कोळी – २ : कोळी ही जमात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश इ. राज्यांत आढळते. विशिष्ट भागातच ती अनुसूचित जमात म्हणून मानली जाते. इतरत्र हे लोक इतर मागास वर्गांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. सोनकोळी म्हणजे मासे मारणारे कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी आणि मल्हार कोळी असे कोळ्यांचे वर्ग आढळतात. महाराष्ट्रात कोळ्यांचे मुख्यत्वे दोन वर्ग पडतात : मासे मारणारे आणि शेती करणारे कोळी. महाराष्ट्रात मासे मारणारे कोळी सोनकोळी या उपजातीत आढळतात. हे लोक सर्व कोळी लोकांत आर्थिक व सांस्कृतिक दृष्ट्या सुधारलेले असल्याने त्यांचा अनुसूचित जमातीत समावेश होत नाही. फक्त महादेव व मल्हार कोळी यांचा समावेश अनुसूचित जमातीत होतो. या कोळ्यांचे कुणब्यांशी अनेक दृष्टींनी साम्य आहे. ते कोकणात व देशावर आढळतात. त्यांच्या शाखा डॉ. विल्सन यांनी पुढीलप्रमाणे दिलेल्या आहेत : आग्री, अहीर, बंद, भिल्ल, भिलावे, भिरले, चंची, दोर अगर टोकरे, हेलमार, कब्बेर, कराडे, खार, कोकण, महादेव, डोंगर ऊर्फ राज, मल्हार अगर कुनुम, चुमली, पान अगर पानभरी, मराठा, माखी, मेंदाले, मेता अगर धनगर, मुसळे अगर बंधू, नेहरे, राहताडकर, शिंग तोकी, सोन, सोलेसी (काष्टी अगर लाल लंगोटी), सूर्यवंशी, तायडे, ठाणकर अगर ख्रिस्ती व वली.

या जमातीचे मुख्य गट म्हणजे मल्हार कोळी, महादेव कोळी, सोनकोळी व ढोर कोळी. ढोर कोळी हे सर्वांत कनिष्ठ समजले जातात. जव्हारचे महाराज महादेव कोळी आहेत.

महादेव कोळी: महादेव कोळी सह्याद्रीत पुणे ते मुळशीपर्यंत व पुणे ते त्रिंबकपर्यंत आढळतात. जव्हारलाही यांची वस्ती आहे. बालाघाट ऊर्फ महादेव डोंगरात त्यांचे मूळ वसतिस्थान असावे, असे परंपरा सांगते. अहमदनगर जिल्ह्यातही ते आढळतात. महादेव कोळी आणि मल्हार कोळ्यांपैकी पानभरे कोळी हे गडकरी होते. गडसंरक्षणाचे काम ते करीत. महादेव कोळ्यांची गोत्रनावे व कुळांची नावे अनेक आहेत. खंडोबा आणि एकवीरा देवी ही तर सर्वच कोळ्यांची दैवते आहेत. परंतु महादेव कोळ्यांची वरसुबाई ही रोग बरी करणारी विशेष देवता आहे. त्यांच्या धर्मविषयक कल्पना, सणवार आणि आचार कुणब्यांप्रमाणेच आहेत. वाघदेव, मारुती, राम, शिव, कृष्ण इ. देव ते मानतात. दसरा, दिवाळी, अक्षय्यतृतीया वगैरे सण ते पाळतात. कमलजा देवीलाही ते पूजतात. कळसुबाई, जाकुबाई, सतुबाई, रानाई ऊर्फ रानबाई वगैरेही काही देवींना ते मानतात. शेतात खूप गवत माजले, तर ते ‘कणस्त्री’ ची प्रतिमा करून शेतात ठेवतात. विठोबाचे माळकरीही यांच्यात आढळतात. यांचा नवस आणि मंत्रतंत्रावर फार विश्वास असतो. त्यांच्या समाजात भगताचे महत्त्व असाधारण आहे.

कोळी पुरुष व मुलगी

यांचा व्यवसाय शेती व जंगलातले पदार्थ गोळा करण्याचा असतो. यांचे संस्कार म्हणजे प्रथम ऋतुदर्शनात मुलीची खणा-नारळाने ओटी भरतात. गरोदर स्त्रीचे ओटीभरण करीत नाहीत. स्त्रीचे पहिले बाळंतपण सासरी होते. बाळंतीण बाज वापरीत नाही. जमिनीवरच झोपते. मूल जन्माला आले, की त्याच्या अंगावर गार पाणी ओततात. त्याला ‘ओपसावणी’ म्हणतात. बाळंतिणीला बाजरीचे पीठ कातबोळ्याबरोबर शिजवून देतात. त्याने तिला दूध येते, अशी त्यांची समजूत आहे. पाचवीला साठीची पूजा करतात. जमलेल्या आप्तेष्टांत पाच भाकरी व चण्याच्या घुगऱ्या वाटतात. षष्ठीपूजनाच्या वेळी सावा धान्याच्या दोन राशी जमिनीवर ठेवतात. त्यांना देवता समजून हळद-कुंकू वाहतात. त्यांच्यापुढे भात आणि तीळ यांचे पाच लाडू ठेवतात. त्यांतला एक तीळ-तांदळाचा लाडू बाळंतीण घरातील मोरीला अर्पण करते. बाळंतिणीच्या खोलीत भिंतीवर अकरा मानवाकृती काढतात. त्यांत ‘बाहुला’ ऊर्फ ‘बळी’ नावाची एक आकृती असते. तिचे डोके शेंदराने काढतात आणि पूजा करतात. त्यांना दूध, दही, खेकडा यांचा नैवेद्य दाखवतात. मूल रांगू लागले, की पंचपावली करून गृहदेवतेची पूजा करतात. मुलाचे नाव दहाव्या दिवशी ठेवतात व जावळ काही महिन्यांनी काढतात. यांच्यात जावळ काढण्याचा समारंभ असतो. जावळ गुरुवार, शुक्रवार अगर रविवार या दिवशी काढतात. मूल पाऊल टाकू लागले, की पावलाच्या आकाराएवढ्या तांदळाच्या पिठाच्या पाच आकृत्या करून त्या उकडून काढतात व पाच शेजाऱ्यांना वाटतात.

मृताला ते जाळतात किंवा पुरतात. यांच्यात लग्न असगोत्र घराण्यांत होते. एवढेच नव्हे, तर विशिष्ट गोत्रांतच विवाह होतात असे दिसते. उदा., बांबळे गोत्रीयांचे लग्न गोडे, हिले, झांजरे, नाडकर आणि पिचड यांच्याशी होते. भरमल गोत्रीयांचे लग्न गबाळे, पेडेकर यांच्याशीच होते.

पूर्वी बालविवाह प्रचलित होता, परंतु अलीकडे सरासरी मुलाचे वय पंधरा-सोळा आणि मुलीचे त्याहून कमी असताना त्यांची लग्ने होतात. लग्न वडील माणसांमार्फत ठरते. मुलीचे देज देतात. प्रथम साखरपुडा होतो. लग्न मुलीच्या घरी मांडवात होते. ठाकूरांप्रमाणे महादेव कोळ्यांत लग्नाची गाणी गाणारी धवलारीण नसते. लग्नात खूपच बारीकसारीक विधी असतात. यांच्यात बहुपत्नीत्व रूढ आहे.

मल्हार कोळी : हे मल्हारीचे भक्त असल्यामुळे त्यांना हे नाव पडले. यांना पानभरी कोळी असेही म्हणतात. हे नाव त्यांच्या पाणी भरण्याच्या कामावरून पडले असावे. हे ठाणे, मुंबई व देशावर आढळतात. यांच्यात भोईर, जाधव, केरव, लांग, पोवार, शरणपाद, शेलार, सोज्वळ आणि वेखंडे ही नावे आढळतात. पंढरपुराजवळ पुष्कळ मल्हार कोळी येसकर (वेसकर) म्हणून आढळतात. अहमदनगर जिल्ह्यात बरेचजण शेती करतात. मराठेशाहीत सिंहगड, तोरणा व राजगड यांचे वंशपरंपरागत रक्षक (गडकरी) हे कोळीच होते. ठाणे जिल्ह्यात अनेक मल्हार कोळी कुणब्यांत समाविष्ट झाले. १९६१ च्या शिरगणतीप्रमाणे यांची लोकसंख्या ८९,०४७ होती.

सोनकोळी : मुंबई शहर व समुद्रकिनाऱ्याचा काही भाग यांमध्ये ही पोटजमात फार मोठ्या प्रमाणात आढळते. यांच्यात मामाच्या मुलीशी लग्न होऊ शकते. विधवाविवाहाची प्रथा आहे. सोडचिठ्ठी देतात. डोंगरकोळ्यांच्या घरी सोनकोळी जेवत नाहीत. जेजुरीच्या खंडोबाची ते पूजा करतात. मृतांस जाळतात अगर पुरतात. साथीने वा रोगांनी मेलेल्या माणसांस ते पुरतात. या जमातीच्या स्त्रिया घराची सर्व जबाबदारी सांभाळतात. यांच्यात स्त्रीला मानाचे स्थान आहे.


गुजराती कोळी : गुजरातमधल्या कोळ्यांवर राजपूत संस्कार आढळतात. काही कोळी राजपूतांप्रमाणे विधवाविवाह करीत नाहीत. गुजरातमध्ये यांची संख्या २२,८७९ (१९६१) होती. खेडा जिल्ह्यात कोळ्यांची संख्या फार आहे. पालनपूर, साबरकाठा व पंचमहाल येथे त्यांची वस्ती आहे. हे कोळी शूर पण प्रसंगी लूटमार करणारे, म्हणून ओळखले जातात.

त्यांची गोत्रे स्थलपरत्वे खाली दिल्याप्रमाणे आहेत :

(१) पालनपूर : ठाकरडा, कोळी. (२) महिकाठा : तळाबदा, चुनवालिया, पाटणवाडिया, चरोतरिया. (३) खेडा :खांट, बारिया, तळाबदा (कोतवाल, बारिया) पाटणवाडिया. (४) अहमदाबाद:तळाबदा ऊर्फ पटेलिया, ठाकरा व चुनवालिया. (५) पंचमहाल : खांट, बारिया व पटेलिया. (६) भडोच आणि सुरत : तळाबदा, मांघाता, रोरोरारिया ऊर्फ मानसोरोरारिया, बारिया, धाराळा, पाटणवाडिया, भाळिया, इंदोरिया, तळाबदा इत्यादी. यांतील खेड्यातल्या कोळ्यांचे साहचर्य माळव्यातल्या भिल्लांशी होते आणि ते ब्रिटिशांनाही जिंकायला भारी पडले.  

मध्य प्रदेशातील कोळी : रसेल व हिरालाल यांनी मध्य प्रदेशातील कोळ्यांचे भिल्लांशी अनेक बाबतींत साम्य आहे, असे म्हटले आहे. हे भिल्ल म्हणजे पश्चिम सातपुड्यातले– खानदेशातले– भिल्ल होत.

विदर्भातील व खानदेशातील कोळी याच वर्गातले आहेत. भिल्लांप्रमाणे यांनाही नाईक या सन्मानार्थ नावानेच हाक मारतात. वऱ्हाडात या कोळ्यांनी खिंडीचे रक्षण करण्याचे काम केलेले आहे. भिल्लांच्या प्रमाणेच कोळीही गुन्हेगार म्हणून या भागात ज्ञात होते. लोक त्यांना भीत असत. दरोडे घालणे, खून करणे वगैरे प्रकारांत ते पुढाकार घेत असत. निमाड जिल्ह्यात कोळ्यांची वस्ती पुष्कळ आहे. मध्य प्रदेशात कोळ्यांच्या पाच जाती आहेत : सूर्यवंशी, मल्हार, भिलावफोड, शिंगाडे व मुसलमान. सूर्यवंशी हे आपण राजपूत आहोत, असे म्हणतात. मल्हार ऊर्फ पानभरी हे मल्हारीचे पूजक असून महाराष्ट्रीय आहेत. हे बिब्बे फोडण्याचा धंदा करतात.

संदर्भ : 1. Enthoven, R. E. Tribes and Castes of Bombay, 3 Vols., Bombay, 1920 – 1922.

     2. Ghurye, G. S. The Mahadev Kolis, Bombay, 1957.

     3. Punekar, V. B. The Son Kolis of Bombay, Bombay, 1959.

  4. Russel, R. V. Hiralal, The Tribes and Castes of Central Provinces of India, 4

             Vols., London, 1916.

सिरसाळकर, पु. र.