्याने आसाम, मिझोराम व मणिपूर या प्रदेशांत आढळते. त्यांची लोकसंख्या ८३,४०० होती (२००१). हमारांची मातृभाषा तिबेटी-ब्रह्मी भाषासमूहातील कुकी-चीन भाषा- प्रकारातील असून आसाममध्ये ते प्रामुख्याने ती बोलतात, तर मिझोराम-मध्ये ते मिझो (दुहलियन तवांग) बोलतात व त्यासाठी रोमन लिपी वापरतात. प्रामुख्याने ते मांसाहारी आहेत. भात हे त्यांचे मुख्य अन्न असून तांदळापासून बनविलेली बीअर (झू) ते पितात.

आसामातील हमारांची खाऊबुंग, लुंगताऊ, लेरी, झोटे, एन्गुर्टे, खेल्टे, खाऊलर्‍हींग, फेहरिम या बहिर्विवाही कुळींत विभागणी झालेली आहे. या सर्व कुळींच्या आणखी अनेक उपशाखा आहेत. समाजापुरती अंतर्विवाही पद्धत पाळली जाते परंतु कुळींची बहिर्विवाही पद्धत पाळली जात नाही. त्यांच्यात एकपत्नीत्व असून मामेबहिणीस वधू म्हणून प्राधान्य दिले जाते. वाटाघाटी होऊन लग्न ठरते. वधूमूल्याची पद्धत रूढ आहे. जमातीत विधवा पुनर्विवाह संमत आहे. बहुतेक हमार कुटुंबे संयुक्त असून त्यांच्यात पितृप्रधान पद्धत आढळते. कनिष्ठ मुलाकडे वडिलोपार्जित संपत्तीचा वाटा जातो, तर ज्येष्ठ मुलाकडे वडिलांचे प्राधिकार जातात. जमातीतील पुरुषमंडळी स्थलांतरित शेती करतात, तर स्त्रिया घरातील लहानसहान कामे करतात, गुराढोरांकडे लक्ष देतात, जळण गोळा करतात, पाणी भरतात, कपडे विणतात व भांडी बनवितात. मुलाच्या जन्मानंतर तीन दिवस अशौच पाळतात नामकरण विधी साजरा करतात. बहुतेक हमार हे ख्रिस्ती धर्मी असल्यामुळे विवाहविधी चर्चमध्ये संपन्न होतो. मृताला ते पुरतात तथापि त्यांच्यापैकी काही पूर्वापार चालत आलेल्या धर्मावर श्रद्धा ठेवतात. ‘पॅथिएन’ नामक त्यांची सर्वोच्च देवता आहे. स्थलांतरित शेती हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. झेमी, दिमसा, कुकी आणि दिघो या आजूबाजूच्या समाजांबरोबर त्यांचे पारंपरिक सामाजिक आणि आर्थिक संबंध व व्यवहार आहेत. बुअनझाब्रल हा युवागृह प्रकार त्यांच्या गावातील महत्त्वपूर्ण भाग मानला जातो परंतु आधुनिक क्लब आणि मंडळामुळे युवागृहांचे समाजातील महत्त्व कमी होऊ लागले आहे. त्यांची पारंपरिक ग्रामसभा (मंडळ) असून तिच्या प्रमुखास लाल म्हणतात व त्याच्या सहाध्यायांना खावनबावल म्हणतात मात्र जमातीच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी अलीकडे त्यांनी ‘हमार राष्ट्रीय संघ’ स्थापन केला आहे.

मिझोराममधील हमार हे मुख्यत्वे ऐजवाल जिल्ह्यात आढळतात. त्यांच्यामध्ये १३ कुळी किंवा गोत्रे आहेत. हे लोकसुद्धा झूम पद्धतीची स्थलांतरित शेती करतात परंतु जमिनीवर ग्राममंडळाचे नियंत्रण असते. त्यांच्या इतर जीवनशैली, धार्मिक चाली आणि अर्थव्यवस्था आसामातील हमारांप्रमाणेच आहेत.

मणिपूरमधील हमार हे दक्षिण मणिपूर जिल्ह्यात विखुरलेले आहेत. तेथे त्यांच्या २० कुळी आहेत आणि २१० वंशावळी आढळतात. त्यांच्यामध्ये मामेबहीण आणि आतेभावाबरोबरच्या विवाहास प्राधान्य आहे. युवागृह पद्धती हे हमारांचे वैशिष्ट्य होते पण येथेही ही पद्धत बदलू लागली आहे.

हमारांमध्ये साक्षरतेचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक आहे.

कुलकर्णी, शौनक