भिल्ल : भारतातील लोकसंख्येने मोठी असलेली एक अनुसूचि जमा त. त्यांची वस्ती मुख्यत्वे कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र व त्रिपुरा या राज्यांत आढळते. अरवली, विंध्य व सातपुडा पर्वतांवरील दाट वन्य पठारे हे त्यांचे राहण्याचे मूळ ठिकाण होय. वैदिक वाङ्‍मयात भिल्लांचा उल्लेख निषाद म्हणून असल्याचे विद्वान मानतात. त्यांचा पौराणिक वाङ्‍मयातूनही उल्लेख आढळतो. भिल्ल हा शब्द विल्सन यांच्या मतानुसार द्राविडी भाषासमूहातील ‘विल्लू’ वा ‘बिल्लू’ (धनुष्यबाण) या शब्दापासून आलेला आहे. १९७१ च्या शिरगणतीनुसार भिल्लांची लोकसंख्या ५१,९९,०८६ इतकी होती. त्यांची भाषा भिल्ली असून तिच्या अनेक बोली भाषा आहेत. त्यांत अहिराणी, पावरी इ. बोली भाषा असून प्रादेशिक भाषांतील शब्दांची सरमिसळ झालेली आहे. भिल्ल गरासिया, ढोली भिल्ल, डुंगरी भिल्ल, नेवासी भिल्ल, ताडवी भिल्ल, रावळ भिल्ल, भिलाला, भिल्ल मीना इ. भिल्ल जमातीच्या पोट जमाती आहेत. भिल्ल प्रोटा-ऑस्ट्रलॉइड वंशातील असून काळसर वर्ण, लांबट डोके, चपटे नाक, गोल उभट चेहरा व मध्यम उंची ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये होत.

ते कायम स्वरूपाची प्राथमिक अवस्थेतील शेती करतात. त्याबरोबरच ते गुरे पाळणे, मासेमारी, शिकार, अन्नसंकलन व रोजंदारी हे पूरक व्यवसाय करतात. मका, गहू, ज्वारी, भात, बार्ली व कडधान्ये ही मुख्य पिके ते घेतात. बहुतांशी भिल्ल गाई, बैल, कोंबड्या, शेळ्या व बकऱ्या पाळतात. त्यांच्यासाठी राखीव कुरणेही असतात. मासेमारी, व कंदमुळे, पाने, फळे, मोहाची फुले गोळा करणे ही कामे विशेषतः स्त्रिया व मुले करतात. रान डुकरे, चित्ता वगैरेंची शिकार ते धनुष्यबाण आणि सापळा यांच्या साहाय्याने करतात. त्यांच्या आहारात सकाळी भात व कोद्री असून सायंकाळी भाकरी व कडधान्ये असतात. अंडी, कोंबडी, मासे, मांस यांचाही समावेश त्यांच्या आहारात असतो. गोमांस ते निषिद्ध मानतात. मोहाची दारू व ताडी ही त्यांची अत्यंत आवडती पेये असून स्त्री-पुरुष दोघेही ती पितात. टेकडीच्या उतारावर पाणी असलेल्या ठिकाणी ते वस्ती करतात. त्यांची घरे गटागटाने विखुरलेली आढळतात. माती, शेण, दगड, झाडाची पाने, बांबू, वाळलेले गवत यांच्या साहाय्याने ते घरे बांधतात, घरात तीन खोल्या व ओसरी असते. घरातील पुढील भागात गोठा, तर मागील बाजूस पाण्याची सोय असते. छोट्या घरांना पाल म्हणतात. पुरुषवर्ग कमरेपासून गुडघ्यापर्यंत धोतर नेसतो. स्त्रिया फालूपासून तयार केलेले कपडे व साडी-चोळीचा वापर करतात. स्थलकालपरत्वे त्यांच्या पोशाखात व चालीरीतीत आधुनिकता आली आहे.

स्त्री-पुरुषांना अलंकारांची खूप आवड आहे. पुरुष कानांत बाळ्या व हातात चांदीची कडी आणि अंगठी घालतात. स्त्रिया बांगड्या, हातातील कडे, कानांत चांदीच्या किंवा कथिलाच्या बाळ्या व वेल, नाकात नथ, गळ्यात काचमण्यांच्या, खड्यांच्या किंवा शिंपल्यांच्या माळा आणि हसली नावाचा चांदी वा कथिलाचा हार घालतात. या माळांनी त्यांचा सर्व उरोभाग झाकला जातो. पुरुष व स्त्रिया गोंदवून घेतात. धनुष्यबाण. मोठ्या सुऱ्या, गलोलातील दगड व निरनिराळे सापळे ही त्यांची शिकारीची प्रमुख साधने होत.

भिल्ल जमातीमध्ये दोन बहिर्विवाही अर्धके असतात. एका अर्धकातील लोक एकमेकाशी सपिंड म्हणजेच एकरेखीय पद्धतीने जखडलेले असतात. प्रत्येक अर्धकामध्ये अनेक बहिर्विवाही पितृसत्ताक कुळी असतात. कुळींची नावे गावांवरून किंवा गणचिन्हांपासून घेतलेली आढळतात. प्रत्येक कुळी ही अनेक बहिर्विवाही वंशावळींपासून झालेली असते. समाजातील प्रत्येक व्यक्ती वंशावळी, कुळी व अर्धक यांचा जन्मसिद्ध सभासद असतेच. वंशावळीत अनेक कुटुंबांचा समावेश असतो.

भिल्ल कुटुंबाला ‘वासिलु’ म्हणतात. त्यांच्यात पितृसत्ताक पण विभक्त कुटुंबपद्धती रूढ आहे. विवाहानंतर मुलगा पितृगृही राहतो. वयोवृद्ध पुरुषाच्या हाती कुटुंबातील सर्व सत्ता असते. कुटुंबातील व्यक्तींना कामाचे वाटप करणे, नित्य खर्चाची व्यवस्था लावणे ही त्याची महत्त्वाची कर्तव्ये होत.

गर्भाशयामध्ये पाचव्या महिन्यापासून जीव धरतो, या समजुतीमुळे गर्भपात हे निषिद्ध मानतात गर्भवतीच्या सहाव्या महिन्यापासून मूल तीन महिन्यांचे होईपर्यंत पतिपत्‍नींचे लैंगिक संबंध नसतात. प्रसूतीचे काम सुईण करते. प्रसूतीनंतर चार किंवा पाच दिवस जननाशौच पाळतात. पाचव्या दिवशी नामकरण करतात. पारंपारिक विवाह पद्धतीत वधूमूल्य देतात. या विवाह पद्धतीव्यतिरिक्त खालील पद्धतीने जोडीदार निवडतात : सेवा-विवाह, अदलाबदल विवाह, घुसखोरी विवाह, जबरी-विवाह इत्यादी. मध्य प्रदेशातील भिल्लांमध्ये बयव, नत्र, उदल किंवा आइवरई, घरजमाई, भगोरिया, घिज्जिलय व झगडा असे सहा विवाहप्रकार प्रचलित आहेत. तसेच विधवा/विधुर यांच्या विवाहात धाकटा दीर व मेहुणी यांचा विवाह मान्य असला, तरी बंधनकारक नाही. संततीसाठी बहुपत्‍नीत्‍वही आढळते पण पुरुष सर्वसाधारणतः मेहुणीशी किंवा तिच्या नात्यातील स्त्रीशी विवाह करतो.


१. भिल्लांचे वीरगळ, २. भिल्ल वैदू, रतनमाळ, मध्य प्रदेश. ३. भिल्ल कुटुंब, देदियपाडा. ४. जात्यावर दळणारी स्त्री, ५. घोडादेवाची प्रतिके, ६. भिल्ल युवक, ७. पारंपरिक दागिने घातलेली भिल्ल युवती, ८. अलिंद : भिल्लांची वस्ती, रतनमाळ, मध्य प्रदेश.


सपिंड विवाहपद्धतीचा गणगोत पद्धतीवर परिणाम झालेला दिसतो. उदा., आईचा भाऊ, आत्याचे यजमान व सासरे यांना ‘मामा’ म्हणून संबोधतात. धाकटा दीर व मोठी भावजय, पतीचा पत्‍नीच्या सर्व धाकट्या बहिणींशी सलगीसंबंध असतो मात्र थोरला दीर व धाकटी भावजय, सासूसासरे व जावई-सून यांच्या मध्ये वर्जनसंबंध असतो.

गावाच्या प्रमुखाला ‘वसावो’ म्हणतात. हे पद वंशपरंपरेने मिळते. सामाजिक व्यवस्थेचे नियमन करणे, देव-देवतांचे पूजन करणे ही वसावोची कामे होत.’पुंजारो’ (पुजारी) पूजा करण्याचे व औषधे देण्याची दोन्ही कामे करतो. सार्वजिक आपत्ती तसेच आजाराच्या काळात ‘भगता’ला विचारून कार्यवाही करितात. गावपंचायतीमध्ये गावातील वयस्कर व प्रतिष्ठित मंडळी असतात. गावातील तंटेबखेडे सोडविणे हे पंचायतीचे मुख्य काम असून परधान व कोतवाल वसावोच्या हुकूमांची अंमलबजावणी करतात.

भिल्ल जडप्राणवादी आहेत. भुताखेतांवर व आत्मा या कल्पनेवर त्यांचा विश्वास आहे. भुताखेतांना मातीची भांडी, मडकी, घोडे इ. अर्पण करतात. त्यांना कोंबडी, बकरी बळी देतात. त्यांच्यात पूर्वजपूजा रूढ आहे. हिंदूंमधील दिवाळी, दसरा व होळी हे सण आणि महादेव, राम, कालिका, इंद्राज इत्यादी देवतांना भजतात. याशिवाय महाराष्ट्र व गुजरातमध्ये डुंगऱ्या देव, शिवऱ्या देव इ. देवतांना भजतात. ढोल, पावरी व झांज यांच्या तालावर स्त्री-पुरुष नृत्य करतात.

मृताचे दहन करतात. मृत बालकास पुरतात. पतिपत्‍नींपैकी एकाचा मृत्यू झाल्यास, अंत्यविधीपूर्वी हयात असलेल्या जोडीदारास थोडा वेळ मृत व्यक्तिशेजारी झोपावे लागते. मृत व्यक्तीस गरम पाण्याने स्‍नान घालून नंतर मुखात नाणे ठेवतात. बाराव्या दिवशी आप्तांना व मित्रांना जेवण देतात. अशौच १४ दिवस पाळतात. बुरूडाकडून शिडी बनवून घेतात. या शिडीच्या आधाराने मृतात्मा स्वर्गात जातो, अशी त्यांची समजूत आहे.

स्वातंत्र्योत्तर भारतातील बदलत्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा भिल्लांच्या आदिवासी जीवनावर परिणाम झाला आहे. याशिवाय भारत सेवक, भिल्ल सेवा मंडळ आदी सामाजिक संस्थांनीही भिल्लांच्या आदिम जीवनात सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्‍न सुरू केले आहेत. त्यामुळे भिल्लांच्या पोषाखात तसेच राहणीमानात आमूलाग्र बदल घडत आहेत. अनेक भिल्ल मुले-मुली त्यांच्या प्रदेशातील प्राथमिक शाळांत जाऊ लागली आहेत तसेच भिल्लांमधील काही सुशिक्षितांनी जालोद (गुजरात) येथे १९५४ मध्ये आदिवासी भिल्ल पंच या नावाने एक परिषद भरविली आणि वधूमूल्याच्या रकमेवर नियंत्रण घातले. भिल्लांच्या विकासार्थ त्यांना वाजवी दराने कर्ज मिळावे, म्हणून काही को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायट्या निघाल्या आहेत तथापि या सुधारणांमुळे त्यांचे स्वच्छंदी जीवन व आदिवासी संस्कृती नष्ट होत आहे, अशी टीका व आरोप करण्यात येतो.

संदर्भ : 1. Bhowmik, L. K. Tribal India. Calcutta, 1971.

            2. Naik, T. B. Impact of Education on the Bhils. New Delhi, 1969.

            3. Naik, T. B. The Bhils : a Study, Delhi, 1956.

            4. Nath, Y. V. S. Bhils of Ratanmal, Baroda, 1960.

मांडके, म. बा.