लूबा : मध्य आफ्रिकेतील बांतू भाषा बोलणारा एक आदिम गट. त्यांना èबालुबा म्हणतात. झाईरे प्रजासत्तकाच्या आग्नेय भागात, विशेषतः विषुववृत्तीय जंगलात, लूबा जमाती व त्यांच्या उपजमाती यांची वस्ती आहे. १९७१ जनगणनेनुसार त्यांची लोकसंख्या सु. पंधरा लाख होती. अलीकडील पुरातत्त्वीय उत्खननांत उपलब्ध झालेल्या अवशेषांवरून त्यांचे वास्तव्य या प्रदेशात फार प्राचीन काळी असावे, असा तज्ञांचा कयास आहे. लूबा किव्ह्यू प्रदेशाच्या दक्षिण टोकापासून कासाई-ओरिएंटलच्या आग्नेय प्रदेशापर्यंत वसती करून राहिले आहेत. लूबांतील भिन्न जमतींची सांस्कृतिक आणि राजकीय वैशिष्ट्ये सारखी असून त्यांच्या शरीराची ठेवण उंच, मध्यम किंवा ठेंगणी असते आणि वर्णाने बहुतेक ते काळे असतात. मध्य आफ्रिकेत इ स. १५०० ते १८०० दरम्यान त्यांचे स्वतंत्र राज्य होते. ते लूबालूण्डा या नावाने प्रसिद्ध होते. त्यांपैकी लूबांची छोटी संस्थाने कासाई नदीच्या पूर्वेस लूआलाबा नदीच्या शीर्ष प्रवाहांच्या परिसरात वसली होती. त्यांच्या राजाला मुलोप्वे म्हणत. एकोणिसाव्या शतकात ही राज्ये मोडकळीस आली आणि यूरोपीयांच्या आफ्रिकेतील आगमनानंतर ती जवळजवळ संपुष्टातच आली. राजकीय दृष्ट्या लूबांचे तीन स्वतंत्र विभाग कल्पिण्यात येतात : लूंबा-शंकाजी (कटांगा), लूबा-बाम्वो (कासाई खोरे)आणि लूबा-हेम्बा (कटांगा वा किव्ह्यू). यांतील लूबा हे भाषिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या इतर काँगोंशी साधर्म्य दर्शवितात. लूबांत पूर्वी राजमातेचे प्रस्थ फार होते. यांच्यात मातृसत्ताक कुटुंबपध्दती रुढ असून वधूमूल्याची किंमत मोजावी लागे.

मध्य आफ्रिकेतील सॅव्हाना या गवताळ प्रदेशात आणि जंगलात वास्तव्य केल्यामुळे लूबांचा प्रमुख व्यवसाय शिकार असून त्यांपैकी काही लूबा जंगलातील पदार्थ गोळा करून विकतात व थोडी शेती करतात. मका व कॅसाव्हा ही त्यांची प्रमुख पिके होत. शेती व दुधासाठी थोडी गुरे पाळतात आणि एकच रस्ता असणाऱ्या लहान खेड्यांत झोपड्यांतून राहतात. काही लूबा काँगो नदी आणि तिच्या उपनद्या यांतून मच्छीमारी करतात. मुलांचा सुंता आणि मुलींचा दीक्षाविधी हे प्रमुख समारंभ असून वैद्यकीय व्यवसाय, मासेमारी व जादूटोणा यांकरिता संघटना आहेत. पाश्र्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे लूबा हे खाणींतून काम करू लागले आहेत. त्यांपैकी काहींनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यांच्यात पूर्वजपूजा, निसर्गपूजा रूढ असून प्रेतात्म्यांचे महत्त्व आहे. मानवी तसेच अमानवी कृतींना एक प्रकारची आत्मिक शक्ती मूलतःच असते तिच्या जोरावर सर्व व्यवहारांचे नियंत्रण होते, असा त्यांच्यात समज आहे. त्यांच्या साहित्यात युगाची कल्पना आणि युगचक्र या कल्पना आढळतात. लूबा हे उत्तम काष्ठशिल्पज्ञ असून त्यांच्या कलाकृतींत समारंभातील कलाकुसरयुक्त लाकडी तलवारी, शीर्ष विश्राम पट्ट आणि देव-देवतांच्या मूर्ती आढळतात.

संदर्भ : 1. Burton, W. F. P. Luba Religion and Magic in Custom and Belief, Toronto, 1961.

           2. Colle, R. P. Les Baluba, Two Vols., Brussels, 1913.

           3. Reefe, Thomas, The Rainbow and the Kings : A History of the Luba Empire to 1891, Berkely, 1981. 

देशपांडे, सु. र.