नायका : गुजरात व महाराष्ट्र राज्यांतील एक अनुसूचित जमात. त्यांची लोकसंख्या १,१९,७५५ होती (१९६१). हे नायका व नायकडा या दोन्हीही नावांनी प्रसिद्ध असून चोळीवाला नायका, कपाडिया नायका, मोट नायका व नाना नायका हे त्यांचेच पोटविभाग होत.

महाराष्ट्रातील बहुतेक नायका भिल्ली भाषा बोलतात. हे लोक बांबू अथवा कारवीपासून बांधलेल्या भिंतींच्या झोपड्यांत राहतात. भिंती शेणाने सारवलेल्या असतात. गायी-म्हशी घरातच बांधतात. पुरुष कमीज, धोतर व डोक्यास टोपी घालतात तर स्त्रिया लुगडे व चोळी (डग्‍ली) नेसतात. तरुण मुली कपाळ, हनुवटी, गाल व मनगटावर गोंदवून घेतात.

ते जरी मांसाहारी असले, तरी ज्वारी व कडधान्ये हे यांचे मुख्य अन्न असून ऋतुमानाप्रमाणे इतर फळे खातात मात्र गोमांस खात नाहीत. चहा हे त्यांचे आवडीचे पेय असून सणावारी ते दारू पितात, मुख्य व्यवसाय शेती हा असून लाकूडतोड, मध, डिंक व लाख संकलन करणे हे जोडधंदे ते करतात.

नायका भिल, बरोदिया, दोंड्या, दभडिया, कडरिया, कातकरी, गवित, नाईक, पवार, सवारे, ठोक्रे आणि वाघ या बहिर्विवाही कुळींत विभागली असून एकाच कुळात विवाह होत नाही. त्यांच्यात पितृसत्ताक कुटुंबपद्धती रूढ आहे. विवाहात वधूमूल्य घेतले जाते तसेच सेवाविवाह आणि घरघुशी पद्धतीचे विवाह मान्य आहेत. विधवाविवाहास मान्यता असून त्याला धार्मिक विधीची गरज नसते. मामाभाची तसेच मावस किंवा आते बहिणीशी विवाह निषिद्ध मानतात.

बाळंतपणाचा विटाळ बारा दिवस पाळतात. सामाजिक तंटे, घटस्फोट, चोरी वगैरे बाबी गावच्या पंचांकडून सोडविल्या जातात. बहुतेक नायका हिंदू असून मरिमाता, काकाबलिया व देवलिमाडी या त्यांच्या प्रमुख देवता आहेत. हिंदूचेच सण ते पाळतात. दिवाळी व होळी हे त्यांचे मुख्य सण आहेत. मृतांना पुरण्याची किंवा दहन करण्याची पद्धती आहे. लहान बालकांना पुरतात. त्याबद्दलचा धार्मिक विधी करण्याचा हक्क मोठ्या मुलास असतो.

भूतबाधा व जादूटोणा यांवर त्यांचा विश्वास असून या बाबतींत ते भगताचा सल्ला घेतात.

संदर्भ : The Maharashtra Census office, Census of India, 1961, Vol. X, Maharashtra, part V B, Scheduled Tribes in Maharashtra, Ethnographic Notes, Delhi, 1972.

 

मांडके, म. बा.